निरंजन मेढेकर

‘लहानपणीच्या चुकांमुळे माझ्या लिंगाचा आकार लहान आहे,’ असं अनेक पुरुषांचं मत असतं. लिंगाचा आकार वाढवण्यासाठी हे पुरुष नानाविध उपाय करून पाहतात आणि आपण जोडीदाराला सुख देऊ शकणार नाही, असा न्यूनगंड वर्षांनुवर्ष बाळगत राहतात. त्याचा नवरा-बायकोच्या लैंगिक सुखावर परिणाम होतो. असंच असमाधान कित्येक स्त्रियांमध्ये ‘आपले स्तन मोठे वा छोटे आहेत,’ या स्वरूपात दिसतं. आकाराचा हा न्यूनगंड वैद्यकीय माहिती घेऊन वेळीच मोडून काढायला हवा.

Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
Shocking video Bride's Mother Cancels Wedding In Bengaluru After Groom's Drunken Misbehaviour video
VIDEO: “लेकीपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही” लग्नात दारु पिऊन पोहोचला नवरदेव; नवरीच्या आईनं भर मांडवात काय केलं पाहा
Wife can file case of molestation against husband
पत्नी पतिविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करू शकते
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
Loksatta editorial Copernicus Climate Change Service Report
अग्रलेख: विक्रमी आणि वेताळ
priti karmarkar
स्त्रीप्रश्नांविषयी आग्रही आणि संवेदनशीलही!

एका मनुष्याचे डोळे मोठे आहेत. त्यामुळे त्याला होणारा फायदा म्हणजे त्याला इतरांपेक्षा जास्त दिसतं! तीच गोष्ट एका बाईंची. त्यांचे कान किंचित मोठे आहेत. त्यामुळे त्यांना इतरांच्या तुलनेत अधिक स्पष्ट ऐकू येतं. ही दोन्ही अर्थातच काल्पनिक उदाहरणं! ती हास्यास्पद ठरतात. कारण अवयवांच्या आकारमानावरून त्यांचं कार्य ठरत नाही हे आपल्याला पक्कं ठाऊक आहे. फक्त हे साधं लॉजिक जननेंद्रियांनाही लागू पडतं हे समजून घेण्यात अनेक जण कमी पडतात. त्यामुळेच अगदी संसारात पडल्यावरही आपल्या जननेंद्रियांचा आकार, त्यांची लांबी-रुंदी योग्य नाहीये आणि त्यामुळे आपण आपल्या जोडीदाराला लैंगिक सुख देऊ शकत नाही, असा न्यूनगंड त्यांचा पिच्छा सोडत नाही.

अनेक पुरुषांमध्ये आपलं लिंग आखूड आहे, असा न्यूनगंड असतो, तर स्त्रियांच्या बाबतीत स्तनांचा आकार त्यांच्या अपेक्षेपेक्षा लहान किंवा मोठा असणं हा चिंतेचा विषय असतो. हे समज-गैरसमज रुजण्याची कारणं नेमकी काय आहेत आणि कुमारवयापासून मनात ठाण मांडून बसलेल्या या न्यूनगंडांवर मात कशी करायची, हे पाहणं विशेषत: मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक ठरतं. 

