ठाणे जिल्ह्य़ातील वाडा तालुका ही तिची कर्मभूमी ठरली आहे. शहरी भागातील शैक्षणिक सोयीसुविधांपासून वंचित असणाऱ्या येथील आदिवासी मुलांच्या सर्वागीण विकासासाठी ती प्रयत्नशील आहे. मदतीचे हात लाभलेही, पण प्रसंगी पदरमोड करून तिने या मुलांच्या कल्याणाचा वसा सोडला नाही. समाजातल्या एका उपेक्षित घटकाच्या विकासासाठी समर्पित झालेल्या अंजली वागणे हिच्या आगळ्या-वेगळ्या कर्तृत्वाविषयी..
राष्ट्रसेविका समितीच्या माध्यमातून ती प्रथमच ठाणे जिल्ह्य़ातील वाडय़ाच्या आश्रमशाळेत पोहोचली. तो होता २००७ चा जानेवारी महिना. शाळेची सुंदर वास्तू, तेथे शिकणारी अनेक बाल-किशोरवयीन आदिवासी मुलं, त्यांचे भाबडे, लुकलुकणारे तेजस्वी डोळे पाहून तत्क्षणी तिचं मन सांगू लागलं, ‘‘तुला समाजासाठी काहीतरी करायचंय ना? योग्य मार्ग सापडत नव्हता ना? बघ सुवर्णसंधी आहे.’’ मनाचा कौल शिरोधार्य मानून प्रथम वर्षभर ती अधूनमधून तेथे जाऊ लागली आणि आज शाळेतील मुलंच तिच्या जीवनाची संजीवनी आहेत. आयुष्यभरासाठी तिने या कामी बांधून घेतलं आहे.
ही सेवाव्रती अंजली वागळे. बारीक देहयष्टी, बोलण्यात ‘डेक्कन क्वीन’, तेवढीच हालचालीत चपळाई व सुसूत्रता पाहून मनात येतं, एवढी ऊर्जा ही आणते कुठून? रोज सकाळी स्वत:चा डबा घेऊन आश्रमशाळेतील मुलांच्या ओढीने बाहेर ती पडते. ‘कै. माधवराव काणे आश्रमशाळा, देवगाव’. भिवंडी-वाडा रस्त्यावर खुपरी स्टॉपवर उतरून ३ कि.मी. चालत गेल्यावर छोटय़ाशा देवगावातील ही आश्रमशाळा आहे. गेल्या १३-१४ वर्षांपासून सुरू असणाऱ्या या शाळेत आता ६६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग तसंच ११ वीच्या कला व विज्ञान या दोन शाखा इथे भरत आहेत. पुढच्या शैक्षणिक वर्षांत १२ वीचाही अभ्यासवर्ग सुरू होत आहे.
माजी आदिवासी विकासमंत्री व सध्याचे वाडय़ाचे आमदार विष्णू सावरा यांनी ही शाळा सुरू केली. एम.ए. आणि एम.एस्सी. पदवी असणारे उत्तम शिक्षक/शिक्षिका शाळेला लाभल्या आहेत. मात्र शैक्षणिक प्रगतीबरोबरच या मुलांचा सर्वागीण विकास व्हायला हवा, हा ध्यास अंजलीला लागला आणि कोणतंही मानधन न घेता ती हे काम करू लागली.
तिचा स्वत:चा जीवनपट व शिक्षणाचा आलेखही आगळावेगळा. आई-वडिलांचं छत्र लवकर हरपलं, पण शिकण्याची जिद्द होती. वयाच्या चाळिशीनंतर ती इतिहास विषय घेऊन एम.ए. झाली. नंतर दोन वर्षांची संस्कृत विषयाची पदविका उत्तीर्ण झाली. हे करतानाच तीन वर्षांचा पौरोहित्याचा कोर्स करून प्रत्येक वर्षी प्रथम क्रमांक पटकावला. शिवाय भरतकाम, संस्कारभारती रांगोळी, लग्न-मुंजी सजावट या सर्व कलांची तिला उपजत आवड व जाणही. म्हणूनच या मुलांनी तिला वेड लावलं नसतं तरच नवल! दोन-तीन तास प्रवास करावा लागला तरी चालेल, पण येथे रोज यायचंच हे तिने पक्कं ठरवलं.
प्रथम मुलांचा विश्वास बसावा, जिव्हाळा निर्माण व्हावा म्हणून कागदाच्या पिशव्या बनवायला शिकवलं. त्यासाठी ती ठाण्याहून रद्दी घेऊन जाऊ लागली. याचवेळी मुलांची भाषा शुद्ध व्हायला हवी, हे तिला जाणवलं. त्यासाठी ठोस उपाय हवा. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृत व मराठी विषयांच्या परीक्षेला मुलांना बसवायचं हे ठरलं. तिचं अध्यापन सुरू झालं तेव्हा मुलांच्या बुद्धीची चुणूक जाणवल्याने ती भारावून गेली. परीक्षेची फी ‘रोटरी क्लब ठाणे सेंट्रल’ यांच्याकडून तिने मिळविली. शहरी मुलांसारखी प्रलोभने, ऐषोआराम तेथे नसल्याने ही मुलं खूप छान प्रतिसाद देतात, हे ती आवर्जून सांगते. या सर्वाबरोबर तिने मुलांकडून ‘मधुराष्टकम्’, ‘नर्मदाष्टकम्’, पूर्ण ‘जनगणमन’ पाठ करून घेतलं आहे. ही मुलं संस्कृतमध्ये वाक्य तयार करतात, तेव्हाचा आनंद अवर्णनीयच, हे सांगताना तिची कळी खुलली होती. म्हणूनच दरवर्षी पहिल्या तीन नंबरांना ती स्वत: बक्षीस देते.
त्यांना वाचायची गोडी लागावी म्हणून आपला मोहरा तिने वाचनालयाकडे वळविला. तेथील वाचनालय अगदी जुजबी. लगेचच तिने ठाण्यातील अनेकजणांना आवाहन केलं. आज त्या वाचनालयात नानाविध वाङ्मयाची नवी कोरी १५०० पुस्तकं आहेत. वेगवेगळ्या युक्त्या वापरून त्यांची वाचनाची गोडी ती वाढवीत असते. मुलांना तिने ग्रंथालयाचं व्यवस्थापनही शिकवलं. या वेडाला काय म्हणावं?
आर्थिक साह्य़ कमी असल्याने शाळेचे गॅदरिंग होत नाही. तरी शिक्षकांच्या मदतीने ती अनेक सांस्कृतिक उपक्रमही करीत असते. मंगळागौरीचे खेळ, भोंडला, नाच यांनी वर्षभर मुलांना खूश ठेवीत असते. मुलांचा सर्वागीण विकास होण्यासाठी त्यांच्याकडून कागदी पिशव्या, भेटकार्ड, शुभेच्छा कार्ड करून घेऊन त्यांचं प्रदर्शनही ती ठाण्यात भरविते. तेही सर्व स्वकष्टाने, स्वखर्चाने. काही विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या परीक्षेला बसविण्याचाही तिचा मानस आहे. इतकंच नव्हे, स्वच्छतेचे महत्त्व त्यांना पटवून देऊन उत्तम आयुरारोग्याचा वसाही दिला आहे. गरजेच्या वेळी डॉ. विकास हजिरनीस यांच्याकडून आश्रमशाळेतल्या मुलांसाठी औषधही नेत असते. तसंच त्यांना लागणारे अभ्यासाचे साहित्य किंवा वसतिगृहासाठी लागणारं सामान गरज भासेल तसतसं पुरवीत असते. मध्ये मध्ये काही मुलींना ठाण्यात घेऊन येते व शहराची ओळखही करून देते. हे सर्व ती विनामूल्य करतेच, उलट अनेकदा पदरमोडही करते.
