आताचा काळ हा विलक्षण वेगाने संक्रमण घडवणारा आहे. पुरुष वर्ग गोंधळलेला आहे. आधुनिकता तर स्वीकारायची आहे, पण परंपरा-संस्कार कसे सोडायचे? आणि त्यातून तयार झालेल्या वृत्तीचं काय करायचं, हा पुरुष वर्गांसमोर पडलेला प्रश्न आहे. त्यांचा स्त्रीकडे पाहायचा दृष्टिकोन परंपरा की नवता या कोंडीत सापडला आहे. म्हणूनच पुरुषांच्या मानसिकतेचाही विचार करायला हवा. का वागतात पुरुष असे? काय आहे त्या मागची उत्क्रांतीवादी मानसिकता? आणि त्याचमुळे पुरुषांचीही कशी होतेय कोंडी, हे सांगणारं हे सदर दर पंधरवडय़ाने.
तत्पूर्वी दुय्यम भूमिकेत असलेली स्त्री पन्नाशीच्या दशकात मोठय़ा प्रमाणावर शिकू लागली. मी जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला (वाणिज्य शाखेत) तेव्हा आमच्या वर्गात ऐंशी मुली आणि बावीस मुले अशी परिस्थिती होती. पण पदवी मिळण्याआधीच आठ-दहा मुलींची लग्नसुद्धा झाली. त्या वेळी ‘महाविद्यालय म्हणजे मुली लग्न जमेपर्यंत थांबायची वेटिंग रूम’ समजत. या विषयावर वाद-विवाद स्पर्धाही झाल्याचे आठवते. पदवी मिळाल्यावर बहुतेक सगळी मुले उच्च शिक्षणाकडे वळली. अनेक मुलींनी मात्र बँक, एल.आय.सी., पोस्ट, शाळा अशा ठिकाणी मिळेल तिथे नोकरी करायला सुरुवात केली. त्या नोकऱ्या होत्या. कर्तृत्वाला वाव मिळावा, करिअर घडावे, असा विचार करून पुढे जाणाऱ्या फारच थोडय़ा होत्या. पत्नीचा पगार आणि कामाचे तास हे पतीपेक्षा कमी असावेत आणि ती सुपर वुमन असावी, या विचारांचे गाडे बराच काळ चालू होते आणि अजूनही आहे. त्यानंतर मात्र परिस्थिती बदलली. स्त्रियांनी करिअर करायचे मनात घेतले आणि प्रमोशन, बदलीची तयारी, स्वत:चा आत्मसन्मान असावा असे त्यांना वाटू लागले. आणि इथेच गडबड सुरू झाली.. आणि ती आत्तापर्यंत चालूच आहे..
  याच काळात त्या आपल्यापेक्षा बुद्धीने, कर्तृत्वाने कमी असतात, अशी धारणा असलेला पुरुषवर्ग थोडासा दुखावला गेला. एका बाजूला स्त्रिया अधिकाधिक क्षेत्रात कर्तृत्व दाखवत होत्या आणि पुरुषांशी स्पर्धा करीत होत्या. या स्पध्रेत अनेकदा त्या पुरुषांना मागे टाकू लागल्या. आणि पुरुषी अहं डोकं वर काढू लागला. भारताची पंतप्रधान स्त्री असली तरी चालेल पण महिला बॉसच्या हाताखाली काम करणे अपमानास्पद वाटू लागले. पुरुषी अहंकाराला ती मोठी ठेचच होती. मास्तरीण, बँक किंवा सरकारी कर्मचारी इतपतच स्त्रियांनी  जावे असे बहुसंख्य पुरुषांचे मत होते. पण आयएएस, आयपीएस, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान अशा प्रांतांत त्या यशस्वी कामगिरी करू लागल्यानंतर मात्र पुरुष मंडळी असुरक्षितेची भावना अनुभवायला लागली. संशोधन उद्योग-व्यवसाय, राजकारण, सत्ताकारण या सर्वच क्षेत्रांत त्या पुढे जाऊ लागल्या. त्या पुढे जात आहेत म्हणजे आपली संधी हिरावून घेत आहेत, असा त्यांचा ग्रह होऊ लागला. एका बाजूला बेरोजगारीची समस्या होतीच.  स्त्री कर्मचारी अनेकदा पुरुष कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक असल्याचे अनेक पाहण्यांतून आढळून आले आहे. त्यामानाने मध्यमवर्गीय पुरुष थोडासा बेफिकीर, थोडासा कामे ढकलणारा असतो, असेही पाहणीत दिसले आणि त्याचे प्रतििबब स्त्रियांना अनेक संधी मिळण्यात झाले. त्यातच सरकार स्त्रियांना सक्षम बनवण्यासाठी कायदे करीत होते. या कायद्यांमुळे काही पुरुषांना आपल्या हजारो वर्षांच्या हक्कांवर अतिक्रमण होते आहे, असे वाटू लागले आणि त्याचे पडसाद घराघरांत उमटू लागले.
