– वैशाली शामराव पतंगे

सतत ऑनलाइन राहण्याची प्रत्येकाला वाटणारी निकड वास्तव जगातल्या माणसांमधल्या संवादासाठीचा अडथळा होऊन बसली आहेच, शिवाय आजूबाजूचा परिसर, निसर्ग, झाडं, प्राणीपक्षी यांच्यापासून, त्यांच्या स्पर्श-गंधांच्या संवेदनांपासूनही ती माणसाला दूर नेते आहे. ऑनलाइनमुळे आलेल्या तुटलेपणावर ‘डिजिटल डिटॉक्स’ वा डिजिटल अंतर राखणं हा उपाय आहे खरा, पण तो आपल्याला गरजेचा आहे, हे कळण्यासाठीही खडबडून जागं व्हायला लागणार आहे.

Man climbed on truck to catch the kite during makar Sankranti pune video viral
हे फक्त पुण्यातच घडू शकतं! एका पतंगासाठी पठ्ठ्यानं केलं ट्रॅफिक जाम, भररस्त्यात ट्रकवर चढला अन्…, VIDEO पाहून पोट धरून हसाल
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Shocking video of Kidnapping where a man saved girls life video viral on social media
काळ आला होता पण वेळ आली नव्हती! त्याने तिला जबरदस्तीने व्हॅनमध्ये बसवलं अन्…, अपहरणाचा धक्कादायक VIDEO व्हायरल
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Video Shows Man cleverness
थरारक! काही सेकंदांत होत्याचं नव्हतं झालं असतं; ‘तो’ रस्ता ओलांडत असताना वेगानं आली कार अन्… पाहा धडकी भरवणारा VIDEO
Shocking video of a Girl abuses and assualt auto driver over fare in up mirzapur video viral on social media
तुम्हीच सांगा चूक कोणाची? तरुणीने शिवीगाळ करत रिक्षाचालकाला केली मारहाण, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं
Makar Sankranti 2025 Funny video of a kid flying a kite with pants falls down viral video
याला म्हणतात नाद! पँट खाली आली पण पतंग नाही सोडली; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Little school girl driving jcb as passion video viral on social media dvr 99
लेक असावी तर अशी! शेतकरी बापाच्या मुलीची ‘ही’ कला पाहून तुम्हीही व्हाल अवाक, VIDEO एकदा पाहाच

पुण्याहून मुंबईला जाणारी सोमवार सकाळची ‘शिवनेरी’. मुंबईच्या ‘आयटी’ चाकरमान्यांनी पूर्ण आरक्षित असलेली. अशाच एका गाडीत एक तरुण जोडपं माझ्या मागोमाग आत शिरलं. दोघं समवयीन, समान पेशातले पती-पत्नी असावेत याचा अंदाज त्यांचा वावर-पेहराव आणि सुरुवातीच्या संभाषणावरून आला. आपापल्या जागांवर बसल्यानंतर तिच्या हातात टॅब आणि त्याच्या मांडीवर लॅपटॉप विराजमान झाला. जोडीला दोघांनी हेडफोन चढवले. साडेचार तासांच्या प्रवासात त्यांच्या नजरा आपापल्या उपकरणांमधून हलल्या नाहीत, की कानातले इलेक्ट्रॉनिक अलंकारसुद्धा उतरले नाहीत.
एकदा मध्येच गाडी थांबल्यावर उतरायचं म्हणून ती उठून उभी राहिली आणि सामानाचं वरचं रॅक तिच्या डोक्याला जोरात थडकलं. आम्ही मान वळवून पाहिलं, पण तिच्या नवऱ्यानं मानही वळवली नाही आणि तिनंदेखील फक्त ‘उफ्फ’ करून एक हात डोक्यावर दाबून आपली टॅबवरची दुसऱ्या हाताची बोटं चालूच ठेवली! इच्छित मुक्कामावर दोघंही उतरून गेले, तेव्हा तरुण युगुलाचं हे नवरूपदर्शन विश्वरूपदर्शनाइतकंच साक्षात्कारी असल्याचा भाव माझ्या चेहऱ्यावर निर्माण झाला होता.

