निरंजन मेढेकर
अनेक लग्नांमध्ये जोडीदारांमधल्या वादाचं मूळ हे लैंगिक संबंधांमधल्या असमाधानात असतं. याचं कारण शरीरसंबंधांची पुरेशी माहिती नसणं आणि त्याचबरोबरीनं त्याच्याविषयीचे गैरसमज असणे. त्यामुळे काही वेळा यासंदर्भात अवास्तव अपेक्षाही केल्या जातात, जसं की हिंदी सिनेमानं अतिलोकप्रिय केलेली ‘सुहागरात’ किंवा ‘पॉर्न’ फिल्म्समधल्या काल्पनिक गोष्टी खऱ्या वाटणं. दीर्घ आणि कायमचं संसारसुख मिळवायचं असेल तर लग्नाआधीच शरीरसंबंधांची पूर्ण माहिती करून घेणं आवश्यक आहे.
मराठवाडय़ातल्या एका छोटय़ा गावातून हणमंतराव आपल्या २५ वर्षांच्या मुलाला- विजयला घेऊन बीडमध्ये सेक्सॉलॉजिस्ट डॉ. अनिकेत कुलकर्णी यांच्याकडे आले तेव्हा त्यांचं बापाचं काळीज काळजीनं, तर विजयचं न्यूनगंडानं पोखरलेलं होतं. हणमंतराव मुलासाठी स्थळं बघत होते, पण मुलाला लग्नच करायचं नव्हतं. लग्न न करण्यामागे करिअर किंवा बाकी कुठलं कारण नव्हतं, तर विजयच्या मनातली भीती होती. आपलं लिंग ‘पॉर्न’मध्ये दाखवतात तसं नसून दबलेलं आहे, त्यामुळे आपण पत्नीला कधीच सुख देऊ शकत नाही, असा विजयचा ठाम समज होता.
डॉ. अनिकेत यांनी जेव्हा त्याची तपासणी केली तेव्हा तो अगदी सुदृढ आणि निरोगी असून, या स्वत:बाबतच्या चुकीच्या समजापायी लग्न न करण्याचा निर्णय कसा अयोग्य आहे, हे त्यांनी त्याला समजावून सांगितलं. हणमंतरावांनी वाट वाकडी करत आणि बाप-मुलातल्या नात्यात विनाकारण असलेला संकोच बाजूला सारत विजयला सेक्सॉलॉजिस्टकडे वेळीच आणलं म्हणून ठीक. पण दुर्दैवानं अशी असंख्य मुलं-मुली आहेत ज्यांना असं कोणतंही विवाहपूर्व माहिती वा समुपदेशन मिळत नाही आणि त्यामुळे आयुष्यभर ते कुठल्या ना कुठल्या न्यूनतेत जगत राहतात. म्हणूनच लग्नापूर्वी शरीरसंबंधांची नीट माहिती करून घेणं आवश्यक आहे.
आपल्या समाजात आजही लग्न ठरवताना दोघांचं करिअर आणि आवडीनिवडीशिवाय जात, पोटजात, पत्रिकेपासून, स्वत:चं घर आहे का, गाडी आहे का, इथपासून ते लग्नातला मानपान, देणंघेणं अशा (अनावश्यक!) गोष्टींचाच प्रामुख्यानं विचार केला जातो. पण लैंगिकदृष्टय़ा दोघं एकमेकांना पूरक आहेत का, मुळात दोघांचे सहजीवनासंदर्भातले, कामजीवनासंदर्भातले नेमके विचार काय आहेत, एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा, गरजा, फँटसी काय आहेत, याचा काडीचाही विचार केला जात नाही. एक वेळ हे मुद्दे ‘बोल्ड’ वाटत असले तर बाजूला ठेवू या. पण आज एकविसाव्या शतकातही कुटुंब नियोजनाविषयी, लग्नानंतर मूल होऊ द्यायचं की नाही? उत्तर होकारार्थी असल्यास किती वर्षांनी होऊ द्यायचं? एक मूल होऊ द्यायचं की दोन मुलं होऊ द्यायची? मुलांची जबाबदारी कशी विभागून घ्यायची? करिअरमध्ये काही काळासाठी ब्रेक घ्यायचा झाल्यास तो कुणी घ्यायचा? यावर किती जोडपी लग्नाआधी मोकळेपणानं चर्चा करतात हा प्रश्नच आहे. या सगळय़ा प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याची, मुळात हे प्रश्न लग्न करण्याआधी आपल्याला पडायला हवेत याची जाणीव किती जणांना असते? यामुळेच लग्नाळू तरुणाईनं सहजीवनाला आणि कामजीवनालाही आकार देण्यासाठी असं समुपदेशन घेणं आवश्यक ठरतं.
अमेरिकेतील ‘फॅमिली रिलेशन्स’ या जर्नलमध्ये २००३ मध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार जी जोडपी विवाहपूर्व समुपदेशन घेतात त्यांचं संसारसुख हे असं समुपदेशन न घेणाऱ्या जोडप्यांच्या तुलनेत ३० टक्क्यांहून अधिक असल्याचं आढळून आलं. डॉ. अनिकेत सांगत होते,‘‘लैंगिकता शिक्षण आणि विवाहपूर्व समुपदेशनाच्या संपूर्ण अभावामुळे उद्भवणाऱ्या लैंगिक समस्यांचं स्वरूप ग्रामीण भागात गंभीर आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री समागम झालाच पाहिजे हा पुरुषांचा बऱ्याचदा अट्टहास असतो. त्यामुळेच त्यात अपयश आलं की संबंधांबद्दल विनाकारण भीती बसते. माझ्याकडे एक उच्चशिक्षित जोडपं उपचारांसाठी आलं होतं. हनीमूनला प्रयत्न करूनही संभोग जमला नाही, तेव्हा त्यानंतर त्यांनी शरीरसंबंध प्रस्थापित करणंच सोडून दिलं. लहानपणी सायकल जशी आपण चुकतमाकत शिकतो, तसंच कामजीवनाची घडी ही हळूहळू बसते हे जोडप्यांनी समजून घेतलं पाहिजे.’’
‘विवाहपूर्व समुपदेशन- वैवाहिक प्रगल्भतेसाठी मानसशास्त्रीय विवेचन’ या पुस्तकात ‘विवाहपूर्व समुपदेशन कार्यशाळा : शंकासमाधान’ या प्रकरणात डॉ. सविता देशपांडे लिहितात, ‘कोणत्याही घरात मुलाचा किंवा मुलीचा विवाह ठरला, की विवाहाच्या मुहूर्ताची वेळ येईपर्यंत धावपळ आणि तयारी चालूच राहते. पण ही तयारी विवाहसमारंभ उत्तम साजरा करण्यासाठी असते. प्रत्यक्ष विवाहानंतरच्या आयुष्यासाठीची काहीच तयारी केली जात नाही. अनेक संशोधनांतून असं जाणवलं आहे, की विवाहानंतरच्या आयुष्यासाठीची तयारी केलेले विवाह सहसा अयशस्वी होत नाहीत. अर्थात त्यांच्या आयुष्यात समस्या, पेचप्रसंग येत नाहीत असं नाही, मात्र आयुष्यात निर्माण झालेलं नैराश्य, अडचणी इत्यादींना तोंड द्यायला दाम्पत्यं समर्थपणे तयार झालेली असतात.’
लैंगिकता शिक्षणाच्या आणि विवाहपूर्व समुपदेशनाच्या अभावामुळे केवळ स्त्रियांनाच नाही, तर पुरुषांनाही कसा त्रास सहन करावा लागतो, याचं उदाहरण सेक्सॉलॉजिस्ट आणि गायनॅकॉलॉजिस्ट डॉ. नीलिमा देशपांडे यांनी दिलं. अनू आणि श्रेयस या दोघांची एकमेकांशी लहानपणापासून ओळख असल्यानं आणि आता ते दोघंही उच्चशिक्षित असल्यामुळे एकमेकांना अगदी अनुरूप ठरतील, असा विचार करत घरच्यांनी त्यांचं लग्न लावून दिलं. मात्र अनूला शरीरसंबंधांबद्दल काहीच माहिती नव्हती. याविषयी मुलीशी कसं बोलायचं, म्हणून आईनंही तिला याबद्दल कधी काही सांगितलं नव्हतं. आज लग्नाला दहा वर्ष लोटल्यावर त्यांना दोन मुलं आहेत, पण त्यांच्यात अजून एकदाही समागम झालेला नाही. ही बाब स्पष्ट करताना देशपांडे सांगतात, ‘‘प्रणय-संभोगाबद्दल लग्नाआधी आणि लग्नानंतरही ‘ब्र’ही न काढण्याच्या वृत्तीमुळे अनेक स्त्री-पुरुष आयुष्यभर शरीरसुखाची उपेक्षा सहन करत जगतात. अनू आणि श्रेयसच्या उदाहरणात श्रेयसची कामेच्छा अनू कधी समजूनच घेऊ शकली नाही. या जोडप्यात प्रत्यक्ष समागम न होता ‘स्प्लॅश प्रेग्नन्सी’मुळे गर्भधारणा राहिली.’’ ‘स्प्लॅश प्रेग्नन्सी’ म्हणजे जोडप्यात प्रत्यक्ष संभोग घडत नाही, तर स्त्रीच्या मांडय़ांमध्ये किंवा योनीओठांवर वीर्यस्खलन होतं आणि त्या वीर्याचा काही अंश गर्भाशयापर्यंत गेल्यामुळे गर्भधारणा राहते.
स्वत:च्या लैंगिक इच्छा, गरजांची स्वत:लाच पुरेशी ओळख नसल्यानं मोडलेल्या एका लग्नाची गोष्ट मॅरेज काऊन्सिलर शर्मिला पुराणिक सांगतात. ‘‘माझ्या पाहण्यातलं हे जोडपं उच्चशिक्षित होतं आणि त्यांचा ठरवून विवाह होणार होता. पण लग्नाआधी भावी नवरदेवानं या मुलीला स्पष्ट केलं, की तो चोवीस तास ‘ऑन’ असतो आणि त्यामुळे तो कधीही लैंगिक सुखाची मागणी करू शकतो. वधूनं त्याच्या या बोलण्याचा इतका धसका घेतला की, सरळ लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. खोलात जाऊन विचार करता याचं मूळ हे पुरुष शरीरसुखासाठी कायम आसुसलेले असतात या समजात आहे. वास्तविक त्या तरुणालाही स्वत:च्या शारीरिक गरजांचं पुरेसं भान नव्हतं. मात्र त्यामुळे विनाकारण गैरसमज होऊन त्याची परिणती नातं तुटण्यात झाली.’’
‘सीएनएन’ वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या ‘Why you should talk about sex before marriage’ या कार्यक्रमात सोशल सायकॉलॉजिस्ट जस्टिन लेहमिलर म्हणतात, ‘‘वयानुरूप, तसंच आयुष्यातल्या चढउतारांमुळे (उदा. मूल झाल्यावर) आपल्या शरीराची घडण आणि गरजा या दोन्हीही बदलत असतात. या बदलांचा परिणाम प्रत्येकावर सारखाच होतो असं नाही. जोडप्यापैकी एकाच्या लैंगिक गरजा,अपेक्षा या दुसऱ्यापेक्षा अत्यंत झपाटय़ानं बदलू शकतात, ते समजून घेतलं नाही तर त्याचं रूपांतर विसंवादात, विवाहबाह्य संबंधांत किंवा घटस्फोटात होऊ शकतं.’’
अनेक लग्नांमध्ये जोडीदारांमधल्या वादाचं मूळ हे लैंगिक संबंधांमधल्या असमाधानात असतं, याचा प्रत्यय समुपदेशनात येतो, असं काऊन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट रश्मी पटवर्धन सांगतात. ‘‘विश्वास बसणार नाही, पण सात-आठ वर्ष नात्यात असलेलं आणि आता लग्नाचा विचार करत असलेलं एक पंचविशीचं जोडपं समुपदेशनासाठी माझ्याकडे आलं होतं. मी त्या दोघांना एकमेकांविषयी, एकमेकांच्या गुणांविषयी लिहायला सांगितलं, तेव्हा मुलीनं मुलाविषयी अगदी भरभरून लिहिलं. पण मुलाला काय लिहावं ते सुचत नव्हतं. मोठय़ा कष्टानं त्यानं तीन-चार वाक्यं लिहिली. त्यात त्याचं एक वाक्य होतं, ‘आयटम फिरवायला चांगला आहे.’ यातून त्या दोघांचे एकमेकांकडे बघण्याचे दृष्टिकोन किती भिन्न आहेत हे दिसून येतं. तो तिच्याकडे केवळ गरज म्हणून, ‘सेक्स पार्टनर’ म्हणून बघत होता, तर ती त्याच्यात भावनिकदृष्टय़ा गुंतली होती. अशा जोडप्यांनी लग्न केल्यास गुंता आणखी वाढत जातो. मग त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या शरीरसंबंधांवरही होतो आणि त्या संपूर्ण नात्यातच एक प्रकारचा कोरडेपणा येत जातो.’’ असं रश्मी यांनी स्पष्ट केलं.
याच मुद्दय़ावर बोलताना डॉ. अनिकेत म्हणतात, ‘‘लग्न केवळ शरीरसंबंधांसाठी होत नाहीत, त्यापलीकडे खूप काही गोष्टी आपल्या आयुष्यात येत, होत असतात. आपल्या सहजीवनाचा तो केवळ एक भाग असतो. उत्तम सहजीवनासाठी नेमकं काय करायला हवं याबद्दल तरुण मुलंमुली अनभिज्ञ असतात. कामजीवनाचा विचार करता समागम नेमका कसा करायचा हेच अनेक जोडप्यांना माहिती नसतं. त्यामुळे शरीरसंबंधांचा निरामय आनंद अनेक जोडप्यांना घेता येत नाही.’’
प्रा. डॉ. चंद्रशेखर देशपांडे लिखित-संपादित ‘विवाहपूर्व समुपदेशन’ या पुस्तकात प्रस्तुत लेखक संलग्न असलेल्या ‘मानवी शिक्षण संस्थे’तर्फे २००९-१० या शैक्षणिक वर्षांत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विवाहपूर्व समुपदेशन कार्यशाळांचा उल्लेख आहे. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालय, आकुर्डीतील ‘रामकृष्ण मोरे महाविद्यालय’ आणि अहमदनगर येथील ‘न्यू आर्ट्स, सायन्स व कॉमर्स’ महाविद्यालयातील एकूण ३५० विद्यार्थी-विद्यार्थिनींनीसाठी डॉ. चंद्रशेखर यांच्यासह प्रा. मेधा कुमठेकर, डॉ. सविता देशपांडे आणि डॉ. वसंत देसले यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या.
‘‘या कार्यशाळांमुळे तरुण-तरुणींच्या मनातल्या विवाहपूर्व काळातल्या समस्या, प्रश्न समजण्यास उपयोग झाला. असे प्रश्न त्यांना घरात कुणाला विचारता येत नाहीत. तेवढा मोकळेपणा नसतो. त्याबद्दल बोलल्यास, ‘तुला का काळजी पडली आहे? आम्ही आहोत ना तुझं हित बघायला,’ असं म्हणत मुलांना गप्प केलं जातं. त्यामुळे कार्यशाळांचा हा शास्त्रीय मार्ग अत्यंत खात्रीलायक व सयुक्तिक ठरला. एरवी साध्या, संकोची वाटणाऱ्या तरुणी किती प्रभावी विचार करू शकतात, धीटपणे आणि विचक्षणपणे प्रश्न विचारू शकतात, याचा प्रत्यय आला,’’असं या कार्यशाळांचं फलित उलगडताना पुस्तकात नमूद करण्यात आलंय.
आज तरुण-तरुणींचं लग्नाचं सरासरी वय वाढत असल्यामुळे लग्न होईस्तोवर अनेकांची काही प्रेमप्रकरणं, ब्रेकअप्सही झालेली असतात. त्यात गैर काही नसलं, तरी याविषयी होणाऱ्या जोडीदाराला विश्वासात घेऊन कसं सांगायचं, तसंच आधीच्या नात्यांत शरीरसंबंध आले असतील तर लग्नाआधी कोणत्या वैद्यकीय चाचण्या आवर्जून करायला हव्यात, याविषयी विवाहपूर्व समुपदेशनातून मार्गदर्शन मिळू शकतं. मुळात तुम्ही ज्या डॉक्टरांकडे, सायकॉलॉजिस्टकडे समुपदेशनाला जाणार आहात, त्यांच्या रोजच्या पाहण्यात अशी प्रकरणं येत असल्यानं तुमच्या पूर्वानुभवांचा ते बाऊ करण्याचा प्रश्न येत नाही. तसंच त्यांच्या व्यावसायिक मूल्यांमुळे हे अनुभवकथन पूर्णत: गोपनीय राहतं. त्यामुळेच मनातली भीती, संकोच, लाज बाजूला सारत लग्नापूर्वी विवाहपूर्व समुपदेशनाचा विचार नक्कीच करायला हवा.