ऑस्ट्रेलियातील आदिवासी एक लांबलचक  कण्र्यासारखे घनगंभीर आवाज करणारे ‘डिजीरिडू’ नावाचे वाद्य वापरतात. दररोज २० मिनिटे या पद्धतीने चार महिने ‘डिजीरिडू’च्या प्रॅक्टिसनंतर घोरणे तर कमी झालेच, पण ‘स्लीप अ‍ॅप्नीया’देखील निम्म्याने कमी झाला! असा दावा एका शोधनिबंधात संशोधकांनी केला आहे. घोरण्यावरच्या अशाच काही उपायांवरील लेख..
‘निद्राविज्ञान’ अर्थात झोपेचे शास्त्र ही एक सकारात्मक वैद्यकीय शाखा आहे. नानाविध निद्राविकार (आत्तापर्यंत ८४ माहीत असलेले) जरी असले तरी बहुतांश विकारांवर इलाज आहेत! उपचारांनंतर आयुष्यात विलक्षण फरक पडू शकतो, असा अनेक लोकांचा अनुभवही आहे.
घोरणे आणि त्याच्याशी संलग्न असलेला ‘स्लीप अ‍ॅप्नीया’ यावर देखील अनेक उपचार आहेत. त्यांचा विचार या लेखात करू या. सर्वप्रथम आपण घरगुती, सोप्या आणि स्वस्त उपायांचा आढावा घेऊ या. अर्थात असे उपाय सगळ्यानांच लागू पडतील असे नाही. किंबहुना जर काही दिवसांनंतर लक्षणीय असा फरक वाटला नाही तर पुढची पायरी म्हणजे तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
झोपताना पलंग, उशी आणि पहुडण्याची स्थिती यांचा घोरण्यावर परिणाम होतो. आडव्या स्थितीमध्ये पडल्यावर, विशेषत: पाठीवर झोपल्यानंतर आपली जीभ आणि पडजीभ पाठी ढकलली जाते. याने गळा अरुंद होऊन घोरणे वाढते. अशा वेळेला कुशीवर झोपल्याने घोरणे कमी होते. यात पंचाईत अशी आहे की झोपेत पुन्हा कुशीवरून पाठीवर वळणार नाही कशावरून, हे आपल्या हातात थोडेच असते? अशा वेळेला एक पाठीच्या लांबीएवढा तक्क्या ठेवणे उपयोगी ठरते. काही लोक फक्त मान आणि डोके जास्त उशी घेऊन उचलतात तसे न करता झोपताना कंबरेपासून ते डोक्यापर्यंतचा भाग थोडासा उंचावणे हा एक उत्तम उपाय आहे. यामुळे नाक सुटण्यास मदत होतेच, शिवाय जळजळणे आणि अन्न घशाशी येणे हा प्रकारही कमी होतो. दुसरा उपाय म्हणजे अंगरख्याला तीन टेनिस बॉल्स् पाठीकडे मधोमध शिवून घेणे. यामुळे कुशीवरून पाठीवर यायला अटकाव होईल.
अर्थात या उपायांमध्ये दोन त्रुटी आहेत. सर्वप्रथम म्हणजे सतत एका कुशीवर झोपल्याने मान आणि त्या बाजूचा खांदा वजन पेलण्यामुळे दुखावू शकतो. झोपणे पन्नास टक्के तरी पाठीवर असावे.  हे मागील लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे वज्र्य आहे. दुसरी त्रुटी म्हणजे झोपताना बरेच लोक शर्ट वा तत्सम घालतीलच असे नाही. अर्थात घोरणे जर कुठल्याही कुशीवर आणि पाठीवर होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला बरा. ‘वजन कमी करणे’ हा सर्वाधिक दिला जाणारा सल्ला! पण हादेखील सगळ्यांना लागू होत नाही. तुम्ही वजन वाढण्याच्या अगोदर घोरत नव्हतात आणि सर्व घोरणे वजन वाढीनंतरच आले असेल तरच हा उपाय लागू होईल. पण अगदी बारीक मंडळीदेखील घोरतात हे लक्षात घ्यावे.
शिवाय वजन कमी करणे म्हणजे शरीरातील फॅट कमी करणे होय. याकरिता काही महिने वेळ लागू शकतो. दहा दिवसांत दहा पौंड वजन कमी! या पद्धतीत खरे वजन (फॅट) कमी होत नाही. तसेच ‘स्लीप अ‍ॅप्नीया’मुळे वजनवाढ आणि त्याची परिणती .. हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी वजन कमी करण्याबरोबरच ‘स्लीप अ‍ॅप्नीया’च्या तात्पुरत्या इलाजांची जोड आवश्यक ठरते.
अतिरिक्त जाड असलेल्या लोकांना ‘बॅरीअ‍ॅट्रिक सर्जरी’ चा उपाय सुचवला जातो. पाश्चात्त्य देशांमध्ये ऑपरेशनच्या काही आठवडे अगोदर प्रत्येकाची ‘स्लीप अ‍ॅप्नीया’ चाचणी अनिवार्य आहे. त्यामुळे ऑपरेशन टेबलवरचे अथवा नंतरचे अपघात टळतात. एवढेच नव्हे तर ऑपरेशन झाल्यावरदेखील काही महिने ‘स्लीप अ‍ॅप्नीया’वर उपाय असलेले ‘पॅप’ नावाचे मशीन लागते. त्यामुळे ऑपरेशननंतर वजन वेगाने कमी होण्यास मोलाचा हातभार लागतो असा माझा अनुभव आहे.
भारतामध्ये मात्र वेगळा अनुभव येतो. एकतर ‘पॅप’च्या वाढीव खर्चास बरीच मंडळी कांकू करतात आणि उगाच विरोध नको म्हणून सर्जन मंडळी देखील याकडे काणाडोळा करतात. त्यामुळे ‘स्लीप अ‍ॅप्नीया’कडे दुर्लक्ष होते. अर्थात अपघात काही सांगून येत नाहीत त्यामुळे आपापल्या जिवाची किंमत ज्याने त्याने ठरवावी. काहीजणांचे घोरणे हे नाकाशी संबंधित असते. उदाहरणार्थ आपण रबरी नळीने बागेला पाणी देत असताना, थोडेसे वरती काही क्षण दाबून धरले तर नंतर बाहेर पडणारे पाणी जास्त वेगाने लांब पडते हा सर्वाचाच अनुभव आहे. तसेच जर नाकाच्या अंतर्गत थोडे आकुंचन झाले तरी आत येणारी हवा अधिक वेगाने येऊन गळ्यामध्ये व्हायब्रेशन्स् अर्थात घोरणे निर्माण करते.
गरम पाण्याने आंघोळ, मानेची स्थिती यामुळे नाक मोकळे होण्यास मदत होते. जलनेती, सूत्रनेती यांचा देखील फायदा होतो. ज्यांना अ‍ॅलर्जीचा त्रास आहे आणि त्यामुळे सतत नाक चोंदते अशांनी मात्र त्यावर वैद्यकीय सल्ला घ्यावा. माझ्या पाहण्यात आयुर्वेद, होमिओपथी आणि आधुनिक वैद्यकीय पद्धती या तिन्हींमध्ये उत्तम उपाय आहेत. बाजारामध्ये नाक चोंदण्यावर  ‘नेजल डिकजेस्टंट’ (उदा. ऑट्रीवीन)  ड्रॉप्स मिळतात. ते मात्र तीन ते चार दिवसांनंतर सलग वापरू नयेत. त्यांच्या सतत वापराने नाकाच्या आतील अस्तरावर विपरीत परिणाम होतो. ‘ब्रिद राइट’ नावाच्या नाकावर चिकटवण्याच्या पट्टय़ादेखील मिळतात. त्यांच्यामुळे नाक उघडण्यास मदत होते. अर्थात जर घोरणे केवळ नाकाशी संबंधित असेल तरच त्यांचा उपयोग! जलनेतीकरता वापरण्यात येणारे विलयन (सोल्युशन) घरीदेखील बनवता येते. एक कप कोमट पाण्यामध्ये तीन चमचे मीठ (आयोडिन नसलेले) आणि एक चमचा खायचा सोडा घालावा. सकाळी उठल्यावर एकदा आणि संध्याकाळी घरी आल्यावर एकदा जलनेती करावी.
बऱ्याच वेळेला नाक आणि घसा कोरडा असतो. त्यामुळे नाकातील श्लेष्म घट्ट होतो आणि त्यामुळे घोरणे वाढते. अशा  वेळी दिवसभरात १२ ते १८ कप पाणी प्यावे. आपल्या पंख्यावर अथवा उशीच्या अभ्य्रावर धुलिकण असतात, तसेच ‘डस्टमाइट’ नावाचे सूक्ष्म जंतूदेखील असतात. या जंतूंमधील प्रथिनांमुळेदेखील अ‍ॅलर्जीचा त्रास बळावतो. त्यामुळे पंखे, उशांचे अभ्रे स्वच्छ ठेवण्याने देखील घोरण्यावर फरक पडू शकतो. घरातील पाळीव प्राणी आणि त्यांचे केस यामुळेदेखील अ‍ॅलर्जी बळावून घोरणे वाढते. बाजारात काही विशिष्ट उशा मिळतात, त्या वापरल्याने मान उंचावते आणि घोरणे कमी होते, पण दुर्दैवाने मानदुखी देखील मागे लागू शकते, त्यामुळे त्यांच्यापासून लांब राहिलेले बरे!
घोरणे गळा / नाक अरुंद झाल्यामुळे वाढते, त्याहीपेक्षा घोरण्याचे मुख्य कारण हे घशाच्या स्नायूंची शिथिलता हे आहे. किंबहुना भारतीय लोकांमध्ये मला हेच कारण जास्त आढळून आले आहे. बऱ्याच वेळेला हे कारण आनुवंशिक असल्याने एकाच कुटुंबात अनेक घोरणारे आढळतात. एखादा हुशार वाचक त्यावरून असादेखील कयास बांधेल की जर या स्नायूंची निद्रेतील शिथिलता कमी केली तर घोरणे बंद होईल! पाश्चात्त्य देशांमध्ये घशाच्या स्नायूंना व्यायाम देण्याचे अनेक प्रकार पारखून झाले पण फारसे यश दिसले नाही. गेल्या पाच वर्षांत मात्र ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’ या प्रख्यात वैद्यकीय नियतकालिकात दोन लेख प्रसिद्ध झाले आहेत. ऑस्ट्रेलियातील आदिवासी एक लांबलचक असलेले, कण्र्यासारखे ‘डिजीरिडू’ नावाचे वाद्य वापरतात. घनगंभीर आवाज करणारे हे ‘डिजीरीडू’ अनेकांनी आमीर खानच्या ‘दिल चाहता है’ या सिनेमात ‘जाने क्यूँ लोग प्यार करते है’ या गाण्यामध्ये ऐकले आहे.
या दोन्ही शोधनिबंधात म्हटल्याप्रमाणे दररोज २० मिनिटे अशी चार महिने ‘डिजीरीडू’च्या प्रॅक्टिस्नंतर घोरणे तर कमी झालेच, पण ‘स्लीप अ‍ॅप्नीया’देखील निम्म्याने कमी झाला! हे वाद्य वाजवताना घशामध्ये हवेची गोलाकार हालचाल करावी लागते, त्यामुळे घशाच्या विशिष्ट स्नायूंमध्ये फरक घडून येत असावा असा संशोधकांचा दावा आहे.
घोरण्याचा आपल्या समाजावर होणारा दुष्परिणाम लक्षात घेता आमचे संशोधन हे उज्जायी प्राणायाम आणि त्याच्या घोरण्यावरचा परिणाम यावर चालू आहे. कुठलेही संशोधन जर वैद्यक जगतात सर्वमान्य करायचे असेल तर त्याची मांडणी काटेकोरपणाने आणि शास्त्रीय निकष लावूनच करायची असते. अशा चाचण्यांमुळे (रँडमाइज्ड कंट्रोल्ड) आधुनिक वैद्यकशास्त्राची घोडदौड  झाली आणि ‘आयुर्वेद, होमिओपथी’मधील अनेक मौलिक बाबी त्या तज्ज्ञांपुरत्याच सीमित राहिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा