आश्चर्य वाटलं ना नाव वाचून? पण आता जमानाच ‘स्पा’चा आहे. दिवाळी चार दिवसांवर आली म्हणता म्हणता आज भाऊबीज आलीसुद्धा! बहीण-भावाचं नातं असू दे किंवा बाळकृष्णाला भाऊ मानलेल्या बहिणीचं नातं – एकंदरीत काय नात्यांचे बंध दृढ करणारे सर्व सण असतात. मग मनात विचार आला की आपलं आपल्या मनाशी / शरीराशी आणि आत्म्याशी असलेलं नातं विसरून कसं चालेल? आणि हे नातं जपण्यासाठी सणाची वाट बघायची गरजच नाही. रोजचाच दिवस ‘सण’ म्हणून साजरा करता येईल. परवा एका आरोग्यधाम हॉस्पिटलमध्ये गेले होते. आत प्रवेश केल्यावर धन्वंतरीच्या मूर्तीसमोर मंद तेवत असलेली पणती, ओमकाराचा नाद आणि ‘मधुर’ स्मित असलेले डॉक्टर पाहिले आणि एक वेगळीच अनुभूती जाणवली.
दिवाळीसारख्या सणांचा आनंद आरोग्यदायी मन:स्थितीने घेता आला तर सणांची रंगत अधिकच वाढते. म्हणूनच मला वाटतं की आरोग्य अबाधित राहण्यासाठी आपण जर ‘आहार-विहार स्पा’ घेतला तर अशी अनुभूती रोजच प्रत्येकाला घेता येईल. आज आपण बोलूया हिवाळा ऋतूमध्ये आपल्या आरोग्याची काळजी कशी घेता येईल!
थंडीचे दिवस – हेमंत ऋतू आता सुरू होईल. मग शरीर-मन-आत्मा यांना जोडणारी दिनचर्या कशी असावी?
१. गुलाबी थंडी आणि अंधुक उजाडलेलं असताना आळस झटकून व्यायाम करणं – जो जमेल तो. चालणे/ योगा/ सूर्यनमस्कार वगैरे. त्यामुळे शरीरात कफ साचणार नाही. ६० मिनिटांचा व्यायाम (प्रकृती प्रमाणे कमी-जास्त) जरूर करावा. थोडय़ा वेळासाठी का होईना, पण प्राणायाम जरूर करावा.
२. वात आणि कफ प्रवृत्ती जास्त बळावलेली असते. म्हणून आहारामध्ये त्यानुसार बदल करणे आवश्यक आहे. भूक वाढली तरी वजन वाढेल म्हणून कमी खाणे बरोबर नाही. योग्य अन्नाची निवड मात्र जरुरी आहे. जव, अळशी, कुळीथ, खोबरं, गायीचे तूप, हळद/काळी मिरी घातलेलं बिन-सायीचं दूध , सिझनमध्ये मिळणारी कंदमुळे, मेथी, पुदिना, पालक, मोहरी किंवा मोहरीचा पाला, शेवगा शेंगा, कारलं वगैरे पचन सुलभ करणाऱ्या भाज्या, त्यांची सुप्स, (सलाड टाळणे), आलं, सुंठ, काळी मिरी, जेष्ठमध, लवंग, तुळस, दालचिनीसारखे मसाले, गवती पातीचा चहा, तीळ, शेंगदाणे, बदाम, अक्रोड, खजूर, इत्यादी ड्राय फ्रुट्स आणि तेलबिया, पिण्यासाठी कोमट पाणी वगैरे पदार्थाचा उपयोग जरूर करावा. आवळा, आंबेहळद, हिरवा पातीचा लसूण शरीरातील विष द्रव्य बाहेर काढण्यासाठी अतिशय उपयुक्त. सायीचे दूध, साखर, दही, आंबवलेले किंवा तेलकट पदार्थ कफ वाढवायला मदत करतात. दिवसाची सुरुवात च्यवनप्राशने करता आली तर उत्तमच.
३. अंघोळी आधी थोडय़ाशा कोमट तेलाने मसाज करणे कधीही चांगले. कफ नसेल तरी रोज सकाळी मीठ-हळदीच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. रक्त प्रवाह सुधारण्यासाठी थोडा तेल मसाज करून मीठ घातलेल्या कोमट पाण्यात हात-पाय बुडवून ठेवावेत.
आहे की नाही खिशाला परवडणारा ‘स्पा’! थोडीशी जिद्द आणि वेळेच नियोजन असेल तर कठीण काहीच नाही.
थंडीसाठी काही खास मेनू-
* चहा – आल्याचा तुकडा, तुळशीची पानं आणि मध किंवा गूळ घालून केलेला चहा
* १ चमचा साखरविरहित च्यवनप्राश
* पुदिना-जिरं आणि हिरवा पातीचा लसूण घालून केलेली चटणी
* सैंधव घालून केलेलं आंबेहळदीचं लोणचं
* अळशीच्या बिया, ओवा, तीळ आणि सुकं खोबरं घालून केलेला मुखवास
* लवंगाचे २-४ दाणे घालून शिजवलेला लाल भात आणि पालक-उडीद डाळीचे वरण आणि तूप
* मेथी घालून केलेली बाजरीची किंवा मक्याची भाकरी आणि ताजं कढवलेलं घरचं लोणी
* शेवगाच्या शेंगेचं रसम मसाला घालून केलेलं गरमागरम सूप..
हे आहेत थोडे हटके प्रकार पण थंडीसाठी एकदम झक्कास!
आरोग्यवान असणं म्हणजे ताप – सर्दी- खोकला नसणं एवढंच नाही तर आरोग्याचं लक्षण म्हणजे पुढील गोष्टींचा अभाव –
सकाळी उठल्यावर निरुत्साही वाटणे, दुपारी डोळ्यांवर झापड येणे, वेळी-अवेळी जांभया येणे, रात्री अतिशय थकवा जाणवणे, जेवणाच्या वेळी भूक कमी लागणे किंवा रात्री उशिरा अचानक काहीही खावेसे वाटणे, क्षुल्लक कारणासाठी अवास्तव चिडचिड होणे, शरीराचा कोणताही भाग कधीही दुखत राहणे वगैरे. यापैकी एकही समस्या असेल तर मूळ कारण आपल्याच आहारविहारामध्ये दडलेलं असतं. ते शोधून काढून ज्यावेळी मी माझ्या रुग्णाला योग्य सल्ला देते आणि रिलीफ मिळालेला रुग्ण माझ्याकडे काही दिवसांनी येतो त्यावेळी त्यांच्या डोळ्यातील आणि बोलण्यातील समाधान खूप काही देऊन जातं. रात्री शांत झोप लागण्याच कारण याच अनुभूतीमध्ये आहे!!
परवाच एक छान मेसेज वाचला –
दिव्याने दिवा लावला तर दिव्यांची एक दीपमाळ होते
फुलाला फुल जोडलं की फुलहार तयार होतो
माणसाला माणूस जोडत गेलं की ‘माणुसकीचं’ एक सुंदर नातं तयार होतं..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा