नैराश्य आलं की त्या व्यक्तीलाच नव्हे तर तिच्या जवळच्या लोकांनाही अनेकदा ते जाचक ठरू शकतं. पण त्यावर उपाय आहेत. नैराश्य कमी करणाऱ्या औषधाने फरक दिसायला लागतो. नातेवाईकांना तर हा बदल पटकन कळतो. फक्त आवश्यकता असते ती संयमाची!

औदासीन्याच्या भोवऱ्यात जेव्हा एखादी स्त्री अडकते तेव्हा आपण कधी काळी या काळोखाच्या छायेतून पुन्हा प्रकाश पाहू शकू, असा विचारसुद्धा ती करू शकत नाही. मुळातच नैराश्य वा डिप्रेशनमुळे आशावादी व सकारात्मक विचार करणे माणसाला खरे तर सुचतच नाही. पण औदासीन्याच्या मानसिक आजारातून, कितीही गंभीर असला तरी उपचार घेऊन बाहेर पडता येणे सहज शक्य आहे. आजच्या काळात अनेक उपचारपद्धती आहेत. म्हणून जेव्हा नैराश्य आपल्या जगण्याच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण करीत आहे किंवा आयुष्य जगूच देत नाही, हे लक्षात येता क्षणी उपचारांच्या दिशेने पाऊल टाकलेले बरे.
सर्वप्रथम हा आजार ओळखणे व तो आपल्याला झाला आहे याचा बिनशर्त स्वीकार करणे अतिशय महत्त्वाचे आहे. यासंबंधित काही भ्रामक कल्पना व गरसमजुतीचा निचरा करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. उदा. नैराश्य ही स्त्रीच्या डोक्यातली भ्रामक कल्पना आहे, असे गृहीत धरणे चुकीचे आहे. नैराश्य हे नकारात्मक विचारशृंखलेतून उद्भवते, पण ते मेंदूतल्या महत्त्वाच्या रासायनिक बदलांमुळे.
* नैराश्येवर मात करण्यासाठी स्त्रियांनी आपल्या त्यागपूर्ण प्रतिमेकडे किंवा भूमिकेकडे पाहिले पाहिजे.  – अतिशय हास्यास्पद असा हा गरसमज आहे. स्त्री ही काही प्रतिमा नाही. ती हाडामासाची जिवंत व्यक्ती आहे. म्हणूनच तिला नैराश्याचा आजार होऊ शकतो आणि त्यासाठी तिने शास्त्रीय उपचार घेतले पाहिजे.
* नैराश्य म्हणजे एखादी दुर्घटना घडल्यामुळे स्त्रीवर झालेल्या आघाताची भावनिक प्रतिक्रिया असते. – हा ही अशास्त्रीय गरसमज आहे. आयुष्यात जवळच्या माणसाचा मृत्यू होणे, नोकरी जाणे, प्रेमभंग होणे यामुळे मन उद्विग्न होणे हे नसíगक आहे. पण त्यामुळे सर्वानाच नैराश्य येईल असे नाही. उद्विग्नपणा आल्यावर आपण सावरतो आणि ते निघूनही जाते. पण नैराश्य हा एक आजार आहे.
* सर्व स्त्रियांमध्ये नैराश्येची लक्षणे एकसारखी असतात.-  हीसुद्धा अशास्त्रीय भ्रामक कल्पना आहे. नैराश्याची लक्षणे ही विविध स्वरूपाची असतात. काही स्त्रियांना सतत रडू येते. काम होत नाही. भूक कमी लागते. वजन कमी होते. तर काही स्त्रियांमध्ये खूप चिडचिड होते. त्या जास्त झोपतात. वजन वाढते. या विविध लक्षणांमुळे नातेवाईकांना स्त्रियांचे नैराश्य म्हणजे भावनिक नाटक किंवा स्टंट वाटतो. नैराश्य हे मेंदूच्या रसायनातील बदलांमुळे किंवा त्याचा समतोल बिघडल्यामुळे होते. याचाच अर्थ इतर आजारांप्रमाणेच तज्ज्ञांकडे जाऊन नैराश्याचे निदान करणे व उपचार घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांकडे जाऊन आपली लक्षणे व्यवस्थित सांगावीत. एखादे लक्षण थोडेसे अवघड वाटते किंवा ओशाळे वाटते म्हणून सांगण्याचे स्त्रिया टाळतात. कित्येक स्त्रियांना आपल्याला खूप रडू येते, कामात उत्साह वाटत नाही, सारखे झोपून राहतो हे सांगणेही कठीण जाते. काही वेळा आयुष्य अगदी नकोसे वाटते. आपण या जगात नसतो तर बरे झाले असते, असे वाटते. तर कधी कधी आत्महत्या करावी असे गंभीरपणे वाटते. असे वाटणेसुद्धा पाप आहे, असा विचार स्त्रियांच्या मनात येतो. मनावर खूप भार आल्यासारखा त्यांना वाटते. तर मृत्यूच्या व आत्महत्येच्या विचाराने औदासीन्य घेरलेले असते. औदासीन्यात सारासार विचार करण्याची मनाची ताकद कमी झालेली असते, म्हणून तसे वाटते. जेव्हा असे गंभीर विचार मनात येतात, तेव्हा नैराश्याचे स्वरूपसुद्धा तीव्र असते. नैराश्याच्या सौम्यतेवर वा गंभीरतेवर उपचार अवलंबून असतात. मानसोपचारतज्ज्ञाला हेही जाणून घेणे आवश्यक असते, की नैराश्य हे पहिल्यांदाच आले आहे का किंवा यापूर्वीही येऊन गेले होते. नैराश्य हे पुन:पुन्हा येऊ शकते. अगदी मधला काळ पूर्णपणे नॉर्मल गेला किंवा आनंदात गेला तरीसुद्धा. नैराश्य काही वेळा दीर्घकालीनही असू शकते.
अगदी दोन वर्षांपासून दहा-बारा वर्षांपर्यंत या काळात पूर्ण आयुष्याचा वृक्ष नुसता सुकून गेल्यासारखा भकास झाल्यासारखा वाटतो. अशा वेळी तज्ज्ञांना हे माहीत करून घ्यावयाचे असते, की साधारण कुठल्या प्रकारच्या उपचाराने पूर्वी रुग्ण बरा झाला होता वा कुठले उपचार चालले नव्हते.
नैराश्याच्या उपचारामध्ये मेंदूतील सिरोटोनिन व नॉरएपिनेफ्रिनसारख्या रसायनांची भूमिका नि:संशय महत्त्वाची आहे. म्हणून अ‍ॅन्टिडिप्रेशन वा डिप्रेशन कमी करणाऱ्या औषधांची गरज या उपचारात महत्त्वाची मानली जाते. साधारणत: दोन ते तीन आठवडय़ांत या औषधाने फरक दिसायला लागतो. हा फरक मुख्यत्वे, मनाला बरे वाटते, उदासपणा थोडा कमी झाला आहे, आजूबाजूच्या गोष्टींमध्ये काय चालले आहे हे कळू लागले आहे, मनाची कलकली कमी झाली आहे, स्थिरावल्यासारखे वाटते अशा अनुभवातून लक्षात येतो. नातेवाईकांना तर हा बदल पटकन कळतो. या गोळ्या आज खाल्ल्या व उद्या बरे वाटते असे होत नाही. बऱ्याचदा काही सौम्य दुष्परिणाम जवळजवळ सर्व स्त्रियांना जाणवतात. जसे की अ‍ॅसिडिटी झाली, अचानक गदगदल्यासारखे वाटते, अस्वस्थ वाटते. हे दुष्परिणाम कालानुरूप कमी होऊ लागतात. या आजाराचे पुन:पुन्हा परीक्षण करणे आवश्यक वाटते. कारण नैराश्य किती बरे झाले, गोळ्या प्रभावी ठरल्या की नाहीत इत्यादी तपासणे गरजेचे असते. या उपचारांसाठी संयम हवा. ‘पी हळद हो गोरी’ असे अजिबात होत नाही.
 एकदा बरे होण्याची प्रक्रिया सुरू झाली की दोन ते चार महिन्यांपर्यंत पूर्ण बरे झाल्याची रुग्ण खात्री देतात. यानंतर मात्र सहा ते आठ महिन्यांत गोळ्या अगदी हळूहळू कमी करायच्या असतात. पण डिप्रेशन जर एकापेक्षा अधिक वेळा झाले तर या गोळ्या जास्त काळ द्याव्या लागतात. एकापेक्षा अधिक गोळ्या द्याव्या लागतात. रसायनांची पातळी सातत्याने समतोल ठेवावी म्हणून काही इतर मूड स्टॅबिलायझरसारख्या गोळ्याही द्याव्या लागतात. डिप्रेशन यामुळे पुढच्या काळात काबूत राहू शकते. या उपचारादरम्यान झोपेचे नियोजनही खूप महत्त्वाचे आहे. डिप्रेशनमधून व्यक्ती जसजशी बाहेर येते तसतशी झोपसुद्धा सुधारते. पण सुरुवातीच्या काळात झोप अजिबात येत नाही. दिवसभर अस्वस्थ वाटते म्हणून झोप येण्यासाठी एखादे औषध दिले जाते. डिप्रेशनमध्ये आत्महत्या करावीशी वाटणे, जिवाची तळमळ होणे, एका जागी बसताच येत नाही, नुसती घालमेल होते अशी लक्षणे दिसल्यास विद्युत उपचारपद्धतीचाही वापर केला जातो. आत्महत्येचे विचार असल्यास विद्युत उपचारपद्धती योग्य रुग्णांमध्ये अतिशय प्रभावी ठरते. याशिवाय अ‍ॅनिमिया, थायरॉइड, डायबिटिस यांसारख्या शारीरिक आजारांमुळे किंवा हार्मोन्सच्या समस्यांमुळे डिप्रेशन येते. गोळ्यांबरोबर मानसोपचारपद्धतीची डिप्रेशनमध्ये खूप मोठी भूमिका आहे. सुरुवातीला स्त्रीला भावनिक आधार देणे गरजेचे आहे. स्त्रीला खूप एकाकी वाटते, अपराधी वाटते, सर्वानी झिडकारल्यासारखे वाटते. अशा वेळी डॉक्टरनी व कुटुंबाने दिलेल्या भावनिक आधाराच्या आश्वासनानेसुद्धा तिचा आत्मविश्वास वाढतो. तिच्या भावना न दुखवता, तिची थट्टा न करता या मंडळींनी तिला सहज कळू दिले, की या स्थितीत
तिला किती असहाय व एकाकी वाटत असेल याची कल्पना त्यांना आहे. तर तिच्यात खूप सकारात्मक बदल दिसून येतो. आपण काही विचित्र अवघडलेल्या स्थितीत एकटेच नाही पण इतरांनासुद्धा याची जाणीव आहे, या भावनेने व एकंदरीत या स्थितीत कुणी तरी आपल्या पाठीशी आहे की ‘मैं हूँ ना’ ही जाणीव सातत्याने दिल्यास तिचा हुरूप व जीवनाबद्दलची ओढ वाढते. मानसोपचारपद्धतीत नकारात्मक व निराशाजनक वैचारिक दृष्टिकोन बदलून सकारात्मक आणि आशादायक दिशेने नेणाऱ्या मानसोपचारपद्धती महत्त्वाची भूमिका बजावतात. मुळातच या वैचारिक पद्धतीत बदल घडवणाऱ्या उपचारपद्धती आहेत. ज्याला ‘कॉग्नेटिव्हथेरपी’ म्हणतात. आपण जग बदलण्याचा अवघड व अशक्यप्राय विचार करण्यापेक्षा स्वत:लाच बदलून अवघड परिस्थितीचा सामना कसा करावा हे या उपचारात शिकविले जाते. या विचार-बदलाच्या प्रक्रियेत स्त्रीची स्वप्रतिमाही उजळत जाते, खंबीर होत जाते.
नैराश्यग्रस्त माझ्या एक रुग्ण मला म्हणाल्या होत्या, डॉक्टर मी माझ्यामुळेच बरी झाले हो. इतर कोण कशाला बदलेल आपल्यासाठी आणि आपण तरी का अपेक्षा करावी? अत्यंत विपरीत परिस्थितीतसुद्धा त्यांनी या विचारधारेने स्वत:ला सावरले व नंतर आयुष्यात यशस्वी झाल्या. मुळात आनंदाला आपल्या आयुष्यात कसे खेचता येईल, हे स्त्रीने पाहावे. आपल्या नकारात्मक विचारांना आपणच आव्हान द्यावे. आपण कोणाला आवडत नाही, आपल्यावर कोणाचे प्रेम नाही या विचारांचा काही प्रत्यक्ष पुरावा आहे का? यापूर्वी आपल्याशिवाय घरातल्या कुणाचे पान हलणारच नाही, या विचारात सम्राज्ञीसारखे वावरत होतो. या घडीला हे असे वाटते यात तथ्य नाही, हे लक्षात यायला थोडासा वेळ लागतो. पण शेवटी लक्षात येते खरे.
थोडक्यात, काळोख्या रात्रीनंतर लख्ख प्रकाश पडतो यावर स्त्रीने विश्वास ठेवावा. याव्यतिरिक्त भरपूर व्यायाम करणं, ज्यामुळे अ‍ॅण्डॉरफिनसारखी सुंदर भावना जागवणारी रसायने मेंदूत वाढतात. लवकरात लवकर दैनंदिन जीवनात स्वत:ला सामावून घेणे, आवडती कामे करणे यामुळे नैराश्यातून लवकर बाहेर पडू शकतो. काही तरी नवीन करावे, नवीन छंद जोपासावेत हे उत्तमच! जिवाभावाचे मित्र-मत्रिणी नसíगक अ‍ॅण्टिडिप्रेसन्ट आहेतच. ‘अगं काही झालं नाही तुला. हे सगळं तात्पुरतं आहे, तू बरी होशील’ असं म्हणणारी एखादी मत्रीण अफाट वादळातून आपलं तारू किनाऱ्याला आणायला मदत करते, याचा अनुभव काहींना असेलच.
बऱ्याच वेळा औदासीन्यामुळे कुठली जबाबदारी अंगावर घेऊ नये, असे स्त्रियांना वाटते. शांत बसून राहतात. पण याउलट जबाबदारीने कामे संपविली तर काही तरी आत्मसात केल्याच्या भावनेने औदासीन्य कमीच होते. अर्थात जबाबदारी अंगावर घेणे म्हणजे त्या ओझ्याखाली दबून जाणे नव्हे. आपली कौटुंबिक नाती सांभाळणे खूप महत्त्वाचे आहे. याची जबाबदारी साऱ्या कुटुंबीयांवर आहे. कारण कौटुंबिक ताणामुळे नैराश्य लवकर जात नाही. नैराश्य जर दीर्घकालीन असेल तर तज्ज्ञाकडे नियमित जावे. जीवनशैली जास्त कृतिशील व उत्साही बनवावी. जमलेच तर आध्यात्मिक मार्गही अवलंबावा, ज्यामुळे औदासीन्य निर्माण करणाऱ्या ऐहिक विचारांना बांध घालता येईल. या सर्वातून ‘पुन्हा नवी जन्मेन मी’ या तत्त्वज्ञानाला आयुष्याचा अविभाज्य घटक बनवावे.    

loksatta representative shriram oak conversation with dr sujala watve
आठवड्याची मुलाखत : मानसिक आजारांसाठी मदतीचा हात देणारी ‘हेल्पलाइन’
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Bengaluru Crime News
मुलांना विष पाजलं, स्वत:ही केली आत्महत्या; बंगळुरूत दाम्पत्याचं धक्कादायक कृत्य; मरणापूर्वी लिहिला सविस्तर ईमेल!
Tejswini Pandit
“लवकर बरं व्हायचं आहे”, तेजस्विनी पंडितला नेमकं झालंय तरी काय? पोस्टवर स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधवने केल्या कमेंट्स
52 year old shyamala Goli swims 150 km
लाटांवर स्वार होऊन विक्रम करणारी श्यामला गोली
Mother murder daughter Nagpur, Nagpur,
प्रेमात अडसर ठरणाऱ्या सख्ख्या मुलीचा आईनेच केला खून, मृतदेहाची विल्हेवाट…
dilemma Ramdas Athawale Parbhani case
परभणी अत्याचार प्रकरणी रामदास आठवलेंची कोंडी
Daughter takes mother to salon for first time
‘लेक असावी तर अशी… ‘ पहिल्यांदा आईला घेऊन गेली पार्लरला अन्… Viral Video तून पाहा ‘तिच्या’ चेहऱ्यावरील आनंद
Story img Loader