निरंजन मेढेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फेब्रुवारी महिना सुरू होताच ‘व्हॅलेंटाइन डे’चे वेध पूर्वी अनेकांना लागत असत; पण आताच्या पिढीचे प्रेम, शरीरसंबंध आणि लग्न याकडे पाहण्याचे विचार काहीसे वेगळे आहेत. शरीरसंबंधांकडे गरज म्हणून पाहण्याचा आणि लग्नाला ‘कमिटमेंट’ मानून त्याची धास्ती घेण्याचा हा काळ आहे; पण यामध्ये आयुष्यातला प्रेमाचा हळुवार आणि लोभस पैलू यापुढे कायमचा झाकोळला जाईल का? 

नव्वदच्या आणि नवीन सहस्रकातल्या पहिल्या दशकात ‘व्हॅलेंटाइन डे’ आणि त्याच्या समर्थक-विरोधकांचं मोठं प्रस्थ होतं. फेब्रुवारीची सुरुवातच ‘व्हॅलेटाइन’शी संबंधित हरतऱ्हेच्या बातम्यांनी व्हायची. प्रेमी युगुलांमुळे गुलाबी झालेलं वातावरण संस्कृतिरक्षकांमुळे गडद व्हायचे प्रसंगही हटकून उद्भवायचे! पण अलीकडच्या काही वर्षांत ‘व्हॅलेंटाइन’ची हवा एकदम थंडावलीय. यामागे काही प्रमाणात करोना आणि बाजारपेठेतल्या चढउतारांचा वाटा असला, तरी त्याचं मूळ प्रेम, एकनिष्ठता, शरीरसंबंध आणि एकूणच स्त्री-पुरुष संबंधांकडे बघण्याच्या तरुणाईच्या बदललेल्या दृष्टिकोनात आहे का, याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न.

पृथ्वीवरच्या एकूण सस्तन प्राण्यांपैकी केवळ तीन टक्के (काही अभ्यासकांच्या मते ९ टक्के) प्राणी एकाच जोडीदाराबरोबर आपले बंध (monogamous bond) प्रस्थापित करतात. बाकी सगळय़ा क्षमतांमध्ये मनुष्यप्राणी अग्रेसर असला, तरी या ३ टक्क्यांमध्ये त्याचा समावेश होत नाही. थोडक्यात, जोडीदाराशी एकनिष्ठ राहणं आणि नातेसंबंधांत-विवाहबंधनात अडकणं ही माणसानं स्वत: निर्माण केलेली व्यवस्था असून, ती टिकवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. आजच्या ‘मिलेनियल’ आणि ‘जनरेशन झी’ने मात्र उर्वरित ९७ टक्के प्राणिजगताचा आदर्श डोळय़ांसमोर ठेवलाय का, हा खरा प्रश्न आहे. ‘वन फॉर जॉय’ या आपल्या पुस्तकात लेखक डॉ. प्रियरंजन नंदी नमूद करतात, की सध्या

२३ ते ३८ वयोगटात असलेल्या मिलेनियल्सनं सेक्सला लग्नापासून वेगळं करून टाकलंय. कारण लग्न होईस्तोवर अनेकांनी डेटिंग केलेलं असतं, वन नाइट स्टँड, काही कॅज्युअल रिलेशन्स, तर काही ब्रेकअप्सही करून झालेली असतात. मिलेनियल्ससाठी ‘मोनोगामी’ची व्याख्या ही आज ‘एका वेळी एक जोडीदार’ अशी बदललेली दिसते आहे. डॉ. नंदी यांच्या मते, इंटरनेट आणि ‘ओटीटी’च्या जमान्यात वाढत असलेली १२ ते २२ वयोगटातली ‘जनरेशन झी’ तर याही पुढे गेलीय. सरसकट सगळी पिढी असं सार्वत्रिकीकरण करता आलं नाही, तरी बहुतांश या पिढीतील तरुण-तरुणी एकच एक जोडीदार आपल्या लैंगिक, भावनिक, आर्थिक आणि भौतिक गरजा भागवणं अशक्य आहे, या निष्कर्षांवर आले आहेत. त्यामुळेच एका अर्थी त्यांनी शरीरसंबंधांतून पुनरुत्पादनाची शक्यताच हद्दपार करून टाकलीय.

