देविका दफ्तरदार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘तोच आपला बा अन् तीच आपली आई’ – सुमित्रा मावशीच्या ‘बाई’ या लघुपटातल्या पहिल्या वाक्यापासूनचा माझा तिच्याबरोबरचा प्रवास आज डोळ्यांसमोर उभा राहतो आहे. सुमित्रा मावशी ही माझी सख्खी मावशी. ‘बाई’ हा पहिला लघुपट तिनं केला तेव्हा मी अगदी चार-पाच वर्षांची होते. ‘बाई’च्या वेळच्या फार धूसर आठवणी माझ्या मनात आहेत; पण अंधूकसं आठवतंय, की खेडेगावातल्या एका झोपडीजवळ आम्ही ४-५ लहान मुलं खेळत होतो आणि मग सुमित्रा मावशीचा माझ्या कानावर पडलेला आवाज मला आठवतो, ‘‘कॅमेऱ्याकडे नाही बघायचं.. ‘म्हनुन बाई’ एवढंच म्हण.’’

‘म्हनुन बाई’ या संवादापासून ते ‘शिरीन, माणूस स्वत:ची संहिता स्वत: कधी लिहू  शकेल?’ या ‘संहिता’ चित्रपटातल्या संवादापर्यंतचा सुमित्रा मावशीबरोबरचा माझा प्रवास तुमच्यासमोर मांडू इच्छिते. ‘बाई’, ‘अपना स्वास्थ्य अपने हाथ’, ‘भैंस बराबर’, ‘नितळ’, ‘बाधा’, ‘देवराई’, ‘संहिता’, ‘अस्तु’, ‘कासव’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिच्यासोबत स्वत:ला घडवण्याची संधी मला मिळत गेली आणि तशी मी तिचं बोट धरून चित्रपट क्षेत्रात पाऊल टाकत गेले. चित्रपट क्षेत्रातील गुरू एवढीच आमची साथ नाही, तर माझी मावशी- किंबहुना मावशी म्हणजे ‘माँ-सी’- आईसारखी, ही तिनंच सांगितलेली नात्याची जाण तिनं कायम माझ्याशी घट्ट ठेवली. सुमित्रा मावशीच्या नजरेतून जगाकडे बघताना कायम एक वेगळी दृष्टी मिळायची. निसर्गाशी, झाडांशी, पानाफुलांशी, प्राण्यापक्ष्यांशी नातं जोडायला तिनंच मला शिकवलं. माझा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट सुमित्रा मावशी आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘देवराई’. माणसाचं मन आणि देवराई यांचं नातं सांगणारा हा चित्रपट. त्याच्या चित्रीकरणाच्या दोन दिवस आधी मी, सुमित्रा मावशी आणि आमची संपूर्ण टीम कोकणातल्या त्या दाट जंगलात गेल्याचं मला आठवतं. दाट जंगल, वेडेवाकडे वाढलेले वृक्ष आणि तिथली भयाण शांतता बघून मी पुरती भेदरून गेले होते. इतकं की, पुढचे काही दिवस या जंगलात आपण शूटिंग करायचं, हा विचारच पचनी पडेना; पण जंगलातली ती शांतता आपल्याशी काही तरी बोलू पाहाते आहे, ती वेडीवाकडी वाढलेली झाडं कशी एकमेकांना आधार देत उभी आहेत, याची जाणीव करून देऊन सुमित्रा मावशीनं माझी भीती पार घालवून अभिनय करण्यासाठीचा आत्मविश्वास माझ्यात पुरता रुजवला.