हेही वाचा – नवीन वर्षांचे स्वागत करताना.. वेळेचे व्यवस्थापन : घटिका गेली.. पळे वाचवू..

मागच्या दोन-चार वर्षांपर्यंत अशा जागांवर दिसणारा ‘तो’ आणि ‘ती’ आजूबाजूच्या प्रत्येकाला बेदखल करून आपल्या विश्वात रमणारी, एकमेकांचा हात हातात घेणारी होती. त्याच्या हरेक वाक्यावर हसणारी ती आणि तिच्या प्रत्येक हसण्यावर तिच्याकडे पाहणारा तो! आता मात्र तरुण जोडपी साडेचार तासांच्या प्रवासात एकमेकांशी चकार शब्दही बोलत नाहीत, हे काळजी करण्याइतपतचं परिवर्तन म्हणायला हवं. व्हर्च्युअल जगात तत्परतेनं प्रतिसाद देणाऱ्या माणसांना आपल्या शेजारी बसणाऱ्यांकडे लक्ष देणं इतकं का जिकिरीचं होऊन गेलं आहे?

‘प्रत्यक्षाहूनि प्रतिमा उत्कट’ असते म्हणून प्रतिमेलाच कवटाळून बसण्याचं हे आमचं वेड नातेसंबंधांवर दीर्घकालीन परिणाम करू लागलं आहे. व्हर्च्युअल जगातल्या मैत्रीचं स्वरूप आल्हाददायक, बिनखर्चिक असतं, म्हणून फक्त त्याच्यात रमणाऱ्यांनी प्लास्टिकचं शेत सांभाळलं आहे! कमी ‘मेन्टेनन्स’मध्ये ते करता येईल, पण जेवणाचं ताट त्यानं सजणार का, हा प्रश्न आहे. उलट वास्तव जगातल्या नात्यांना मोडीत काढून एकटं पडण्याचा धोका जास्त संभवतो. शिवाय व्हर्च्युअल जगातली माणसं मुखवटा घालून वावरत असल्यामुळे प्रत्यक्षात ती तशी असतीलच याची खात्री नाही. त्यामुळे ‘तेलही गेले आणि तूपही गेले’ हे हाती धुपाटणं येईपर्यंत लक्षात येत नाही. अशी अनेक उदाहरणं आजूबाजूला दिसू लागली आहेत. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या स्वप्नाळू प्रदेशात विहरणाऱ्यांना नवे यक्ष-यक्षिणी भेटतात, तसेच जुने हळवे कोपरे सापडतात. नातेसंबंधांत नावीन्याचा शोध घेण्याची ही ओढ सोशल मीडियाला अधिक आकर्षक बनवते. ही ओढ पूर्वीपासून आहे, पण हातातल्या मोबाइलनं ती तिन्ही त्रिकाळ सहजसाध्य झाली आहे. त्यातून वास्तवातल्या नात्यांत असुरक्षितता शिरली आहे.

