संकेत पै
जागरूक राहून, ‘सजगतेनं’ जगणं, या संकल्पनेला केवळ वैचारिक पैलू नाहीयेत. जीवनात व्यक्तीचा एकूण दृष्टिकोन काय, यावर जशा अनेक गोष्टी अवलंबून असतात, तसंच व्यक्ती रोजच्या जगण्यात कशा कशाला प्राधान्य देते, हेही पाहणं आवश्यक आहे. यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहार. तुमचे विचार उत्तम आणि सकारात्मक आहेत, पण रोजचा आहार कुपोषण वाढवणारा असेल, तर अनेक गोष्टी तिथेच चुकायला लागलेल्या असतात..
ग्रीक वैद्याकतज्ज्ञ हिपोक्रेटसला ‘आधुनिक वैद्याकशास्त्राचा जनक’ म्हणतात. त्यानं सांगून ठेवलेल्या तत्त्वांचा वैद्याकशास्त्राच्याच नव्हे, तर मानसिक आरोग्याच्या इतिहासावरही मोठा प्रभाव आहे. त्याच्या अनेक प्रसिद्ध वचनांपैकी एक म्हणजे ‘Let food be thy medicine and medicine be thy food.’ सध्याचा काळ वेगवान तांत्रिक सुधारणांचा आणि नवनवीन वैज्ञानिक शोधांचा आहे. अशा वेळी हे जुनं ज्ञान अधिक महत्त्वाचं ठरतं. आरोग्य चांगलं राहावं, यासाठी पोषण ही मूलभूत गरज आहे, यावर हिपोक्रेटस भर देतो.
आपण या लेखमालिकेत ‘सजगतेनं जगणं’ या संकल्पनेची चर्चा करतोय. रोजचं जगणं तर धकाधकीचं असणारच आहे, परंतु तरीही त्यात आरोग्याला, तंदुरुस्तीला महत्त्व देणं आवश्यक आहे, हे मागील लेखात अधोरेखित झालं. आता आहार, आरोग्य आणि त्याचा आयुष्याशी असलेला संबंध, या विषयावर विचार करू या.
आरोग्याच्या बाबतीतला एक मोठा आणि अनेक लोक अगदी आग्रहीपणे मांडतात असा मतप्रवाह म्हणजे, तुम्ही व्यायाम करत असाल, तर काहीही खाऊ शकता! अगदी माझे आई-वडील, सासू-सासरे, यांनाही असंच वाटतं. खरं तर या समजाचा विपणनाच्या युक्त्यांशी संबंध आहे. आरोग्य, अन्न आणि व्यायाम यांच्यातला गुंतागुंतीचा संबंध यामध्ये किरकोळीत काढलाय.
आणखी वाचा-‘ती’च्या भोवती : किमया तिच्या जिद्दीची!
काही जाहिरातींमध्ये असं दाखवलेलं असतं, की तुम्ही काहीही अपायकारक अन्न जरी खाल्लं, तरी व्यायाम करून ते सर्व उष्मांक जाळून टाकता येतात. व्यायामासाठीची उपकरणं आणि सप्लिमेंट्स विकणाऱ्या कंपन्या असं म्हणतात, की तुम्ही कोणत्याही प्रतीचं अन्न खात असाल, तरी आमच्या उत्पादनांनी ती कमतरता भरून निघेल. विशिष्ट सांस्कृतिक रीतीभाती आणि चांगल्या आरोग्याच्या दृष्टीनं आहाराचा विचार करणं, या दोहोंत आरोग्य आणि पोषणाला कमी महत्त्व दिलं जातं. उदा. सणासुदीलाही जेव्हा एखादी व्यक्ती काही आरोग्यविषयक नियम पाळायचं ठरवते- चार घास कमी खाणं किंवा गोड कमी खाणं आदी, तेव्हा तिची टिंगल केली जाते. काहीही खा आणि व्यायाम करून ते जिरवा, असाच सूर सगळीकडे दिसतो. थोडक्यात ‘उत्तम पोषक आहारापेक्षा सर्व लक्ष व्यायामावरच केंद्रित करा,’ असा संदेश मिळतो.
पण हे खरं नाही! जरी व्यायामाचा आरोग्याला फायदा होत असला, तरी अपुऱ्या आणि अपायकारक अन्नानं निर्माण झालेली कमतरता त्यामुळे भरून निघत नाही. माझाही पूर्वी या बाबतीत इतरांसारखाच समज होता. पाच वर्षांपूर्वी एका मार्गदर्शकानं तो मोडून काढला. त्यांनी मला हे पटवून दिलं, की व्यायाम करणं चांगलंच आहे, पण शरीर कुपोषित असेल, सततच्या चुकीच्या आहारामुळे शरीरात विषद्रव्यं (टॉक्सिन्स) भरलेली असतील, तर अशा स्थितीत व्यायाम करण्यानं मोठ्या प्रमाणात अपाय होऊ शकतो. त्यांच्या शब्दांनी माझे डोळे उघडले. पूर्वी मी व्यायामाला कसं अति-महत्त्व देत असे, ते सर्व डोळ्यांसमोर येऊन गेलं. थोडक्यात काय, जेव्हा तुमचं शरीर सुदृढ असतं, तेव्हा त्या सुदृढतेला पूरक ठरेल असा, आरोग्यात वाढ होईल असा व्यायाम फायदेशीर. मग मीही यावर थोडा अभ्यास केला. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की व्यायामापेक्षाही शरीराला अन्नाद्वारे मिळणाऱ्या पोषणमूल्यांवर बरंच काही अवलंबून असतं. शरीराची ठेवण आणि आरोग्य दोन्ही. अनेक संशोधनं असं सांगतात, की जवळपास आपलं ९५ टक्के आरोग्य त्यावर आधारलेलं आहे. अमेरिकी डॉक्टर मार्क हायमन याबाबत म्हणतात- ‘You can’t exercise your way out of a bad diet.’
आणखी वाचा-‘टाँगलेन’ची अनोखी गल्ली!
हल्ली प्रक्रिया केलेले, प्रिझर्व्हेटिव्ह्ज्चा मारा असलेले पदार्थच बाजारात मोठ्या प्रमाणावर मिळतात. त्यामुळे केवळ व्यायाम या एकाच गोष्टीवर अवलंबून न राहता, चांगल्या आहाराकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरतं. आपण जेव्हा ‘सजगतेनं जगणं’ ही संकल्पना अवलंबू लागतो, तेव्हा आपल्या आरोग्यावर जीवनशैलीचा मोठा प्रभाव पडतो, हे समजून घ्यावं लागतं. ‘तुमच्या आरोग्याचं स्वामित्व तुमच्याकडे घ्या,’ हा विचार त्यात आहे. आपण पुष्कळदा आरोग्यविषयक लोकप्रिय ‘ट्रेंडस्’ आणि इतरांची मतं, याच आधारे आपले निर्णय घेत असतो. ते सोडून स्वत:च आरोग्याच्या बाबतीत दक्ष राहायला शिकण्याची भावना आपल्यात रुजवता येते. पोषक आहाराच्या बाबतीत आपण स्वत: मान्यताप्राप्त माध्यमांमधून खात्रीशीर माहिती मिळवू शकतो. आरोग्याच्या आड येणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक बंधनांना बाजूला सारू शकतो.
समस्त प्राण्यांमध्ये केवळ मनुष्य हा एकच असा प्राणी आहे, जो शरीर बांधेसूद राहावं या संदर्भात ‘डाएट’ हा शब्दप्रयोग वापरतो. इतर प्राण्यांमध्ये ‘डाएट’ ही त्यांची जीवनशैलीच आहे. हत्तीचं डाएट गवत, झाडांचा पाला, फळं, सिंहाचं डाएट मांस, आदी. प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात जगता यावं, टिकून राहता यावं, यासाठी आवश्यक ऊर्जा आणि पोषणमूल्यं पुरवण्याची निसर्गाची एक स्वतंत्र यंत्रणा असते. आपण मात्र सातत्यानं साखर, मीठ, इतर कृत्रिम पदार्थ आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज्नी ओतप्रोत असं अन्न खातो. अगदी एखाद्या कार्यक्रमापुरतं चांगलं दिसण्यासाठी ‘क्रॅश डाएट’सुद्धा करतो!
पूर्वीचा मानव शिकारी होता, साठवणूक करणारा होता. येईल त्या परिस्थितीत तगून राहण्यासाठी आपल्या भूप्रदेशाचा, उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा त्याला बारकाईनं अभ्यास करावा लागे. भोवतालच्या स्थितीशी जुळवून घेताना आहारात वैविध्य हवं, हे त्याच्या लक्षात आलं. मग विविध वनस्पतींचा, प्राण्यांच्या मांसाचा पोषणमूल्यांची गरज भागवण्यासाठी आहारात समावेश झाला. हल्ली मात्र ‘सोय’ या गोष्टीला आपण झुकतं माप देतो. सहजपणे उपलब्ध असलेल्या पाकीटबंद पदार्थांचा स्वयंपाकघरातला वावर त्यामुळेच वाढला. पूर्वी खाण्यापिण्याचे चांगल्या दर्जाचे जिन्नस आणणं, घरात अन्न शिजवणं, याला प्राधान्य दिलं जात असे. आता ते मागे पडलंय. यामुळे अन्नपदार्थांमधलं वैविध्य कमी झालं. ‘प्रोसेस्ड’ पदार्थांवरचं अवलंबित्व वाढलं. मात्र या अन्नात पूर्वीची पोषकता नाही.
आणखी वाचा-सांधा बदलताना : हस्तांतरण..
सजगतेनं जगताना आपल्या अन्नात कॅलरीजचं (उष्मांकांचं) प्रमाण किती, एवढंच पाहून चालत नाही. त्यात पोषणमूल्यं किती आहेत हे समजून घेणं अधिक गरजेचं. एखादा पाकीटबंद पदार्थ खरेदी करताना त्या वेष्टनावर असलेली घटक पदार्थांची यादी आवर्जून वाचा. ते घटक आरोग्याला पोषक आहेत की घातक आहेत, हे डोळसपणे समजून घ्या. उत्तम पोषणमूल्यं असलेले पदार्थ- म्हणजे फळं, भाज्या, प्रथिनं, चांगले स्निग्ध पदार्थ, अशा जीवनसत्त्वं, खनिजं आणि अँटिऑक्सिडंट्स पुरवणाऱ्या पदार्थांना प्राधान्य द्यायला हवं. माझे मार्गदर्शक मला म्हणाले होते, की ‘जेव्हा एखाद्या घटक पदार्थाचा अर्थ तुम्हाला गूगलवर शोधावा लागतो, तेव्हा बहुतांशी तो पदार्थ शरीराला लाभदायक नसतोच!’
आहार पोषक असेल, तर मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा यांसारख्या विकारांना प्रतिबंध होतो आणि त्यांवर नियंत्रणही ठेवता येतं. जागरूकतेनं, पोषक आहार घेतल्यामुळे आरोग्यात सुधारणा होतेच, परंतु अशा गंभीर समस्या निर्माण व्हायचा धोका कमी होतो. स्वस्त असलेले ‘रेडीमेड’ खाद्यापदार्थ, इतर ‘प्रोसेस्ड’ आणि बंद पाकिटातले पदार्थ, यांमुळे पचनाशी संबंधित विकार होण्याची शक्यता असते. आपल्याला होणाऱ्या बहुतांश आजारांचं मूळ पोटात- पचनसंस्थेच्या आरोग्यात असतं. अशा वेळी ते लक्षात न घेता आजारावर उपचार केला, तर तो वरवरचा ठरू शकतो, कारण मूळ समस्या तशीच राहिलेली असते. अति प्रमाणात प्रक्रियायुक्त आणि बेकरी पदार्थ खाल्ल्यानं ‘लिकी गट’ नामक पचनसंस्थेचा विकार उद्भवू शकतो. यात आतड्यातून अनेक प्रकारचे जीवाणू, इतर विषद्रव्यं थेट रक्तात मिसळून आरोग्य समस्यांमध्ये भर पडते. यात नैराश्य, चिंता (अँग्झायटी), रोगप्रतिकारशक्तीशी संबंधित आजारही (ऑटोइम्युन डिसिजेस) उद्भवू शकतात.
आणखी वाचा-‘एका’ मनात होती : जोडीदाराशिवायचं एकटेपण!
अभिनेत्यांचं ‘डाएट’ नेहमी चर्चिलं जातं. विल स्मिथ या प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या आरोग्यविषयक सवयींबद्दल झालेली एक ‘वेब-चर्चा’ आठवतेय. मोना शर्मा या आरोग्य मार्गदर्शक आणि आहारतज्ज्ञ त्यात म्हणतात, ‘‘स्वत:ची काळजी घेण्याची सुरुवात ही स्वयंपाकघरापासून होते!’’ स्मिथच्या कुटुंबाला याबाबत मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, ‘‘अन्न शरीराचं पोषण करतं. त्याचा केवळ ‘डाएट’शी किंवा कुठल्यातरी ‘ट्रेंड’शी संबंध नाहीये. शिवाय आहार ही काही उरकून टाकायची गोष्ट नाही!’’ आताचं जगणं खूप धावपळीचं आहे. मात्र त्यात मी स्वत:ला वारंवार हा प्रश्न विचारतो- ‘मी काय खातोय? त्यातून आपल्या शरीराचं पोषण झाल्यासारखं वाटतंय का?…’ उत्तम अन्नाचा उत्तम आरोग्याशी असलेला घनिष्ठ संबंध त्यातून अधोरेखित होतो. मग आपलं लक्ष केवळ ‘खाणं’ यावरून ‘शरीराचं पोषण होईल असं अन्न खाणं’ यावर केंद्रित होतं. या बदललेल्या दृष्टिकोनामुळे आरोग्याला फायदेशीर ठरणाऱ्या अन्नाची आयुष्यात किती महत्त्वाची भूमिका आहे, हे उमगतं. त्याला प्राधान्य द्यायला आपण शिकतो.
सारांश असा, की सजग जीवन जगताना केवळ समृद्ध जीवनाबद्दलच्या धारणा पुरत नाहीत. त्याच वेळी स्वत:च्या आरोग्याची उत्तम काळजी घेणं आवश्यक आहे. आपण जी गोष्ट निवडतोय, त्यावर आपलं भविष्य आधारित आहे, हे जाणीवपूर्वक समजून घ्यावं लागतं.
शरीराला आणि मनाला चैतन्य देण्याची शक्ती या निवडीत असते आणि आपण ती अजमावू शकतो. आरोग्यावर पुन्हा नियंत्रण मिळवू शकतो. केवळ पोषण करणारी नव्हे, तर आपली लवचीकता, ऊर्जा आणि परिपूर्णता वृद्धिंगत करणारी जीवनशैली यातून निर्माण करता येते.
sanket@sanketpai.com