मी शाळेत असतानाची गोष्ट. सुमित्रा मावशीला काही आजारपणामुळे विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्या काळात मी सुमित्रा मावशीच्या घराच्या खिडकीत बसून तिच्याबरोबर पक्ष्यांशी बोलायला शिकले. एकटेपणा वाटला तर खिडकीत बसून झाडावरच्या पक्ष्यांशी गप्पा मारायच्या, त्यांचे आवाज ऐकायचे आणि त्यांना आपले मित्र बनवायचं. असे कित्येक क्षण आम्ही एकत्र घालवले. आजसुद्धा सुमित्रा मावशीच्या घरी गेल्यावर आपल्याला पहिल्यांदा जाणवतात ती तिच्या गच्चीवर असलेली खचाखच भरलेली, सुंदर सजवलेली, वेगवेगळ्या जातींची झाडं. त्या झाडांशी तिचं खूप जवळचं नातं होतं; तिच्या घरची माणसं असल्यासारखं. सुमित्रा मावशी परगावी असली तरी कुणाला तरी निरोप गेलेला असायचा, ‘माझ्या झाडांची काळजी घेताय ना? त्यांना रोज पाणी घालताय ना?’ निसर्गातल्या प्रत्येक झाडात, पानात, फुलात, पक्ष्यात तिचं अस्तित्व मला सतत जाणवत राहील.

सुमित्रा मावशीचं हे झाडांशी असलेलं नातं तिच्या अनेक चित्रपटांत दिसतं. ‘नितळ’ चित्रपटात मी साकारलेल्या नीरजा या अंगावर पांढरे डाग असलेल्या नायिकेलासुद्धा जाणीव होते, की तिच्या चेहऱ्यावरचे पांढरे डाग हे निसर्गातल्या सुंदर रंगीबेरंगी पानांसारखे आहेत. पानं नसतात का अर्धी हिरवी, अर्धी पांढरी. अगदी तसंच.

‘नितळ’ हा सुमित्रा मावशी-सुनील सुकथनकरांसोबत केलेला माझा दुसरा पूर्ण लांबीचा सिनेमा. प्रमुख भूमिकेत मी आणि डॉ. शेखर कुलकर्णी. आम्ही दोघे नवीन आणि आमच्यासोबत होते अनेक दिग्गज- विजय तेंडुलकर, रीमा, नीना कुलकर्णी, विक्रम गोखले, ज्योती सुभाष, रवींद्र मंकणी. यातल्या प्रत्येकाकडून खूप काही शिकण्यासारखं होतं; पण त्या सगळ्यांसोबत काम करण्याचं खूप दडपणही होतं; पण सुमित्रा मावशीचा कणखर स्वभाव, सेटवरची ‘कमांडिंग पोजिशन’ आणि अभिनय करण्याचे अचूक दिलेले धडे, या सगळ्यामुळे कितीही मोठे कलाकार समोर असले तरी  काम करण्याचा आत्मविश्वास ती मला कायम द्यायची. कुठलीही व्यक्तिरेखा साकारताना ती नेहमी सांगायची, ‘ते माणूस होता आलं पाहिजे.’ मग ते माणूस जर व्हायचं असेल, तर व्यक्तिरेखेचा अभ्यास चोख करायचा. सगळ्यात पहिली पायरी म्हणजे ‘स्क्रिप्ट’ चोख पाठ पाहिजे. तिचा अट्टहास असायचा, की फक्त अभिनेते, दिग्दर्शकच नाही, तर सेटवर काम करणाऱ्या प्रत्येकाला स्क्रिप्ट माहिती पाहिजे.  कलाकाराने व्यक्तिरेखेचा अभ्यास करताना त्या व्यक्तिरेखेची पार्श्वभूमी, इतर व्यक्तिरेखांशी असलेलं नातं, आवाजाचा पोत, देहबोली, हे तर अभ्यासलं पाहिजेच, पण वेशभूषा कशी ठरवली जाते, सेट प्रॉपर्टी (नेपथ्य) काय वापरली जाते, प्रकाशयोजना कसं केलं आहे, याकडेसुद्धा त्यांचं लक्ष असायला पाहिजे, ही सुमित्रा मावशीची शिकवण.

सुमित्रा मावशीच्या प्रत्येक चित्रपटाबरोबर एक माणूस म्हणून मी घडत गेले हे सगळ्यात महत्त्वाचं. ‘नितळ’चा किस्सा सांगायचा, तर त्यातल्या नीरजाची भूमिका ही कोड असलेल्या मुलीची भूमिका होती. एक अभिनेत्री म्हणून अर्थातच मला दडपण आलं होतं, कारण चेहऱ्यावर पांढऱ्या डागांचा मेकअप करून संपूर्ण चित्रपट करायचा होता. पहिल्याच दिवशी मेकअप ट्रायल करून आरशात चेहरा बघताना मी पुरती नव्‍‌र्हस झाले होते. हे असे पांढरे चट्टे चेहऱ्यावर घेऊन काम करायचं? माझा उतरलेला चेहरा बहुधा सुमित्रा मावशीच्या लक्षात आला असावा, कारण टीममधल्या इतर लोकांच्या प्रतिक्रिया या ‘बाप रे कसं  दिसतंय हे!’ अशा असताना, सुमित्रा मावशी मला म्हणाली, ‘काय सुंदर दिसतायत हे पांढरे डाग तुला!’ मी अवाक् झाले. पुढे पुढे हा चित्रपट पूर्ण करताना तिच्याकडून एक नवीन दृष्टी मी मिळवली होती. तिच्याच संवादातून, ‘सौंदर्य हे बघणाऱ्याच्या दृष्टीत असतं. संस्कृतीनं स्त्रीला सौंदर्याच्या संकल्पनेच्या तुरुंगात जे अडकवलंय त्यातून तू बाहेर पडली आहेस. बस्स एक कुशल माणूस हो.’

सुमित्रा मावशीबरोबरच्या चित्रपटांच्या आणि वैयक्तिक प्रवासाच्या अनेक आठवणी आज सिनेमाच्या मोंटाजसारख्या डोळ्यांसमोर येतायत. एक कलाकार म्हणून सुमित्रा मावशीचे अनेक पैलू होते. चित्रपटातली प्रत्येक फ्रेम ही जशी सुंदर आणि खरी दिसली पाहिजे असं तिला वाटायचं, तसं तिचं  जगणंही सर्जनशील, सुंदर आणि खरं करण्याचा तिचा नेहमी प्रयत्न असायचा. तिच्यातली कला ही तिच्या जगण्यात सर्वत्र दिसायची. मग ते तिचं भिंतीवरच्या सुंदर चित्रांनी सजवलेलं, वेगवेगळी झाडं लावलेलं, कलात्मक वस्तूंनी सजवलेलं घर असेल, नाही तर तिचं सुंदर, स्वच्छ हस्ताक्षर असेल किंवा तिचा पेहराव असेल. त्या सगळ्यामध्ये कलात्मक दृष्टी दिसायची. आयुष्यात आलेल्या प्रत्येक अवघड, दु:खी प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी रडत बसण्यापेक्षा नवीन कलाकृती तयार करून, आयुष्याला सकारात्मकता देऊन दु:खावर मात करण्याची ताकद तिच्यात होती. तिच्या प्रत्येक कलाकृतीतून माणुसकी, समाज आणि नातेसंबंध याचं  तिला असलेलं महत्त्व जाणवत राहातं. म्हणूनच फक्त रक्ताच्याच नव्हे, तर प्रेमाच्या नात्यांनी बांधलेलं तिचं खूप मोठं कुटुंब आहे.

मी इतर दिग्दर्शकांबरोबर काम करत असतानासुद्धा प्रत्येक स्क्रिप्टवर चर्चा करायला किंवा माझा कुठलाही आलेला नवीन चित्रपट बघायला ती कायम उत्सुक असायची. वेळोवेळी कान पकडून टीका करतानासुद्धा ती कधी मागेपुढे बघायची नाही. सुमित्रा मावशीचं बोट धरून मी आयुष्याचे धडे घेतले. कधी तिचं ऐकलं, कधी विरोध केला. कधी तिच्यावर रुसले, कधी भांडले; पण उद्या आपल्याला काही लागलं, तर ती एक हक्काचं माणूस आहे, हा विश्वास कायम तिनं मला दिला. ‘नाळ’ चित्रपटासाठी मला ‘पिफ’मध्ये (पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आणि त्याच वेळेस सुमित्रा मावशीला ‘दिठी’ या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला होता. एकाच वेळेस पुरस्कार घेताना आमचं दोघींचा ऊर भरून आला होता.

सुमित्रा मावशीनं तिच्या चित्रपटातून समाजाला खूप काही दिलं. त्या चित्रपटांचा एक अंश मला होता आला याचा मला अभिमान आहे..

श्रद्धांजली!

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devika daftardar article on renowned marathi director sumitra bhave zws