सेक्सॉलॉजिस्ट डॉ. अनिकेत कुलकर्णी यांनी सांगितलेला अनुभव – तिशी पार केलेला आकाश हा कष्टानं प्रगती केलेला. स्वत:च्या हिमतीवर सुरू केलेल्या व्यवसायात त्यानं उत्तम जम बसवला होता, पण काही केल्या लग्नाला तयारच होत नव्हता. याचं कारण म्हणजे आपलं लिंग छोटं आहे, असा न्यूनगंड त्याच्या मनात ठाण मांडून बसलेला. गेल्या अनेक वर्षांपासून तो वेगवेगळय़ा औषधांनी, तेलांनी, मलमांनी लिंगाचा आकार वाढवण्याचा हरतऱ्हेनं प्रयत्न करत होता, पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. त्यामुळे लग्न केलं, तरी आपण आपल्या भावी पत्नीला लैंगिक सुख देऊ शकणार नाही याची जणू त्याला खात्रीच होती. अखेर तो धैर्य एकवटून डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेला. या तपासणीचे निष्कर्ष त्याच्या दृष्टीनं ‘धक्कादायक’ होते. आकाशचं लिंग अजिबात लहान नसून, चारचौघांसारखंच होतं. ‘कुमारवयात केलेल्या चुकांमुळे’- म्हणजेच हस्तमैथुनामुळे आपलं लिंग आखूड झालंय, या त्याच्या धारणा कशा चुकीच्या आहेत हे डॉ. अनिकेत यांनी त्याला समजावून सांगितलं. शिवाय लिंग वाढवण्यासाठी नाही, तर मनातली ही नाहक चिंता कमी करण्यासाठी त्यांनी त्याला काही औषधं दिली. आज आकाशच्या लग्नाला तीन वर्ष झाली असून, तो सुखाचा संसार करत आहे.

आपलं लिंग लहान आहे, असा समज असणं ही एक मानसिक व्याधी असून, त्याला ‘स्मॉल पीनस सिंड्रोम’ असं म्हणतात. ‘मेडिकल न्यूज टुडे’ या आरोग्यविषयक लेखांच्या संकेतस्थळावर यासंबंधीच्या एका प्रसिद्ध लेखात नमूद करण्यात आलंय, की ‘स्मॉल पीनस सिंड्रोम’मध्ये लिंगाचा आकार प्रत्यक्षात कमी नसला, तरी त्याविषयी त्या पुरुषाच्या मनात प्रचंड चिंता असते. आपल्याकडे सल्ल्यासाठी येणाऱ्या पुरुषांपैकी ७५ टक्के पुरुषांना आपलं लिंग लहान आहे या न्यूनगंडानं पोखरलेलं असतं, असं

डॉ. अनिकेत सांगतात. ‘‘आपलं लिंग लहान आहे, हा समज वयानं लहान-मोठय़ा, शिक्षणानं बेताच्या किंवा उच्चशिक्षित अशा बहुसंख्य पुरुषांच्या मनात असतो. यामागच्या कारणांचा विचार करता कुमारवयात हस्तमैथुनाची सवय जडल्यानं माझं लिंग आखूड झालं, असं अनेकांना वाटत असतं, पण यात कुठलंही तथ्य नाही. याशिवाय आपण पॉर्न फिल्म्स बघतो, म्हणून असं झालं असेल, या समजाचाही यात मोठा वाटा असतो. क्वचित कधी पत्नीनं किंवा जोडीदारानं काही टोमणे मारले किंवा अन्य काही कारणाने शेरेबाजी झाली, तरी त्या पुरुषाच्या स्वाभिमानाला जबरदस्त धक्का पोहोचू शकतो.’’ असं ते सांगतात.

गोळय़ा-औषधांनी लिंग वाढू शकत नाही, हे स्पष्ट करताना डॉ. अनिकेत सांगतात, ‘‘काहीही केलं तरी माणसाची जीभ लांबीला वाढू शकत नाही, कारण त्यात हाड नसतं. तीच गोष्ट लिंगालाही लागू होते. काही तरुणांना लिंग वाकडं असल्यामुळे लग्नानंतर समागम जमेल की नाही अशी धास्ती असते. बाळ जेव्हा आईच्या गर्भात असतं तेव्हा जागा कमी असते. त्या वेळच्या बाळाच्या स्थितीवर लिंगाची रचना, वळण आणि आकार ठरत असतो. एखाद्या दरवाजातून सरळ आत गेलो की वाकून आत गेलो, यानं जसा काही फरक पडत नाही, तसंच लिंग सरळ आहे की किंचित वाकडं आहे, यानं वैवाहिक आनंदात काही फरक पडत नाही.’’