क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट रश्मी पटवर्धन यांच्या मते, आजची तरुणाई लैंगिक नातेसंबंधांकडे आधीच्या पिढीपेक्षा अतिशय वेगळय़ा दृष्टिकोनातून बघते आहे. ‘‘पूर्वी शरीरसंबंधांसाठी लग्न करायला हवं अशी आपली एकूण भारतीय मानसिकता होती; पण आता तसं राहिलेलं नाही. तहान-भूक लागल्यावर आपण कसं कुठल्याही गाडीवर उभं राहून खातो, अगदी तसंच मला माझी लैंगिक गरज शमवण्यासाठी कुणीही पार्टनर चालू शकतो, असा विचार तरुणाईच्या एका वर्गात रुजताना दिसतोय. या विचारातूनच ‘वन नाइट स्टँड’, ‘ओन्ली सेक्स पार्टनर’, ‘फ्रेंड्स विथ बेनिफिट्स’ असे ट्रेंड्स तरुणाईत प्रचलित होताना दिसताहेत,’’ असं त्या म्हणतात.

कोणत्याही भावनिक गुंतवणुकीविना केवळ एक लैंगिक कृती म्हणून सेक्सकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढतोय, तसाच तरुणाईतल्या एका गटात स्त्री-पुरुष नातेसंबंधांविषयीची संवेदनशीलताही वाढताना दिसतेय, असं नमूद करत रश्मी म्हणाल्या, ‘‘स्वत:च्या शारीरिक गरजांचा विचार करताना आपण आपल्या जोडीदाराच्या शारीरिक-भावनिक गरजांची व्याप्ती समजून घेणंही आवश्यक आहे, हा विचारही रुजताना दिसतोय.’’ मुक्त लैंगिक संबंधांची दुसरी बाजू म्हणजे अनेक तरुण मुलं-मुली नैराश्याच्या आणि वैफल्याच्या विचित्र गर्तेत अडकताहेत, असं निरीक्षण नोंदवत फॅमिली फिजिशियन

डॉ. अमित थत्ते यांनी एक प्रातिनिधिक उदाहरण सांगितलं. ‘बी.कॉम.’ झालेली विशीची पूजा महाराष्ट्रातल्या एका छोटय़ा गावातून पुण्यासारख्या शहरात आली. इथे तिनं नोकरी सांभाळत मोठय़ा कष्टानं एमबीए पूर्ण केलं आणि तिला एका मोठय़ा बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीही मिळाली. तिचं आणि तिच्या घरच्यांचं स्वप्न पूर्ण झालं; पण या काळात घरच्यांना न सांगता ती एका मुलाबरोबर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहात होती. पारंपरिक विचारांच्या आईबाबांना हा मुलगा पसंत पडणार नाही, याची ठाम खात्री असल्यानं त्याच्याबद्दल न सांगता ती लग्नाचा विषय टाळत राहिली; पण कोणत्याही नात्यात येते तशी पठारावस्था तिच्याही नात्यात आली आणि त्यांचं नातं तुटलं. या दोन-तीन वर्षांत त्याच तरुणामुळे ती गर्भवती राहिली होती आणि तिनं गर्भपातही केला होता. ब्रेकअपनंतर आलेल्या नैराश्यामुळे ती सध्या एका मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचार घेत असून, गेल्या सहा महिन्यांपासून ‘अँटी डिप्रेसंट’ औषधं घेत आहे. ‘‘लिव्ह इन रिलेशनशिप, नको असलेली गर्भधारणा, गर्भपात, अ‍ॅनिमिया, व्यायामाचा संपूर्ण अभाव, सिगारेट-दारू-वीडचं व्यसन आणि शेवटी थेरपी असं हे एकूण दुष्टचक्र आहे. सगळेच तरुण या चक्रात अडकतात असं नाही; पण माझ्याकडे येणाऱ्या विशी-तिशीच्या रुग्णांमध्ये विवाहपूर्व लैंगिक संबंधांचं आणि व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप वाढलेलं दिसून येतं,’’ असं डॉ. थत्ते म्हणतात.

 ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’मध्ये अगदी अलीकडे प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार ‘मिलेनियल्स’ आणि ‘जनरेशन झी’मध्ये ‘सिच्युएशनशिप’ या नातेसंबंधांतील नवीन ट्रेंडला सध्या पसंती मिळत आहे. सिच्युएशनशिप हे ‘वन नाइट स्टँड’ आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’च्या मधलं नातं असतं. यात त्या जोडप्यावर एकनिष्ठतेचं किंवा बांधिलकीचं कुठलंच दडपण नसतं. ती नात्याची सुरुवातही नसते. गोष्टी मनासारख्या घडल्या तर पुढे जाण्याचा विचार केला जाऊ शकतो; पण मुळात आजच्या तरुणाईला नातेसंबंधांतल्या बांधिलकीची- म्हणजेच ‘कमिटमेंट’ची इतकी भीती का

वाटत असावी? या प्रश्नाचं विश्लेषण करताना मानसशास्त्रज्ञ गौरी जानवेकर म्हणतात, ‘‘एकनिष्ठ नातं सुरक्षिततेची हमी देतं असं या पिढीला वाटतं, तर मुक्त लैंगिक संबंध अधिक जास्त आनंद देतात असं वाटतं. या दोन्ही प्रकारांत उत्तरं केवळ बाहेर मिळू शकतात, आपल्या व्यक्तिमत्त्वावर काहीच काम करायची गरज नाही असं अनेकदा गृहीत धरलं जातं. विशेषत: जेव्हा मुक्त लैंगिक संबंधच आपल्या सगळय़ा प्रश्नांचं उत्तर आहे असं वाटत असतं, तेव्हा नात्यात थोडय़ा जरी तडजोडी करायला लागल्या किंवा वाट पाहावी लागली, तरी आपण खूप काही गमावतोय अशी त्यांना सतत धास्ती वाटते. आपण दुखावले जायलाच नको किंवा नात्यात दु:ख सहन करायला लागूच नये, असा अट्टहास काही ठिकाणी दिसतो. मुक्त लैंगिकतेमुळे आणि जोडीदार निवडीच्या, तसंच पाहिजे तेव्हा बदलण्याच्या स्वातंत्र्यामुळे काचलेपण कमी झाल्यासारखं वाटत असलं, तरी जर स्वत:वर काम करायची तयारी नसेल तर हे समाधान कमी प्रमाणात मिळतं.’’

सतत काही तरी वेगळं करून बघू, तेच ते साचलेपण नको, या मानसिकतेतून नातेसंबंधांतले गुंतेही वाढताना दिसताहेत. एक प्रातिनिधिक उदाहरण सांगताना त्या म्हणाल्या, ‘‘एकाच कंपनीत काम करणाऱ्या तरुण-तरुणींच्या ग्रुपमध्ये जोडय़ा जमल्या होत्या; पण टाळेबंदीच्या काळात ग्रुपमधल्या एकाचं आपल्या मित्राच्या गर्लफ्रेंडबरोबर चॅटिंगचं प्रमाण वाढलं आणि त्यांच्यात आकर्षण निर्माण झालं. ते ‘सेक्स चॅट’ही करत होते. ही गोष्ट ग्रुपमधल्या इतरांना समजली तेव्हा त्याचे तीव्र पडसाद उमटले. बांधिलकीत न अडकता पटकन हवं तेव्हा नवीन नात्यात गुंतायचं म्हटलं, तरी तशी प्रत्यक्ष कृती करायची झाल्यास भावनिक पातळीवर त्याची काय किंमत मोजावी लागेल, याचा अशा गप्पा मारताना त्या दोघांनी विचारच केला नव्हता. किमतीचा विचार न करता केलेली कृती आनंदाची खात्री देऊ शकत नाही. समुपदेशनानंतर त्यांनी हे पाऊल न उचलण्याचा, हे थांबवण्याचा निर्णय घेतला.’’

एका माध्यम संस्थेनं मध्यंतरी केलेल्या एका ऑनलाइन सर्वेक्षणात केवळ २० टक्के तरुणांनी ते सध्या ज्या नात्यात आहेत त्याच मुलाशी किंवा मुलीशी लग्न करण्याची त्यांची इच्छा असल्याचं नमूद केलं होतं. या सर्वेक्षणाची व्याप्ती ही संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करणारी अजिबातच नसली तरी तरुणाईचा लग्नाकडे आणि नातेसंबंधांतील दीर्घकालीन बांधिलकीकडे बघण्याचा एकूण कल यातून दिसून येतो.

दुसरीकडे आधीच्या पिढय़ांच्या तुलनेत ‘जेन झी’ ही लैंगिकदृष्टय़ा कमी सक्रिय असल्याचा दावा एका संशोधनात करण्यात आलाय. ‘एबीसी’ या संस्थेतर्फे ‘ऑस्ट्रेलिया टॉक्स’ या संशोधन उपक्रमांतर्गत २०१९ मध्ये ‘जेन झी’च्या लैंगिक वर्तनाविषयी संशोधन करण्यात आलं. सर्वेक्षणात सहभागी तब्बल ४० टक्के तरुणांनी आजवर एकदाही समागम केला नसल्याचं नमूद केलं, तर १३ टक्के तरुणांनी ते वर्षांतून एखाद्या वेळी सेक्स करत असल्याचं सांगितलं. मिलेनियल्सशी तुलना करता हे प्रमाण फारच कमी आहे. कारण तिशीच्या पुढच्या मिलेनियल्सपैकी ६७ टक्के तरुणाई ही महिन्यातून एकदा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा समागम करतात, असं आकडेवारी सांगते. या संशोधनाचे निष्कर्ष ‘गार्डियन’मध्ये नंतर प्रकाशित झालेल्या एका बातमीत फेटाळण्यात आले; पण तरी यानिमित्तानं या पिढीला ‘सेक्सलेस जनरेशन’ असं म्हटलं जातंय.

आता ज्या निमित्तानं आणि विषयानं या लेखाची सुरुवात केली त्या ‘व्हॅलेंटाइन डे’कडे परत येऊ या. प्रेम साजरं करण्यासाठी एक ठरावीक दिवस असावा की नसावा, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे; पण कामभावनेइतकीच प्रेम हीदेखील आदिम, उत्कट आणि हवीहवीशी असलेली भावना आहे, हे तरुणाईनं समजून घ्यायला हवं. उलट कामापेक्षाही उदात्त आणि संपूर्ण आयुष्य व्यापून टाकणारा असा प्रेमाचा ठेवा असतो. प्रेमाच्या नात्यात पडायचं का किंवा आपल्या नात्याला आकार कसा द्यायचा, हे ठरवण्याचं जे स्वातंत्र्य आजच्या पिढीला आहे ते यापूर्वी कुठल्याच पिढीला नव्हतं. स्वातंत्र्योत्तर काळात, अगदी नव्वदच्या दशकापर्यंत बॉलीवूडमध्ये मसालापटांइतकाच प्रेमभंगाच्या चित्रपटांचा पूर लोटण्याचं हे महत्त्वाचं कारण होतं. ते त्या पिढीचं दु:ख होतं, अभिव्यक्ती होती, शल्य होतं आणि एका अर्थी भोगही होते! ‘व्होग’ नियतकालिकानं फेब्रुवारी २०१९ मध्ये म्हणजेच करोनाकाळ अवतरण्यापूर्वीच ‘Is Valentine`s Day Outdated?’ या शीर्षकानं एक लेख प्रसिद्ध केला होता. हा एक दिवस आऊटडेटेड झाल्यानं आपल्या कुणाच्याच आयुष्यात काहीच फरक पडणार नाहीये. महत्त्वाचं काही असेल, तर ते म्हणजे प्रेमाचं मोल आणि मूल्य जपणं!niranjan@soundsgreat.in