बऱ्याच लोकांना दिवास्वप्ने बघणे ही वेळेचा अपव्यय करणारी सवय वाटते. काही अंशी ते खरेदेखील असते. पण अनेक कलाकारांना आणि सृजनशील माणसांना ते वरदान ठरू शकते! जे ऑफिसमध्ये काम करतात त्यांना पिवळ्या ‘पोस्ट इट’ नोटची माहिती असेलच. जगभरातील ऑफिस स्टेशनरीमध्ये सर्वाधिक खप या ‘पोस्ट इट’चा असतो. या उपयुक्त गोष्टीचा शोध ‘आर्ट फ्राय’ या माणसाला लागला, तोही एका दिवास्वप्नात.
मा
गील लेखात (१५ मार्च)आपण स्वप्न म्हणजे काय? त्यांचा अर्थ आणि मेंदूचे काम याबद्दल सविस्तर माहिती घेतली. या लेखात स्वप्नांमुळे होणाऱ्या गंभीर आजारांची ओळख करून घेऊया.
जीम ओल्डन या पासष्ट वर्षीय गृहस्थाने माझ्या दवाखान्यात प्रवेश केला तेव्हा हा ऑर्थोपेडिक / ट्रॉमाचा रुग्ण चुकून तर माझ्याकडे आला नाही ना? अशी शंका वाटून गेली. त्याचा डावा पाय / घोटा यांना प्लास्टर होते आणि त्याला चालायला कुबडय़ांचा आधार घ्यावा लागत होता. उजवा डोळा काळा निळा पडला होता आणि हाताला बँडेज होते.
त्याची गोष्ट थोडक्यात अशी होती. अंधारात दोन अनोळखी माणसे त्याचा पाठलाग करत होती. एकाने पुढे वाकून त्याचा पाय पकडायचा प्रयत्न केला आणि याने जोराने लाथ मारली. दोन्ही हातांनी गुद्दागुद्दी करत निकराने लढत दिली. दुर्दैवाने पाय शेजारच्या दगडी िभतीला लागला आणि बेडवरून खाली पडल्याने डोळ्यांना इजा झाली. खरा प्रकार वाचकांच्या लक्षात आलाच असेल. जीमला घाबरवून सोडणारे स्वप्न पडले होते आणि त्यावर तो प्रतिक्रिया देत होता!
मागील लेखात रेम झोपेबद्दल सविस्तर माहिती होती. बरीच स्वप्ने रेम झोपेमध्येच पडतात पण निसर्गाची योजना इतकी बेमालूम असते की स्वप्ने पडत असताना, रेम झोपेमध्ये मेंदू उद्दीपित झाला असला (जागृत अवस्थेपेक्षा दीडपटीने जास्त!) तरी शरीर नुस्ते क्लांत (रिलॅक्स्ड) नसून शिथिल (पॅरालाइज्ड) असते. जीमच्या रेम स्लिपमध्ये बिघाड झाल्याने शरीर शिथिल होत नव्हते. स्नायू अजूनही कार्यरत होऊ शकत होते. प्रतिक्षिप्त क्रिया जागृत अवस्थेत असतात तशाच होत्या! परिणामी स्वप्नांचा दुष्परिणाम भोगणे प्राप्त झाले होते. या विकारास रेमरिलेटेड बिहेविअर्स डिसऑर्डर (आर.बी.डी.) असे नाव आहे. अनेक कारणांमुळे आर.बी.डी. उद्भवू शकतो. साधारणत: पन्नाशीनंतर याचे प्रमाण वाढते. काही औषधे घेतल्यावर आर.बी.डी. दिसून येतो. स्लीप अॅपनिया, पीरिऑडिक लेग मूव्हमेंट अशा झोपेतच होणाऱ्या विकारांनीदेखील आर.बी.डी. दिसू शकतो. पाíकन्सन्स या विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये आर.बी.डी.चे प्रमाण जास्त असते. किंबहुना पाíकन्सन्स होण्याच्या एक दशक अगोदर आर.बी.डी.चे तुरळक प्रसंग घडतात. या विकारात आपला कोणीतरी पाठलाग करत आहे अथवा धमकी देत आहे अशा तऱ्हेची पॅरॅनॉइड स्वप्ने पडतात.
