नैराश्य वा डिप्रेशनमध्ये, त्या व्यक्तीला सतत खिन्न वाटत राहते. खूप निराश आणि असहाय वाटते. स्वत:वरचा विश्वास कमी वाटतो. डिप्रेशन हे स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त, किंबहुना ते दुपटीने अधिक आढळते. या शतकातला नैराश्याचा मानसिक आजार हा स्त्रियांमध्ये प्रथम क्रमांकाचा आजार आहे.

औ दासीन्याचा मानसिक विकार, नैराश्य आपण खरे तर डिप्रेशन म्हणून जास्त व्यवस्थित ओळखतो. डिप्रेशन हा एक अतिशय सर्वसाधारण असा मानसिक आजार आहे. बऱ्याच वेळा अनेकांना डिप्रेशन म्हणजे एक नकारात्मक अशी भावनिक प्रक्रिया आहे, असे वाटते. एखादी दु:खद घटना घडली, नात्यांमध्ये तणाव झाला, नोकरी सुटली, कर्जबाजारीपण आले तर उदास भावना प्रत्येकाला येतेच. किंबहुना प्रसंगानुरूप तसे वाटणे स्वाभाविक आहे, पण ती केवळ एक भावनिक प्रक्रिया आहे आणि दु:खद घटनांमुळे आली आहे म्हणून त्याला डिप्रेशनचा विकार म्हणता येणार नाही. खिन्नपणा आपल्या मन:पटलावर या सर्व गोष्टींनी उमटतो खरा, पण काळाच्या ओघात तो निघूनही जातो. डिप्रेशन खऱ्या अर्थाने एक गंभीर स्वरूपाचा आणि व्यापक बराच काळ रहाणारा असा मानसिक आजार आहे.
डिप्रेशनमध्ये, सर्वसामान्यपणे त्या व्यक्तीला सतत खिन्न वाटत राहते. खूप निराश आणि असहाय वाटते. स्वत:वरचा विश्वास कमी वाटतो. आपण कुठलीही गोष्ट धड करू शकणार नाही किंवा कुठल्याही चांगल्या गोष्टींसाठी आपण पात्र आहोत, असेही वाटत नाही. डिप्रेशन हे स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात दिसते. किंबहुना ते दुपटीने अधिक आढळते. या शतकातला डिप्रेशनचा मानसिक आजार हा स्त्रियांमध्ये प्रथम क्रमांकाचा आजार आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. तसे पाहता परदेशात विशेष करून पाश्चात्त्य देशात डिप्रेशन हे एका टिपिकल किंवा साचेबंध स्वरूपात दिसते. आशियाई खंडात आणि भारतात ते तसेच दिसेल असे नाही. याचे कारणभावना व्यक्त करण्याच्या स्वरूपात आशियाई खंडात आणि परदेशात सांस्कृतिकदृष्टय़ा खूप फरक आहे. स्त्रियांच्या आशिया खंडातील विशिष्ट भूमिकेमुळे औदासीन्य हे थोडेसे वेगळ्या स्वरूपात दिसते.
बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत असे दिसून येते की, त्यांना विविध प्रकारची शारीरिक दुखणी होत असतात. ही दुखणी अगदी काही वष्रे त्यांना सहन करावी लागतात. उदा. ओटीपोटी दुखत राहणे, डोके दुखणे, हाडांचे दुखणे अशा प्रकारे त्या दुखण्याने त्रस्त झालेल्या असतात, उद्विग्न झालेल्या असतात. अशा वेळी जो कोणी सांगेल आणि सल्ला देईल त्या त्या डॉक्टरकडे जातात. अनेक प्रकारची औषधे त्यांनी वापरून पाहिलेली असतात. एक बाई तर म्हणाल्या की, डॉक्टर, मी माझ्या या शारीरिक दुखण्यासाठी काय काय व्याप केले, किती औषधे घेतली, किती डॉक्टरांकडे, किती पसे खर्च केले याचा आढावा घेतला तर माझी एक स्वतंत्र दीर्घकथाच होईल. हे ऐकताना यात अतिशयोक्ती आहे, असे वाटते. पण त्या बाईंनी त्यांचे हाडांचे दुखणे कमी होत नाही म्हणून अनेक उपचार घेतले होते. फॅमिली फिजिशियनपासून सगळ्या खास डॉक्टरांकडे त्या जाऊन आल्या होत्या. अगदी गावातल्या वैदूपर्यंत त्या पोहोचल्या होत्या. कुठल्याशा पाल्यांचा रससुद्धा घेतला होता. पण त्यांचे दुखणे मात्र काही केल्या कमी होत नव्हते. घरच्या देवाकडे, कुलदेवतालासुद्धा साकडे घालून झाले होते. एका डॉक्टरांनी सल्ला दिला म्हणून त्या आमच्या मानसोपचार विभागात पोहोचल्या.
आम्ही यांची व्यवस्थित क्लिनिकल माहिती घेतली. तेव्हा असे लक्षात आले की, त्या बाई या हाडांच्या दुखण्यामुळे कशातच इंटरेस्ट घेत नव्हत्या. घरची साधी साधी कामेसुद्धा करीत नव्हत्या. उत्तम सुगरण म्हणून त्या त्यांच्या नातेवाईकांत आणि मित्रमंडळींमध्ये प्रसिद्ध होत्या, पण आता त्यांना साधे वरणही जमेना. कधी मीठ जास्त घातलेय, कधी मीठ घातलेच नाही. हे रोजचेच झाले होते. कुणाचा खरंच विश्वास बसला नसता की एके काळी या बाई सर्वाच्या आवडत्या सुगरण होत्या. आणखी विचारपूस करताना कळले की त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर अगदी थोडय़ा काळात त्यांच्या भावालाही भयंकर अपघात होऊन तोही गेला होता. आयुष्याच्या दोन अत्यंत दु:खदायक घटनांनी त्या कोसळत गेल्या. शरीर तर धडधाकट होते. अनेक डॉक्टरांनी अनेक तपासण्या केल्या. त्यात कुठलाही वैद्यकीय आजार दिसत नव्हता. सुरुवाती सुरुवातीला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या त्यांची सारी कामे करीत होत्या. आजाराच्या सुरुवातीला त्या नेटाने सगळे जमवून घेत होत्या. पण हळूहळू उत्साह ओसरत चालला होता. पूर्वी चटपटीने त्या कामे करीत होत्या. पण आता त्याच कामाला त्यांना कष्ट पडत होते. शारीरिक ताण खूप जाणवत होता. अत्यंत थकवा जाणवत होता. हळूहळू तर ते सगळे आवडणारे काम करूच नये, असे त्यांना आतून वाटत होते. त्यांचे त्यांनाच कळत नव्हते की कसल्या भयानक अंधाराने त्या वेढल्या जात होत्या. घरच्यांना वाटले की आईच्या मृत्यूच्या दु:खाचा त्यांना प्रचंड धक्का बसला आहे. अपघातात झालेल्या भावाच्या दयनीय मृत्यूने, त्या अवस्थेने त्यांचे मन व्यथित झाले होते. सगळे कसे विरून गेले होते. ना संसाराची जाणीव ना स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव. सुरुवातीला त्यांच्या नवऱ्याने तिला समजावून सांगितले. स्वत:ला सावरायला सांगितले. थकवा आला होता म्हणून टॉनिक घ्यायला लावले. पण त्यांना कसली तरी अनामिक हुरहुर आतून जाणवत होती. आतमधून सगळे कसे पोकळ – पोकळ वाटत होते. कुठे तरी खोलवर मनाच्या कप्प्यात एक भयंकर उल्कापात होत होता. आजूबाजूच्या प्रसन्न वातावरणात, सणासुदीत कशा-कशांत त्यांचे लक्ष लागत नव्हते. नेहमी आनंद साजरे करणारे त्यांचे मन ते आनंदाला ओळखतही नव्हते. कॉलेजला आणि शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलांची न्याहारी व जेवण त्या पूर्वी किती व्यवस्थित करीत असत. तो आहार कसा पौष्टिक असेल याचा त्या अभ्यासपूर्वक विचार करायच्या. पण आज मुलांना साधे खायला-प्यायला मिळेल की नाही याचा विचारही त्यांच्या मनात येत नव्हता.
मन कधी सरभर झाल्यासारखे वाटत होते. कधी शून्यात गेले होते. इतरांना तर काही कळतच नव्हते. सासरच्या मंडळींनी किती तरी महिने वाट पाहिली की ती आज सावरेल, उद्या सावरेल. पण नाही त्या सावरूच शकत नव्हत्या. त्यांचे त्यांनाच कळत नव्हते की, आपल्याला हे काय होतेय? त्या सुरुवातीला स्वत:शीच झगडत राहिल्या, लढत राहिल्या पण त्या लढय़ात मनस्ताप मात्र त्यांनाच होत होता. त्यांना प्रचंड अपराधी वाटत होतं. एक सांसारिक स्त्री असून त्या स्वत:च्या कर्तृत्वाला विसरत चालल्या होत्या की काय? आपण अगदी कुचकामी आहोत, असे त्यांना वाटू लागले. त्यामुळे त्या आणखी झुरत चालल्या. असहाय होत गेल्या. आता नवरा आणि मुले त्यांना खूप समजून घेतले तरी त्या स्वत:चा हट्ट सोडीत नाहीत, बरे व्हायचे नाव घेत नाहीत म्हणून चिडू लागले. आपल्या दु:खाचा त्या बाऊ करतात, असे त्यांना वाटू लागले. काय कमी होते त्यांना? नवरा सगळे त्यांच्या हातात देत होता. पै-पाण्याची समस्या नव्हती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुले व्यवस्थित होती. मग हिचे काय हे नाटक चालले आहे, हा प्रश्न कुटुंबीयांच्या मनात येऊ लागला.
या अशा प्रकारच्या समस्या स्त्रियांमध्ये औदासीन्याच्या मनोविकारात आढळतात. बघता बघता आपल्या लक्षात येते की, त्यांचे वजन घटत चालले आहे. चेहरा फिका पडलेला आहे. चेहऱ्यावरचे सौंदर्य आटल्यासारखे झाले आहे. पूर्वीचे स्मितहास्य, झळाळी व तेज स्त्रियांच्या चेहऱ्यावरून लुप्त होते. रोजच्या रोज व्यवस्थित राहण्यासाठी धडपडणारी ती स्त्री या आजारात आता कशाही साडय़ा नेसते. मुद्दामच मळकट, फिकट, नीटनेटकेपणाने राहत नाही. केसांची वेणीफेणी नीट केली जात नाही. अगदी भिकारीपणा आहे की काय, असे वाटायला लागते. तिकडे कपाटात भरपूर भारी साडय़ा असतात. ही अशी परिस्थिती घरच्यांना कळत नाही. सारे कसे व्यवस्थित असताना, व्यावहारिक ऐश्वर्य असताना, संसार तृप्त असताना काय या स्त्रीला जगणे दुर्धर होते. खरे त्या स्त्रीला कळत नसते. म्हणून पुढे काय करायचे ना तिला कळत ना तिच्या घरच्यांना कळत. साधे छातीत धडधडले किंवा थोडसे दुखले तरी हार्टअ‍ॅटॅक येईल की काय या भीतीने डॉक्टरांकडे आजकाल माणसे जातात. अनेक तपासण्या करतात. पण एवढय़ा मोठय़ा मनाच्या दुखण्यात मात्र डॉक्टरकडे जायचे कुणाला सहजी कळत नाही. आपण जसे उच्च रक्तदाब व मधुमेह समजून घेतो तसे डिप्रेशनला समजून घेणे आवश्यक आहे. मनाचा हा आजार खरे तर मनालाच कळत नाही. सगळ्यांना हा फुकाचा दु:खाचा बाऊ वाटतो. पण डिप्रेशनची ही वेदना खरी आहे. मन:पटलावर खूप खोलवर रुजलेली आहे. बऱ्याचदा स्त्रियांना वाटते की, हा त्यांच्या मनाचा कमकुवतपणा आहे. त्यामुळे त्या आणखी वैतागतात व चिडचिडतात. दुसरे कोणी ही वेदना गंभीरपणे समजून घेत नाही आणि आपल्याला ती काबूतही ठेवता येत नाही, याची चीड त्यांच्या मनाला कुरतडू लागते. शरीराबरोबर मनालापण असहायपणा आलेला असतो. स्त्रियांच्या बाबतीत ही अत्यंत महत्त्वाची बाब अशासाठी आहे की, त्यांना आपण आपल्या कौटुंबिक व स्त्री-सुलभ जबाबदारीत कुशल व तत्पर राहणे अधिक आवडते. त्यांच्या ऐहिक अस्तित्वाला कर्तव्यदक्षतेमुळे एक अमूल्य अर्थ येतो. किंबहुना ही कर्तव्यदक्षता आपल्या जीवनातला रस आहे असे वाटते. आणि डिप्रेशनमुळे नेमक्या याच कर्तव्यात आपण खूप कमी पडतो आहोत याची जाणीव त्यांना होते तेव्हा त्या प्रचंड दबावाखाली वावरतात. स्वत:बद्दल त्यांना तिरस्कार वाटू लागतो. त्यामुळे त्या आणखी एकाकी पडतात, आणखी दु:खी होतात. आपल्याला हे नराश्याच्या आजारामुळे झाले आहे आणि त्यासाठी उपचार घेणे आवश्यक आहे हे समजून घेणे त्यांना खूप जड जाते. पण डिप्रेशन हा स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानसिक आजार आहे. त्याबद्दल आणखी जाणून घेऊया पुढच्या   (२१ फेब्रुवारी) लेखात..
डॉ. शुभांगी पारकर – pshubhangi@gmail.com

philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
loksatta representative shriram oak conversation with dr sujala watve
आठवड्याची मुलाखत : मानसिक आजारांसाठी मदतीचा हात देणारी ‘हेल्पलाइन’
52 year old shyamala Goli swims 150 km
लाटांवर स्वार होऊन विक्रम करणारी श्यामला गोली
Santosh Deshmukh murder case, Devendra Fadnavis ,
“आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला तरी…”, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
Loksatta natyarang The story of the gradual fading of memory of dementia sufferers
नाट्यरंग: असेन मी नसेन मी: स्मृतिभ्रंशग्रस्तांची हळूहळू विझण्याची कहाणी…
women responsibility, free Time women , women ,
रिकामटेकडी
dilemma Ramdas Athawale Parbhani case
परभणी अत्याचार प्रकरणी रामदास आठवलेंची कोंडी
Story img Loader