डॉ. अंजली जोशी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

anjaleejoshi@gmail.com

एखाद्या व्यक्तीविषयी किंवा गोष्टीविषयी कृतज्ञता वाटणं म्हणजे फक्त चांगलं वाटणं नाही, तर ती भावना आपल्या मनावर त्याहीपेक्षा अधिक परिणाम करते. दीर्घकालीन मानसिक स्वास्थ्य सुस्थितीत ठेवण्यासाठी ही कृतज्ञतेची भावना मदत करते. विशेष म्हणजे ही भावना माणसांमध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न करून उत्पन्न करता येते. ‘कृतज्ञतेची रोजनिशी’ लिहिणं हा असाच एक प्रयोग. बाह्य़ परिस्थिती आपत्तीजनक असूनही आनंदाचा अनुभव घेऊ शकण्यासाठी स्वत:ला सक्षम करण्याचा. सध्याच्या काळात प्रत्येकानं करावा असा..

‘‘मी कृतज्ञतेची रोजनिशी लिहायला सुरुवात केली तेव्हा टाळेबंदीचा पहिला अध्याय सुरू झाला होता. चिंता, निराशा, असमाधान अशा भावनांनी आधीच मनाचा कब्जा घेतला होता. अशा मन:स्थितीत, ‘मी कुणाबद्दल कृतज्ञ आहे, आणि का,’ हे रोज लिहिणं जिकीरीचं वाटत होतं. आई-वडील, शिक्षक, वडीलधाऱ्या व्यक्ती यांचीच नावं कृतज्ञतेच्या सुरुवातीच्या नोंदींमध्ये  होती. पण रोज वेगळी नोंद करायची असल्यामुळे विचारांचा अवकाश मुद्दाम वाढवायला लागला. मग हळूहळू साक्षात्काराचे एकेक क्षण गवसायला लागले..

रोज उठल्यावर दुधाची पिशवी घरात आणली की वाटायचं, की टाळेबंदीच्या काळात गैरसोय सोसून घरापर्यंत दूध आणून देणाऱ्या दूधवाल्याबद्दल कृतज्ञ राहायला हवं. मग कृतज्ञतेच्या नोंदींत भाजीवाला, वर्तमानपत्र टाकणारा, शेजारी, मित्रमत्रिणी, सहकारी अशा अनेकांची भर पडत गेली. मग वाटलं, की फक्त ज्ञात व्यक्तीच नाहीत तर किती तरी अज्ञात व्यक्तींनीही मला आनंद दिला आहे. माझं घर बांधणाऱ्या अज्ञात कामगारांबद्दल  कृतज्ञता वाटायला लागली. आनंदाच्या लहरी मनात जागवणाऱ्या ज्ञात-अज्ञात संगीतकारांबद्दल कृतज्ञता वाटायला लागली. समाजसुधारक, लेखक, कवी, थोर व्यक्ती अशा नव्या नोंदींनी रोजनिशी भरत गेली. अशाही काही व्यक्ती आठवल्या, की त्या अगदी कमी काळापुरत्याच माझ्या आयुष्यात येऊन अंतर्धान पावल्या होत्या. पण त्यातल्या काहींनी दिलासा दिला होता, काहींनी रस्ता दाखवला होता, काहींनी मायेचा वर्षांव केला होता, तर काहींनी कडक शिक्षा करून मला वळणावरही आणलं होतं. त्यातल्या किती तरी जणांचा चेहरा किंवा नावंही मला नीटशी आठवत नव्हती. पण रोजनिशीत त्यांच्याबद्दल लिहिताना मन कृतज्ञतेनं भरून यायला लागलं.

