आर्थिक नियोजनासाठी सल्लागार किंवा वित्त नियोजन का हवा ? तर तो तुमच्या पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करण्यासाठी मदत करू शकतो. इतकेच नाही तर त्याच्या प्रावीण्याच्या क्षेत्रातील ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग करून तुम्ही गुंतवणुकीतील आर्थिक लाभ वाढवू शकता.
पैशाचे नियोजन म्हटले की ‘वेळच मिळाला नाही’ किंवा ‘गुंतवणुकीचे पर्याय फारच गुंतागुतीचे असतात’, ‘पैसे आहेत हो पण नेमके त्याचे काय करायचे ते कळत नाही’ या आणि अशा प्रकारची कारणे अनेकांकडून दिली जातात आणि यावरचा बहुधा एकमेव उपाय म्हणजे ताबडतोब वित्त सल्लागाराची भेट घेणे!
निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी किती तजवीज हवी, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे कुठे गुंतवावेत आणि मुख्य म्हणजे डोक्यावर कर्ज असतानाही आर्थिक जबाबदाऱ्या नेटाने पार कशा पाडाव्यात, या आणि अशा प्रश्नांना आर्थिक सल्लागार चांगली उत्तरे देऊ शकतात. आपली सध्याची आर्थिक स्थिती काय आहे याचा लेखाजोखा ते काढतातच, पण त्यासह एकूण जमा वाढवण्यासह या संपत्तीचे व्यवस्थापन कसे करायचे यासाठी उपयुक्त सूचनाही देतात. या लेखात अशाच आर्थिक सल्लागारांविषयी जाणून घेऊयात.
एजंट –  गुंतवणूकविषयक विविध उत्पादनांच्या वितरणासाठी वित्त कंपनीशी जोडलेली व्यक्ती म्हणजे एजंट. एकाच कंपनीशी संलग्न असल्याने साहजिकच कंपनीच्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्यात त्यांच्याकडून मदत होते. एखाद्या वित्त उत्पादनाची चांगली-वाईट बाजू एजंट तपशीलवार पटवून देऊ शकतो, सेवेचे स्वरूप, कंपनीची बाजारातली पत, तसेच वित्त उत्पादनाचा दर्जा इत्यादी. मात्र ठराविक उत्पादनांपुरता त्यांचा संबंध असल्याने एजंटचा सल्ला मर्यादित स्वरूपाचा असू शकतो.
अनेकदा परिचयातील एखादी व्यक्ती जी वित्तीय कंपनीत एजंट म्हणून काम करत असते ती आपल्याला गुंतवणूकविषयक सल्ले देते. मात्र जेव्हा तुम्ही कोणते वित्तीय उत्पादन घ्यायचे याबाबत ठाम असता त्या वेळी तुम्ही या एजंटच्या सल्ल्याचा बेधडक वापर करू शकता.
बँका –  सगळ्यात विश्वासार्ह व सहज उपलब्ध असणारा आर्थिक मध्यस्थीचा पर्याय म्हणजे बँका. आपल्या बँक खात्यातील व्यवहारांशिवाय कर्जे, गुंतवणूक तसेच विमा अशा अनेक गोष्टींसाठी बँक कर्मचारी आपल्याला मदत करू शकतात. अनेक बँका आपल्या आर्थिक गरजांसाठी वन-स्टॉप-शॉपचा पर्याय देताना दिसतात. इंटरनेट बँकिंगच्या मदतीने मुदत ठेवींचे नूतनीकरण, तसेच खात्यातील जमा-ठेवींवर नियंत्रण अशा कितीतरी गोष्टी आपण अगदी सहज करू शकतो. मात्र अनेकदा तुम्हाला ‘एक ना धड भारंभार चिंध्या’ असा अनुभव येऊ शकतो. कारण बँकांकडून अनेक प्रकारच्या सेवा दिल्या जातात, त्यामुळे ते प्रत्येक ग्राहकासाठी स्वतंत्र पर्याय देऊ शकत नाहीत. तसेच जर पारंपरिक मार्गाने गुंतवणुकीला तुम्ही प्राधान्य देणार असाल तर स्थानिक बँकेतील कर्मचारी तुम्हाला मदत देऊ शकतात. विशेष म्हणजे बँका काही खास ग्राहकांना वैयक्तिक बँकिंग तसेच त्यांच्या पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करण्याविषयीचा सल्लाही देतात.
