शिवपार्वतीचा पुत्र, गणांचा अधिपती, बुद्धी दाता ही गणपतीची गुणवैशिष्ट्ये सर्वसामान्यांना माहीत असतात, मात्र समर्थ रामदास स्वामी, नामदेव महाराज, तुकाराम, संत एकनाथ महाराज, अशा अनेक संतांच्या गणेश वंदनेत गणपतीचे याही पलीकडचे वर्णन वाचायला मिळते. बुद्धीच्या माध्यमातून मिळणारा ज्ञानाचा आनंद हीच बुद्धिदेवता मोरयाची कृपा ही गोष्ट सर्वच संतांनी एकमुखाने स्पष्ट केली आहे. श्रीगणेशाचे विविध संतांनी केलेले वर्णन गाणपत्य संप्रदायाचे उपासक, अभ्यासक आणिसंशोधक विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांच्या या लेखातून…
ॐ नमोजी आद्या वेदप्रतिपाद्या
जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा
देवा तूंचि गणेशु सकलार्थमति प्रकाशु
म्हणे निवृत्तिदासु अवधारिजो जी
उपनिषदांमध्ये ज्याला ओंकारब्रह्म म्हणतात, ते सर्वाद्या, वेद प्रतिपाद्या, स्वसंवेद्या आत्मतत्त्व म्हणजेच मोरया. ‘देवा तूंचि गणेशु’ असे नि:संदिग्ध प्रतिपादन करीत मोरयाच्या निर्गुण, निराकार, परब्रह्म, परमात्म स्वरूपाला माउली ज्ञानेश्वर महाराज वंदन करतात. विविधसंतांनी केलेली गणेश वंदना अभ्यासत असताना आपल्या डोक्यात आजपर्यंत बसलेल्या भगवान श्री गणेश म्हणजे पार्वतीचे पुत्र, शिवनंदन, शिवगणप्रमुख या सर्वच कल्पना गळून पडतात. संतांनी दिलेल्या दृष्टीच्या आधारे आपण मोरयाकडे पाहायला सुरुवात करतो तेव्हा शिवपुत्र नवे तर ‘शिवहरीरवीब्रह्मजनक’ अशा स्वरूपात गाणपत्य संप्रदायाने वर्णन केलेल्या मोरयाच्या परम वैभवशाली आणि शास्त्रशुद्ध यथार्थ स्वरूपाने आपण विमोहित होतो.
आणखी वाचा-सांधा बदलताना : कळा ज्या लागल्या जीवा
संतांनी आपल्या श्री गणेशस्तवनांमध्ये क्वचित प्रसंगी जनभावनेत रूढ झालेल्या या पार्वतीनंदन स्वरूपाचे ओझरते वर्णन केले असले, तरी कोणत्याही संतांना मोरया केवळ एवढ्या मर्यादित स्वरूपात अपेक्षितच नाही. मोरयाचे ओंकारब्रह्म, परब्रह्म स्वरूपच सकल संतांच्या वंदनेचा विषय आहे. अवतार सापेक्ष रीतीने पार्वतीपुत्र स्वरूपाचे वर्णन करता येत असले, तरी संतांच्या दृष्टीने ते वर्णन यथार्थ नाही. समर्थ रामदास स्वामी ‘आत्मारामा’च्या आरंभी हीच भूमिका अत्यंत स्पष्ट शब्दात व्यक्त करतात,
जयासि लटिका आळ आला
जो माया गौरीपासोनि जाला
जालाचि नाही त्या अरूपाला रूप कैचे
श्री समर्थ म्हणतात, तो मोरया माया स्वरूपी गौरीपासून झाला. हा त्याच्यावर लटिका आळ आहे. आळ नेहमी खोटाच असतो. त्याला पुन्हा लटिका म्हटले. जणू काही ठासून सांगायचे आहे की पक्का खोटा. काय खोटे? तर मोरया पार्वतीपासून जन्माला आला. तो झालेलाच नाही अर्थात ते अनादी, अनंत स्वरूपात चिरंतन, सनातन तत्त्व आहे.
श्री समर्थ मोरयाला अरूप म्हणतात. रूप शब्द आपण सामान्यत: चेहऱ्याकडे पाहूनच वापरतो. चेहऱ्याकडे पाहूनच रूपवान किंवा रूपवती शब्द उपयोगात आणतो, मात्र मोरया अरूप आहे. मोरयाचा देह तर तुमच्या-माझ्यासारखा सामान्य आहे, पण असामान्य आहे ते मोरयाचे मस्तक. ते ‘गजमस्तक’आहे. ‘गज’ शब्द सर्वार्थाने अलौकिक आहे. ‘ग’ आणि ‘ज’ ही त्यातील दोन अक्षरे पलटवली की ‘जग’ शब्द तयार होतो. हे जग सादी, सांत, सावयव, सगुण, साकार, परिवर्तनीय आदी आहे. त्याच्या विपरीत म्हणजे अनादी, अनंत, निरवयव, निर्गुण, निराकार, अपरिवर्तनीय तत्त्व म्हणजे गज. तेच ज्यांचे आनन अर्थात त्याच स्वरूपात त्यांना समजून घेता येते ते गजानन. या दृष्टीने मोरयाचे शरीर ‘जग’ आहे, पण मस्तक ‘गज’ असल्यामुळे मोरया अरूप आहे. श्री समर्थांना तो अरूप, परब्रह्म, परमात्मा अभिवंदनीय वाटत आहे. श्री समर्थ त्या मोरयाचे वर्णन करताना शब्द वापरतात,
ॐ नमोजी गणनायका सर्व सिद्धीफलदायका
अज्ञानभ्रांती छेदका बोधरूपा
अज्ञानभ्रांतीला तोच दूर करू शकतो जो ज्ञानरूप असतो, बोधरूप असतो. तो मोरया उपास्य आहे. ‘ॐ नमोजी आद्या’ म्हणणारी माउली असो किंवा ‘ॐ नमोजी गणनायका’ म्हणणारे श्री समर्थ असोत, दोघांचीही नव्हे, खरे तर सर्वच संतांची श्री गणेशाकडे पाहण्याची ही समान दृष्टी आहे.
आणखी वाचा-स्वभाव-विभाव: संदर्भाचा भ्रम
शांतिबह्म श्री एकनाथ महाराजांनी आपल्या ‘हस्तामलक’स्तोत्राच्या आरंभी अर्पिलेली शब्दकलिका पाहा, किती माउलींचे अनुसरण करणारी आहे.
जी वस्तु वेदांत प्रतिपाद्या
जे अनादित्वे जगद्वंद्या
ते वंद्याही परमवंद्या
तो वंदीला सिद्धिनायकु
मोरयाचे ज्ञान एकच आहे हेच सांगणारी ही श्री ज्ञाननाथांची आणि श्री एकनाथांची समान वैखरी. शंकरांनी दिलेल्या काही वरदानांमुळे श्रेष्ठ झालेले एक गणतत्त्व स्वरूपात कोणतेही संत मोरयाकडे पाहतच नाहीत. जे ‘वंद्याही परमवंद्या’ अर्थात जे ‘सर्वपूज्य’ आहेत. सर्वादि पूज्य आहेत, त्याच मोरयाला सर्व संत आळवतात.
मोरयाच्या या शिवपुत्र नव्हे तर परमेश्वर जनक स्वरूपाचे वर्णन करताना श्री तुकोबाराय कसे वर्णन करतात पाहा,
ॐकार प्रधान रूप गणेशाचे
जे तिन्ही देवांचे जन्मस्थान
अकार तो ब्रह्मा
उकार तो विष्णू
मकार महेश मानियेला
ऐसे तिन्ही लोक जेथुनी उत्पन्न तो हा गजानन मायबाप
तुका म्हणे ऐसी आहे वेद वाणी पहावी पुराणी व्यासाचिये
पार्वतीनंदन, शिवपुत्र नव्हे तर बह्मदेव, विष्णू, शंकर हे तिन्ही देव ज्यांच्यापासून उत्पन्न होतात त्या त्रिगुणाधीश आणि त्रिगुणातीत मोरयाचे वर्णन तुकोबाराय करीत आहेत.
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा
आणखी वाचा-स्री-‘वि’श्व: ‘रिक्लेम द नाइट’
असे म्हणताना श्री समर्थांना तेच ‘त्वं गुणत्रयातीत’ म्हणत अथर्वशीर्षकारांनी वंदिलेले मोरयाचे परब्रह्म रूप अपेक्षित आहे.
प्रथम नमू गजवदनु
गौरी हराचा नंदनु
सकळसुरवरांचा वंदनु
मूषक वाहन नमियेला त्रिपुरावधी गणाधिपती
हरे पूजिला भावे भक्ती
एके बाणे त्रिपुर पाडिला
क्षिती तै पशुपती संतोषला
इंद्रादिकी अष्टलोकपाळी लंबोदरू
पूजिला कनककमळी
त्यासी प्रसन्न झाला तयेवेळी
म्हणवुनी सकळी पूजियेला
सटवे रात्री मदनु शंबरे नेला
प्रद्युम्न समुद्रामाजी टाकिला
तै कृष्णे विघ्नहरू पूजिला
प्रद्युम्न आला रतिसहित
पूजिला साहि चक्रवर्ती
त्याचिया पुरति आर्ती
युधिष्ठिरे पूजिला चतुर्थी
राज्य प्राप्ती झाली तया
म्हणवुनि सुरवरी केली पूजा
त्रिभुवनी आणिक नाही दुजा
विष्णुदास नामा म्हणे स्वामी माझा
भावे भजा एकदंता
अशा शब्दांत संतशिरोमणी श्री नामदेव महाराज श्री गणेशांचे वंदन करतात.
यात आरंभी जरी गौरीहराचा ‘नंदनु’ असा शब्द आला असला, तरी तो देवी पार्वती आणि शंकर यांना आनंद देणारा अशा व्यापक अर्थाने आहे. कारण पुढच्याच ओवीमध्ये श्री नामदेव महाराज श्री शंकरांनी केलेल्या गणेशोपासनेचे वर्णन करीत आहेत. त्रिपुरासुर वधाच्या अत्यंत महत्त्वपूर्ण प्रसंगी भगवान शंकरांनी गणेश उपासना केल्यामुळे त्रिपुरासुर मारला गेला. हे श्री नामदेव महाराज उद्धृत करीत आहेत. श्री गणेश केवळ शिवपुत्र असते तर पित्याने मुलाची पूजा करण्याची आवश्यकता काय?
पुढे श्री नामदेव महाराज इंद्र इत्यादी देवतांनी केलेल्या गणेश उपासनेचे वर्णन करीत आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या भगवान पांडुरंगाच्या, भगवान श्रीकृष्णाच्या गणेशोपासनेचा उल्लेख. ‘तै कृष्णे विघ्नहरू पूजिला’ अशा सुस्पष्ट शब्दात श्री नामदेव महाराज भगवान गणेशांचे सर्वपूज्यत्व अधोरेखित करीत आहेत.
आणखी वाचा-मोडक्या व्यवस्थेचे कठोर वास्तव
म्हणवुनि सुरवरी केली पूजा
त्रिभुवनी आणिक नाही दुजा
सर्व सुरवरांनी अर्थात ईश्वर महेश्वरांनी देखील ज्याची पूजा करावी, असा त्रिभुवनात दुसरा कोणी नाही. असे म्हणत श्री नामदेव महाराज मोरयाच्या सर्वपूज्यत्वाचा जयजयकार करीत आहेत. अर्थात हे सर्व झाले मोरयाचे स्वरूप. तो कसा आहे? याचे वर्णन. पण त्या स्वरूपाचा आपल्याला लाभ काय? हे सांगताना तुकोबाराय म्हणतात,
धरोनिया फरश करी भक्तजनांची विघ्ने वारी
ऐसा गजानन महाराजा
त्याची चरणी लाहो लागो माझा
अर्थात असा हा मोरया आपल्या हातातील परशूच्या माध्यमातून भक्तांच्या जीवनातील विघ्न दूर करतो. संतांच्या दृष्टीने या जगातील सगळ्यात मोठे विघ्न म्हणजे ब्रह्मभिन्न कोणत्याही गोष्टीचा होणारा भास. ती भ्रांती दूर होणे हीच खरी कृपा. त्यासाठी श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
तुझिया कृपेचेनि बळे वितुळती भ्रांतीची पडळे
आणि सर्व भक्षक काळे दास्यत्व की जे
मोरयाच्या कृपेने अज्ञानाचा नाश होतो. अज्ञानाने युक्त असल्यामुळे नाशवंत असणाऱ्या जगाच्या माध्यमातून मिळणारे नाशवंत सुख बाजूला पडत अविनाशी आनंदाचा मार्ग प्रशस्त होणे हीच मोरयाची कृपा.
सर्वच संतांनी भगवान बुद्धिपतीच्या कृपेने प्राप्त होणाऱ्या, बुद्धीच्या माध्यमातून मिळणारा हा ज्ञानाचा आनंद हीच मोरयाची कृपा ही गोष्ट एकमुखाने स्पष्ट केली आहे. श्री एकनाथ महाराज म्हणतात,
तुझी अणुमात्र झालिया भेटी
शोधिता विघ्न न पडे दृष्टी
तोडिसी संसार फासोटी
तोचि तुझे मुष्टी निज परशु
जीवनातील सकल विघ्न दूर करणारा मोरया असा विघ्नराज आहे. त्यासाठीच तो आपल्या सगळ्यांना उपास्य आहे. मायापती असणाऱ्या त्या मायातीत मोरयाला माया विनाशासाठी संत प्रार्थना करतात. तुकोबारायांचे शब्द आहेत,
मज वाहवता मायेच्या पुरी
बुडता डोही भवसागरी
तुज वाचोनि कोण तारी
पाव झडकरी तुका म्हणे
मायेच्या प्रांतातील नश्वर सुखांची आसक्ती दूर करत शाश्वत आनंदाचा मोदक प्रदान करतो तो मोरया. शाश्वत आनंद तोच प्रदान करू शकतो जो स्वत: तसा असेल. सच्चिदानंद असेल. त्यामुळेच संतांनी वर्णन केले ते ओंकारब्रह्म गणेशाचे. परबह्म गणेशाचे.
आणखी वाचा-इतिश्री: मैत्रीतलं पालकत्व
तो मोरया सिद्धिपती आहे आणि बुद्धिपतीदेखील. संत त्याच्या बुद्धिपती स्वरूपाचे अधिक वर्णन करतात. बुद्धीचा आधार आहे शास्त्र. भारतामध्ये शास्त्र म्हटल्यानंतर सहा दर्शनांचा विचार येतो. ही सहाही दर्शने आणि त्या माध्यमातून प्राप्त होणारे ज्ञान हे मोरयाच्या हातात आहे हे सांगण्यासाठी श्री ज्ञानेश्वर माऊली सहा हातांच्या मोरयाची रचना सांगतात आणि त्याच्या हातातील परशु म्हणजे तर्कशास्त्र, अंकुश म्हणजे नीतीशास्त्र, मोदक म्हणजे वेदांत, दंत म्हणजे वार्तिक, कमळ म्हणजे सांख्य तर अभय हस्त म्हणजे धर्मशास्त्र असे रूपक सादर करतात. मोरयाचा सर्वात श्रेष्ठ अवयव म्हणजे त्याची सोंड. मानवी जीवनातील सर्वात श्रेष्ठ गोष्ट म्हणजे विवेक. माऊली या दोघांची सांगड घालत म्हणते,
देखा विमलवंतु सुविमळु
तोचि शुंडादंडू सरळु
जेथ परमानंदु केवळु महासुखाचा
बुद्धिपतीला मागणी आहे ती या बौद्धिक आनंदाची. ‘जय जय जी गणनाथा तू विद्या वैभवे समर्था। अध्यात्म विद्योच्या परमार्था मज बोलवावे।’अशा शब्दांत विद्या वैभवसंपन्न बुद्धिपतीला श्री समर्थ अभिव्यक्तीसाठी क्षमता मागत आहेत. कारण,
ओम नमोजी गणनायका
सर्व सिद्धी फलदायका
अज्ञानभ्रांतीछेदका बोधरुपा
हे मोरयाचे स्वरूप आहे. सिद्धी आणि बुद्धी दोन्ही गोष्टी त्याच्याद्वारे प्राप्त होणार आहेत. विद्यावंतांचा पूर्वजु असे श्री समर्थ त्यांचे वर्णन करतात आणि त्याच्या कृपेने प्राप्त होणाऱ्या बौद्धिक आनंदाचे वर्णन करताना म्हणतात,
नमू ऐसिया गणेंद्रा विद्या प्रकाश हे पूर्णचंद्रा
जयाचेनी बोध समुद्रा भरती दाटे बळे
सर्व संतांनी एकमुखाने केलेली ही सिद्धीबुद्धिपती स्वरूप,ओंकारबह्म गणेशाची वंदना समजून घेत या गणेशोत्सवात मोरयाची याच रूपात उपासना करण्याचा प्रयत्न करू.
(लेखकाचे ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद झालेल्या ‘श्री गणेशोपासना’ या ग्रंथमालेसह ७७ पैकी ५० ग्रंथ केवळ गणपती या विषयावर प्रकाशित आहेत.)
sgpund@rediffmail.com