निरंजन मेढेकर

लैंगिक आरोग्य हा शारीरिक आणि मानसिक आरोग्याचाच एक महत्त्वाचा पैलू आहे. त्यामुळे कामजीवन बिघडलेलं असेल, तर त्यास जोडप्यातल्या एकाचा वा दोघांचा मानसिक ताण जबाबदार असण्याची शक्यता फार मोठी असते. अनेक जोडपी अतिसंकोचामुळे एकमेकांशीही या गोष्टींवर बोलत नाहीत. मात्र त्यामुळे समस्या वाढून विभक्त होण्यापर्यंत मजल गेल्याचीही अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे जोडप्यांना अशी समस्या असल्यास ती स्वीकारून वेळीच त्यावर तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं.

Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
murder of Satish Wagh, Satish Wagh, dispute,
सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
Yes Madam Fires Over 100 Employees for Feeling Stressed at Work Viral Email Claims
“ही तर चिटींग आहे!” आधी ऑफिसमध्ये कामाचा ताण येतो का विचारले अन् ज्यांनी होकार दिला त्यांनाच कामावरून काढून टाकले
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
sex ratio of birth in nashik municipal corporation
जिल्ह्यात लिंगोत्तर प्रमाणात घट; लिंग चाचणीची दक्षता समिती बैठकीत साशंकता
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…

गौतम आणि नेहा दोघेही ‘कॉलेज स्वीटहार्ट्स’! चार-पाच वर्ष नात्यात राहिल्यावर लग्नासंबंधी निर्णय घेण्याची वेळ आली, तेव्हा गौतमला आनंदापेक्षाही चिंतेनं, ताणानं घेरलं. नेहा ‘स्वजातीय’ नसल्यानं घरचे आपल्या लग्नाला कधीच मान्यता देणार नाहीत, याची त्याला जणू खात्रीच होती आणि झालंही तसंच. त्याच्या घरच्यांनी कडाडून विरोध केला. आता एक तर घरच्यांच्या विरोधासमोर झुकायचं किंवा घरच्यांच्या मर्जीची पर्वा न करता नेहाशी लग्न करायचं, हे दोनच पर्याय उरले. त्यानं नेहाशी लग्न केलं आणि घरच्यांनी त्याला घरातून बेदखल करत त्याच्याशी संबंध तोडले. कुटुंबीय असं वागतील याची शक्यता असली, तरी प्रत्यक्ष त्यांनी ही कृती केल्यानं तो हादरला. त्यातच या नवविवाहित जोडप्याची पहिली रात्र आली. रक्ताच्या नातेवाईकांनी संबंध तोडल्यानं मनावर आलेला ताण शरीरावर परावर्तित झाला आणि पहिल्याच रात्री त्याला लैंगिक ताठरतेची समस्या उद्भवली. यातून त्याला लैंगिक कामगिरीविषयी चिंता (Performance anxiety) निर्माण झाली. अतिताणामुळे अन् ‘सेक्स जमत नसल्याच्या’ सततच्या चिंतेमुळे त्याला मधुमेह जडला. लग्नानंतर तीन वर्षांनी गौतम आणि नेहा जेव्हा सायकियाट्रिस्ट आणि सेक्स थेरपिस्टकडे उपचारांसाठी गेले, तेव्हा त्याची लैंगिक ताठरतेची समस्या कायम होतीच, शिवाय कामेच्छाही कमी झाली होती. शरीरसंबंधात सातत्यानं येणाऱ्या अपयशामुळं, विफलतेमुळे घटस्फोट घेण्याचा ते दोघं विचार करत होते. त्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी म्हणून ते आले होते. त्यांच्या दृष्टीनं उशीर झाला असला, तरी मानसोपचारतज्ज्ञाकडे जाण्याचा सूज्ञ निर्णय घेतल्यानं त्यांना वेळेत उपचार मिळाले. आज ते सुखाचा संसार करत आहेत.

