‘काळजी घ्या’ असा मेसेज मिळाला आणि समीराच्या मनात पाल चुकचुकली. ती धावत खाली आली. तेवढय़ात एक माणूस ऑफिसच्या भिंतीवरून पाण्यात उडी मारताना तिला दिसला. आता मात्र तिला धोक्याची जाणीव झाली..
समीरा खूप आनंदात होती. हातात निवडीचं पत्र घेऊन ती धावतच घरी आली. त्या आनंदात आईला गरगर फिरवून तिने आपली भारतीय तटरक्षक दलात निवड झाल्याचं सांगितलं आणि घरातले सगळेच खूप खूश झाले. त्यांच्यासाठीही हा भाग्याचा क्षण होता.
लहानपणापासूनच संरक्षण दलात जाण्याचं ती स्वप्न बघत होती आणि या वर्षीपासून प्रथमच संरक्षण दलात स्त्रियांना प्रवेश देण्यात आला होता. तिने अर्जही भरून टाकला.
समीरा आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. अतिशय लाडाकोडात वाढलेली. आपल्या मुलीला असं आयुष्य झेपेल की नाही याची त्यांना काळजी वाटत होती, पण समीरा फारच आग्रही व निश्चयी होती.
तटरक्षक दलातली पहिली लेडी ऑफिसर म्हणून तिची निवड झाल्याने तिच्याकडे बघण्याची सगळ्यांची नजर कौतुकभरली होती. पांढराशुभ्र युनिफॉर्म घालून त्यावर ऐटदार कॅप घातली की आपोआपच राणीची ऐट तिच्यात यायची. सारं जग जिंकल्याची भावना निर्माण व्हायची, पण खांद्यावरच्या स्ट्रिप्स बघून मात्र ती लगेच जमिनीवर यायची. त्या तिच्यात जबाबदारीची जाणीव निर्माण करायच्या..
”Assistant commandant Sameera reporting sir.”  छानसा सॅल्युट करून तिने आपले अधिकारी कमांडंट गुप्ता यांना आपली ओळख करून दिली. त्यांनी तिचा सॅल्युट स्वीकारीत तिच्या हातात एक फाइल दिली आणि सांगितलं, ‘चला, कामाला लागा.’ हळूहळू तिने सारं काम शिकून घेतलं. २-३ महिन्यांतच तिचं काम वाखाणण्यासारखं होऊ लागलं. जबाबदारी वाढायला लागली.
..त्या दिवशी समीरा डय़ुटीवर होती. तिने घरी फोन करून आईला आपण घरी येणार नसल्याचं सांगितलं व आपल्या केबिनमध्ये आली. सेलरना तिने आवश्यक त्या सूचना दिल्या. संपूर्ण ऑफिसची पाहणी करून आपला राऊंड संपविण्याच्या बेतात असताना अचानक तिला समुद्राच्या दिशेने पोहत येऊन कोणीतरी आपल्या ऑफिसच्या कुंपणावरून चढून आत येण्याचा प्रयत्न करीत असल्याचं दिसतं.
एवढय़ात फोन खणखणला. दिल्ली मुख्य कार्यालयातून फोन होता. सेलिंग करणाऱ्या बोटीसंदर्भात एक निरोप होता.
 -कोस्ट गार्डच्या शिपने पाच मच्छीमारांना वाचवलं व त्यांच्या बोटीतल्या मालाचं बोटीसहित रक्षण करून त्यांना वादळी वातावरणातून सहीसलामत मुंबईच्या किनाऱ्यावर आणलं होतं.- या संदर्भात मुख्यालयाला कळविण्याचं काम डय़ुटी ऑफिसर म्हणून ती करीत असताना तिला ही बोट ज्यांच्या ताब्यातून वाचवली आहे त्या स्मगलर्सपासून धोका निर्माण होऊ शकतो, तेव्हा ‘काळजी घ्या’ असा मेसेज मिळाला. आणि समीराच्या मनात पाल चुकचुकली. ती धावत खाली आली. तेवढय़ात एक माणूस ऑफिसच्या भिंतीवरून पाण्यात उडी मारताना तिला दिसला. आता मात्र तिला धोक्याची जाणीव झाली..
तिने तातडीची बैठक घेऊन उपस्थित सहकाऱ्यांना मुंबई रिजनल हेडक्वार्टर  काळजीपूर्वक तपासायला सांगितले, चला लवकर. कामाला लागा आणि यशस्वी होऊनच परता.’’ असं सांगून स्वत: ऑफिसच्या राऊंडसाठी सज्ज झाली.
एक कर्मचारी तिला उभा दिसला. तिने विचारले, ‘तू घरी का नाही गेलास, एवढा उशीर का झाला, तेव्हा त्याने बाथरूम दुरुस्तीचं काम करून घ्यायचं होतं म्हणून थांबलो होतो, असं सांगितलं. तिने सगळ्यांना त्या परिसराची पाहणी करायला सांगितले.
कमांडर ऑफ कोस्टल गार्डची तिथं केबिन असल्याने सारी महत्त्वाची कागदपत्रं अतिमहत्त्वाचे दस्तऐवज, संरक्षण दलाची संपत्ती तिथं होती. त्यांच्या सुरक्षिततेचा विचार मनात घोळत असताना मुख्य अधिकारी प्रसाद यांनी बॉम्ब असल्याचा संदेश मिळाल्याचं सांगितलं आणि समीरा विजेच्या चपळाईने कामाला लागली.
भराभर तिने फोन करून आपल्या अधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली. अग्निशमन दलाला पाचारण केलंच, पण लगेचच बॉम्ब निकामी करणाऱ्या टीमला र्अजटचा मेसेजही दिला.
सगळ्या कर्मचाऱ्यांना भराभर ऑफिसबाहेर येण्याच्या सूचना दिल्या व स्वत: बॉम्बची जागा दाखविण्यासाठी तत्परतेने उभी राहिली. दोन मिनिटांचा फरक पडला. बॉम्ब निकामी केले गेले व संपूर्ण रिजनल हेड क्वार्टरची हानी होता होता वाचली.
आपल्या अधिकाऱ्याने किती मोठे नुकसान होण्यापासून आम्हाला वाचविले आहे हे बॉसला सांगताना तिच्या कर्मचाऱ्यांचे शब्द अपुरे पडत होते. आणि तिचं हे कर्तृत्व ऐकताना आई-वडिलांचे डोळे पाण्याने भरले होते.
दुसऱ्या दिवशी ब्रिफिंगमध्ये समीराला ऑफिसर इनचार्ज व ऑफिसरने मनापासून सॅल्युट केला त्या वेळी अभिमानाने ओथंबलेली समीरा ताठ मानेने म्हणाली, ‘इटस् माय डय़ुटी सर’.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा