आदर्श मानवी जीवनाचे मापदंड म्हणून ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे चार टप्पे समजले जातात. त्याचप्रमाणे आर्थिक नियोजनाचे उद्दिष्ट गाठतानाही काही ठराविक टप्पे पार करावे लागतात. यातील कोणत्या टप्प्यावर कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे हे एकदा स्पष्ट झाले की अधिक ताण न घेताही आपण नियोजनाच्या त्या त्या टप्प्यावर आर्थिक स्वातंत्र्य अनुभवू शकतो.
वॉरन बफे या जगातल्या श्रीमंत माणसांपैकी एक असणाऱ्या अब्जाधीशाने असे सांगितले आहे की उत्पन्नाच्या कोणत्याही एका स्रोतावर अवलंबून राहून नका. उत्पन्नाचा दुसरा स्रोत हवा यासाठी गुंतवणुकीकडे वळा.
म्हणूनच, गुंतवणुकीकडे वळणाऱ्या तरुण मित्रमैत्रिणींनो! गुंतवणुकीच्या प्रक्रियेत आपण कोणत्या टप्प्यावर आहोत याचा आढावा घेतला पाहिजे. यामुळे अचूक आर्थिक अंदाज वर्तवता येतीलच. शिवाय गुंतवणूकविषयक निर्णय घेण्यासही फायदा होईल.
आर्थिक नियोजनातील टप्पे
संपत्तीचा संचय- आर्थिक नियोजनातील या प्राथमिक टप्प्यात व्यक्तीवर तुलनेने कमी जबाबदाऱ्या असतात. म्हणूनच संपत्तीचा संचय करणे हा मुख्य उद्देश असला पाहिजे. भारतातील जवळपास ६० टक्क्यांहून अधिक जनता अर्थात ३५ वर्षांच्या खालील प्रत्येकाचा यात समावेश होतो. यातील बहुतेक जणांनी नुकतेच नोकरी किंवा व्यवसायाच्या मार्गाने अर्थार्जनाला सुरुवात केलेली असते. म्हणूनच या टप्प्यावर मोठय़ा आर्थिक जबाबदाऱ्या अंगावर घेण्यास काहीच हरकत नसावी. उदा. घर घेणे किंवा मेडिकल विमा उतरवणे यासारख्या आयुष्यभरासाठीच्या तरतुदी करण्याचा हाच उत्तम काळ..
सुप्रियाचे उदाहरण पाहूया. २५ वर्षांची सुप्रिया नामांकित आयटी कंपनीत नोकरीला लागली असून तिला आर्थिक नियोजनाचा श्रीगणेशा करायचा आहे. तिच्यासाठी मार्गदर्शक टिप्स-
१. संपत्ती संचयनाच्या टप्प्यावर आपल्या एकूण उत्पन्नापकी किमान २५-३० टक्केरक्कम गुंतवणुकीकडे वळवली पाहिजे.
२. ही गुंतवणूक एकाच ठिकाणी न करता ती सोन्यामध्ये, मुदत ठेवींमध्ये, भांडवली बाजारात तसेच रियल इस्टेटमध्ये अशी विभागून करण्याला पसंती द्या.
३. रियल इस्टेट तसेच भांडवली बाजारातील गुंतवणूक दीर्घकालीन फायद्याची ठरते. त्यामुळे पोर्टफोलिओतील गुंतवणुकीत त्याचा मोठा वाटा असला पाहिजे. मात्र मुदत ठेवींमधील गुंतवणूक गरजेनुसार ठरवली गेली पाहिजे.
४.काही बरीबाईट घटना घडल्यास, विम्यातील गुंतवणूक सुप्रियावर अवलंबून असणाऱ्या कुटंबीयांसाठी (आई-वडील किंवा नवरा) मोठा आधार ठरू शकते. म्हणून विमा घेणे केव्हाही चांगले. इंडोमेंट तसेच मार्केटशी निगडित असणाऱ्या विमा योजना या दीर्घकालीन गुंतवणुकीतच मोडतात ( १० ते १५ वर्र्षे कालावधी) या योजना तिला आयुष्याच्या पुढील काळात फायदेशीर ठरू शकतात. कमी गुंतवणुकीपासून सुरुवात करून गरजेनुसार सुप्रिया यामधील गुंतवणुकीची रक्कम वाढवू शकते.
५. याशिवाय भविष्यनिर्वाह निधी, विमा योजना आणि म्युच्युअल फंड्स यांच्यात दर महिना किंवा तिमाही स्वरूपात ती गुंतवणूक करू शकते.
६. बँक खात्यात मोठी रक्कम नुसतीच पडून असणे बरे नव्हे! तीन महिन्यांच्या पगाराहून अधिक रक्कम बचत खात्यात नुसती जमा असणे शक्यतो टाळा.