स्वतंत्र वित्त सल्लागार – (आयएफए) वित्त सल्लागारांची रोजीरोटी त्यांनी ग्राहकांना देऊ केलेल्या गुंतवणूकविषयक उत्पादनांमधून मिळते. म्हणूनच आर्थिक गरजांप्रमाणे ते वैयक्तिक सेवा देऊ शकतात. त्यांचा अनुभव व व्यावसायिक कौशल्यांच्या आधारावर ते विविध स्तरांतील ग्राहकांना सल्ला देतात. म्हणूनच प्रत्येक वित्त सल्लागाराची खासियत वेगळी असू शकते- कुणाला रियल इस्टेटमधील गती अधिक असू शकते, तर कुणी गुंतवणूक सल्लागार म्हणून माहीर असू शकतो, तर कुणी विमा नियोजनात आघाडीवर.
थोडक्यात तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करण्यासाठी वित्त सल्लागाराची मदत घेऊ शकता, तसेच त्याच्या प्रावीण्याच्या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून गुंतवणुकीतील आर्थिक लाभ वाढवू शकता.
वित्त नियोजक – बदलत्या धोरणांमुळे भारतीय बाजारपेठेत वित्त नियोजकांची एक जमात उदयाला येऊ लागली. कर्जाचे व्यवस्थापन, गुंतवणूक-विमा तसेच कराविषयीचे नियोजन या साऱ्याचा विचार करून ग्राहकांना संकलित स्वरूपाचे आर्थिक नियोजन सुचवणे हे वित्त नियोजकांचे उद्दिष्ट असते. उत्तम वित्त नियोजक तुमच्या गरजा लक्षात घेतो, तुमची आर्थिक उद्दिष्टे ठरवतो व भविष्यात या उद्दिष्टांचा वेध घेण्यासाठी तपशीलवार योजना तयार करतो. तुम्ही एखाद्या नियोजनबद्ध तसेच संकलित स्वरूपाच्या सेवेच्या शोधात असाल तर वित्त नियोजक तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात.
दर आकारणीचे प्रकार –कमिशनवर आधारित – अनेक पांरपरिक वित्तीय उत्पादनांच्या विक्रीवर कमिशन ठरलेले असते. गुंतवणुकीच्या एकूण रकमेच्या ठराविक टक्के रक्कम कमिशन म्हणून मध्यस्थीला मिळते. समजा- तुम्ही १० हजार रुपये गुंतवणार आहात. ज्यावर ४ टक्के कमिशन मिळणार असेल तर प्रत्यक्षात ९६०० रुपये गुंतवले जातात व ४०० रुपयांचे कमिशन फीच्या स्वरूपात मध्यस्थीला मिळते. प्रत्येक वेळी तुम्ही गुंतवणूक केल्यावर काही टक्के वजा होतात. म्हणूनच कमिशनची राशी ही गुंतवणुकीची एकूण रक्कम व किती वेळेला केली त्याचा आकडा यावर अवलंबून असते.
फीवर आधारित –
या प्रकारात, मध्यस्थी देत असलेल्या सेवेबद्दल तुमच्याकडून काही रक्कम फी म्हणून आकारली जाते. हे अधिक दर्जात्मक असून उत्पादन वा सेवा यांच्या स्वरूपावर अवलंबून असते. यासह वित्तीय उत्पादने बाजारात कशी कामगिरी करतात, त्या आधारावर ते फी आकारतात. त्यामुळे जर एखाद्या बाजाराशी निगडित उत्पादनाने चांगली कामगिरी केली तरच त्यावर आधारित फी घेतली जाते अन्यथा नाही. थोडक्यात रुपयाचे मूल्य वधारले तरच फी द्यायची. यामुळे ग्राहकाचे हित व मध्यस्थीचा स्वार्थ दोन्ही साधले जातात. दोघांचाही हेतू संपत्तीची वृद्धी हाच आहे.
आपल्या देशात अगदी अलीकडेपर्यंत ग्राहकांकडून कमिशन घेण्याचीच पद्धत होती. आता मात्र जागरूकता वाढत असल्याने फीवर आधारित सेवेला वाढती पसंती दिसते आहे.
या सर्वापेक्षा वेगळ्या, बाजाराशीसंबंधित काही उत्पादनांचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी ब्रोकरेज घेतला जाऊ शकतो. बाजार नियामक सेबीकडून भविष्यात आर्थिक सेवांबाबत मध्यस्थी करणाऱ्यांवरही नियंत्रण असावे, याप्रकारच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे.
वित्त सल्लागाराला काय विचाराल ?
१. त्याची पात्रता व अनुभव नक्की विचारा – त्याची पात्रता व बौद्धिक क्षमता  फार महत्त्वाची आहे. म्हणूनच पॅ्रक्टिस करण्यासाठी त्याच्याकडे संबंधित शिक्षणाची पदवी असणे बंधनकारकच आहे. त्याचा कामाचा अनुभव तुमच्या पैशांचे उत्तम व्यवस्थापन करण्यास उत्तम दिशा देऊ शकतो. याशिवाय त्याच्या पूर्वी केलेल्या कामांची यादी नक्की विचारा. यावरून त्याची पोर्टफोलिओ हाताळण्याची क्षमता तसेच पात्रता दोन्हीचा अंदाज येऊ शकतो.
२. आर्थिक सल्लागाराची फी व कमिशन यांची चौकशी करा – तुमचा आर्थिक सल्लागार विविध उत्पादनांच्या विक्रीवरील मिळकत कशी ठरवतो, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. तो तुमच्याकडून अतिरिक्त आकारणी करत आहे का ? उदा. एजंटने विम्यात गुंतवण्यासाठी १० हजार रुपये घेतले व त्यावर ३० टक्के कमिशन असेल तर प्रत्यक्षात ग्राहकांचे फक्त ७ हजार रुपये गुंतवले जातात. हे लक्षात घ्यायला हवे.
३. वित्तीय उत्पादने व सेवा यांची चौकशी करत राहा- तुमच्यासाठी व कुटुंबासाठी योग्य योजना आखताना वा निवडताना आर्थिक सल्लागाराकडे पुरेसे पर्याय आहेत का याची तुम्हाला माहिती असणे चांगले. जर त्याची शिफारस काही उत्पादनांपुरती मर्यादित आहे का? तुमच्या आर्थिक उद्दिष्टांवर त्याचा परिणाम होतोय का? तुमच्या आर्थिक प्रश्नांवर उपाय सुचवताना वित्त सल्लागार पुरेसा लवचिक आहे का? तो तुमची जोखीम घेण्याची कुवत तो तपासतो ? या सर्व बाबी आर्थिक मध्यस्थी निवडताना न चुकता विचारात घ्या.
४. पारदर्शीपणा- आर्थिक उत्पादनांशी निगडित अचूक व संपूर्ण माहिती तुम्हाला देणे ही सल्लागाराची जबाबदारी असते. जर एखाद्या उत्पादनाविषयी तुमच्या मनात संभ्रम असेल तर त्याविषयी अधिक माहिती गोळा करा. एखाद्या उत्पादनाची आतापर्यंतची कामगिरी जरी समाधानकारक असली तरी भविष्यात त्याची उपयुक्तता किती असेल हे तुम्हाला माहीत हवे. उदा-जोखीम, गुंतवणुकीची मर्यादा, फायदे-तोटे व तुमच्या गरजांसह त्याची उपयुक्तता हे मुद्दे अशा वेळी अवश्य तपासा. अनेक गुंतवणुकदारांनी त्यांची कष्टाची कमाई काही घोटाळ्यांमुळे गमावली आहे. सिटी लिमोसिनसारख्या प्रकरणात सुरुवातीला उत्तम परतावा होता, म्हणून गुंतवणूकदार गाफील राहिले व नंतर त्यांना गंडा घातला गेला.
५. सतर्कता व आढावा – एखाद्या उत्पादनाची खरेदी किंवा विक्री इतक्यापुरताच मध्यस्थीचा संबंध नसून तुमच्या पोर्टफोलिओची वेळोवेळी तपासणी करणेही त्यांचे काम आहे. तुमचे आर्थिक उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक ती कृती झाली पाहिजे, त्यासाठी मध्यस्थीने वेळोवेळी तुम्हाला आवश्यक माहिती देणे गरजेचे आहे.
तुमचा आर्थिक सल्लागार जरी तुमचे आर्थिक व्यवहारांसाठी मार्गदर्शन करत असला तरी आपण स्वत: जातीने आपल्या पोर्टफोलिओचा आढावा घेतला पाहिजे. करियर, लग्न यांसारख्या आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांबाबतचे निर्णय आपण स्वत: घेतो मग आपला पैसा दुसऱ्याच्या हाती सोपवून निर्धास्त होऊन कसे चालेल. स्वयंप्रेरित आर्थिक नियोजनाला आर्थिक सल्लागाराची साथ मिळाली तर संपत्तीच्या वृद्धीकरणाचा अध्याय खऱ्या अर्थाने लिहिला जाईल.
(लेखिका वित्त सल्लागार असून लेखातील मते त्यांची वैयक्तिक आहेत)
chaturang@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा