सेक्स हा छंदीफंदी लोकांचा विषय असून त्यात शिकण्यासारखे आणि समस्या उद्भवण्यासारखे काय असते, असा सुशिक्षितांचासुद्धा समज आहे. कामशास्त्र हे चटोर व वाहय़ात लोकांसाठी नसून खरे म्हणजे लग्नापूर्वी प्रत्येकाला आवश्यक असणारे ज्ञान आहे. सर्वसामान्यांचे सेक्स विषयातील मूलभूत ज्ञानसुद्धा अत्यंत केविलवाणे आहे. त्यामुळेच मधुमेहासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विकाराचा लैंगिकतेवर खोलवर परिणाम होत असतो हे लक्षात येत नाही.
‘तुम्ही त्वचारोगतज्ज्ञाकडून क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट होण्याचा निर्णय कसा काय घेतला डॉक्टर? आणि नेमकं काय करता तुम्ही? मुलगा कसा होईल वैगरेसाठी पेशंटला सल्ले देता का? सेक्स प्रॉब्लेम म्हणजे मूल न होण्याचा प्रॉब्लेम ना?’ अनेक वर्षांपासून मला सातत्याने आणि जिव्हाळय़ाने भेटणारे एका नामवंत औषध कंपनीचे (आता मोठय़ा हुद्दय़ावर असलेले) साठीकडे झुकलेले कामतसाहेब थोडेसे कुतूहलाने माझ्याशी बोलत होते.
मी शांतपणे त्यांना सांगितले, ‘नाही. एक तर आपल्याकडे सेक्स हा विषयच बोलला जात नाही. आणि सेक्स प्रॉब्लेम म्हणजे मूल न होण्याची समस्या नाही. प्रत्यक्ष सेक्सच्या क्रियेचे प्रॉब्लेम.’
‘सेक्सच्या क्रियेचे? तरुणांना यातही अडचणी येतात? काहीतरीच काय! आम्हाला आमच्या काळी असले काही प्रॉब्लेम नव्हते बुवा. अर्थात हा विषय माझ्या आयुष्यातून जाऊनही दहा-पंधरा वष्रे तरी झाली असतील म्हणा.’ कामत अगदी ‘अरे बाप रे! शांतम् पापम्’चा भाव त्यांच्या चेहऱ्यावर आणून बोलत होते.
‘अहो, म्हणजे अगदी पंचेचाळिशीतच तुम्ही या क्षेत्रात रिटायर्ड झालात म्हणा की.’ मी कामतांकडून ‘कन्फेशनल कन्फम्रेशन’ करून घेत होतो.
‘हो. म्हणजे काय त्यानंतरही लोक असल्या गोष्टी करत असतात?’ बुचकळय़ात पडलेले कामत.
‘ तुमच्या काही तब्येतीच्या तक्रारी आहेत?’ चौकसखोर मी.
‘काहीही नाही. मस्त ठणठणीत आहे बघा आता साठीला पोचलो तरी. फक्त श्रीमंती आजार बाळगून आहे म्हणा, डायबेटिस अर्थात मधुमेह. अठरा वष्रे. आणि तेही फारसा बँक बॅलन्स नसताना.’ कामत.
‘ तरीच सेक्समधला बॅलन्सही तुमचा संपलेला दिसतोय.’ मी एक वैद्यकीय ‘गुगली’ टाकला. आणि तो बरोबर कामतांची विकेट घेऊन गेला.
‘काय? या दोन गोष्टींचा काय संबंध?’ कामत ‘पॅरॅमेडिकल क्षेत्रातले’ असूनही पूर्णपणे गडबडले होते. आणि मग साहजिकच मी त्यांचं ‘मधुमेह आणि सेक्स’ याविषयी बौद्धिक घेतलं.
असे अनेक कामतसाहेब सर्वच क्षेत्रांत आढळून येतात. याचे कारण लैंगिकता हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असूनही आजवर गुलदस्त्यातच राहिला आहे. या विषयाचा असणारा संकोच परंपरेने व वारसा हक्काने समाजात दिसतो. सामाजिकच नव्हे तर व्यक्तिगत आयुष्यातही याविषयी मोकळेपणाने बोलले जात नाही.
‘सेक्सविषयी मला काही फार माहीत नाही, कारण मी विवाहित होते.’ प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री झ्सा झ्सा गाबर (Zsa Zsa Gabor)  हिचे हे वाक्य जगप्रसिद्ध आहे. यामध्ये विवाहित स्त्रीच्या सेक्सविषयक अनुभवांचे प्रतििबब आढळते. यातून स्त्रीच्या कामानंदाकडे पुरुष किती लक्ष देत असतो (किती बेफिकीर असतो), याचे विदारक वास्तवच लक्षात येते. आणि पाश्चात्त्य जगातही तीच रड आहे याची जाणीव होते. सेक्स ही जीवनातील एकमेव गोष्ट नाही हे खरे, परंतु ती सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे हेही तितकेच खरे. (सेक्स इज नॉट द ओन्ली थिंग इन लाइफ, बट इट इज द मोस्ट इम्पोर्टंट थिंग इन लाइफ). याचे एकमेव कारण म्हणजे ही प्राणिजगतात निसर्गाने निर्माण केलेली दुसऱ्या दर्जाची सर्वात बलवत्तर (सेकंड स्ट्राँगेस्ट) मूलभूत प्रेरणा आहे. आणि कुठलीही प्रेरणा दाबून आपण आपले नुकसानच करीत असतो.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सामान्य व्यक्तीला आर्थिक, कौटुंबिक व व्यावसायिक विवंचना जास्त प्रमाणात भेडसावत असल्याने सेक्स अर्थात काम ही बाब फक्त शारीरिक गरज म्हणून समजली जात आहे. यातील मानसिक समाधान व आनंद जास्तीत जास्त मिळावा म्हणून फारसा विचार केला जात नाही. वैद्यकीयदृष्टय़ा ही आपल्या मानसिक आनंदाची व ताण घालवणारी गोष्ट आहे. ती स्वत:च्या फायद्याचीच असून यात बरेच काही शिकण्यासारखे असते, हे लक्षातसुद्धा येत नाही.
सेक्स हा छंदीफंदी लोकांचा विषय असून त्यात शिकण्यासारखे आणि समस्या उद्भवण्यासारखे काय असते, असा सुशिक्षितांचासुद्धा समज आहे. कामशास्त्र हे चटोर व वाहय़ात लोकांसाठी नसून खरे म्हणजे लग्नापूर्वी प्रत्येकाला आवश्यक असणारे ज्ञान आहे. परंतु योग्य पद्धतीने न शिकवल्यामुळे व पिवळय़ा पुस्तकांमध्ये अडकल्यामुळे बदनाम होऊन छंदी लोकांच्या सोयीसाठीच हे आहे असा बहुतेक लोकांचा समज आहे. तसेच लैंगिक समस्या या अशिक्षित लोकांनाच आहेत असाही समज आहे. खरे म्हणजे या समस्या समाजातील सर्व थरांतील लोकांना सारख्याच प्रमाणात असतात. परंतु जागरूकतेच्या अभावामुळे सर्वच जण पुढे येतात असे नाही. सर्वसामान्यांचे सेक्स विषयातील मूलभूत ज्ञानसुद्धा अत्यंत केविलवाणे आहे. हे विदारक सत्य आहे. त्यामुळेच मधुमेहासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विकाराचा लैंगिकतेवर खोलवर परिणाम होत असतो, हे लक्षात येत नाही. यासाठी थोडी लैंगिक प्रतिसादाची माहिती घेणे जरुरीचे आहे.
स्त्री-पुरुषांचा लैंगिक प्रतिसाद तीन वेगवेगळय़ा केंद्रांनी नियमन केला जातो. मेंदूच्या गाभ्यात असणारे हायपोथॅलॅमसमधील कामेच्छा केंद्र, पाठीच्या कण्यातून जाणाऱ्या मज्जारज्जूमधील सर्वात खालील सॅक्रल भागात असणारे लैंगिक ताठरता केंद्र (पुरुषांमध्ये) आणि योनीमार्गात ओलसरपणा आणणारे केंद्र (स्त्रीमध्ये) तसेच मज्जारज्जूच्या लम्बर भागात असणारे स्खलन केंद्र. या तीन केंद्रांच्या मज्जासंस्थाही वेगवेगळय़ा आहेत. म्हणूनच तीनही केंद्रांचे प्रसंगानुरूप योग्य नियमन करणारे एकच औषध कधीही निर्माण करता येणे शक्य नाही. एका मज्जासंस्थेसाठी काम करणारे औषध हे दुसऱ्या मज्जाकेंद्रावर विपरीतच परिणाम करीत असतात. म्हणून सेक्स टॉनिक ही संकल्पना मोडीत काढणे आवश्यक आहे.
मधुमेहाने कामेच्छा केंद्रावर परिणाम होऊन ती भावना हळूहळू कमी होत जाते. मधुमेहाने प्रोलॅक्टिन रसायन वाढते. तसेच पुरुषत्वाचा सेक्स हॉर्मोन ‘टेस्टोस्टेरॉन’ही कमी होत जातो. त्यामुळे कामेच्छा केंद्रावर परिणाम होऊन ती भावना हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे मधुमेहींच्या कामसंबंधांमध्ये अंतर पडत जाते. दाम्पत्यांच्या संबंधांवरही विपरीत परिणाम होतो.
पुरुषांमध्ये लैंगिक ताठरता ही िलगामध्ये असणाऱ्या तीन नळय़ांमध्ये रक्तवाहिन्या रुंदावून रक्त पसरल्याने येत असते. मधुमेहामुळे सायक्लिक जीएमपी निर्माण करणारे व त्यामुळे रक्तवाहिन्या रुंदावणारे ‘नॉस’ हे रसायनच कमी कमी होत असते. म्हणूनच हृदयाच्या व िलगाच्या रक्तवाहिन्या अरुंद होत जातात. त्यामुळे त्या त्या अवयवांना रक्तपुरवठा कमी होत जातो. म्हणून जसा हार्ट अ‍ॅटॅक येतो तसाच पेनिस अ‍ॅटॅकही येत असतो. यालाच इरेक्टाइल डिस्फन्क्शन (पूर्वीचे इम्पोटन्स) अर्थात् नपुंसकतेची समस्या म्हणतात.
स्त्रीमध्येही योनीमार्गाच्या रक्तवाहिन्यांवर होणाऱ्या परिणामामुळे योनीमार्गाचा कोरडेपणा ही समस्या जाणवते. योनीमार्गाचे अस्तरही पातळ होत जाते. यामुळे प्रत्यक्ष संबंधाच्या वेळी दोघांनाही वेदना जाणवते. एवढेच नाही तर िलगावर लाल चट्टे (बॅलॅनोपोस्थायटिस) येतात. जेव्हा िलगाची ताठरता कमी होत जाते किंवा योनीमार्गाचा कोरडेपणा जाणवायला लागतो तेव्हा मधुमेहाची तपासणी करून घेणे आवश्यक असते.
मधुमेहामुळे कोलेस्टेरॉलचेही प्रमाण वाढू लागते. अथेरोस्केरॉसिस वाढते. रक्तवाहिन्या अरुंद होत जातात. त्यामुळेही पेनिस अ‍ॅटॅक (नपुंसकता, इरेक्टाइल डिस्फन्क्शन) व योनीमार्गाच्या कोरडेपणाची समस्या लवकर येते. शरीराच्या झिजेमुळे सतत निर्माण होणारी ऑक्सिडन्ट ही रसायने अवयवांमध्ये साठून रक्तवाहिन्यांचे नुकसान फार करतात. मधुमेहामध्ये हे जास्त प्रकर्षांने घडते.
पुरुषाच्या िलगावरील पुढील त्वचेला (प्रेप्यूज) सूज येऊन (बॅलॅनोपोस्थायटिस) तिथे जखमा होणे हे मधुमेहींना जास्त वेळा जाणवते. याचा दुष्परिणाम सेक्सवर होतो. स्त्रीच्या योनीमुखाला (सर्वसिायटिस) व योनीअस्तराला (व्हजायनायटिस) पण सूज येते. सेक्समुळे एकाचा संसर्ग दुसऱ्याला होतो व त्यामुळे कामजीवनावर विपरीत परिणाम होतो.
योनीमार्गाचे पातळ होणारे अस्तर व सतत भेडसावणारे इन्फेक्शन अशा त्रासामुळे स्त्रीला हळूहळू सेक्सची निरिच्छाच निर्माण होते. तिचा सेक्सचा प्रतिसाद नीट विकसित न झाल्याने तिला सेक्समधील परमोच्च आनंद उपभोगायला अडचण येऊ लागते. योनीमुखाच्या सुजेमुळे गर्भधारणेलाही अडथळा येऊ शकतो.
नपुंसकतेसारख्या लैंगिक समस्येमध्ये शारीरिक कारणांमध्ये केवळ न्यूरो-व्हॅस्क्युलर म्हणजे रक्त-मज्जासंस्थेशी संबंधित किंवा हॉर्मोनल म्हणजे सेक्स हॉर्मोनशी संबंधित जर कारणे सापडली तरच ती शारीरिक लैंगिक समस्या नाही तर मानसिक असा वैद्यकक्षेत्रात विचार होता. किंबहुना अजूनही आहे. आजवरच्या माझ्या अनुभवातून बहुतेक लैंगिक समस्यांच्या केसेसमध्ये लैंगिक स्नायूंची अकार्यक्षमता आढळली. मधुमेहाच्या जोडीला वाढतं वय (चाळिशीपुढील), ताण-तणाव, तंबाखू-धूम्रपानाचे व्यसन, दारूबाजपणा इत्यादी गोष्टींचाही लैंगिक स्नायूंच्या फिटनेसवर परिणाम होत असतो. कित्येकदा मधुमेहाचे पहिले लक्षणच लैंगिक ताठरतेची समस्या शकते, हे मधुमेहींनी आणि त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी लक्षात ठेवणे जरुरीचे आहे.
या वैद्यकीय निरीक्षणांमुळे एक गोष्ट निश्चित की मधुमेहाला आटोक्यात आणणाऱ्या औषधांच्या जोडीला, मधुमेहामुळे लैंगिक रक्तवाहिन्या व लैंगिक स्नायूंवर विपरीत परिणाम होत असल्यामुळे, लैंगिक स्नायूंचा फिटनेस कमी होत असल्याने मधुमेहाच्या औषधांबरोबरच सेक्स फिटनेसथेरपी उपयुक्त असतेच आणि समस्या नसतानाही याचा वापर केला तर मधुमेहींच्या लैंगिक समस्या टाळण्यासाठीही सेक्स फिटनेसथेरपी उपयुक्त ठरते. मधुमेहतज्ज्ञांनी (डायबेटॉलॉजिस्ट)सुद्धा पेशंटच्या लैंगिक समस्यांविषयी जागरूक राहून, त्याविषयीची हिस्टरी घेऊन वेळीच योग्य सल्ला द्यावा.
shashank.samak@gmail.com

Story img Loader