डॉ. अंजली जोशी
एखाद्या गोष्टीत उत्तम कामगिरी करूनही आई-बाबांनी कधीही तोंडभरून कौतुक केलं नाही, हा अनुभव अनेक व्यक्तींचा! तोंडावर फार प्रशंसा गेली तर मुलं गर्विष्ठ होतील, हे आई-बाबांनी पाळलेलं एक मूल्य; पण त्यामुळे पुढच्या आयुष्यात ती व्यक्ती वाजवी श्रेयही स्वत:कडे घेणं विसरून जाते, त्याचं काय?.. जुन्या पिढीची अनेक मूल्यं आताच्या जगात पूर्णत: कालबाह्य झाली आहेत. जुन्या आणि नव्या पिढय़ांमधला जीवनमूल्यांचा झगडा एखाद्या वळणावर थांबून दोघं एकत्र येऊ शकतील का?..सकाळी उशिरा जाग आली. कालचा बाबांच्या सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ संपायला रात्र झाली होती. कंपनीतून रजा काढून मी खास त्यासाठी आलो होतो. बाहेर आलो तर आई-बाबा सकाळची कामं आवरून निवांत बसले होते. चहा पिताना निरोप समारंभात बाबांबद्दल त्यांचे सहकारी काय बोलले होते ते आठवायला लागलं. बाबांचं उत्तम तांत्रिक कौशल्य, मनमिळाऊ स्वभाव, परोपकारी वृत्ती अशा गुणवैशिष्टय़ांची सगळय़ांनी तोंड भरून प्रशंसा केली होती. माझ्या मनात पूर्वीपासून असलेला प्रश्न मात्र डोकं वर काढून उभा राहिला. एवढी गुणवत्ता असूनही बाबांना पदोन्नतीच्या फारशा संधी का मिळाल्या नव्हत्या? विचारल्यावर बाबा म्हणाले, ‘‘मिहिर, मी वरिष्ठांसमोर कधी तोंडपुजेपणा केला नाही. स्वत:च्या कामाबद्दल स्वत:च्या तोंडानं सांगणं मला प्रशस्त वाटत नाही.’’
‘‘पण वरिष्ठांपर्यंत पोहोचत असेल ते तुमच्या टीमचं एकत्रित काम. तुमचं स्वत:चं टीममध्ये नक्की योगदान काय आहे हे त्यांना कसं कळणार?’’ मी विचारलं.
‘‘ते जाणून घेणं हे वरिष्ठांचं काम आहे, माझं नाही.’’ बाबांनी त्यांच्या नेहमीच्या बाण्यात उत्तर दिलं. मी यावर वाद घातला नाही. कारण मला बाबांचं मत माहीत होतं. ते म्हणायचे, ‘‘माणसानं नम्र असलं पाहिजे. स्वत:बद्दल बढाई मारू नये. स्वत:च्या तोंडानं स्वत:चे गुण गाऊ नयेत.’’ आईही त्यांचीच री ओढायची.
आईबाबांच्या या शिकवणुकीचं ओझं माझ्या मनावर लहानपणापासून होतं; पण बाहेरच्या जगात पाऊल ठेवलं तेव्हा व्यवहारी जगात ही शिकवणूक उपयोगी पडत नाही, ही जाणीव तीव्रपणे झाली. टीममध्ये काम करत असताना कामाचा बराच भार मीच उचलत होतो. रात्र-रात्र जागून ते डेडलाइनच्या आत पूर्ण करायचो. एवढं करूनही जेव्हा मला परफॉर्मन्स रिव्ह्यूमध्ये सामान्य रेटिंग मिळालं, तेव्हा माझे डोळे खाड्कन् उघडले. मी टीममध्ये नक्की काय काम करतो, हे माझ्या बॉसपर्यंत पोहोचत नव्हतं. कारण त्यांच्याकडे जाऊन स्वत:च्या कामाबद्दल बोलणं मला फुशारकी मारणं वाटायचं.
हेही वाचा : स्त्री हिंसाचारमुक्त कधी होईल?
माझ्या मनावर स्वार झालेली ही शिकवणूक मी तपासून पाहिली तेव्हा लक्षात आलं, वरिष्ठांच्या अंगावर इतकी कामं आहेत, की त्यांना टीममध्ये कोण काय काम करतोय हे स्वत:हून जाणून घेण्यास फुरसत मिळत नाही. त्यामुळे आपलं काम त्याच्यापर्यंत खुबीनं सांगण्याचं कौशल्य आत्मसात करणं गरजेचं आहे. स्वत:च्या गुणांबद्दल अवास्तव सांगणं म्हणजे बढाई होऊ शकते; पण स्वत:चं वाजवी मार्केटिंग केलं नाही तर आपल्या कामाचं अवमूल्यन केलं जातं. जगाच्या बाजारात आपण मागे पडतो. आपल्याकडे काय आहे हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच ते इतरांना कळणंही महत्त्वाचं आहे. त्यासाठी स्वत:ला पावलं उचलणं क्रमप्राप्त आहे.
आईबाबांनी चारचौघांमध्ये माझं फारसं कौतुक केलेलं मला आठवत नाही. मी कौतुकानं चढून जाईन किंवा मला गर्व होईल, असा विचार त्यामागे असावा. मी जेव्हा आजूबाजूला पाहू लागलो तेव्हा कळलं, की माझ्यासारख्या अनेक मध्यमवर्गीय मुलांवर असेच संस्कार झालेले आहेत. कौतुक ऐकण्याची सवय नसल्यामुळे आपण चांगलं काम करूनही ते चांगलं आहे, असं त्यांना स्वत:लाच वाटत नाही. जर आपण स्वत:च आपल्या चांगल्या कामाचं अवमूल्यन करत असू, तर ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं तर फारच पुढची गोष्ट झाली! मग अशी मुलं न्यूनगंडाचे बळी होतात, अतिनम्रतेचं ओझं वाहात राहतात. लहानपणच्या संस्कारांमुळे स्वत:चं वाजवी मार्केटिंग करणं त्यांना जमत नाही. गुणवत्ता असूनही ती मागे पडतात किंवा आपल्याला कसं डावललं जातं याबद्दल स्वत:ची कणव करत न्यूनगंड कुरवाळत राहतात. मी तसं होऊ देणं नाकारलं. लहानपणच्या शिकवणुकीचं ओझं झुगारून दिलं आणि ज्या कंपन्या माझ्या गुणवत्तेला न्याय देतील अशा कंपन्या जॉइन करत गेलो.
हेही वाचा : कौटुंबिक जखमेवरची मलमपट्टी
अर्थात आईबाबांना हे फारसं रुचणार नाही, अशी अटकळ होतीच. आताही आई म्हणाली, ‘‘मिहिर, आम्ही वर्षांनुवर्ष एकाच कंपनीत राहिलो. तू मात्र चार वर्षांत तीन कंपन्या बदलल्यास. कमिटमेंट नावाचं मूल्य तुमच्या पिढीतून हद्दपार झालंय बहुतेक!’’
‘‘माझी कमिटमेंट माझ्या स्वत:शी आहे, कंपनीशी नाही.’’ मी म्हणालो.
‘‘ही आत्मकेंद्रितता झाली!’’ आई
नाराजीनं म्हणाली.
‘‘माझ्या मते तो स्वत:ला न्याय देणं आहे. आणि कमिटमेंट दोन्ही बाजूंनी असते. उद्या कंपनी तोटयात चालली तर मला कामावरून काढून टाकलं जाईल. मग कमिटमेंट फक्त मीच एकतर्फीपणे का पाळायची?’’ ‘‘अरे, नुसत्या नोकरीबाबत मी म्हणत नाही. नातेसंबंधातही तुमची पिढी कमिटमेंट देत नाही.’’ आई तिची बाजू लढवतच होती.
‘‘कमिटमेंट न देणं, म्हणजे आम्ही जसा काही गुन्हाच करतोय असा तुमच्या पिढीचा दृष्टिकोन असतो! कमिटमेंट देऊन ती न पाळणं हा गुन्हा असू शकतो; पण एखादी गोष्ट आपण पार पाडू शकू याची खात्री नसताना कमिटमेंट न देणं हा गुन्हा कसा ठरेल? डेटिंग करायचं असेल तर तसं आम्ही स्पष्ट सांगतो. लग्नाची कमिटमेंट देत नाही. दीर्घकाळाची कमिटमेंट देण्यासाठी आम्ही जर तयार नसू, तर उगाच दुसऱ्याला खोटया आशा लावत नाही. म्हणजे उलट आम्ही जास्त प्रामाणिक नाही का?’’
आईनं यावर विषय आटोपता घेतला; पण माझ्या मनात विचार घोंघावत राहिले. समोर टेबलावर वाण्याकडून आणलेलं सामान पडलं होतं. ते नेहमीच्या वाण्याकडचं दिसत नव्हतं, याकडे माझं लक्ष गेलं. आईला विचारलं, तर म्हणाली, ‘‘अरे, हल्ली या नवीन वाण्याकडून मी सामान मागवते. एक वस्तू असली तरी तो घरपोच पाठवतो. सोयीचं पडतं खूप!’’
माझ्या मनात आलं, की पर्याय मिळाले की तुम्हीही निष्ठा बदललीत ना! मग फक्त आमच्या पिढीला नावं का ठेवता? जेवढे पर्याय जास्त, तेवढी कमिटमेंट कमी. आमच्यापुढे अनेक पर्याय आहेत, म्हणून आम्ही निष्ठा बदलू शकतो. तुमच्या काळात पर्याय कमी होते. तुम्ही नोकरीत निष्ठा दाखवली, ती खरोखर निष्ठेमुळे का पर्याय नसल्यामुळे आलेल्या अपरिहार्यतेमुळे? मी नोकऱ्या बदलल्या हे खरं असलं तरी ते सोपं नसतं. नवीन बदलाशी, नवीन चक्राशी चटकन जुळवून घ्यावं लागतं. आधीचा ‘कम्फर्ट झोन’ तोडावा लागतो. धोका पत्करावा लागतो. तो पत्करण्याची आमची तयारी असते. वर्षांनुवर्ष एकाच ठिकाणी नोकरी करण्यामागे निष्ठेपेक्षा कम्फर्ट झोन तोडण्याची भीती असते, असं आम्ही तुमच्या पिढीला म्हटलं तर?..
अधिक विचार केला तेव्हा वाटलं, आईवडील जी अनेक मूल्यं मुलांना शिकवतात, ती व्यावहारिक जीवनात उपयोगी पडत नाहीत. मुलांना लहानपणापासून रुजलेली मूल्यं झटकून टाकता येत नाहीत आणि नवीन चटकन अंगीकारता येत नाहीत. ना धड इकडे, ना धड तिकडे, अशी त्रिशंकूसारखी त्यांची अवस्था होते. मग त्याचाही ‘गिल्ट’ येत राहतो. मीही असं अपराधीपणाचं ओझं वाहिलं आहे. त्यातून तावून-सुलाखून बाहेर पडल्यावर मी निष्कर्ष काढला, की आईवडिलांनी अधिक व्यवहार्य, जीवनाभिमुख मूल्यं मुलांना शिकवली, तर ती जीवनसागरात गटांगळया खाणार नाहीत. शाळा-कॉलेजमधल्या शिक्षणात आणि व्यवहारी जगातल्या शिक्षणात जशी तफावत दिसून येते तशीच तफावत आईवडिलांनी शिकवलेल्या मूल्यांत आणि आणि प्रत्यक्ष जीवनातल्या मूल्यांत दिसून येते.
हेही वाचा : नवीन वर्षांचे स्वागत करताना.. वेळेचे व्यवस्थापन : घटिका गेली.. पळे वाचवू..
मला आठवलं, की आईबाबा परीक्षेच्या गुणांवर किती अतिरेकी भर द्यायचे! पुढच्या जीवनात उपयोगी पडतात ते परीक्षेतले गुण नव्हेत, तर नेतृत्वगुण, नेटवर्किंग, टीम मॅनेजमेंट अशी कौशल्यं; पण सगळी शक्ती परीक्षेवर एकवटल्यामुळे ही कौशल्यं विकसित होण्यास ऊर्जाच शिल्लक राहत नाही. गुण कमी असले तरी ही कौशल्यं विकसित झालेली मुलं व्यावसायिक उन्नतीच्या शिडया भराभर चढतात आणि अभ्यास एके अभ्यास करणारी मुलं एकारलेल्या व्यक्तिमत्त्वाची होतात. परीक्षेतल्या गुणांना सर्वस्व मानणारी ही मानसिकता पालकांनी बदलली तर मुलांना किती उपयोग होऊ शकेल..
आई-बाबा म्हणायचे, ‘‘एकच एक ध्येय ठेव आणि त्यासाठी झटून प्रयत्न कर. आता वाटतंय की एकच एक ध्येय उलट विचारांची ताठरता निर्माण करतं. हल्लीचं जग इतकं वेगवान आहे, की एकच ध्येय ठेवून जगात निभाव लागणं शक्य नाही. आपल्याला अनेक ध्येयं ठेवावी लागतात आणि वेळप्रसंगी ती बदलण्याची लवचीकता ठेवावी लागते. परिस्थितीत इतक्या झपाटयानं बदल होतात, की ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचेपर्यंत त्या ध्येयाचं उद्दिष्टच भुईसपाट झालेलं असतं. तो धक्का पचवता न आल्यामुळे कोलमडून गेलेली अनेक मुलं मी पाहतो. त्यामुळे पर्यायी अनेक ध्येयं ठेवण्याशिवाय गत्यंतर नाही.
‘पैशांची श्रीमंती नको, मनाची श्रीमंती हवी’ हे बाबांचं बोधवाक्य मला तोंडपाठ होतं. हेही मला एकांगी वाटतं. मुळात पैशांची श्रीमंती आणि मनाची श्रीमंती ही व्यस्त का? ते दोन्ही एकत्र असू शकतात की! मध्यमवर्गाला श्रीमंतांबद्दल इतका आकस का असतो? इतरांची पिळवणूक करून किंवा त्यांच्यावर अन्याय करूनच समृद्धी येते असं नाही. प्रामाणिकपणे कष्ट करून स्वबळावरही ती येऊ शकते. मला खूप पैसा मिळवायचा आहे, हे ध्येय ठेवलं, तर तुमच्या पिढीतले लोक आम्ही उथळ आहोत, चंगळवादी आहोत, अशी आमची संभावना करतात. पैसा हे सर्वस्व नसलं, तरी त्याला साधनमूल्य तरी आहे, हेही ते मान्य करत नाहीत. मध्यमवर्गीय लोकांमध्ये चांगलं राहण्याचा गिल्ट येतो, तो अशाच शिकवणुकीमुळे! म्हणजे पैसा तर मिळवायला लागतो; पण त्याबद्दल गिल्ट वाटून घ्यायचा. या ओढाताणीपेक्षा स्वच्छपणे मला समृद्धी हवी आहे, असं मान्य करणं सोयीचं नाही का?..
बाबा म्हणाले, ‘‘मिहिर, पद आणि पैसा या अशा गोष्टी आहेत, की ज्या क्षणी त्या हातात येतात, त्या क्षणी त्यांचं महत्त्व संपतं. कारण त्या वेळी त्या अपुऱ्याच वाटतात. मग अजून मिळवण्याच्या आपण मागे लागतो. हे चक्र अव्याहत चालूच राहतं. शेवटी आपल्यालाच त्याला पूर्णविराम द्यावा लागतो, हे लक्षात ठेव.’’
हेही वाचा : शोध आठवणीतल्या चवींचा! : खांडोळीची भाजी ते घुळणा!
मी मान डोलावली; पण करिअरची घोडदौड चालू असताना पूर्णविराम देणं मला पराङ्मुखता आणि अल्पसंतुष्टता वाटते.
आई-बाबा नेहमीच अल्पसंतुष्ट राहिले. अधिकचे प्रयत्नच त्यांनी नाकारले. आपल्या छोटया जगात हातपाय मारत राहिले; पण पंख पसरून, धोका पत्करून उंच आभाळात कधी भरारी घेतली नाही. मला अशी भरारी घ्यायचीय. आई-बाबांसारखा ‘गुड-इनफ माइंडसेट’ मला नकोय, तर ‘ग्रोथ-माइंडसेट’ हवाय; पण मग लक्षात आलं, की माझं बोलणं आईबाबांना आवडणार नाही, कारण आमच्या वाटा वेगळया आहेत आणि या वाटांवरची मुक्कामाची ठिकाणंही वेगळी आहेत.
anjaleejoshi@gmail.com