आनंदाची बातमी म्हणजे या स्वप्न विकारावरदेखील उपाय आहेत! वेळीच काळजी घेतली तर जीमसारखी परिस्थिती उद्भवणारच नाही. निद्राविकार तज्ज्ञांकडून तपासून घेणे ही पहिली पायरी. पॉलीसोम्नोग्राम हा रात्रीची झोप अभ्यासण्याचा सगळ्यात उत्तम (गोल्डस्टँडर्ड) मार्ग. त्यानंतर आढळलेल्या प्रत्येक कारणावर उपाय करता येतो. क्लोनाझेपाम या औषधाचा वापर परिणामकारक ठरतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अशा व्यक्तींनी उंच खाटेवर न झोपता जमिनीवर बिछाना अंथरावा. आजूबाजूस काचेच्या अथवा धातूंच्या वस्तू ठेवू नयेत. रात्री मद्यपान करणे टाळावे.
अशा स्वप्नावस्थेत घडणाऱ्या प्रसंगांचा वापरदेखील काही गुन्हेगार मंडळी कोर्टात बचावासाठी करू शकतात. १९८४ मध्ये घडलेली सत्य घटना. डेनव्हर शहरातील एका सर्जनने रात्री आपल्या बायकोची हत्या केली. तिच्या देहाचे तुकडे करुन गोणीत भरले आणि स्विमिंग पूलच्या जवळ असलेल्या खोलीत ती गोण ठेवली. कोर्टामध्ये त्याने आर.बी.डी. असल्याचा दावा केला. आपण हे कृत्य जागेपणी केले नसल्याने निर्दोष असल्याचे त्याचे म्हणणे होते. सरकारतर्फे निद्रातज्ज्ञांनी उत्तम तपासणी करून (पॉलीसोम्नोग्राम) त्यांच्या दाव्यातील फोलपणा सिद्ध केला.
आर.ई.एम. (स्वप्न वा साखरझोप) आणि पुरुष िलगाचे आपोआप होणारे उद्दीपन यांचा महत्त्वाचा संबंध आहे. साधारणपणे वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून लहान मुलांचे झोपेमध्ये िलग ताठर होणे तुरळकपणे दिसू लागते. पौगंडावस्थेत त्याचे प्रमाण वाढते. याचा लैंगिक भावनेशी संबंध असेलच असे काही नाही. पण ज्यांना इरेक्टाइल डिसफंक्शनचा त्रास होतो आहे, त्यांच्याकरिता स्वप्नझोपेत होणारे हे बदल महत्त्वाचे ठरतात.
काही औषधांमुळे (उदा. मानसिक आजारांवर काम करणारी काही अँटीडिप्रेसंट) रेम झोपेवर परिणाम होतो आणि इरेक्टाइल डिसफंक्शनचा त्रास उद्भवतो. बऱ्याच वेळेला इरेक्टाइल डिसफंक्शनचा त्रास हा शारीरिक नसून मानसिक असतो. रात्रीच्या उत्तरार्धात रेम झोप जास्त असते याचा उल्लेख अगोदर केलेलाच आहे. म्हणूनच रात्रीऐवजी पहाटे कामक्रीडेची वेळ उत्तम ठरते.
दिवास्वप्न
आतापर्यंत आपण रात्री झोपेत पडलेल्या स्वप्नांचा विचार केला. दिवसाढवळ्या पडलेल्या स्वप्नांना दिवास्वप्न म्हणतात. मनोराज्ये आणि दिवास्वप्ने यात फरक आहे. एका तंद्रीत गेल्यावर जेव्हा दृश्ये पाहिल्याचा भास होतो याला दिवास्वप्न म्हणता येईल. दिवास्वप्ने आणि रात्रीची स्वप्ने यात ठळक फरक आहेत. जसे वय वाढत जाते तसे दिवास्वप्ने बघणे कमी होत जाते.
नॉर्थ कॅरोलाइना विद्यापीठात असलेल्या पिटर डेलानी यांनी त्याची कारणमीमांसा केली आहे. त्यांच्या मते दिवास्वप्ने ही भविष्यकाळासंदर्भात असतात. तरुण लोकांना आपण आयुष्यात सर्वशक्तिमान अथवा ‘हीरो’ (उदा. सचिन तेंडुलकर) होण्याची महत्त्वाकांक्षा असते. जसे वय वाढत जाते तशी ही शक्यता धुसर होत जाते आणि आपोआपच दिवास्वप्नांचे प्रमाण घटते.
मागील लेखांमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे रात्रीच्या स्वप्नांचा स्मरणशक्ती ‘बळकट’ होण्याकरता उपयोग होतो. याउलट दिवास्वप्नांमुळे आपण अगोदर करत असलेली कृती विसरली जातो! तसेच हे विस्मरणाचे प्रमाण दिवास्वप्न कुठल्या संदर्भात आहे यावर अवलंबून असते. उदा. जितकी भूतकाळातील गोष्ट, तितके विस्मरण जास्त! तसेच एखाद्या व्यक्तीला स्वत:ची सुट्टी जवळच्या ठिकाणाऐवजी परदेशात घालवल्याचे दिवास्वप्न पडले तर कामाचे विस्मरण जास्त होते. वास्तविक जीवनात ही बाब महत्त्वाची आहे. ज्या व्यक्ती स्मरणशक्तीबरोबर अवलंबून असतात. (उदा. नाटकात / सिरियलमध्ये काम करताना संवाद लक्षात ठेवणे.) त्यांना परदेशातील सफरीबद्दल दिवास्वप्न पडले तर पंचाईत व्हायची!
आपल्या मेंदूमध्ये विचार करणाऱ्या भागांचे दोन प्रकार असतात. काही भाग विश्लेषण (अॅनालिसिस) करतात तर काही भावनात्मक पद्धतीने विचार करतात. दिवास्वप्नांमध्ये मेंदूचा विश्लेषण (काथ्याकूट) करणारा भाग शिथिल असतो. रात्रीच्या स्वप्नांमध्ये असा शिथिलपणा दिसत नाही. जसा एखाद्या कॉम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर असते तसेच मन आणि मेंदू यांचा संबंध आहे. दिवास्वप्ने ही मेंदूच्या रचनेशी जास्त संलग्न असतात. जशी मेंदूची अंतर्गत साखळी बदलते तशी दिवास्वप्नेदेखील बदलतात!
बऱ्याच लोकांना दिवास्वप्ने बघणे हे वेळेचा अपव्यय करणारी सवय वाटते. काही अंशी ते खरेदेखील असते. पण अनेक कलाकारांना आणि सृजनशील माणसांना ते वरदान ठरू शकते! जे ऑफिसमध्ये काम करतात त्यांना पिवळ्या ‘पोस्ट इट’ नोटची माहिती असेलच. जगभरातील ऑफिस स्टेशनरीमध्ये सर्वाधिक खप या ‘पोस्ट इट’चा असतो. या उपयुक्त गोष्टीचा शोध ‘आर्ट फ्राय’ या माणसाला एक दिवास्वप्नात लागला. त्याचे झाले असे की दर रविवारी फ्राय चर्चमध्ये पाद्रय़ाचे प्रवचन ऐकायला जायचा. प्रार्थना पुस्तकातील गाणी सगळ्यांनी उभं राहून म्हणायची असतात. फ्राय हा धांदरट माणूस असल्याने त्याच्या पुस्तकातील बुकमार्क सारखे खाली पडायचे आणि बाकी माणसे प्रार्थना म्हणत असताना घाईघाईने पुस्तक चाळण्याचा आणि इतरांची नाराज नजर चुकवण्याचा प्रसंग वारंवार यायचा. ज्या थ्री एम या कंपनीत फ्राय काम करायचा, त्या कंपनीतील सिल्वर या शास्त्रज्ञाने अशा चिकट गोंदाचा शोध लावला होता की जो पटकन निघून जायचा. पण याचा व्यावहारिक उपयोग लक्षात आला नव्हता. फ्रायच्या दिवास्वप्नात बुकमार्कऐवजी हा नाजूक गोंद लावलेला कागद आला आणि या नोट्सचा जन्म झाला.
गेल्या चार लेखांत आपण स्वप्नांच्या दुनियेत होतो. पुढील लेखांमध्ये(१२ एप्रिल) ‘घोरणे’ आणि गाढ झोप यांच्या संबंधाबद्दल…
दिवास्वप्न
बऱ्याच लोकांना दिवास्वप्ने बघणे ही वेळेचा अपव्यय करणारी सवय वाटते. काही अंशी ते खरेदेखील असते. पण अनेक कलाकारांना आणि सृजनशील माणसांना ते वरदान ठरू शकते!
आणखी वाचा
First published on: 29-03-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daytime dreaming