तुमचे शरीर ब्रह्मांडापासून वेगळे नाही. प्रकृतीचे विस्तृत रूपच तुमच्या शरीरात आहे. हे समजून घ्यायला हवे, की आपले नाडीतंत्र केवळ आपला परिचय ऊर्जा आणि ज्ञानाशी करून देते, एवढेच नाही तर या संपूर्ण अद्भुत संरचनेमुळे आपण अनुरूप परिवर्तनही घडवू शकतो. त्यामुळे आपल्या शरीराला श्रेष्ठत्व प्राप्त होते. आपल्या शरीराची शक्ती आणि ऊर्जा संपूर्ण विश्वाच्या शक्तीशी आणि ऊर्जेशी जोडू शकतो. त्यामुळे सर्वच कामे सोपी आणि सहजतेने होऊ शकतात.
ध्यान आणि उद्देश या दोनच विशेष गोष्टींमुळे चेतना जागृत होत असते. ध्यानामुळे ऊर्जा आणि उद्देशामुळे गती निर्माण होत असते. जीवनातील ज्या बाबीवर तुम्ही ध्यान केंद्रित कराल, ती बाब अधिक सुदृढ होईल. ज्या बाबीवरून तुम्ही ध्यान हटवाल, ती बाब तुमच्या हातातून निसटून जाईल. आपल्या इच्छापूर्तीचा ‘मार्ग’, ‘उद्देश’ स्वत:च शोधून काढत असतो. म्हणजे ‘उद्देश’ स्वत:च इच्छापूर्ती करून घेत असतो. तसेच जर कोणी इतर आध्यात्मिक नियमांचे पालन करीत असेल, तर ज्या इच्छेवर ध्यान केंद्रित केले असेल, ती इच्छा पूर्ण होईल. हे कशामुळे शक्य आहे, असा विचार येईल, तर त्याचे उत्तर असे की, ध्यानाची जी सुपीक जमीन आहे, तिच्यात अनंत संयोजनशक्ती भरलेली आहे. अनंत संयोजनशक्ती म्हणजे अशी शक्ती, जी एकाच वेळी संपूर्ण घटनांचे अत्यंत कुशलपणे संयोजन करते. या अनंत शक्तीचे प्रतिरूप आपण गवताच्या प्रत्येक काडीत किंवा शरीराच्या प्रत्येक अणूमध्ये पाहू शकतो.
प्रकृतीची योजनाच अशी आहे की, प्रत्येक वस्तू एकदुसरीशी संबंधित असते. जेव्हा जमिनीच्या खाली राहणारे प्राणी जमिनीबाहेर पडू लागतात, तेव्हा वसंत ऋतूच्या आगमनाची सूचना देणारी ती क्रिया-प्रक्रिया आहे, असे समजावे. वर्षांतील काही ठरलेल्या दिवसांत पक्षी एका ठरावीक दिशेने जाऊ लागतात. ही प्रकृतीची एक लयबद्धताच म्हटली जाईल. या लयबद्धतेचा ताळमेळ आपोआप घातला जातो. त्यालाच क्रिया अथवा कर्म म्हणतात.
विशुद्ध सामर्थ्यांच्या प्रयत्नशील, निरंतर अतूट प्रवाहासाठी मूळ आधार तर तुमची इच्छाच आहे. तीच अप्रकट गोष्टीला प्रकट रूप देत असते. तुम्हाला फक्त एवढेच कायमसाठी लक्षात ठेवायला हवे, की तुम्ही तुमच्या हेतूला आणि उद्देशाला मानवजातीच्या कल्याणासाठीच वापरायचे आहे. हे शक्य आहे, पण अगोदर तुम्हाला सफलतेच्या आध्यात्मिक नियमांचे पालन करायला हवे.
इच्छेच्या मागे उद्देशाची वास्तविक शक्ती आहे. उद्देश आपला आपणच शक्तिशाली असतो. कारण उद्देशाला कसल्याही परिणामाची आशा नसते. इच्छा मात्र कमजोर असते. तसं पाहता उद्देश हादेखील एक प्रकारची इच्छाच असते. उद्देश सांगतो, की सर्व नियमांचे पालन करा. विशेष करून तो विरक्तीच्या नियमाचे पालन करायला सांगतो. विरक्तीचा नियम हाच सफलतेचा सहावा आध्यात्मिक नियम आहे. विरक्तीपूर्ण उद्देश तुम्हाला जीवनाशी जोडत असतो आणि वर्तमान स्थितीची जाणीव करून देत असतो. जेव्हा वर्तमान स्थितीबद्दल जागरूक राहून, कार्य केले जाते तेव्हा ते कार्य अधिक प्रभावशाली होत असते. तुमचे लक्ष जेव्हा भविष्याकडे लागलेले असते, तेव्हा तुमचे ध्यान वर्तमानाकडे असते. तुमचे ध्यान वर्तमानाकडे असेल, तर तुम्ही भविष्यासाठी केलेला हेतू पूर्ण होईल. कारण भविष्याची निर्मिती वर्तमानातूनच होत असते. म्हणून वर्तमान जसे असेल, तसेच स्वीकारले पाहिजे. वर्तमान स्वीकारल्यानंतरच भविष्याचा विचार करून, त्याकडे ध्यान दिले पाहिजे. विरक्तीपूर्ण उद्देशाद्वारेच भविष्याची निर्मिती होत असते.
वर्तमान, भूत आणि भविष्य या तिन्ही गोष्टींना चेतनेची तत्त्वे असेच म्हटलेले आहे. भूतकाळ म्हणजे जुन्या आठवणी असतात, तर भविष्य म्हणजे अगोदरच काही अनुमान केलेले असते. वर्तमान म्हणजे जागरुकताच असते. म्हणूनच काळ (समय) विचारांची गती आहे. भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोन्ही बाबी कल्पनेतूनच जन्म घेतात. केवळ वर्तमानच जागरूक असते. तेच सत्य आणि शाश्वत असते. काळ आणि ऊर्जा यांच्यासाठी वर्तमान हेच सामथ्र्य असते. उष्णता, प्रकाश, वीज, चुंबकत्व किंवा गुरुत्वाकर्षण या सगळ्या बाबी अस्तित्वात असतात, पण त्या अदृश्य असतात. त्यांची प्रचीती याच सामर्थ्यांतून येते. या गोष्टी भूतकाळात राहात नाहीत आणि भविष्यकाळातही राहात नसतात. तेच फक्त वर्तमान होय.
जर तुमचे जीवन वर्तमानाबाबत जागरूक असेल, तर काल्पनिक अडथळे संपून जातील. कारण ९९ टक्के अडथळे काल्पनिकच असतात. उरलेल्या अडथळ्यांना योग्य उद्देशाच्या साह्य़ाने, योग्य संधीत बदलता येऊ शकते. एकच एक उद्देश ध्यानाचे वैशिष्टय़ असे असते, की ज्याचे लक्ष कधीच बदलत नसते. उलट ते एकाच बाजूला केंद्रित राहते. त्याचा अर्थ, तुम्ही कोणत्याही प्रकारच्या अडथळ्याला काहीच मानू नये, अडथळ्यांसमोर वाकू नये आणि आपली एकाग्रता जेवढी शक्य होईल, तेवढी टिकवून ठेवावी. तुम्ही आपल्या चेतनेद्वारे प्रत्येक प्रकारचा अडथळा दूर करू शकता. एकाग्रचित्त झाल्यामुळे तुम्ही एकाच उद्देशावर टिकून राहाल. कोणत्याही प्रकारच्या दु:खामुळे किंवा अडथळ्यामुळे घाबरणार नाही. हीच विरक्त जागरुकतेची आणि केंद्रित उद्देशाची शक्ती आहे. ती निरंतर गतिमानच राहते.
उद्देशाची शक्ती वापरल्यास तुम्ही जी इच्छा कराल, ती पूर्ण होईल. तुम्ही प्रयत्नांद्वारेच आपल्याला हवा तसा परिणाम घडवू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. त्याच्या बदल्यात तणाव, हृदयाघात आणि संक्रमण पद्धतीशी समझोताही करावा लागेल. या सर्व बाबींना इच्छा आणि उद्देशाच्या नियमांमध्ये ठेवायला पाहिजे. जेव्हा त्यांचा वापर तुम्ही इच्छांच्या पूर्ततेसाठी कराल, तेव्हा उद्देश स्वत:च आपली शक्ती निर्माण करू शकेल.
१. स्वत:ला काही काळापर्यंत मौनात ठेवा. म्हणजे तुम्ही बाकीचे विचार बाजूला ठेवून, मौन धारण करून आपल्या वास्तव अवस्थेला ओळखण्याचा प्रयत्न करा.