डॉ. निकेत कासार यांनी सांगितलेला हा अनुभव केवळ गौतम आणि नेहा या एका जोडप्याचा नाहीये. ताणाचे विविध प्रकार जोडप्यांच्या कामजीवनावर मोठा परिणाम करत असल्याचं या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी बोलताना समोर येतं. अवघड परिस्थितीमुळे सतत सतावणारी चिंता किंवा कसोटीची मानसिक अवस्था म्हणजे ताण, अशी ‘जागतिक आरोग्य संघटना’ ताणाची व्याख्या करते. ताणाचं वैशिष्टय़ म्हणजे तो डोळय़ांनी दिसत नाही; पण तो त्या व्यक्तीला आतून पोखरत असतो. ताणाचा थेट परिणाम वैवाहिक सहजीवनावर कसा होतो आणि त्याचं योग्य नियोजन करत ते पूर्वपदावर कसं आणायचं, हे पाहणं आजच्या वेगवान आणि स्पर्धेच्या युगात आवश्यक ठरतं.

 लिसा डॉन हॅमिल्टन आणि सिंडी मेस्टन या संशोधकांनी ‘Chronic stress and sexual function in women’ या आपल्या अभ्यासविषयातून स्त्रियांच्या लैंगिक कार्यावर तीव्र ताणाचा कसा परिणाम होतो याचा शोध घेतला. ताणाचा पुनरुत्पादनाच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो याबद्दलचं संशोधन याआधी झालं असलं, तरी ताणामुळे स्त्रीच्या लैंगिक प्रतिक्रियेवर नेमका कसा परिणाम होतो, याचा तपास करण्याचा संशोधकांचा मुख्य उद्देश होता. शरीरातील ताणाचं प्रमाण जितकं जास्त, तितकं जननेंद्रियांच्या लैंगिक उद्दीपनाचं (genital sexual arousal) प्रमाण कमी असतं, असा प्रमुख निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला. सतत ताणाखाली असलेल्या स्त्रियांमध्ये ‘कॉर्टिसॉल’ या हॉर्मोनची पातळी जास्त असते, तसंच मानसिक अस्थिरतेचाही परिणाम कामेच्छा घटण्याबाबत होतो, असं या संशोधनातून स्पष्ट झालं.

 सेक्सॉलॉजिस्ट डॉ. अनिकेत कुलकर्णी सांगतात, ‘‘समागमासाठी महत्त्वाची पूर्वअट म्हणजे त्या वेळी तुमची मन:स्थिती पूर्णपणे शांत पाहिजे. सेक्सच्या वेळी मनात कसली भीती, काळजी, चिंता असेल, घाई-गडबड असेल तर लैंगिक कामगिरीवर त्याचा थेट परिणाम होतो. कारण मन चिंतेत असताना ते लैंगिकदृष्टय़ा उत्तेजित होऊ शकत नाही. तसंच ‘ऑरगॅझम’ हीदेखील अनुभवण्याची गोष्ट आहे. मन स्थिर नसेल तर ती अनुभूतीही पूर्णपणे येऊ शकत नाही. पुरुषांच्या संदर्भात, कुठल्या कारणानं मन चिंतेत असेल किंवा सेक्सबद्दल चिंता असली, तरी लैंगिक ताठरता येत नाही. आली तरी ती टिकत नाही किंवा त्याचं पर्यवसान शीघ्रपतनात होतं. जोडप्यांनी हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे की, बऱ्याचदा त्यांच्या सगळय़ा लैंगिक समस्यांचं मूळ हे ताणात असतं.’’ 