हळूहळू वाटायला लागलं, की रोजनिशीत फक्त माणसांचाच समावेश का करायचा? इतरही किती गोष्टी आहेत. टाळेबंदीमुळे घराच्या बाहेर पडता येत नाही, पण रोज खिडकीतून निळं आभाळ दिसतं, स्वच्छ सूर्यप्रकाश अनुभवता येतो, बहर आलेलं झाड दिसतं. मग हे सर्व अनुभव देणाऱ्या निसर्गाबद्दलही मला कृतज्ञता वाटायला लागली. माझी यादी आता इतकी लांबलचक होत चालली आहे, की राल्फ वॉल्डो इमर्सन या साहित्यिक-तत्त्ववेत्त्याच्या उद्गारांची मला आठवण येते. तो म्हणतो, की ‘‘कृतज्ञता बाळगण्याची सवय जडवून घेतलीत तर कृतज्ञतेच्या यादीत तुमच्या जीवनातील जवळपास सर्वच व्यक्ती आणि गोष्टींचा समावेश करावा लागेल, कारण त्यातल्या प्रत्येकानं आपापल्या परीनं तुम्हाला इथवर मार्गक्रमण करण्यास मदत केली आहे.’’ अर्थात या उद्गारांबद्दल मी इमर्सनचा समावेशही माझ्या रोजनिशीत केला आहे, हे वेगळं सांगायला नको.’’

हे आहे माधवीचं मनोगत. ते अनेकांना उपयोगी पडू शकेल. टाळेबंदीचा पाचवा अध्याय चालू असताना, ‘करोना’चं थमान वाढत चाललं असताना आणि दिवसेंदिवस निराशाजनक बातम्या ऐकू येत असतानाही माधवी आनंदाचा अनुभव घेऊ शकते. कारण कृतज्ञतेची भावना मनात आली की तिला समाधान वाटतं, माणसांमधल्या चांगुलपणाच्या प्रचीतीनं तिचं मन भरून येतं, प्रेम-जिव्हाळा वाढतो, तिला आशादायी वाटतं. ही करामत करणारी ‘कृतज्ञतेची रोजनिशी’ हे दुसरंतिसरं काही नसून एक मानसशास्त्रीय तंत्र आहे.

या तंत्राची जन्मकथा एका मानसशास्त्रीय प्रयोगात दडली आहे. रॉबर्ट एमन्स हा अमेरिकी मानसशास्त्रज्ञ या प्रयोगाचा जनक असून त्यानं केलेल्या प्रयोगाचं नाव आहे, ‘काऊंटिंग ब्लेसिंग्ज व्हस्रेस बर्डन’. कृतज्ञता एक सकारात्मक भावना आहे, असं तोपर्यंतचं संशोधन सांगत होतं. पण एमन्सला वाटत होतं, की कृतज्ञता म्हणजे फक्त चांगलं वाटणं नाही, तर ती त्याहीपेक्षा अधिक परिणाम करते. तो परिणाम नक्की काय असावा, ते मोजण्यासाठी सहकाऱ्याच्या मदतीनं त्यानं एका प्रयोगाची सिद्धता केली. त्यात ज्यांच्यावर प्रयोग करायचा आहे त्या सर्वाना, प्रयुक्तांना दहा आठवडे रोजनिशी लिहिण्याची अट घातली. त्यांची तीन गटांमध्ये विभागणी करून प्रत्येक गटाला वेगवेगळ्या सूचना दिल्या.

पहिल्या गटातल्या प्रयुक्तांना लिहायची होती ‘कृतज्ञतेची रोजनिशी’, दुसऱ्या गटातल्या प्रयुक्तांना लिहायची होती ‘अडचणींची रोजनिशी’ आणि तिसऱ्या गटातल्या प्रयुक्तांना लिहायची होती ‘दैनंदिन घडामोडींची रोजनिशी’. प्रयोगाच्या निष्कर्षांमध्ये असं दिसून आलं, की कृतज्ञतेची रोजनिशी लिहिणारे प्रयुक्त लोक इतर गटांमधल्या प्रयुक्तांपेक्षा किती तरी जास्त आनंदी आणि आशावादी होते, त्यांना शारीरिक समस्या कमी होत्या, ते समायोजनात, सह-अनुभूती दर्शवण्यात आघाडीवर होते.  जे उत्तर शोधण्यासाठी एमन्स धडपडत होता, ते त्याला मिळालं.  ते होतं- कृतज्ञता फक्त चांगलं वाटण्यापुरती मर्यादित नाही, तर दीर्घकालीन मानसिक स्वास्थ्य सुस्थितीत ठेवण्यास ती मदत करते. एमन्सला हेही कळलं, की कृतज्ञतेची भावना ही माणसांमध्ये उत्पन्न करता येते. फक्त त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. ‘कृतज्ञतेची रोजनिशी’ हा असाच एक प्रयत्न आहे. मानसिक आरोग्यसंवर्धनाचं एक उत्तम तंत्र म्हणून ते ओळखलं जातं. हल्ली या तंत्राच्या जोडीनं कृतज्ञता पत्र, कृतज्ञता भेट, कृतज्ञता छायाचित्र अशी नवीन तंत्रंही विकसित झाली आहेत.

आजवर धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक (‘थँक्सगिव्हिंग’ इत्यादी) अशा अनेक दृष्टिकोनांतून कृतज्ञतेचा अर्थ लावला गेला आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोन मात्र कृतज्ञतेचा अर्थ लावताना मानसिक स्वास्थ्याला अग्रक्रम देतो. तो सांगतो, की कृतज्ञता म्हणजे उपकाराचं ओझं घेणं नव्हे, तर आजूबाजूच्या अनेक व्यक्ती आपलं जीवन सुखावह करण्यात हातभार लावतात याची उचित जाणीव ठेवणं. या अनुषंगानं कृतज्ञतेचा मानसिक आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो याचा अभ्यासही मानसशास्त्रात झाला आहे. ज्या व्यक्तींत कृतज्ञता उच्च असते, त्यांचं मानसिक आरोग्य उच्च असतं, हे दर्शवणारी अधिकाधिक संशोधनं समोर येत आहेत. सर्वसाधारण समजूत अशी असते, की कृतज्ञता वाटणं किंवा न वाटणं हा नैसर्गिक कल असतो. पण संशोधन सांगतं, की कृतज्ञता वाटण्याकडे एखाद्याचा कल असला किंवा नसला तरी तो म्हणजे काळ्या दगडावरची रेघ नाही. प्रयत्न केला तर तो बदलू शकतो आणि ज्यांचा नैसर्गिक कल कृतज्ञता वाटण्याकडे फारसा नाही, त्यांच्यातही ती निर्माण करता येते. ‘कृतज्ञतेची रोजनिशी’ त्यासाठी मदत करते. यात कृतज्ञता व्यक्त करण्यास सुयोग्य व्यक्ती किंवा गोष्टी शोधण्यास आणि रोज त्यांची नोंद ठेवण्यास मनुष्याला मुद्दाम उद्युक्त केलं जातं. या तंत्राद्वारे मानसिक आरोग्याचं संवर्धन कसं होतं, ते माधवीच्या उदाहरणातून पाहू.

स्व-परिघाचा विस्तार- कृतज्ञता वाटणं म्हणजे इतरांच्या चांगल्या कृत्यांची दखल घेणं. ती घेण्यासाठी आत्मके ंद्रिततेतून बाहेर यायला लागतं. माधवीच्या मनोगतातून दिसतं, की तिच्या नोंदींमध्ये सुरुवातीला तिच्या स्व-वर्तुळाशी संलग्न असणाऱ्या व्यक्ती- उदाहरणार्थ कुटुंबीय, शिक्षक, अशा होत्या. रोजनिशीत नोंद करण्यासाठी ती दूधवाल्यापासून आजूबाजूच्या अनेक व्यक्तींच्या छोटय़ा-मोठय़ा कामांची दखल घ्यायला लागली. म्हणजेच तिचा ‘स्व’चा परीघ विस्तारत गेला. परस्परावलंबनाचं महत्त्व कळल्यामुळे परस्परांशी जोडलं गेल्याची समृद्ध जाणीव तिला झाली. या जाणिवेचा मानसिक आरोग्याशी जवळचा संबंध आहे.

सकारात्मकतेस उत्तेजन- इतरांची किंवा परिस्थितीची ऋण बाजू लक्षात ठेवण्याकडे सहसा आपला कल असतो. कृतज्ञतेमध्ये सकारात्मक भावना अंतर्भूत आहे. व्यक्तीच्या किंवा परिस्थितीच्या ऋण बाजूपेक्षा धन बाजूकडे लक्ष वळवण्याचं काम कृतज्ञता करते. आजूबाजूला असणाऱ्या व्यक्ती त्याच असल्या तरी रोजनिशी लिहिताना त्यांच्याकडे पाहण्याचा माधवीचा दृष्टिकोन बदलत गेला. त्यांच्यातल्या सकारात्मकतेची तिला जाणीव होत गेली. हा सराव करण्याअगोदर व्यक्तींच्या किंवा परिस्थितीच्या नकारात्मक बाजूंवर ती अवास्तव लक्ष केंद्रित करत असल्यामुळे चिंता, निराशा, असमाधान अशा भावनांनी ग्रस्त होती. ‘कृतज्ञतेच्या रोजनिशी’मुळे धन बाजूंकडे लक्ष वळून या भावनांची तीव्रता कमी झाली. मग बाह्य़ परिस्थिती आपत्तीजनक असूनही ती आनंदाचा अनुभव घेऊ शकली, आणि मानसिक स्वास्थ्य सुस्थितीत ठेवू शकली.

इतरांचा स्वीकार- बऱ्याचदा इतरांचं मूल्यमापन काळ्या-पांढऱ्या शिक्क्यांनी करण्याची आपल्याला सवय असते. काळा शिक्का मारलेल्या व्यक्तींसाठी आपण मनाची कवाडं बंद करून घेतो. कृतज्ञतेच्या सरावात धन बाजूकडे लक्ष केंद्रित केलं जात असल्यामुळे कुठल्याही व्यक्तीवर काळे-पांढरे शिक्के  मारण्याच्या सवयीला प्रतिबंध होतो आणि समतोल मूल्यमापनाची सवय वाढीला लागते. तसंच हेही कळतं, की ज्या व्यक्ती आपल्याशी अपेक्षेप्रमाणे वागल्या नाहीत, त्यांनी तसं वागून आपल्याला मदतच केली आहे. कारण त्यामुळे आपण कठीण प्रसंगाला तोंड द्यायला समर्थ झालो आहोत. थोडक्यात कृतज्ञता ही सहिष्णुता आणि क्षमाशीलता जोपासण्यास प्रोत्साहन देते. रोजनिशी लिहायला सुरुवात केल्यापासून माधवीच्या मानसिक आरोग्याचा चढता आलेख हा या भावनांचा निदर्शक आहे.

‘कृतज्ञतेची रोजनिशी’ लिहिल्यामुळे माधवी आनंदी असली तरी ती अंतिम फलश्रुती नाही. कृतज्ञतेचं केवळ स्मरण करण्यापर्यंत कृतज्ञतेचा सराव थांबत नाही, तर यापुढे जाऊन ती कृतीत आणणंही महत्त्वाचं आहे. मदत केलेल्या काहींजवळ कृतज्ञता व्यक्त करणं माधवीला शक्य आहे. पण सरसकट सगळ्यांपाशी ती व्यक्त करणं अवघड आहे, कारण तिच्या कृतज्ञतेच्या नोंदींमधील अनेक व्यक्ती अज्ञात आहेत, तसंच काही गतकाळातल्या आहेत. त्यामुळे केवळ व्यक्त करून न थांबता ती कृतज्ञतेबाबत अधिक विधायक कृती करू शकते.

ही विधायक कृती म्हणजे ज्या व्यक्तींनी मदत केली आहे त्यांच्या मदतीची परतफेड त्यांनाच करणं नव्हे. कारण अनेकदा त्यांना तशा मदतीची गरजही नसते. विधायक कृतीसाठी माधवी अजून एक तंत्र वापरू शकते. त्याचं नाव आहे- ‘फीड फॉरवर्ड’- म्हणजे ‘मदतीची परंपरा मागे न वळवता पुढे न्या’. माधवीनं जर हे तंत्र वापरलं, तर तिला अशा अनेक व्यक्ती आजूबाजूला दिसतील की ज्यांना तिच्या मदतीची गरज आहे. त्यांना मदत करून ती ही परंपरा पुढे नेऊ शकते. अर्थात तिचा कृतज्ञतेचा सराव पक्का असेल, तर मदत घेणाऱ्या व्यक्तींचा समावेशही ती तिच्या रोजनिशीत करेल, कारण तिला मदतीची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ती त्यांच्याबद्दलही कृतज्ञ असेल. त्या वेळी आत्मविकासाच्या सर्वोच्च टप्प्याकडे तिची वाटचाल चालू झालेली असेल. तेव्हा टाळेबंदी असो वा नसो प्रत्येकाने करावा असा हा प्रयोग करायला हवा.. आपल्या आनंदाची चावी शेवटी आपल्याच हाती असते ती अशी..

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diary of gratitude chaturang psychroscope article abn