आपला नवरा ऑनलाइन आहे, हे पाहिल्यावर त्याच्या ज्या मैत्रिणीवर संशय आहे, तीसुद्धा ऑनलाइन आहे की नाही हे तपासण्याचं काम दिवसभर करणाऱ्या पत्नीला समुपदेशनाची गरज निर्माण होते. आपली बायको मोबाइलला पासवर्ड आणि व्हॉट्सअ‍ॅपला फिंगरप्रिंट लॉक’ लावते, म्हणजेच तिची कोणाबरोबर तरी भानगड चालू आहे, असा संशय घेणाऱ्या नवऱ्यापासून वेगळे होण्याची वेळ एखाद्या बायकोवर शेवटी येते. व्हर्च्युअल जगात आपला जोडीदार नक्की काय करतो, यावर लक्ष ठेवणारे नवरा किंवा बायको अंतिमत: संशयकल्लोळात अडकतात, हे आजचं सार्वत्रिक चित्र आहे. अर्थात हा संशयकल्लोळ फक्त गैरसमजातूनच निर्माण होतो असं नाही, तर त्याला स्त्री-पुरुषांचं ‘डिजिटल डेटिंग’, ‘सेक्स्टिंग’, ‘न्यूड चॅट्स’ याचं वाढलेलं प्रमाणही जबाबदार आहे. कोणत्याही उत्तरदायित्वाशिवायचे नातेसंबंध वास्तव जगातल्या नात्यावर खोल ओरखडे उमटवतात. तरीही ती किंमत मोजण्याची बहुतेकांची तयारी का असावी? प्रत्यक्षातल्या संवादातलं अवघडलेपण व्हर्च्युअल वावरात नसल्यानं माणसं अधिक धीट वा कोणत्याही विधिनिषेधाशिवायच मोकळा संवाद साधू शकतात. त्यांना आपल्यातलं न्यूनत्व झाकण्याची संधी डिजिटल वावरात वेगवेगळया फिल्टरच्या रुपानं मिळते. शिवाय ‘मी कसा आहे’ किंवा ‘मी कशी आहे’ याचं ‘प्रोजेक्शन’ सर्वस्वी आपल्याच हातात असतं, त्यामुळे वास्तव जगातल्या तथाकथित कुरूप व्यक्तीलासुद्धा नाकारलं जाण्याचं भय कमी वाटतं. एखाद्या नात्यात जरी नकार आला, तरी असंख्य पर्यायांचा महासागर सतत खुला असतो.

बऱ्याचदा एक व्यक्ती एकापेक्षा अनेक जणांशी ‘डिजिटल डेटिंग’ करत असते किंवा ‘सिच्युएशनशिप’मध्ये असते. त्यामुळे पोकळी निर्माण होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. म्हणजे नातेसंबंधांची ही जुळण्याची-तुटण्याची मालिका सुसाट वेगानं, कोणत्याही अडथळयाशिवाय सतत चालू ठेवता येते. कमी त्रासात सहजसाध्य असं सुख मिळवणं ही आपली जैविक घडण आहे. त्यातून ‘डोपामाईन’ स्रवतं, जे तात्पुरत्या आनंदाची निर्मिती करतं. जरा ‘डाऊन’ वाटायला लागलं की एखादी आपला व्हॉट्सअ‍ॅपचा डीपी बदलते किंवा वाढदिवसाच्या दिवशी एखाद्याला फेसबुकवर आकर्षक ‘टेम्पररी प्रोफाइल पिक्चर’ किंवा कव्हर फोटो लावावासा वाटतो. कारण माणसांना इतरांकडून प्रतिसाद अपेक्षित असतो आणि त्यांच्या चित्तवृत्तींना प्रभावित करतो. अशा कृतीनंतर सोशल मीडियावर मिळणारे व्ह्यूज, लाइक्स, कमेंट्स मोजत राहण्याचं काम त्यांच्यासाठी दिवसभर आनंददायक ‘असाइन्मेंट’ होऊन जाते. त्यात माणसं सतत भावनिकदृष्ट्या व्यग्र आणि उत्तेजित राहतात. प्रत्येक लाइक आणि कमेंटला प्रत्युत्तर देण्याचं काम त्यांच्यासाठी एकमेकांची पाठ खाजवण्यासारखं होऊन बसतं.

आपल्या मुलांसह काश्मीरच्या सहलीला गेलेल्या जोडप्याला सततच फोटो-व्हिडीओंचं स्टेटस आणि रील्समध्ये रुपांतरण आपल्या मुलांच्या मदतीनं करायचं असतं. त्यामुळे स्वत:च्या डोळ्यांनी काश्मीर बघितलं जात नाही. त्या फोटो-व्हिडीओतून दाखवला जाणारा आनंद त्यांना खरोखरच मिळाला का, हा प्रश्न पडतो. यापुढे जाऊन सोशल मीडियावर त्यांचे फोटो, व्हिडीओ पाहणाऱ्यांना आपलं आयुष्य अगदीच निरस चाललं आहे, असं वाटून जातं. म्हणजे खोट्याकडून खोट्याकडे जाणारी मालिका आपण सुरू करतो. अनुभवापेक्षा अनुभवाचं प्रदर्शन अधिक आनंददायी आहे का, याचा विचार व्हायला हवा. आपल्या शब्दांत न सापडणारा अवर्णनीय असा क्षण वा उत्कट असा अनुभव कॅमेऱ्यात खऱ्या अर्थानं कैद होत नाही, तरीसुद्धा त्याचं प्रतिरूप म्हणून सौंदर्यानुभवाच्या एखाद्या शिखरावर ते तसं करणं आणि त्याउलट सदैव आपल्या डोळ्यांसमोर मोबाइलच्या स्क्रीनची भिंत उभी करणं हे निराळं आहे.

हेही वाचा – स्त्री हिंसाचारमुक्त कधी होईल?

इतरांनी अपलोड केलेला फोटो किंवा व्हिडीओ, हा केवळ त्यांच्या आयुष्यातला एक तुकडा असतो, हे बहुतेकांच्या ध्यानातून निसटतं. त्यातून असूया आणि हेव्याच्या लहरी निर्माण होत राहतात. सतत व्हर्च्युअल जगात रमणाऱ्यांना वास्तव जगातील नातेसंबंध जपण्यासाठी काय करायचं असतं हे कळेनासं झालं आहे. विशेषत: पौगंडावस्थेतल्या मुलामुलींना आपले नातेवाईक आणि समाजातल्या इतर सदस्यांशीही संवाद साधणं जमत नाही. त्यामुळे सामाजिक समायोजन (सोशल अ‍ॅडजेस्टमेंट) अवघड होऊन बसतं. कुटुंबातला प्रत्येक सदस्य स्वत:ची ‘डिजिटल स्पेस’ राखण्याच्या प्रयत्नांत स्वतंत्र बेट होऊन जातो. व्हर्च्युअल गटाचा भाग असणं आणि कुटुंब या सामाजिक घटकातून दुरावत जाणं, हे एकाच वेळी घडताना दिसतं.

सतत ऑनलाइन राहण्याची प्रत्येकाला वाटणारी निकड वास्तव जगातल्या माणसांमधल्या संवादासाठीचा प्रमुख अडथळा होऊन बसला आहे. वृद्ध, एकाकी माणसांची वाढणारी लोकसंख्या आणि त्यांच्याबरोबरच्या संवादासाठी उपलब्ध नसणारी माणसं, हे आपल्या घराघरांतलं चित्र आहे. रात्रीच्या वेळी एकाच खोलीत झोपणारे लोक झोप येईपर्यंत एकमेकांपेक्षा दुसऱ्या कुणाशी तरी चॅटिंग करणं वा समाजमाध्यमांवर सक्रिय राहणं पसंत करतात. आपल्या भोवतालाशी जोडलं जाण्याची संधी गमावणाऱ्यांना आपण नक्की कोणत्या आनंदाला पारखे होत आहोत याची पुरेपूर कल्पना येत नाहीये, कारण व्हर्च्युअल जगात मिळणाऱ्या आनंदाला आपण खराखुरा आनंद मानू लागलो आहोत.