२. आपली वास्तव स्थिती ओळखण्यासाठी तुम्ही तुमच्या इच्छांना आणि आकांक्षांना स्वतंत्र करून टाका. जेव्हा तुम्ही मौन अवस्थेत असाल, तेव्हा कोणताच उद्देश किंवा विचार राहणार नाही, परंतु जेव्हा तुम्ही मौन अवस्थेतून बाहेर पडाल, तेव्हा विचार आणि मौन एकमेकांच्या संपर्कात येतील आणि तेव्हाच तुमच्या उद्देशाशी परिचय होईल. जर तुमचे अनेक हेतू असतील, तर पुन्हा दुसऱ्यांदा मौनावस्थेत जाण्याच्या अगोदर त्या हेतूंवर ध्यान केंद्रित करा. जर तुम्ही एक सफल व्यवसाय करू इच्छित असाल तर उदाहरण म्हणून तुम्ही त्या उद्देशाबरोबच मौनही धारण करा. तेव्हा तुम्हाला कळेल, की तो उद्देश तुमच्या जाणिवांमध्ये आधीपासूनच लपलेला होता. आपल्या इच्छांना आणि उद्देशांना मौनाच्या अवस्थेत स्वतंत्र करा. त्याचा अर्थ योग्य ठिकाणी उद्देशांची मशागत करा, म्हणजे योग्य वेळी त्याचे फळ तुम्हाला मिळेल.
३. आत्मनिरीक्षणाच्या स्थितीत राहा, म्हणजे तुम्ही तुमच्या आत्म्याच्या खऱ्या बाजू ओळखून घ्या. गरज लागल्यास तुम्ही तुम्हालाच लोकांच्या नजरेतून पाहा. मात्र दुसऱ्यांच्या विचारांचा परिणाम आणि टीकेचा अवास्तव परिणाम होऊ देऊ नका. आत्मनिरीक्षणाचा खरा अर्थ असा आहे, की तुम्ही स्वत:च तुमच्या इच्छा ओळखून घ्या. अन्य कोणाशीही त्याबद्दल चर्चा करू नका.
४. फळाची अपेक्षा ठेवू नका. नावीन्याची कास धरा. त्याच हेतूने जीवन कंठित करा. याचा अर्थ असा, की तुम्ही जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा. त्याचा परिणाम काय होईल, याची चिंता न करता.
५. सृष्टी आपल्या विस्तारावर नियंत्रण करते, ते तिला करू द्या. जेव्हा तुम्ही तुमच्या विचारात स्थिरता आणाल, तेव्हा तुमच्या इच्छा आणि आकांक्षांमध्ये संयोजनाची अद्भुत शक्ती उत्पन्न होईल. त्या शक्तीवर विश्वास ठेवून तुमच्या साध्याबाबत निश्चिंत व्हा. योग्य वेळी संपूर्ण विश्व एकत्रितपणे तुमच्या इच्छापूर्तीचा योग जुळवून आणेल.
उद्देश आणि इच्छा यांच्या नियमांचे तुमच्या जीवनात योग्य व सहजरीतीने पालन करायचे असेल, तर खाली दर्शविलेल्या गोष्टींकडे ध्यान द्या.
१. माझ्या सर्व इच्छांची एक यादी मी तयार करीन. जेथे जाईन तेथे ती यादी माझ्यासोबतच ठेवीन. मौन आणि ध्यानाच्या अवस्थेत जाण्याच्या अगोदर रात्री झोपण्यापूर्वी त्या यादीवर एकदा दृष्टी फिरवीन. दररोज सकाळी उठल्यावरदेखील त्या यादीवर दृष्टी फिरवीन.
२. माझ्या इच्छांना मुक्त करून टाकीन. इच्छांच्या पूर्ती होईल यावर मी माझा विश्वास कायम ठेवीन. त्यामागेदेखील तसेच कारण आहे. कदाचित प्रकृतीनेच माझ्यासाठी त्यापेक्षाही काही अधिक करून ठेवलेले असेल.
३. आपल्या प्रत्येक कामामध्ये वर्तमानाबाबतची सतर्कता बाळगेन, वर्तमान क्षणांतील निराशाजनक अडथळ्यांपुढे मी हार मानणार नाही. माझे ध्यान विचलित होऊ देणार नाही.
(‘सफलतेचे सात आध्यात्मिक नियम’ या साकेत प्रकाशनाच्या, विद्याधर सदावर्ते यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकातील हा संपादित भाग, साभार)
इच्छापूर्ती
तुमचे शरीर ब्रह्मांडापासून वेगळे नाही. प्रकृतीचे विस्तृत रूपच तुमच्या शरीरात आहे. हे समजून घ्यायला हवे, की आपले नाडीतंत्र केवळ आपला परिचय ऊर्जा आणि ज्ञानाशी करून देते, एवढेच नाही तर या संपूर्ण अद्भुत संरचनेमुळे आपण अनुरूप परिवर्तनही घडवू शकतो.
आणखी वाचा
First published on: 22-12-2012 at 05:06 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepak chopras fulfillment of desire