मधुमेह हा सर्व अंगांनी नियंत्रित राहणे हे त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. मधुमेह लहान मुलांमध्ये कसा होतो, तो कसा नियंत्रित ठेवता येतो, हे आपण पाहिले (८ फेब्रुवारी). आता मोठय़ांमधील मधुमेहाविषयी. कसा होतो आणि काय काळजी घ्याल याविषयी.
साखर गोड की कडू? असा प्रश्न कोणी विचारला तर हसू येईल ना? पण दुर्दैवाने ही साखर चुकीच्या ठिकाणी म्हणजे माणसाच्या रक्तात असली की ती किती कटुता निर्माण करते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आज आपण या अशाच कटू सत्याची म्हणजेच मधुमेहाची माहिती घेणार आहोत आणि संपूर्ण शास्त्रीय माहितीच्या आधारे आपल्या जीवनाची हरवलेली गोडी परत मिळवणार आहोत.
माणसाला आयुष्यभर इन्शुलिन या संप्रेरकाची (हॉर्मोनस्ची) गरज असते. स्वादुपिंडाच्या बीटा पेशींमध्ये हे इन्शुलिन तयार होते आणि शरीरातल्या साखरेच्या चयापचयावर नियंत्रण ठेवते. अन्नातून तयार झालेली आणि शरीराच्या अंतर्गत लिव्हरमार्फत तयार झालेली साखर ही रक्तात मिसळते आणि इन्शुलिनमार्फत पेशींच्या आत पोचवली जाते. पेशींचे कामकाज सुव्यवस्थित राखण्यासाठी अशा साखरेची गरज असते. जेव्हा इन्शुलिन तयारच होत नाही (टाइप वन डायबेटीस) किंवा कामकाज नीट करू शकत नाही (टाइप टू डायबेटीस) तेव्हा ही साखर रक्तातच वाढत राहते आणि साऱ्या शरीरभर अपाय करते. आणि म्हणूनच नुसत्या साखरेच्या आकडय़ालाच नव्हे तर त्यामुळे शरीराला होणाऱ्या अपायांना आपण जपलं पाहिजे. आणि हे आयुष्यभर घडलं पाहिजे.
उपाशीपोटी (८ ते १० तासांचा उपास) साखर ८० ते १०० मि.ग्रॅ. आणि खाण्यानंतर साखर १४० मि.ग्रॅ.च्या आत सातत्याने राखली तर मधुमेहामुळे होणारे अपाय बऱ्याच अंशी लांब राहतात, तसेच त्याचे गांभीर्य कमी राहते. मधुमेह सर्वसाधारणपणे कसा राखला जातो हे ऌु अकउ या चाचणीतून समजते आणि गेल्या महिन्यात साखरेचा अ‍ॅव्हरेज कंट्रोल हा या चाचणीतून समजतो. ऌु अकउ ६.५ च्या आसपास राखला गेला तर मधुमेह गेले ३ महिने बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. असा निष्कर्ष काढला जातो. ऌु अकउ १ टक्क्यांनी कमी झाला तर मधुमेहाची गुंतागुंत ३९ टक्के कमी होते, असे शास्त्रीय चाचण्यांनी सिद्ध केले आहे.
मधुमेह हा सर्व अंगांनी नियंत्रित राहणे हे त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक असते त्यामुळे सुनियंत्रित मधुमेह म्हणजे काय हे पाहू.
सुनियंत्रित मधुमेह –
१. fasting, P.P. शुगर व  Hb AIC चे आकडे सातत्याने नॉर्मल असणे.
२. सर्व मदघटक, कोलेस्टेरॉल सातत्याने नॉर्मल असते.
३. रक्तदाब कायम १२०/८० चे आसपास राखणे.
४. हायपोग्लायसेमिया (साखर ७० मि.ग्रॅ.पेक्षा कमी होऊन घाम, चक्कर येणे) न होणे.
५. कोणतीही मधुमेहजन्य व्याधी नसणे.
६. मधुमेहतज्ज्ञांनी केलेली शरीराची तपासणी नॉर्मल असणे.
७. मधुमेहासंबंधी सर्व अवांतर चाचण्या सातत्याने नॉर्मल असणे.
आता मधुमेहाचे दुष्परिणामही समजून घेऊ. सुनियंत्रित नसलेल्या मधुमेहामुळे नुसती अवयवहानी होते असे नाही तर नॉर्मल (मधुमेह नसलेल्या) व्यक्तींच्या तुलनेत अनियंत्रित रुग्णाचे आयुष्यमान १० वर्षे कमी असते.
१) डोळय़ाचे अपाय- यात प्रामुख्याने रेटिनोपॅथी म्ह्णजे नेत्रपटलव्याधी होते. डोळ्याच्या मागच्या पडद्यावर चट्टे उमटणे, केशवाहिन्यांचे जाळे तयार होणे, रक्तस्राव होणे असा त्रास होतो. याकडे दुर्लक्ष केले तर अंधत्व येण्याचा धोका असतो. हे अंधत्व लेसर उपचारांमुळे टाळता येते. लेसरतज्ज्ञ कोणत्याही भुलीशिवाय केवळ डोळ्यात थेंब टाकून १०-१५ मिनिटांत लेसर उपचार करतात. यात अजिबात दुखत नाही  कापाकापीसुद्धा नसते लगेच ऑफिसलाही जाता येते.