संपत्तीचे संरक्षण- हा टप्पा म्हणजे आपण वर पाहिलेल्या टप्प्याच्या अगदी विरोधाभासी आहे. या टप्प्यावर तुम्ही तुमची पुंजी अधिक सुरक्षित कशी करता येईल, यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. थोडक्यात महागाई असताना आपली रोख रक्कम वाचवणे तर दुसरीकडे भांडवली बाजारात गुंतवलेला ‘पेपर मनी’ तोटय़ात जाणार नाही, यासाठी जागरूक राहिले पाहिजे. नोकरी जाणे, एखादे आजारपण किंवा कर्ज फेडणे यापकी काहीही संकट कोसळू शकते म्हणून संपत्ती सुरक्षेचा मुद्दा गांभीर्याने घेतला पाहिजे. आपण आपले ऐच्छिक खर्च कमी करू शकतो (मागण्यांपेक्षा गरजांना प्राधान्य द्या) तसेच बचतीतून नियमित उत्पन्नाची निर्मिती होत आहे की नाही याची खात्री करून घेऊ शकतो.
राजीव एका एमएनसीमध्ये गेल्या सहा वर्षांपासून नोकरी करीत होता. मात्र कॉस्ट कटिंगमुळे त्याच्या कंपनीतील अनेकांवर आर्थिक संकट कोसळले. कंपनीने राजीवच्या पगारातील ‘इतर’ म्हणून असलेली रक्कम २५ टक्क्य़ांनी कमी केली व गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा पगारही अनियमित होत आहे. त्याचा गृहकर्जाचा हप्ता तसेच कौटुंबिक खर्च यांचा ताळमेळ बसवता बसवता त्याच्या नाकी नऊ आले आहेत.
खालील काही गोष्टी राजीवसाठी फायदेशीर ठरू शकतात-
१.आता बहुतेक बँका बचत खात्यांवरही चांगले व्याज देतात. त्यामुळे ६ टक्क्य़ांपेक्षा जास्त व्याज खात्यातील जमा रकमेवर मिळू शकते. यामुळे तुमच्या बचतीचे मूल्य वृद्धिंगत होण्यास मदत होते.
२. एखादी अडचणीची वेळ आली तर आपण लगेच शेअर्स तसेच इक्विटी फंड्स यांमध्ये केलेली गुंतवणूक काढून घेण्याचा पर्याय निवडतो. मात्र इक्विटीमधील गुंतवणूक ही दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी असते. त्यामुळे संकटसमयी घाईघाईने निर्णय घेत ही गुंतवणूक पूर्णपणे काढून घेण्यापेक्षा तिची पुनर्रचना केली पाहिजे. उदा. ४० टक्के गुंतवणूक असेल तर त्यातून २० टक्के काढून ही रक्कम मुदत ठेवी तसेच कॅपिटल प्रोटेक्शन प्रॉडक्टमध्ये वळवली पाहिजे. थोडक्यात राजीवने इक्विटीमधील गुंतवणूक निश्चित उत्पन्न मिळू शकेल, अशा इतर पर्यायांकडे वळती केली पाहिजे.
३. गुंतवणुकीवरचे व्याज, डिव्हिडंड, घरभाडे या पूर्वीच्या गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न किंवा त्याचा काही भाग पुन्हा गुंतवणुकीकडे वळवला पाहिजे. जोपर्यंत हे पैसे लागत नाहीत, तोपर्यंत अल्पकालीन मुदतीच्या ठेवींसारख्या पर्यायांचा विचार करण्यास हरकत नाही.
४. आता सोने तारण ठेवून किंवा घर वा मालमत्ता गहाण ठेवूनही कर्ज काढता येते. मात्र याची नीट चौकशी केली पाहिजे. उदा. सीमाच्या आईने ४ हजार रुपये तोळा या भावाने सोने घेतले होते. सोन्याचा भाव आता ३३ हजार रुपयांवर गेलाय. घरातल्या अडचणीमुळे त्यांनी सोन्यावर कर्ज काढण्याचा निर्णय घेतला. मात्र सोन्याच्या किंमत १० टक्के वाढूनही त्यांनी आता सोने तारण ठेवून कर्ज घेतल्याने त्यांच्या ‘अॅसेट’ चे रूपांतर कर्जात झाले. ते फेडण्याची जबाबदारी वाढली. शिवाय कर्जावरील व्याज देणेही आलेच. हे व्याज अर्थातच बाजारमूल्यांवर आधारित असणार. अशा वेळी सोन्यावर कर्ज काढण्यापेक्षा हे सोने विकून टाकणे बरे नाही का !
संपत्तीचे जतन-आयुष्यात आतापर्यंत आर्थिक नियोजनासाठी केलेल्या मेहनतीची फळे चाखण्याचा हा टप्पा आहे. आपण जसे निवृत्तीकडे वळतो, त्या वेळी आपल्या कष्टाच्या कमाईचे योग्य प्रकारे जतन करणेही आव्हानात्मक असते. ही संपत्ती तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना आयुष्यभर नीट पुरली पाहिजे, या प्रकारे तिचा विनियोग झाला पाहिजे. म्हणूनच गुंतवणुकीचा वेळोवेळी आढावा, कर नियोजन तसेच दीर्घकालीन गुंतवणूक निर्मितीची साधने हे मुद्दे महत्त्वाचे बनतात. वार्षिक उत्पादने, भाडे स्वरूपात मिळणारे उत्पन्न, पोस्ट तसेच बँकेच्या मुदत ठेव योजना, हायब्रीड म्युच्युअल फंड्स, इंडेक्सशी निगडित डिबेंचर्स यांचा विचार करण्यास हरकत नाही.
या टप्प्यावर काय करायचे यापेक्षा काय कटाक्षाने टाळायचे, याची अधिक काळजी घेतली पाहिजे.
१. दुप्पट, तिप्पट नफा मिळवून देणाऱ्या योजनांना भुलू नका. उदा-‘झाडे लावण्याच्या बदल्यात परतावा’ अशा प्रकारच्या योजना. जे दिसत नाही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. परतावा केव्हा मिळेल याची हमी नाही!
२. गुंतागुंतीची उत्पादने तसेच तुम्हाला क्लिष्ट वाटत असतील अशा उत्पादनांमध्ये गुंतवणूक करू नका.
३. कोणत्याही एका प्रकारात सर्वाधिक गुंतवणूक करणे टाळा. माझ्या शेजारच्या काकूंनी चौकातल्याच किराणावाल्याकडे एक लाख रुपये पाच वर्षांसाठी गुंतवले. त्यावरील व्याजावर त्या खूश आहेत. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव असे करणे टाळाच.
४. मोठय़ा गुंतवणुकीचे भान ठेवा. स्मॉल-कॅप स्टॉक्स तसेच मोक्याच्या जागी नसलेल्या जागेतील गुंतवणूक. यातील परतावा भविष्यात चांगला मिळणार असला तरी जोखीम अधिक आहे, हे लक्षात ठेवा.
संपत्तीचे वाटप-तुम्हाला फक्त तुमच्यापुरते नियोजन करून चालणार नाही. तुमच्या मुलांचा-पुढील पिढीचाही विचार करावा लागेल. वारसा हक्काचा मुद्दा भारतात फार महत्त्वाचा आहे. वारसा म्हणजे आपल्या कुटुंबाची नीतिमूल्ये. परंपरा व संस्कृती यांचे पुढील पिढीकडे हस्तांतरण होय. यासह कुटुंबाची संपत्तीही पुढील पिढीकडे हस्तांतरित होत असते. विकसित देशांमध्ये अशा प्रकारे संपत्ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द करताना जवळपास ४० टक्के वारसा कर भरावा लागतो. भारतात अजून तरी असा कायदा नसल्याने वारसा हक्क तुलनेने सहज प्राप्त होतात.
मृत्युपत्र या कायदेशीर कागदपत्रामुळे वारसा हक्कामुळे उद्भवणाऱ्या समस्या कमी निर्माण होतात. व सामंजस्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटण्या होतात. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे मृत्युपत्र केल्यामुळे तुमच्यावर अवलंबून असलेल्या जोडीदाराचे किंवा कुटुंबातील अपंग वा गतिमंद व्यक्तीचे आर्थिक स्वारस्य व भविष्य जपले जाते. अलीकडे काही कुटुंब कार्यालयांची स्थापना झाली असून तेथील अधिकारी संपत्तीच्या वाटण्यांबाबत मार्गदर्शन करतात.
ज्याप्रमाणे ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम तसेच संन्यासाश्रम असे चार टप्पे आदर्श मानवी जीवनाचे मापदंड समजले गेले आहेत. त्याचप्रमाणे वर उल्लेख केलेले टप्पे आर्थिक नियोजनाच्या प्रवासात येतात. कोणत्या टप्प्यावर कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे हे एकदा स्पष्ट झाले की अधिक ताण न घेताही आपण आयुष्याच्या त्या टप्प्यावर आर्थिक स्वातंत्र्य अनुभवू शकतो.
(लेखिका वित्त नियोजिका असून लेखातील मते त्यांची वैयक्तिक आहेत.)