हे सर्व करायला तुला अर्थबळ कुठून मिळतं? यावर तिचं उत्तर ऐकून तिचा थक्क करणारा लोकसंग्रहच आपल्याला कळतो. ‘‘अहो, माझ्या पोटय़ापाण्यासाठी मी थोडं बहुत शिवणकाम करते. शिवाय माझी बहीण तर माझ्या पाठीशी उभी आहेच, अगदी आई-बाबांसारखी. धाकटी असूनही हे विशेष. शिवाय मी शब्द टाकायची खोटी, पैशाची आवक किंवा वस्तू अनेक मैत्रिणींकडून मिळतात. अपर्णा कुलकर्णी व निलिमा तांबे या दोघी तर केव्हाही व कसलीही मदत करायला तयार. अगदी शाळेत यायचीसुद्धा त्यांची तयारी असते.’’
‘‘शाळेत काही त्रास किंवा राजकारण नाही वाटत?’’ असं विचारल्यावर तिचं उत्तर, ‘‘मी कोठेच लक्ष घालत नाही.’’ मनात आलं, एरवी आपल्यावर अन्याय झाल्यास ‘माहितीचा अधिकार’ या बळावर झाशीच्या राणीसारखी लढणारी ही येथे कमळासारखी अलिप्त. भीत भीत मी मानधनाचा विषय काढला. तर खळखळून हसत म्हणाली, ‘‘अहो, मुलांचं निव्र्याज प्रेम हेच माझं मानधन. छान टपोरी-टपोरी बोरं, जांभळं, पेरू माझ्यासाठी ठेवतातच; पण खूप सारे गजरे मला स्वत: ओवून आणतात. एकीचा घातला की दुसरी रुसणार. म्हणून मी सहा-सहा गजरे डोक्यात मिरवीत असते आणि ठाणं आलं की हळूच त्यांना माझ्या ओंजळीत घेते.’’
‘‘अंजू, हाफ सेंच्युरी पूर्ण केलीस ती कशी साजरी केलीस गं?’’ या प्रश्नावर तर उत्साह ओसंडून वाहू लागला, ‘‘मला मदत करणाऱ्या सगळ्यांना मी गाडी करून माझी शाळा दाखवायला घेऊन गेले. छान गावरान शाही बेत होता. शिवाय शाळेतील सर्व मुलं व कर्मचारी वर्ग यांना स्वहस्ते घरच्या घरी नानकटाई करून नेली,’’ हे ऐकल्यावर मी निशब्दच झाले. क्षण दोन क्षण गेल्यावर म्हटलं, ‘‘किती किलो?’’ ‘‘३२ किलो नानकटाई. अर्थात शेजारच्या कस्तुरी भाभीने मदत केली.’’ मी म्हटलं, ‘‘माझ्याहून लहान आहेस, पण खरंच मी तुझ्या पाया पडते.’’
खरंच अंजू म्हणजे वादळ आहे. एवढं झंझावाती जीवन. दुसऱ्यासाठी झोकून देणं. कसलीही अपेक्षा न ठेवता. काय म्हणावं या समर्पणाला. तिची नम्रता आणि प्रामाणिकपणा तर अवर्णनीय! ‘‘अहो, शाळेतल्या शिक्षिका मला केवढा मान देतात. केवढं प्रेम करतात. माझा तेथे रोजच सत्कार होत असतो. मला लवकर निघायला मिळावं म्हणून त्या तास अॅडजेस्ट करून देतात. त्यांचं सहकार्य असतं तसंच ठाण्यातील सर्वचजण मदत करतात. म्हणून तर मी हे करू शकते. नाही म्हणायला ठाण्यातल्या ‘लायनेस क्लब’ने शिक्षक दिनानिमित्त माझा सत्कार केला. त्यानेच मला केवढा हुरूप आला.’’
मनात आलं, पवित्र नदीसारखी असलेली तिची जीवनसरिता अजूनही अनेकांचं जीवन फुलवीत राहणार यात शंकाच नाही. तिचे जिजाजी दुर्गेश परुळकर यांनी लिहिलेल्या कवितेतील ओळी आठवीतच मी उठले-
कर्मभूमी हो असे तिथेची वनवासी क्षेत्र
पाहुनी त्यांचे दु:ख तिचे पाणावे नेत्र।
ध्येय निष्ठा घेऊनी उरी एकटी चालली
सेवेचे हे व्रत आचरी आमची अंजली।।