डेमी मूरला वयाच्या ६२व्या वर्षी अभिनयासाठीचा पहिला मानाचा पुरस्कार मिळाला. तारुण्यात अभिनयासाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या या अभिनेत्रीला आयुष्याचा ‘सबस्टन्स’ समजायला मात्र वयाची साठी पार पाडावी लागली. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या तिच्या आत्मचरित्रात तिनं तिच्या आयुष्यातल्या सांगितलेल्या नकारार्थी घटनांनीच तिला ‘The only way out is IN!’ चा साक्षात्कार घडवला. तिच्याविषयी सुप्रसिद्ध लेखक, अभिनेते संदेश कुलकर्णी यांनी लिहिलेला हा खास लेख.
नुकताच डेमी मूरला ‘सबस्टन्स’ या चित्रपटासाठी ६२व्या वर्षी अभिनयाचा ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार जाहीर झाला. मी रविवारी कॉलेजच्या मित्राकडे, सच्याकडे गेलो होतो. तेव्हा त्याने तिच्या भाषणाचा व्हिडीओ दाखवला. ‘‘काय दिसायची रे ती!’’ सच्या उसासा सोडत म्हणाला.
‘‘अजूनही छान दिसते. ब्युटी इज इन द आय ऑफ द बिहोल्डर’’ दुसरा मित्र लाल्या गालातल्या गालात हसत म्हणाला.
आम्ही कुणाविषयी बोलतोय हे पाहायला त्याच्या पाच वर्षांच्या मुलाने उडी मारली आणि त्याच्या मांडीवर बसून मोबाइल हातात घेतला आणि विचारलं, ‘‘कोण आहे ही आजी?’’ सच्यानं प्रेमानं त्याला सांगितलं. ‘‘ही डेमी आजी आहे. आजी म्या ss…पाहिले. आम्ही तरुण असताना हिने फार सुंदर चित्रपट केला होता, ‘स्ट्रीपटीझ’!’’ मित्र आणखी काही बोलणार एवढ्यात त्याची बायको मीरा आली आणि त्याला झापलं. ‘‘अरे काही लाज वाटते की नाही? मुलांपुढे काही काय बोलतोस?’’
हेही वाचा – बारमाही : असले जरी तेच ते…
सच्याला डेमी आजी प्रचंड आवडायची. तिचे सगळे पिक्चर त्याने पाहिले होते. हॉस्टेलमध्ये त्याच्या बेडच्या मागे भिंतीवर डेमी आजीचे तरुणपणातले ‘वेग…वेगळे’ फोटो झळकत असायचे. सच्या आपल्या बायकोकडे, मीराकडे बघून म्हणाला, ‘‘काय स्वप्नं पाहिली आणि काय रिअॅलिटी आहे बघा!’’ मीरा उलट वार करत म्हणाली, ‘‘हो. जसा काही तू ब्रूस विलीस दिसायचास.’’ लेकाने पुन्हा प्रश्न केला, ‘‘कोण ब्रूस विलीस?’’ मीरा त्याला आत घेऊन जात म्हणाली, ‘‘डेमी आजीचा नवरा.’’
सच्या हॉस्टेलच्या दिवसांमध्ये रमला आणि हसून म्हणाला, ‘‘आत्ताच्या पिढीला कळणार नाही, पण काय दिसायची रे डेमी आजी! ‘घोस्ट’ चित्रपटामध्ये तिचा आणि पॅट्रिक श्वेजचा तो पॉटरीचा रोमँटिक सीन! आहाहा… आणि ‘इन्डिसेंट प्रपोजल’मधला ‘रोबर्ट रेडफोर्ड’बरोबरचा रोमान्स. ‘स्ट्रीपटीझ’मधला तिचा पोल डान्स पाहण्यासाठी मी पंधरा वेळा तो पिक्चर पाहिला आहे.’’
‘‘सोळा,’’ लाल्या म्हणाला, ‘‘तुझे पैसे संपले म्हणून तू माझ्याकडून पैसे घेतले होतेस आणि ते अजून परत केलेले नाहीस.’’ आम्ही सगळे हसलो.
‘‘काय काळ होता रे तो. छे! उगाच वय वाढतं मित्रा!’’ सच्या म्हणाला.
मी म्हणालो, ‘‘तोच विषय आहे या ‘सबस्टन्स’ चित्रपटाचा. डेमीचं वय वाढल्यानं तिला टीव्ही शोमधून काढून टाकतात. मग ती काळ्या बाजारातून तरुण बनण्यासाठीचं औषध घेते आणि त्याचे भयानक परिणाम होतात. ‘बॉडी हॉरर’ जॉनरची फिल्म आहे.’’
लाल्या म्हणाला, ‘‘त्यांच्याकडे काय वेगवेगळ्या फिल्म बनतात ना? आपल्याकडे असती तर मिळाली असती का या वयात तिला अशी भूमिका?’’ तोवर मीरा परत येऊन बसली होती. ती म्हणाली, ‘‘पुरुष असती तर मिळाली असती. आपल्याकडे साठीचे हिरो तरुण मुलींबरोबर रोमान्स करतातच की!’’
मी म्हणालो, ‘‘त्यांच्याकडेसुद्धा सारंच काही आलबेल आहे असं नाही बरं का. डेमीनं अष्टन कचरशी लग्न केलं होतं तेव्हा मीडियामध्ये किती टीका झाली होती. चाळीस वर्षांची बाई पंचविशीतल्या पोराशी कशी काय लग्न करते?’’ मीरा म्हणाली, ‘‘खरं आहे. कारण ब्रूस विलीसनं ५५व्या वर्षी तीस वर्षांच्या मुलीशी लग्न केलं तेव्हा सगळ्यांनी ते सेलिब्रेट केलं.’’ लाल्या म्हणाला, ‘‘अमेरिका कुठली प्रगत? तिकडे अनेक राज्यांमध्ये अॅबॉर्शन बेकायदा ठरवलंय.’’
मीरा म्हणाली, ‘‘सगळीकडे पुरुषाचंच वर्चस्व! पण तरी तिथे किमान असा चित्रपट तरी बनतो ना… आपल्याकडे बनेल का? … से… डिम्पल कपाडियाला घेऊन तरी?’’
सच्या म्हणाला, ‘‘नका नका जुन्या मैत्रिणींच्या आठवणी काढू नका. नाही तर मी सकाळीच भरायला घेईन!’’ असं म्हणून त्यानं गायला सुरुवात केली- ‘‘सागर किनारे ss… दिल ये पुकारेss…’’
मग माझ्याकडे वळून तो म्हणाला, ‘‘तुझी आहे का रे ओळख डिम्पलशी? मला फक्त एकदा प्रत्यक्ष बघायचं आहे तिला.’’ मी नकार दिल्यावर त्यानं नापसंतीने मान हलवली, ‘‘जर अशा ओळखी नसतील तर फुकट घालवलीस एवढी वर्षं या क्षेत्रात करिअर करून?’’ मी हसून म्हणालो, ‘‘डिम्पलशी नाही, पण डेमीशी माझी ओळख आहे.’’
लाल्या ढिम्मपणे म्हणाला, ‘‘पामेला अँडरसनला मी पुढच्या आठवड्यात अलिबागच्या बीचवर भेटतो आहे.’’
सच्या कोचावर आडवाच झाला. ‘‘नका नका रे सकाळी सकाळी अशा विवस्त्र आठवणी काढू. खरंच भरायला घेईन मी.’’ मीरा म्हणाली, ‘‘डॉक्टरने बंद करायला सांगितली आहे याला तेव्हापासून फार बोलायला लागला आहे. घ्यायचा तेव्हा जरा शांत असायचा.’’
सच्या म्हणाला, ‘‘का माणसं फँटसीमध्ये रमतात कळलं ना? कारण त्यांच्यासमोर वास्तव असं शड्डू ठोकून उभं असतं.’’
