सु ’ जा ’ ण ’ पा ’ ल ’ क ’ त्व
मेंदूच्या विविध केंद्रांकडे विविध जबाबदारी सोपवलेली असते. जसं भाषा बोलण्याचं, लिहिण्याचं काम वेगवेगळी केंद्रे करत असतात. मुलांना वाढवताना-त्यांना शिकवताना पालक आणि मुलांना जर या शास्त्रीय बाजूची माहिती असेल तर ते सोपं जातं. यामुळे मुलांना कुठली गोष्ट सोपी आणि कुठली अवघड हे कळू शकतं. त्यामुळे नेमकी कुठे मदत करायची गरज आहे, हे समजतं. ए खाद्या चांगल्या कारखान्याची व्यवस्था बघितली तर असं दिसतं की प्रत्येक खातं हे आपापलं काम सांभाळतं. प्रत्येक खात्यात कोणी कोणती जबाबदारी घ्यायची हे ठरवलेलं असतं. त्याचं काम तो बरोबर पार पाडतो. एखादा माणूस एखाद्या दिवशी अनुपस्थित असला तर त्याचं काम दुसरं कोणीतरी उचलतं. पण काम थांबवणं हे काही हिताचं नसतं. एखादं काम सुरळीतपणे चालू राहण्यासाठी त्याची सर्व व्यवस्था नीटपणे लागलेली असणं हे सर्वाधिक आवश्यक आहे.
आपला मेंदू हासुद्धा जसा एक अतिशय सुव्यवस्थित चालणारा कारखानाच आहे. इथेही वेगवेगळे अवयव आपापलं काम करत असतात. आपलं काम काय आहे, हे त्यांना नेमकेपणाने माहीत असतं. तरीही ते एकत्र असतात. इथेही एखादा अवयव काही कारणाने काम करेनासा झाला तर दुसरा अवयव तात्पुरती बाजू सांभाळून नेतो. शिक्षणाशी संबंधित असलेली वेगवेगळी क्षेत्रं आपली कामं कशी करतात, हे बघण्यासाठी मेंदूच्या आत डोकावून बघावं लागतं. विविध न्यूरो सायंटिस्टसनी केलेल्या संशोधनानुसार अशी अनेक प्रकारची माहिती आता कळू शकते. या विषयावर सातत्याने संशोधन चालू आहे.
मेंदू हा विचार करण्याचा अवयव. बुद्धीचा अवयव, असं आपण म्हणतो. मात्र आपलं संपूर्ण जीवनच याच्या नियंत्रणात आहे. इथे विविध क्षेत्रं आहेत. ती आपापलं काम करण्यात सतत गर्क असतात. आता तुम्ही छानपकी एका जागी बसून हा लेख वाचत आहात, तरी तुमचा मेंदू मात्र अक्षरश: धावपळ करतो आहे.
डोळ्यांनी वाचायचं-व्हिज्युअल कॉर्टेक्सकडे संदेश जाणार-मग भाषा आकलन केंद्राकडे संदेश जाणार. लेख वाचताना मध्येच आपल्याला विषयाशी संबंधित जुन्या आठवणी आठवतात, म्हणजे पेरिएटल कॉर्टेक्सची मदत- वाचताना काही व्यक्ती आठवणार- संवाद आठवणार- प्रसंग आठवणार -म्हणजे चित्र उभं राहणार- ते चित्र उभं करायला तर अनेक क्षेत्रांची मदत लागते – मध्येच आपण पुढचं प्लॅिनग करणार-अशा कितीतरी गोष्टी आपल्याही नकळत आतमध्ये चालू आहेत. तेही काही दशांश सेकंदाच्या आत. अशा पद्धतीने दर क्षणाला काम आणि कामच करत असतो आपला मेंदू.
भाषा
आपण बोलतो तेव्हा आपलं तोंड, स्वरयंत्र काम करत असतं. पण काय बोलायचं, काय बोलायचं नाही, कुठे थांबायचं, हळू बोलायचं की जोरात? त्यासह देहबोली कशी हवी, हे ठरवत असतो तो आपला मेंदू. मेंदूच्या डाव्या भागात भाषेचं केंद्र आहे, असं आढळून आलेलं आहे.
एकदा पॉल ब्रोका नावाच्या एका डॉक्टरांकडे एक पेशंट आला. तो फक्त ‘टॅन’ हा एकच उच्चार करू शकायचा. तपासताना असं लक्षात आलं की, त्याच्या डोक्याच्या डाव्या भागाला इजा झाली होती. इजा होण्यापूर्वी तो व्यवस्थित बोलू शकायचा. त्यावर त्यांनी अजून खोलात जाऊन संशोधन केलं, तेव्हा त्यांना मेंदूच्या याच क्षेत्रात भाषेचं काम चालतं हे लक्षात आलं. हा अतिशय महत्त्वाचा शोध लावल्याबद्दल मेंदूचं हे क्षेत्र आज ‘ब्रोका केंद्र’ म्हणून ओळखलं जातं.
या केंद्राला लागून दुसरे केंद्र आहे त्याचं नाव ‘वíनक केंद्र.’ कार्ल वíनक या शास्त्रज्ञाचं नाव या केंद्राला देण्यात आलं आहे. कारण त्यांच्याकडे असे पेशंट्स आले होते, ते बोलू शकायचे. पण आपण काय बोलतोय हे त्यांना समजायचं नाही. यावरून वíनक यांनी या भागात भाषेच्या आकलनाचं महत्त्वाचं काम चालतं, हा निष्कर्ष मांडला.
मूल जन्माला येतं तेव्हापासूनच वíनक क्षेत्राचं काम चालू असतं. त्यामुळे आपण मुलांशी जे बोलतो ते मुलांना कळत असतं. ब्रोका केंद्राचं काम मात्र उशिरा चालू होतं. वय वर्ष दीड-दोन – काही जण अडीच वर्षांचे होईपर्यंत बोलत नाहीत. त्याला कारण हे केंद्र. हे केंद्र एकदा विकसित झालं की मुलं बोलायचं थांबत नाहीत.
मूल जन्माला येतं ते विविध भाषा शिकण्याच्या यंत्रणा घेऊनच. त्यांच्या कानावर लहानपणापासून दोन किवा त्याहून आधिक भाषा सहजगत्या येत गेल्या तर मूल दोन्ही भाषा आत्मसात करतं. पण या भाषाशिक्षणासाठी जर जबरदस्ती केली तर मात्र भाषा आत्मसात करण्यावर बंधनं येतात. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे शब्द आणि व्याकरण हे वेगवेगळ्या भागात साठवलं जातं. त्यामुळेच वयाच्या १२ वर्षांनंतर जर एखादी भाषा शिकायला नव्याने सुरुवात करायची असेल तर शिकवण्याच्या पद्धतीत थोडा बदल करावा लागतो. हेलन नेव्हिल यांनी केलेल्या संशोधनात असं दिसलं आहे.
मोटर कॉर्टेक्स हा भाग लेखनाला मदत करतो. वयाच्या पाचव्या- सहाव्या वर्षांपर्यंत हा भाग विकसित झालेला नसतो. मुलं रेघोटय़ा काढू शकतात, चित्रं काढू शकतात, पण अक्षरं काढण्यासाठी जी क्षमता आवश्यक असते, ती त्यांच्यात नसते. यानंतर पुढच्या दोन-तीन वर्षांत हा कॉर्टेक्स हळूहळू तयार होत राहतो. प्रत्येकात हा कॉर्टेक्स विकसित होण्याचा वेग कमी-अधिक असतो.
लिहिण्यासाठी आवश्यक असे हाताचे- मनगटाचे स्नायूदेखील लेखनासाठी पुरेसे विकसित झालेले नसतात. या वयात लेखनाची सक्ती + शिक्षा केल्यास त्याच्या दुष्परिणामांना मुलांना पुढच्या आयुष्यात सामोरं जावं लागेल. कारण त्याच्या पुरेशा विकसित नसलेल्या- कोवळ्या अवयवावर हा ताण आहे, हे लक्षात घ्यावं.
आपण जेव्हा बोलतो, वादविवाद करतो, गाणी म्हणतो तेव्हाही अनेक केंद्रांची मदत लागते. हातवारे करणं, चेहऱ्यावरचे भाव बदलत जाणं, तर्काचा वापर करणं, स्मरणातून अनेक घटना बाहेर काढणं, तालाचा, ठेक्याचा वापर करणं अशी अनेक केंद्रं इथे मदतीला येतात. तेव्हाच परिपूर्ण भाषा साकार होते.
गणित
गणिताच्या बाबतीतही वेगवेगळ्या केंद्रांची मदत घ्यावी लागते. साधं बघायचं तर, अंक हे अंकाच्या स्वरूपात वाचायला आणि अक्षरांच्या स्वरूपात वाचायला (उदा, १० – दहा) व्हिज्युल कॉर्टेक्सच्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही केद्रांची मदत लागते.
गणिती क्रिया करायला मदत लागते ती पेरिएटल लोबमधल्या विशिष्ट केंद्राची. अंक माहीत असणं, पाठ असणं हे गोष्ट वेगळी, मात्र अंक क्रमाने सांगता येणं, अंकाच्या स्वरूपात नसलेल्या – पण क्रमाने माहिती असाव्यात अनेक गोष्टी, जसं, महिन्यांची, आठवडय़ांची नावं हे वेगळं कौशल्य आहे. बेरीज- वजाबाक्या अशा कृती करण्यासाठी जी कौशल्यं लागतात, ती तर्काच्या पातळीवर जातात. त्यामुळे केवळ गणिती आकडेमोड करण्यासाठी ताíकक विचार करावा लागतो.
भूमितीसाठी अवकाशाचा, म्हणजे जागेचा विचार करावा लागतो. त्रिकोण काढायचा तर तो कसा, कुठून आणि केवढा मोठा हे समजायला केवळ अंक येऊन उपयोग नाही, तर हे एक वेगळं कौशल्य आहे.
तसंच भाषिक उदाहरणांबाबतही सांगता येतं. केवळ अंकाचा वापर करून मुलं गणित सोडवू शकतात. मात्र तेच गणित भाषेत घातलं की अडखळतात. कारण इथे भाषेचं आकलन होण्याचं जे केंद्र आहे, त्याचीही मदत लागतेच.
मुलांना वाढवताना-त्यांना शिकवताना पालक आणि मुलांना जर या शास्त्रीय बाजूची माहिती असेल तर सोपं जातं. यामुळे मुलांना कुठली गोष्ट सोपी जात आहे आणि कुठली अवघड हे कळू शकतं. त्याला नेमकी कुठे मदत करायची गरज आहे, हे समजतं.
‘याला गणित अवघड जातं’, असं म्हणतो तेव्हा समग्र गणित अवघड जातं की त्यातला काही भाग अवघड जातो, हे लक्षात घ्यायला हवं. तर नक्की कुठे प्रश्न आहे, हे समजून घेता येईल. उदा. अंक वाचता येताहेत. पण तेच अंक अक्षरात वाचता येत नाहीयेत. याचा अर्थ अक्षरांचा विविध प्रकारे सराव करण्याची गरज आहे. भूमितीत चुकत असेल तर मूलभूत संकल्पना आधी पक्क्या आहेत का ते बघायला हवंय, असं सांगता येईल.
भाषा पक्की करण्यासाठी विविध; पण छोटय़ा छोटय़ा कौशल्यांची सांगड घालावी लागते. व्याकरण अवघड जातं, कारण त्याचा कप्पाच वेगळा आहे, तर त्यासाठी वेगळ्या प्रकारची तर्कशुद्धता लागणार आणि सरावही लागणार हे समजून घेता येईल.
या सर्व क्रिया आपल्यापकी प्रत्येकाच्या मेंदूत सातत्याने घडत असतात. मात्र मेंदूला जे अनुभव सातत्याने मिळत असतात, त्यात तऱ्हेतहेचे वाईट अनुभवही असतात. यामुळे या सर्व प्रक्रियांना हानी बसू शकते. उदाहरणार्थ, कुपोषण. समतोल आहार न मिळणं- याचा परिणाम मेंदूवर होतो. मूल जन्मापासून किमान सुविधांपासून वंचित असणं, पालकांच्या आíथक गटाचा परिणाम त्याच्यावर होणं. कायमस्वरूपी दुर्लक्षित मुलं असतील तर त्यांच्याकडे इतरांपेक्षा अधिक लक्ष द्यायला हवं एवढं मात्र निश्चित.
‘सुजाण पालकत्त्व’ या मालिकेतील ‘कट्टा मुलांचा’ हे अनुराधा गोरे यांचे सदर ३० मार्चच्या ‘चतुरंग’मध्ये प्रसिद्ध होईल.