वास्तव अनुभवातले बारकावे आणि अस्सलपणा याची जाणीव नसल्यानं व्हर्च्युअल जगातला अनुभव पुरेसा पडू लागला असावा. त्यामुळे नक्की काय गमावतोय हेच कळत आहे की नाही, हा आजचा प्रश्न आहे. व्हर्च्युअल जगात रमणाऱ्यांचं तुटत जाणं आजूबाजूच्या माणसांबरोबरचं तुटणं आहे, तसंच ते परिसरातली झाडं, पशुपक्षी यांच्यापासूनसुद्धा दुरावणं आहे. रांगेत उभी असणारी, डॉक्टरकडे आपल्या नंबरची वाट पाहणारी, एकत्र प्रवास करणारी, झाडाखाली वा बागेत बसणारी माणसं मोबाइलमध्ये डोकं घालून बसतात, तेव्हा करायला काही नाही म्हणून आपण आपलं मन रिझवतोय, असं त्यांना वाटत असतं. ओट्यावर, चावडीवर, कट्ट्यावर मस्त गप्पा मारत, सुख-दु:खांच्या गोष्टी करत बसणारे मित्र आता मित्रांकडे बघण्याएवजी स्क्रीन बघत राहतात, आजूबाजूच्या वातावरणाचा, झाडाझुडपांच्या स्पर्श-गंधाच्या संवेदनांना नकार देतात. परिसरातली झाडं, पक्षी, मुक्या जनावरांपासूनसुद्धा दूर जातात. कोणत्याही झाडाचं, प्राण्या-पक्ष्याचं फेसबुक अकाऊंट वा इन्स्टाग्राम प्रोफाईल नसतं, चॅटिंगचं कोणतंही अ‍ॅप ते वापरत नाहीत. त्यांच्याशी- मानवेतरांशी असणारा जिवंत संपर्क आपण विनापर्याय संपवत आणू लागलो आहोत का?

अस्तित्वाच्या समग्राशी डोळा न भिडवणं आपल्याला महागात पडू शकतं हे समजून घ्यायला हवं. आपल्याला सतत ऑनलाइन ठेवणारी नेटवर्किंग अ‍ॅप्स, गेम्स, ओटीटी कंपन्यांची स्पर्धा एकमेकांशी नाही तर आपल्या झोपेशी आणि आपल्या वास्तव जगातल्या नातेसंबंधांशी आहे. त्यांनी उपलब्ध करून दिलेले पर्याय आपल्याला खरे वाटू लागले असतील, तर आपल्या आकलनात काही तरी अपुरेपण आहे हे नक्की!

हेही वाचा – शोध आठवणीतल्या चवींचा! : खांडोळीची भाजी ते घुळणा!

‘डिजिटल डिटॉक्स’ची, अभासी जगापासून दूर राहण्याची गरज पूर्वी कधीच वाटली नव्हती इतक्या प्रकर्षांनं आता वाटते आहे. सतत ऑनलाइन राहण्याची आणि त्याबद्दल विचार करण्याची सवय माणसांच्या दैनंदिन व्यवहारावर, कार्यालयीन कामकाज वा शाळा-कॉलेजमधील अभ्यासावर परिणाम करते आहे. चिकाटीनं आणि दीर्घकाळ एखादी कृती करण्याची क्षमता कमी होते आहे. चित्ताची स्थिरता, जी कोणत्याही चिरंतन कृतीसाठी अत्यावश्यक असते, ती लुप्त होण्याचा धोका संभवतो. आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करणारी माणसं आपल्या छंद आणि कलांपासून तर कोसो दूर चालली आहेत. त्यामुळे कल्पनाशक्ती आणि सर्जकतेचा ऱ्हास होतो आहे हे सार्वत्रिकपणे अनुभवाला येतं आहे. मात्र त्यासाठी आपण काही करणार नसू तर आपण माणूस म्हणून आपल्या स्वातंत्र्याशी तडजोड केल्यासारखं आहे. कारण व्हर्च्युअल जगानं दिलेलं निवडीचं स्वातंत्र्य हा एक भूलभुलय्या आहे. ऑनलाइन राहण्याच्या ध्यास आणि अतिरेकानं जवळपास हरेक वयोगट बाधित झाला आहे. निरुद्देश बघेपण आपण स्वीकारलं आहे, ती आपली नैतिक निवड असेल तर हे बघेपण निष्क्रिय अशा सर्जन-ऱ्हासाकडे घेऊन जाणार, हे नक्की आहे. माणसाच्या समाजशीलतेची शंभर टक्के गरज व्हर्च्युअल वावरातून भागू शकत नाही, याचं भान राखून केलेला वापर आपल्याला विवेकशील सहअस्तित्वाकडे घेऊन जाईल. अन्यथा आपण फक्त ग्राहकरूपी उरू, जे आपल्या इच्छाआकांक्षाचे मालक असल्याच्या भ्रमात असतात!

vaishalispatange@gmail.com

Story img Loader