मीरा म्हणाली, ‘‘तुला फँटसीमध्ये घेऊन जाणाऱ्या डेमी मूरचं वास्तव बघितलंस ना तर तुझं आयुष्य खूप सोपं वाटेल तुला.’’ ‘‘म्हणजे?’’ लाल्याची उत्सुकता जागी झाली.
मीरा म्हणाली, ‘‘तिचं आत्मचरित्र आलं आहे ‘इनसाइड आउट’ नावाचं. ते वाच म्हणजे कळेल.’’
लाल्या म्हणाला, ‘‘वाचलं असतं, पण माझा इंग्रजीचा प्रॉब्लेम आहे.’’ सच्या म्हणाला, ‘‘मीसुद्धा वाचलं असतं, पण मला रिअॅलिटीचा प्रॉब्लेम आहे!
‘‘म्हणजे?’’ लाल्याने विचारलं.
सच्या म्हणाला, ‘‘डेमीच्या प्रत्यक्ष आयुष्यात काय झालं… मला काय करायचं आहे? ती स्क्रीनवर कशी दिसते ते बघायचं आहे मला.’’
लाल्या म्हणाला, ‘‘अरे तीसुद्धा आपल्यासारखी एक माणूस आहे ना?’’
सच्या हसून म्हणाला, ‘‘नाही! ती बाईमाणूस आहे! आणि तिचं बाईमाणूसपण मी कशाला समजून घ्यायचं? मग माझ्या फँटसीला भोक पडेल ना?’’
लाल्याने त्याची खेचली, ‘‘पण तुझी फँटसी तर विवस्त्र आहे ना?’’ सच्या म्हणाला, ‘पॉइंट हा आहे की माझी फँटसी प्युअर राहू दे- ऑन द रॉक्स! त्यात रिअॅलिटीचा सोडा किंवा पाणी घालू नका.’’ मग तो गायला लागला – प्यार को प्यार ही रहने दो ss रिश्तों का इल्जाssम न दो’’
सच्याचा आवाज मुलायम होता. कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये गायचा तेव्हा पोरी मरायच्या त्याच्यावर. एक प्रेम प्रकरण झालं होतं त्याचं. पण घरच्यांनी ते हाणून पाडलं आणि नंतर लग्न लावून दिलं. त्यामुळे त्याचा रिअॅलिटीचा पॉइंट मी समजू शकत होतो. मी म्हणालो, ‘‘सच्या, पण दोन्ही गोष्टी एका वेळी बघता येतात की रे. म्हणजे चंद्र हा खाचखळग्यांचा ग्रह आहे हेसुद्धा पाहता येतं आणि कवितेत त्याचं सौंदर्यसुद्धा.’’
लाल्या म्हणाला, ‘‘सच्या एकाक्ष आहे. त्याला दोन्ही बाजू पाहायच्या नाहीत. पण मला हव्या आहेत आणि मी ते इंग्लिश पुस्तक वाचू शकणार नाहीये. त्यामुळे तू मला सांग मीरा.’’
मीरा म्हणाली, ‘‘अरे ती एवढी फँटसी फिगर, पण तिला आपल्या दिसण्याविषयी कॉम्प्लेक्स होता.’’
सच्या म्हणाला, ‘‘डेमी मूरसारखीला जर दिसण्याचा कॉम्प्लेक्स वाटत असेल तर आम्ही आरशात जे प्रतिबिंब पाहतो त्याविषयी आम्ही काय वाटून घ्यायचं?’’ त्याकडे दुर्लक्ष करत मीरा म्हणाली, ‘‘आपली फिगर मेंटेन करण्यासाठी तिने अघोरी व्यायाम केला, डाएट केलं. तिला ‘फूड इटिंग डिसऑर्डर’ होती. शिवाय तुझ्यासारखी तीसुद्धा अल्कोहोलिक झाली होती.’’
सच्या उसळला. ‘‘प्लीज. मी अल्कोहोलिक नाहीये. शिवाय डॉक्टरनं सांगितल्या सांगितल्या मी एका दिवसात सोडली की नाही? कोणता अल्कोहोलिक माणूस असं करू शकतो?’’
मीरा टोकदारपणे म्हणाली, ‘‘तिनं केलं. ती ‘रिहॅब’ला गेली. ती ‘अल्कोहोलिक्स अनॉनिमस’ जायला लागली… पण मला सगळ्यात जास्त आवडलं ते तिनं स्वत:चं आयुष्य पन्नाशीनंतर कसं हातात घेतलं ते. तारुण्य निघून गेल्याची एक भावना असते ना रे? आता मी पण त्याच पायरीवर उभी आहे ना? तरी मला घर, नवरा, मुलं सगळं आहे. पण तिला काहीच नव्हतं. घटस्फोट झालेला, त्यातच तिच्या तीन मुली तिच्याशी बोलत नव्हत्या. ती पूर्ण व्यसनाधीन झालेली होती. पण तिथून तिनं स्वत:ला सावरलं आणि आता ‘गोल्डन ग्लोब अवॉर्ड’ मिळवलं.
तिच्या आयुष्यातला पहिला मानाचा पुरस्कार! कमाल वाटते मला तिची!’’ मग माझ्याकडे वळून म्हणाली, ‘‘तू वाचलंस की नाही तिचं पुस्तक? नक्की वाच! तू चित्रपट कलाकारांना जवळून पाहतोस. तुला जास्त आवडेल ते.’’
मी म्हणालो, ‘‘हो. नक्की वाचेन. मी आत्ताच एका हिंदूी चित्रपटामध्ये काम केलं एका अभिनेत्रीबरोबर. तीसुद्धा दारूच्या व्यसनातून बाहेर पडली होती. तिची आईसुद्धा स्टार होती. पण तिच्या आयुष्याचा शेवट दर्दनाक होता.’’
मीरा म्हणाली, ‘‘अरे, डेमीचं तिच्या आईबरोबरचं नातं वाचून तर मी अस्वस्थच झाले. तिची आई मानसिक रुग्ण होती. त्यांच्या नात्याविषयी तिनं त्या पुस्तकात खूप काही लिहिलंय. कशा कशातून जावं लागतं ना अनेकींना? गंमत म्हणजे, आत्ता या हिरोइन्स त्यांचं ‘प्रेग्नन्सी शूट’ करतात ना त्याची सुरुवात डेमी मूरनं केली होती. तिनं एका मासिकासाठी पहिल्यांदा तसं शूट केलं तर नंतर तिच्या आईने डेमीची नक्कल करणारं न्यूड फोटो शूट केलं- पैशांसाठी!’’
लाल्या म्हणाला, ‘‘ काय डेंजर बाई आहे!’’
मीरा म्हणाली, ‘‘हो खूपच गुंतागुंत होती त्यांच्या नात्यात! पण बरं काय वाटलं माहिती आहे. डेमी मूरला पुरस्कार मिळाल्यावर तिच्या मुलींनी केलेला नाच! म्हणजे त्यांच्यात आता सारं आलबेल असावं!’’
हेही वाचा – पडसाद : स्वार्थ आणि परमार्थ साधायचा असेल तर…
मी म्हणालो, ‘‘नाती टिकणं महत्त्वाचं आहे. मी परवा वाचत होतो. दीर्घायुषी होण्यासाठी चांगली नाती, मैत्री गरजेची असते.’’
मीरा म्हणाली, ‘‘डेमी तर म्हणते कितीही यश, पैसा, प्रसिद्धी मिळाली तरी ती पुरत नाही.. The only way out is IN!! बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आत पाहणं.’’
सच्या म्हणाला, ‘‘सकाळी सकाळी एवढा बौद्धिक डोस पुरे! आता काही तरी पोटासाठी पण नाश्ता-पाणी करू या.’’
मीरा हसून म्हणाली, ‘‘हो. जरूर. आज तुझी पाळी आहे किचन सांभाळण्याची.’’
सच्या म्हणाला, ‘‘हो का? काय ऑर्डर करू मग? कुणाला कुठला ‘सबस्टन्स’ खायचा आहे ठरवा.’’