निरंजन मेढेकर

पुरुषांमध्ये वीर्यस्खलन,‘इरेक्टाइल डिसफंक्शन’पासून नपुंसकत्वापर्यंत आणि स्त्रियांमध्ये कामेच्छा, जननक्षमता कमी होण्याबरोबरच अपत्यांमध्ये दोष निर्माण होण्यापर्यंतचे परिणाम त्यांच्या सिगारेट, दारू आणि अमली पदार्थाच्या व्यसनांमुळे होत आहेत. आपलं कामजीवन आणि पर्यायाने संसार वाचवायचा असेल तर स्त्री-पुरुषांनी व्यसनांपासून दूर राहायला हवं.

maharashtra government defends ladki bahin yojana in bombay high court
महिला सशक्तीकरणासाठी ‘लाडकी बहीण’; राज्य शासनाचे उच्च न्यायालयात उत्तर; अतिरिक्त भार पडत नसल्याचे स्पष्टीकरण
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
PM Modi to dedicate 3 frontline naval combatants to nation
आत्मनिर्भरतेतील आव्हाने!
Thieves , jewellery stolen, Sankranti ,
पुणे : संक्रातीच्या दिवशी चोरट्यांचा धुमाकूळ, महिलांकडील दागिने चोरीला
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव कसा असतो?
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
national women commission form fact finding committee in murder of a girl Inside bpo premises
‘बीपीओ’च्या आवारातील युवतीच्या खूनप्रकरणी सत्यशोधन समिती; राष्ट्रीय महिला आयोगाचा निर्णय; दहा दिवसांत अहवाल
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…

‘कळतंय पण वळत नाही’ ही म्हण व्यसनाधीन लोकांना आणि  त्यातही संसारात पडलेल्यांना अगदी चपखल लागू होते. व्यसन, मग ते सिगारेट-दारूचं असो, की गांजा-अफूचं; ते वैवाहिक जीवनावर आणि कामजीवनावरही विपरीत परिणाम केल्याशिवाय राहात नाही. तरीही ‘ठरवलं तर मी लगेच व्यसन सोडू शकतो,’ असं अनेक व्यसनी लोकांचं अगदी ठाम म्हणणं असतं; पण आज एक शेवटचा दम मारू, एक शेवटचा प्याला रिचवू आणि उद्यापासून सगळं सोडून देऊ, असं म्हणताना दुर्दैवानं तो उद्या कधी उजाडत नाही. त्यामुळेच वेगवेगळय़ा व्यसनांचा कामेच्छेवर आणि लैंगिक क्षमतेवरही दूरगामी परिणाम होतो.

दारूमुळे कामेच्छा बळावते, असा एक समज आहे. यावर भाष्य करताना डॉ. विठ्ठल प्रभू लिखित ‘निरामय कामजीवन’ या पुस्तकातल्या ‘सेक्स टॉनिक’ या प्रकरणात नमूद केलंय, की ‘‘मद्यामुळे मनावरचं दडपण कमी होतं आणि त्यामुळे माणूस उल्हसित होतो; पण मद्य हे उद्दीपक नसून मेंदूतल्या उच्च केंद्रांचं अवदीपन करणारं पेय आहे. त्यामुळे मद्यामुळे संभोगाची इच्छा बळावते, मात्र कृती मंदावते. मद्यामुळे लिंगाचा ताठरपणा व वीर्यस्खलनाचं कार्य मंदावतं असं प्रयोगांती सिद्ध झालं आहे. अति मद्यसेवनामुळे तर नपुंसकत्व येतं.’’  वयाच्या सोळाव्या वर्षी सिगारेट आणि अठराव्या वर्षी दारू-गांजासह इतर व्यसनांना जवळ केलेल्या अनिलनं आयुष्यातलं उमेदीचं एक तप दारूत अक्षरश: उद्ध्वस्त केलं. त्याचा आपल्या वैवाहिक जीवनावर झालेला परिणाम विशद करताना तो सांगतो, ‘‘ माझ्या व्यसनांमुळे माझी बायको सतत ताणाखाली असायची. मला वाटायचं, की मी प्रमाणात घेतो. किती तरी लोकं व्यसनं करतात, त्यातलाच मीही एक आहे. त्यामुळे दारू पिणं ही माझी समस्या आहे हे मान्य करायलाच मी तयार नव्हतो. त्यामुळे आपल्याबरोबर दुसरी व्यक्ती राहते, तिला तिचं मन आहे, भावना आहेत हे माझ्या गावीही नसायचं.

एरवी नशेत असताना सेक्सची गरजही भासायची नाही. शुद्धीत असताना मात्र माझ्या वेळेला मला ते पाहिजे असायचं. बायको नाही म्हणाली, की चिडचिड व्हायची. मग ‘तुला इच्छा होत नाही, कारण तुझी बाहेर काही भानगड आहे’ असा थेट तिच्या चारित्र्यावर हल्ला करून मी माझ्या इच्छा अक्षरश: ओरबाडून पूर्ण करून घ्यायचो. पुढे पूर्ण अल्कोहोलिक झाल्यावर मात्र दारू सोडून बाकीच्या शारीर गरजा जणू थिजून गेल्या. बारा वर्ष नशेत घालवल्यावर केवळ नशीब बलवत्तर म्हणून मी ‘अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस’च्या संपर्कात आलो आणि माझं व्यसन सुटलं.’’ अनिलला दारू आणि बाकी सगळी व्यसनं सोडून १७ वर्ष झाली आहेत. तो आज एक निरोगी आणि निव्र्यसनी आयुष्य जगत आहे. गेल्या दहा वर्षांपासून देशभर त्याची सायकलवरून भ्रमंती सुरू असते. दारूचं व्यसन हा गंभीर आजार असून, मद्यपी लोकांइतकंच त्यांच्या जोडीदारांना समजून घेणं गरजेचं आहे, असं तो सांगतो. तसंच योग्य मार्गदर्शनानं कुठलंही व्यसन पूर्णपणे सुटू शकतं, असं त्याचं कळकळीचं सांगणं आहे.

ज्यांचे नवरे व्यसनी आहेत अशा स्त्रियांसाठी पुण्यातील ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा’त ‘सहचरी’ हा स्वमदत गट आहे. याविषयी बोलताना ‘मुक्तांगण’च्या संचालक मुक्ता पुणतांबेकर सांगतात, ‘‘ज्या घरात व्यसन असतं तिथे संवाद नसतो. अशा वेळी स्त्रियांची मोठय़ा प्रमाणात घुसमट होते. सहचरी हा स्त्रियांसाठीचा मदतगट असल्यानं त्या इथे त्यांचं मन मोकळं करतात. दारूच्या वासाची त्या बाईच्या डोक्यात तिडीक बसलेली असते. त्यामुळे व्यसनमुक्ती केंद्रातून उपचार घेऊन आलेल्या नवऱ्यालाही त्या लगेच जवळ येऊ देत नाहीत. आम्हीही रुग्णांना घरी गेल्यावर  शारीरिक जवळिकीची घाई न करण्याचा सल्ला देतो. त्यापेक्षा पत्नीशी संवाद प्रस्थापित करत नातं परत फुलवण्यासाठी सुचवलं जातं.’’

 दारूच्या व्यसनामुळे दरवर्षी जगभरात ३० लाख लोक दगावतात, तर वय वर्ष २० ते ३९ दरम्यान होणाऱ्या अकाली मृत्यूंमध्ये १३.५ टक्के मृत्यूंमागे अल्कोहोल हे कारण असतं, असं जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते. दारूच्या अतिसेवनामुळे कामसमस्या उद्भवलेल्या अनेक रुग्णांवर बीडचे सेक्सॉलॉजिस्ट डॉ. अनिकेत कुलकर्णी यांनी आजवर उपचार केले आहेत. ते सांगतात, ‘‘सुरुवातीला मद्यपानामुळे कामेच्छा बळावल्यासारखी वाटते, त्यामुळे शरीरसंबंधांपूर्वी दारू पिण्याची सवय जडते; पण पुढेपुढे थोडय़ा मद्यानं काही होत नाही. त्यामुळे पिण्याचं प्रमाण वाढवलं जातं, ज्याचा थेट परिणाम लैंगिक ताठरतेवर होतो. आपण प्रमाणात घेतोय असं बजावताना ते प्रमाण ओलांडलं जातं आणि मग अल्कोहोलवरचं अवलंबित्व वाढतं.’’

‘इंडियन जर्नल ऑफ सायकियाट्री’मध्ये प्रकाशित ‘Prevalence of sexual dysfunction in male subjects with alcohol dependence’ या बिजिल सिमन अरक्कल आणि विवेक बेनेगल लिखित संशोधन अहवालात दारूच्या व्यसनामुळे उद्भवणाऱ्या पुरुषांच्या कामसमस्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या संशोधनात शंभर मद्यपी लोकांना बंगळूरुच्या ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स’ या संस्थेच्या व्यसनमुक्त केंद्रात दाखल करून त्यांच्या लैंगिक समस्यांचा अभ्यास करण्यात आला. यात ७२ टक्के लोकांना एक किंवा एकापेक्षा अधिक कामसमस्या असल्याचं आढळून आलं. यात शीघ्रपतन, मंद कामेच्छा आणि लैंगिक ताठरतेच्या समस्यांचं प्रमाण अधिक होतं. एखादा रुग्ण किती प्रमाणात मद्याचं सेवन करत आहे, त्यानुसार त्याला उद्भवणाऱ्या कामसमस्यांचं स्वरूप ठरतं, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

तंबाखू, सिगारेट आणि निकोटिनचा कामेच्छेवर होणारा परिणाम सांगताना पुण्यातील फॅमिली फिजिशियन डॉ. अमित थत्ते म्हणतात, ‘‘निकोटिनचा अगदी थेट परिणाम लैंगिक ताठरतेवर होतो. सिगारेटच्या दीर्घकालीन व्यसनामुळे जुनाट खोकल्यासारखी व्याधीही जडू शकते. याचा अर्थातच सहजीवनावर विपरीत परिणाम होतो. निकोटिनचा ठरावीक उग्र वास असतो आणि तो कितीही च्युइंगम चघळलं तरी जात नाही. यामुळे जोडीदाराला व्यसनी माणसाच्या जवळ जायची इच्छा होत नाही.’’

पुरुषांबरोबर गेल्या काही वर्षांत बायकांमधलं व्यसनांचं प्रमाणही वाढायला लागलंय हे निरीक्षण नोंदवत डॉ. अमित सांगतात, ‘‘सिगारेट आणि दारूचा परिणाम कामेच्छेवर आणि जननक्षमतेवर होतो. निकोटिनच्या सेवनामुळे कमी वजनाची मुलं निपजतात. याशिवाय तंबाखू आणि अल्कोहोल या दोन्हींचा भुकेवर परिणाम होत असल्यानं रक्तक्षयाची (anemia) समस्या बळावते. लहान मुलांमधली वाढती स्वगमग्नता (autism) किंवा वर्तनविषयक समस्यांचं मूळ त्यांच्या पालकांच्या व्यसनाधीनतेशी निगडित आहे का, याबाबतही संशोधन होत आहे.’’

अँड्रिया डाऊनी लिखित ‘Does smoking affect your sex life?’ या लेखात कामेच्छा कमी करण्यापासून ते नपुंसकत्वापर्यंत धूम्रपानाचे कामजीवनावर होणारे विपरीत परिणाम विशद करताना लिहिलं आहे, की ‘‘धूम्रपानामुळे पुरुष आणि स्त्रिया दोघांच्याही शरीरात टेस्टॉस्टेरॉन संप्रेरकाच्या पातळीवर हानीकारक परिणाम होतो. याचं कारण म्हणजे धूम्रपानामुळे त्या व्यक्तीच्या शरीरातलं कार्बन मोनॉक्साइडचं प्रमाण वाढतं. त्यामुळे टेस्टॉस्टेरॉन संप्रेरकाची निर्मिती कमी होते आणि कामेच्छा मंदावते.’’ सिगारेटमधल्या हानीकारक रसायनांमुळे पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन, तर स्त्रियांमध्ये कोरडय़ा योनीमार्गाची समस्या बळावते. याशिवाय दीर्घकाळ धूम्रपान केल्यानं शीघ्रपतनासोबतच वंध्यत्वाची समस्याही ग्रासू शकते, असा इशारा या लेखात देण्यात आला आहे.

अयोग्य जीवनशैली हेदेखील आजच्या काळातलं गंभीर असं व्यसन असून, त्याचाही कामेच्छेवर आणि एकूण आरोग्यावरच विपरीत परिणाम होतोय, असं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवत डॉ. अमित सांगतात, ‘‘मोठय़ा प्रमाणात वाढणाऱ्या वजनामुळे (obesity) निर्व्यसनी लोकांमध्येही ‘नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर’ या आजाराचं प्रमाण वाढत आहे. यामुळे लिव्हर सिऱ्हॉसिसचा धोका वाढत असून, यकृत प्रत्यारोपण करण्याची वेळ अनेक रुग्णांवर येत आहे. सततचं बाहेरचं खाणं, व्यायामाचा संपूर्ण अभाव, त्यामुळे उद्भवणारा मधुमेह- उच्च रक्तदाब- हृदयविकार यांचा थेट परिणाम सहजीवनावर आणि कामेच्छेवर होताना दिसत आहे.’’

अति प्रमाणात मद्यसेवनामुळे लैंगिक ताठरतेची समस्या उद्भवते, तर दुसरीकडे अफूसारख्या अमली पदार्थाच्या सेवनामुळे पुरुषांमध्ये विलंबित वीर्यपतनाची (delayed ejaculation) व्याधी सुरू होते, अशी माहिती एका व्यसनमुक्ती केंद्रातल्या समुपदेशकांनी दिली. सिगारेट-दारूइतकीच अलीकडच्या काळात गांजाला पसंती आणि प्रतिष्ठा दोन्ही वाढल्याचं दारुण चित्र आहे. कोकेन, गांजा, भांग, चरस आणि हशीश या द्रव्यांमुळे गुंगी येते, भ्रम निर्माण होतो. शरीरातलं टेस्टॉस्टेरॉन संप्रेरक कमी होतं आणि कालांतरानं नपुंसकत्व येतं, अशा शब्दांत ‘निरामय कामजीवन’ या आपल्या पुस्तकात डॉ. विठ्ठल प्रभू यांनी अमली पदार्थाचा लैंगिकतेवर होणारा परिणाम विशद केला आहे. पुरुषाच्या या सगळय़ा समस्यांचा थेट परिणाम त्याच्या बायकोवर होत असतो. त्यातून नात्यातील गुंतागुंत अधिक वाढत जाते.

 आज सगळय़ांच्याच आयुष्यात वेगवेगळय़ा गोष्टींमुळे ताणतणाव मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्याला व्यसनांची जोड दिली, तर क्षणिक सुखासाठी कर्करोग, हृदयविकारासह अनेक मोठय़ा व्याधींना आपणहून आमंत्रण देण्यासारखी स्थिती आहे. दुसरीकडे सहजीवनातून ‘काम’ नेहमीसाठी हद्दपार करणारंच हे एकूण वर्तन आहे. त्यामुळे स्वत:साठी आणि जोडीदारासाठीही व्यसनांचे जीवघेणे नाद वेळीच सोडून संसारातली बिघडलेली लय जागेवर आणायला हवी!

niranjan@soundsgreat.in

Story img Loader