याव्यतिरिक्त वरचेवर रांजणवाडी येणे, नंबर वरचेवर बदलणे, मोतीबिंदू लहान वयात होणे असे इतर आजारही मधुमेही रुग्णाच्या डोळ्यांना होत असतात.
२) हृदयाचे अपाय – मधुमेहीमध्ये रक्तात वाढलेली साखर ही रक्तवाहिन्यांच्या कायम संपर्कात असते व त्यामुळे सर्वच रक्तवाहिन्या मधुमेहाने खराब होत जातात. म्हणूनच मधुमेह हा रक्तवाहिन्यांचा आजार समजला जातो. सर्व मधुमेहजन्य व्याधी या रक्तवाहिन्यांच्या खराबीमुळे होतात व त्यात हृदयाच्या रक्तवाहिन्या खराब होऊन हार्टअ‍ॅटॅक येणं, मेंदूच्या रक्तवाहिन्या खराब होऊन स्ट्रोक किंवा पॅरालिसिस होणं, ब्लडप्रेशर वाढणं हे गंभीर दुष्परिणाम जास्त प्रमाणात व जास्त गंभीर होतात.
३) किडनी विकार- डायबेटीसमुळे व त्या जोडीने येणाऱ्या ब्लडप्रेशरमुळे किडनीवर गंभीर अपाय होतात. किडणी ही शरीर शुद्धिकरणासाठी असलेली चाळणी असते. यात शरीराला नको असलेले घटक मूत्रावाटे बाहेर टाकले जातात व आवश्यक प्रथिने शरीरातच राखली जातात. मधुमेहामुळे या किडनीच्या चाळणीची भोकं मोठी होऊन प्रथिनांसारखे आवश्यक घटकही मूत्रावाटे वाहून जाऊ लागतात. हीच किडनीच्या विकाराची सुरुवात असते. याच वेळी योग्य औषधोपचार झाले तर किडनी फेल्यूअर होणं लांबवता येतं. शुगर व ब्लडप्रेशरचं काटेकोर नियंत्रण राखलं गेलं नाही तर मात्र आजार फार लवकर बळावू शकतो. हा आजार लवकर समजावा म्हणून युरिन अल्बुमिन या तपासण्या उपयुक्त ठरतात.
४) पायाचे विकार- पायाच्या नसा मधुमेहामुळे खराब होऊन पायाला मुंग्या येणं, बधिरपण येणं, स्पर्शज्ञान कमी होणं, जमिनीचा स्पर्श न समजणं असा अपाय होतो. पायाच्या रक्तवाहिन्यांवर अपाय होऊन पायाला वेदना होणं, गँग्रिन होणं असे गंभीर त्रास होऊ शकतात. याच्या जोडीला जंतू प्रादुर्भाव झाला तर पाय वाचवणं मुश्किल होऊ शकतं. पायाचा आकार बदलणं, जखमा न भरणं. अल्सर होणं अशा अनेक गंभीर आजारांइतकाच चिखल्यांचा साधा वाटणारा आजारही पाय गमावण्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे पाय स्वच्छ व कोरडे ठेवणे, कायम कॉटनचे स्वच्छ मोजे वापरणं व अनवाणी न चालणं हे छोटे सावधगिरीचे उपाय कायम लक्षात ठेवावे लागतात.
५) जंतूप्रादुर्भाव- नागीण, न्यूमोनिया, मेनिंजायटीस हे गंभीर जंतूप्रादुर्भाव तसेच म्यूकर मायकॉसिस, पायलोनेफ्रायटीस, बॅलानायटीस, गळवं होणे, जखमा चिघळणे असे खास मधुमेहात दिसणारे विकार यामुळे अनियंत्रित मधुमेहात भर पडते. जंतूमुळे परत साखर वाढते व इन्फेक्शन वाढते हे जीवघेणं चक्र थांबवण्यासाठी तातडीने योग्य अँटिबायोटिक घेणं गरजेचं असते. याशिवाय त्वचा, विकार, युरिन इन्फेक्शन, सर्दी खोकला, टी.बी. अशी छोटी-मोठी इन्फेक्शन डायबेटीसमध्ये सतत होत राहतात. मधुमेही रुग्णांची रोग प्रतिकार शक्ती इतरांपेक्षा कमी असते. त्यामुळेच योग्य वेळी योग्य डॉक्टरकडून योग्य अँटिबायॉटिक घेणे रुग्णांसाठी महत्त्वाचे असते.
६) थायरॉइड विकार, सोरियासिस, लैंगिक दुर्बलता, ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी, ठोके व ब्लडप्रेशरची अनियमितता, पित्ताशयात खडे होणे, पचनविकार, हाडांची ठिसूळता, नखांचे व इतर ठिकाणचे बुरशीजन्य इन्फेक्शन हे अनेक जोडीदार डायबेटीसचे रुग्णात ठाण मांडून बसतात.
शेवटी योग्य वेळी, योग्य आणि सातत्यपूर्ण उपचार ही मधुमेहावर विजय मिळवण्याची गुरुकिल्ली आहे. आणि असं केलं तर ती साखर कडू न होता आयुष्यभर मधुरच राहील याची शाश्वती आहे. म्हणूनच या क्षणापासून मधुमेहाला काबूत ठेवा आणि सुरू करा ही एक मधुर संगतसोबत!