लिंगाच्या आकारावरून कामजीवन प्रभावित होत नसलं, तरी इतर प्राण्यांच्या तुलनेत पुरुषांच्या लिंगाच्या आकारमानात असलेली तफावत हे याचं मूळ कारण आहे का, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न डफरसने हेन्री लिखित ‘Penis size does matter’ या पुस्तकात करण्यात आला आहे. या पुस्तकाचं वैशिष्टय़ म्हणजे हे कुणा डॉक्टरनं लिहिलं नसून, लिंगाचा आकार सेक्समध्ये खरोखर महत्त्वाचा असतो की नाही, हे जाणून घ्यायच्या उद्देशानं फ्रान्समधल्या काही पुरुषांनी एकत्र येत या पुस्तकाचं संशोधन आणि निर्मिती केली आहे. मनुष्याच्या ताठर लिंगाचा आकार हा दोन सेंटिमीटरपासून ते २५ सेंटिमीटपर्यंत असू शकतो. या पुस्तकात असा दावा करण्यात आलाय, की इतर कुठल्याच प्राण्यांमध्ये लिंगाच्या आकाराच्या बाबतीत इतकी तफावत आढळून येत नाही. उलट पुरुषाच्या लिंगाची सरासरी लांबी ही नर चिंपांझीपेक्षाही अधिक असते. ओबेसिटीचा (लठ्ठपणा) आणि लिंगाच्या लांबीचा परस्परसंबंध असून, वजन वाढल्यामुळे शरीरातील मेदाचं प्रमाण वाढलं तर त्यामुळे लिंगाचा आकार कमी होऊ शकतो, असंही या पुस्तकात नमूद करण्यात आलंय. त्यामुळेच आपल्या लिंगाच्या आकाराविषयी चिंतातुर असलेल्या पुरुषांनी व्यायामाची कास धरणं केव्हाही उत्तम!

स्त्रियांच्या बाबतीत विचार करता स्तनांचा आकार लहान किंवा मोठा असणं हे चिंतेचं कारण का ठरतं, हे विशद करताना स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वंध्यत्वतज्ज्ञ डॉ. शिल्पा चिटणीस जोशी सांगतात, ‘‘स्त्रियांचं शरीर हे जणू सदैव प्रदर्शनाला मांडलेलं आहे, असंच अनेकांचं वागणं असतं. स्तनांबद्दलचा न्यूनगंड हा बऱ्याचदा स्त्रीला जोडीदाराकडून दिला जातो, असं दिसतं. माझ्याकडे अनेक आई आपल्या लग्नाळू मुलींना घेऊन येतात. स्तनांचा आकार लहान असल्यानं लग्नानंतर काही अडचण येईल का, भावी पतीकडून तिला योग्य वागणूक मिळेल का, अशी त्यांना भीती असते. पण स्तनांचा आकार वाढवण्यासाठी खूप काही करता येत नाही, हे समजून घ्यायला हवं. दुसरीकडे आपल्या समाजात पुरुषाच्या शरीराविषयी स्त्रीला तितकीशी कल्पना नसते. त्यामुळेच स्त्रियांमुळे पुरुषांच्या मनात जननेंद्रियांविषयी न्यूनगंड उत्पन्न होण्याचं प्रमाण कमी असावं.’’

स्तनांचा आकार मोठा असल्यामुळेही स्त्रियांना किती मानहानी सहन करावी लागते, हे उलगडताना डॉ. शिल्पा त्यांचा अनुभव सांगतात- ‘‘काही वर्षांपूर्वी माझ्याकडे पश्चिम आशियातलं एक जोडपं आलं होतं. आपल्या पत्नीचे स्तन मोठे असून, काहीही करून ते कमी करून हवेत, अशी त्या पतीची मागणी होती. याशिवाय योनीची शस्त्रक्रिया करून योनीमार्गाचा मोठा झालेला आकारही त्यांना पूर्ववत करून पाहिजे होता. या संपूर्ण संभाषणात एक शब्दही बोलण्याची त्या स्त्रीला मुभा नव्हती, असं दिसत होतं. अशा प्रकारे स्त्रियांना त्यांच्या शरीरावरून, जननेंद्रियांच्या आकारमानावरून अपमानित करणं दुर्दैवी आहे. प्रत्येक जोडप्यानं हे समजून घ्यायला हवं, की मेंदू हा सर्वात संवेदनशील लैंगिक अवयव आहे. स्त्री-पुरुष दोघांचंही लैंगिक जीवन मेंदूवर आणि त्यात निर्माण होणाऱ्या भावभावनांवर अवलंबून असतं. लैंगिक अवयव ही केवळ माध्यमं आहेत. हे जाणून घेतलं की आकाराच्या गोष्टी गौण ठरतात.’’

कॅट आणि हॅरी लिखित ‘Size matters : Facts about breast that every man and woman should know’ या पुस्तकात स्तनांचा आकार हा सगळय़ाच वयोगटांतल्या स्त्रियांना भेडसावणारा प्रश्न असल्याचं सांगितलं आहे. सध्याच्या माध्यम जगतात मोठय़ा स्तनांच्या स्त्रीचं चित्रीकरण ती ‘मादक आणि आकर्षक’ कशी दिसेल या पद्धतीने करण्यात येत असल्यानं कुमारवयीन मुलींपासून ते प्रौढ स्त्रियांपर्यंत अनेकींना मोठय़ा स्तनांचं आकर्षण वाटू शकतं. या पुस्तकात स्तनांसंदर्भातील अनेक मिथकं मांडत त्यांचं खंडनही करण्यात आलं आहे. स्तन मोठे असतील तर बाळाला स्तन्यपान करणं सोपं जातं, हे असंच एक मिथक असून, स्त्रीच्या दूध निर्मितीच्या क्षमतेचा आणि तिच्या स्तनांच्या आकाराचा परस्परसंबंध नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

श्रृंगारात महत्त्वाचं स्थान असणारे स्तन हे प्रसूतीनंतर बाळाचं स्तन्यपान सुरू झाल्यावर बाळाच्या पोषणाचे मुख्य स्रोत बनतात. त्यामुळेही अनेक जोडप्यांना कामजीवन पूर्ववत करताना अडचणी येतात आणि त्यामुळे वेगळे न्यूनगंड मनात बसण्याची शक्यता असते. मात्र ही तात्कालिक स्थिती असून, एकमेकांना पुरेसा वेळ देत सामंजस्यानं कामजीवन पूर्ववत करण्याचा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञ आणि सेक्स थेरपिस्ट डॉ. नीलिमा देशपांडे जोडप्यांना देतात. स्तनांचा विचार करता ‘आदर्श आकार’ असं काही नसतं, हे उलगडताना डॉ. नीलिमा देशपांडे सांगतात, ‘‘वांशिक पार्श्वभूमीनुसारही स्तनांचा आकार बदलतो. उदा. आफ्रिकन स्त्रियांच्या स्तनांचा आकार हा आशियाई स्त्रियांच्या तुलनेत मोठा असतो. विशिष्ट संप्रेरकांच्या उपचारांनी स्तनांचा आकार वाढवता येऊ शकतो. मात्र प्रौढ स्त्रियांमध्ये हॉर्मोन ट्रीटमेंट हा चांगला पर्याय ठरत नाही. स्तनांचा आकार वाढवण्यासाठी ऑपरेशन किंवा औषधांचा विचार करण्यापेक्षा वेगळय़ा प्रकारच्या ब्रा वापरूनही फायदा होऊ शकतो. दुसरीकडे आपले स्तन मोठे असावेत असं बहुतेक बायकांना वाटत असलं, तरी मोठय़ा स्तनांच्या वेगळय़ा अडचणी असतात. त्यामुळे मानेचं, पाठीचं दुखणं सुरू होऊ शकतं. तसंच व्यायाम किंवा इतर शारीरिक हालचाली करण्यावरही मर्यादा येतात. हे त्रास होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं केव्हाही चांगलं.’’

जननेंद्रियांचा आकार हे मानसिक विकाराचं कारण ठरू नये, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न महत्त्वाचे ठरतात. अन्यथा या नाहक न्यूनगंडाचं ओझं माणसं आयुष्यभर बाळगत राहतात.

niranjan@soundsgreat.in

Story img Loader