लग्नानंतर संसारातल्या वेगवेगळय़ा जबाबदाऱ्यांचा म्हणून जो एक ताण असतो, त्यामुळेही सेक्सची इच्छा कशी मंदावत जाते, यावर भाष्य करणारी श्वाना हंटर यांची ‘A sexless marriage’ ही कादंबरी आहे. त्याची नायिका सुझन कोलिन्स ही आपल्या संसारात, दोन मुलांना मोठं करण्यात रमून गेलीय. काही निमित्तानं तिला अचानक आपण पतीपासून शारीरिकदृष्टय़ा दुरावल्याची तीव्र जाणीव होते. याचंच पर्यवसान पती-पत्नीच्या दुराव्यात, विवाहबाह्य संबंधात, काही वेळा घटस्फोटात होत असेल का, असे प्रश्न तिला छळू लागतात. वय, घरातले व्याप आणि स्वत:कडे दुर्लक्ष करण्याच्या आपल्या सवयीमुळे आपण बेढब झालोय, त्यामुळे आपल्या पतीला आपल्याबद्दल आकर्षण वाटत नसेल, असे प्रश्न तिला छळताहेत. पतीशी बोलायला हवं, मोकळेपणानं संवाद साधायला हवा, हे तिला जाणवतंय; पण सेक्सबद्दल स्वत:च्याच पतीशी बोलायला तिला कमालीचा संकोच वाटतोय. कारण मुलंबाळं झाल्यावर आणि चाळिशी ओलांडल्यावर या विषयावर बोलायचं नाही, असा पाश्चात्त्य समाजाचाही जणू अलिखित नियम आहे. ती तिचं ‘सेक्सलेस मॅरेज’ लैंगिकदृष्टय़ा परत कसं सक्रिय करते, त्यासाठी संसारातल्या वेगवेगळय़ा ताणांचं कसं व्यवस्थापन करते, याची ही रंजक-श्रृंगारिक कथा आहे. थोडय़ाफार फरकानं आपल्याकडेही जोडप्यांची हीच स्थिती असल्याचं जाणवतं.

स्त्रीरोगतज्ज्ञ आणि सेक्स थेरपिस्ट डॉ. नीलिमा देशपांडे सांगतात, ‘‘ताण हेच जणू आजच्या जीवनाचं नाव आहे. फक्त आपण त्याचा आपल्या कामावर, नातेसंबंधांवर, सहजीवनावर किती परिणाम होऊ देतोय हे वारंवार पडताळून पाहायला हवं. जोडपीे लैंगिक समस्यांवरच्या उपचारांसाठी आल्यावर म्हणतात, की ‘आम्ही आक्रमक भांडत नाही.. पण ‘ती असं का वागते’, ‘तो उलट का बोलला’ अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरून आमच्यात सतत वाद होतात.’ असे वाद घेऊन झोपायला गेल्यावर जवळीक साधता येत नाही. कारण मन शांत नसतं.’’

 करोनानंतरच्या काळात घरून काम करण्याच्या नवीन बदलामुळे अनेक घरांमध्ये पती-पत्नी दिवसभर सोबत असतात किंवा होते. त्यामुळेही नात्यातला ताण वाढतोय हे अधोरेखित करताना डॉ. नीलिमा म्हणतात, ‘‘लक्षावधी वर्षांच्या मानवी उत्क्रांतीचा विचार करता पुरुषांनी आणि स्त्रियांनी एकाच छताखाली इतका वेळ बरोबर राहणं ही नवीन गोष्ट होती. आताआतापर्यंत आपल्याकडे एकत्र कुटुंबपद्धती होती. सध्याच्या वर्तमानात प्रियकर, मित्र, समुपदेशक, आर्थिक सल्लागार अशा वेगवेगळय़ा भूमिका जोडप्याला निभावाव्या लागतात. त्याचा भयंकर ताण निर्माण होतो. जोडीदाराच्या अपेक्षांचा डोंगर जितका मोठा, तितका ताण जास्त. ताण हा श्रृंगारासाठी मारक असल्यानं त्याचा विपरीत परिणाम कामजीवनावर होतो.’’

 करोनाकाळामुळे अनेकांची आर्थिक घडी विस्कटली. आर्थिक चणचणीमुळे निर्माण होणारा ताण हाही कामजीवनाला मोठय़ा प्रमाणात मारक ठरतो, हे विशद करताना डॉ. अनिकेत यांनी एका जोडप्याचं उदाहरण सांगितलं. ‘‘या कुटुंबाची आर्थिक स्थिती उत्तम होती; पण करोनाकाळात त्या पुरुषाला व्यवसायात मोठं नुकसान आल्यानं व्यवसाय बंद करून फिरतीची नोकरी पत्करावी लागली. त्यामुळं ते प्रचंड तणावग्रस्त होते. याचा परिणाम म्हणजे त्यांची रक्तातली साखर खूप वाढली, तसंच कामेच्छा घटली.’’ 

ताण हा जसा मानसिक असतो तसाच बऱ्याचदा तो शारीरिकही असतो. डॉ. नीलिमा नमूद करतात, की जी जोडपी सतत बाहेरच जेवतात. त्यांचं शरीर सदैव ताणाखाली असतं. याचा थेट परिणाम त्यांच्या पचनशक्तीवर, झोपेवर आणि एकूण शारीरिक तंदुरुस्तीवर होतो. आपण वाचन कुठल्या प्रकारचं करतो, स्क्रीनटाइम किती आहे, झोपायच्या क्षणापर्यंत टीव्ही-मोबाइल बघतो का, याचाही शारीरिक, मानसिक आणि लैंगिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो.

  एका पस्तिशीच्या तरुणाची केस उलगडताना डॉ. अनिकेत सांगतात, ‘‘माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील या तरुणाला कमी कामेच्छा आणि लैंगिक ताठरता न राहण्याची समस्या होती. सततच्या ताणामुळे पुरेशी झोप न होणं, दिवसातून बऱ्याचदा कॉफी, धूम्रपान, आठवडय़ातून चार-पाच वेळा मद्यपान आणि शून्य व्यायाम, हा त्याचा रोजचा एकूण दिनक्रम होता. हे समजून घेणं गरजेचं आहे, की शरीरात जोश नसेल, सतत थकवा जाणवत असेल, पुरेसा व्यायाम आणि विश्रांती होत नसेल आणि वर त्याला व्यसनांची जोड असेल, तर कामजीवन उत्तम राहावं अशी अपेक्षा करणं चुकीचं ठरतं, कारण लैंगिक आरोग्य हा शारीरिक आणि मानसिक आरोग्याचाच एक महत्त्वाचा पैलू आहे.’’

 उपचारांचा विचार करता, आधी आपण ताणाखाली आहोत, आपली जीवनशैली तणावग्रस्त आहे, हे मान्य करायला हवं, असं सांगून डॉ. निकेत म्हणतात, ‘‘संसारातल्या, करिअरच्या बाकी सगळय़ा आशा-आकांक्षां- प्रमाणेच उत्तम ‘काम’ हीदेखील एक गरज आहे. ज्या व्यक्तीचं कामजीवन सुरळीत असतं, तो इतर गोष्टींतही आनंदी, समाधानी असतो. त्यामुळेच ताणाचा परिणाम सहजीवनावर होतोय हे जाणवत असल्यास उपचार घ्यायला हवेत. ताणामुळे लैंगिक समस्या उद्भवल्या असल्यास सेन्सेट फोकस थेरपी, कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी, रॅशनल इमोटिव्ह बिहेविअर थेरपी, तसंच योग, प्राणायाम या व्यायाम प्रकारांचा मन शांत करून ताण कमी करण्यासाठी फायदा होतो.’’

संसार म्हटलं, की कधी नातेवाईकांमुळे, नोकरी-व्यवसायातल्या चढउतारांमुळे, तर कधी परिस्थितीजन्य कारणांमुळे चिंता, ताण असणार हे गृहीत धरायला हवं आणि या ताणांचं व्यवस्थापन करायलाही शिकायला हवं. सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे त्या ताणांचं ओझं सतत बाळगल्यानं ते कमी होणार नाहीत, हे समजून घ्यायला हवं. यासाठी गरज आहे, ती जोडीदाराचा विचार करण्याची, क्षणस्थ होऊन जगण्याची आणि एकूणच आयुष्याकडे रसिकतेनं बघण्याची!

Story img Loader