उमेश आणि ऊर्मिला कॉलेजमध्ये एकमेकांच्या प्रेमात पडले. पदवीधर झाल्यावर दोघांनाही वेगवेगळ्या बँकेत नोकऱ्या लागल्या. उमेश वयाने मोठा असल्याने तो दोन वर्षे तिच्या आधी नोकरीला लागला होता. पण त्याने ती नोकरी हे उत्पन्नाचे एक साधन इतकेच मानले. त्याला कुठलेही छंद नव्हते की महत्त्वाकांक्षा नव्हत्या. बँकेत कर्मचाऱ्यांना अल्प दरात कर्ज मिळते म्हणून स्वत:चे घर झाले. कर्ज मिळते म्हणून वाहन झाले, कर्ज मिळते म्हणून घर सजले. त्याला नोकरी ही केवळ उरकायची गोष्ट होती. सिगरेटी फुंकत टाइमपास करणे, मित्रांबरोबर शनिवारी ओली पार्टी करणे हीच त्याची जीवनशैली. खाओ-पियो और आराम करो. याउलट ऊर्मिला. जबरदस्त महत्त्वाकांक्षी. तिने उमेशला सुचवले की आपण दोघे अभ्यास करू, प्रमोशन घेऊ. तो म्हणाला, ‘काहीतरीच काय बोलतेस. प्रमोशन म्हणजे जबाबदारी आली. बदल्या आल्या.’ पण ती ठाम होती. तिने परीक्षा दिल्या आणि मुलगा दहावी झाल्यानंतर प्रमोशन घेतले. तिची विदर्भात एका छोटय़ा शाखेची व्यवस्थापक म्हणून बदली झाली. आणि तिथेच दोघांच्या वादाला तोंड फुटले. मुलाची जबाबदारी कुणावर? ती म्हणाली, त्याला होस्टेलमध्ये राहू देत. तो म्हणाला, ‘पण माझे कसे होणार?’ ती म्हणाली,‘ हा काय प्रश्न झाला? तुझे तुला करणे काहीच अवघड नाही.’ शेवटी तिने खंबीर भूमिका घेतली आणि तो पुण्यातच एकटा राहू लागला. कधी काम करायची सवय नाही त्यामुळे घरी त्रास. हितचिंतक म्हणायचे, ‘ती किती प्रगती करीत आहे, नाहीतर तू.’ तो थोडासा डिवचला गेला. स्वत: काही करण्याऐवजी तिच्यावरच राग धरला. पत्नीने पतीची आणि मुलांची काळजी घेणे हे प्रथम. बाकी सगळे नंतर, हे त्याचे मत होते. या मताला उमेशच्या आईचा दुजोरा असायचा. उमेशनेच लीगल सेपरेशन मिळवले. उमेश आपल्या धारणेला पक्का होता. ऊर्मिला तिच्या धारणेला धरून होती. घर, नवरा, मुलगा म्हणजे सबंध आयुष्य नव्हे तर स्वत:च्या सर्व क्षमतांचा संपूर्ण वापर करणे तिला कर्तव्य वाटत असे.
  कष्टकरी समाजातही परिस्थिती वेगळीच आहे. नवरा-बायको दोघेही कमावतात. परंतु नवऱ्याला मौज करायला, त्या त्यांचे पसे द्यायला नकार देतात. कित्येक घरकाम करणाऱ्या महिला आपला पगार मालकीणबाईंकडेच ठेवतात किंवा बचत गटात सहभागी होतात. त्याचे वाईट परिणामही भोगावे लागतात. पतीने शिवीगाळ करणे, मारहाण करणे या गोष्टी घडत असल्या तरी त्या स्वत:चे पसे मुलांसाठी बाळगून असतात. आम्ही ज्या झोपडपट्टीत काम करतो तिथल्या महिला गेल्या चार-पाच वर्षांत संघटित झाल्या आहेत आणि शारीरिक िहसा होताना त्या प्रतिकारही करू लागल्या आहेत. कमी शिक्षण झालेल्या पुरुषांना ह्य़ा स्त्री-पुरुष समानता वगरे झेपण्यापलीकडच्या गोष्टी आहेत.
अलीकडील कायदे, विशेषकरून महिला कर्मचाऱ्यांचा छळ या कायद्याची धास्तीच पुरुष बॉस मंडळींनी घेतली आहे. नुकतीच घडलेली एक घटना. एका बॉसने त्याच्या कनिष्ठ महिला अधिकारीला एक महत्त्वाचे प्रेझेन्टेशन पूर्ण करूनच घरी जा. दुसऱ्या दिवशी ते संचालक मंडळींना दाखवायचे आहे असे स्पष्ट सांगितले. त्या महिलेच्या घरी पाहुणे येणार होते, म्हणून कार्यालयाची वेळ संपताच बॉसला काहीही न सांगता ती निघून गेली. त्यामुळे रात्री बारा वाजेपर्यंत कार्यालयात बसून त्यानेच ते प्रेझेन्टेशन पूर्ण केले. तिच्या बेजबाबदार वागण्याची तिला जाणीव करून देणे आवश्यक होते. पण त्याला ती कशा प्रकारे प्रतिसाद देईल याची खात्री नव्हती. केबिनमध्ये बोलावून कानउघाडणी केली आणि तिने जोरात रडायला सुरुवात केली तर, हा प्रश्न होता. समजा, सगळ्यांसमोर बोलले तर लोकांसमोर माझी नाचक्की केली, असा उलटाच आरोप केला तर? शेवटी त्याने मौन पाळणेच स्वीकारले. गांगुली, तेजपाल प्रकरणांपासून अधिकारी पुरुष वर्गांत एक अनामिक भीती आहे. अनेक कार्यालयांत प्रत्येक केबिनमध्ये सीसी कॅमेरे बसवले जात आहेत, सहकारी कर्मचाऱ्यांची सलगी किती ठेवायची याची भीती आहे.
अशा सगळ्या परिस्थितीमुळे समकालीन पुरुषांची कोंडी होत आहे. हल्ली तर लग्नाच्या मुली प्रत्येक कामं ंअर्धे-अर्धे करायला तयार असलेल्या मुलाला होकार देणे पसंत करतात. मुले ‘बिचारी’ आत्ता तर हो म्हणूया पुढचे पुढे असे मनाला सांगत लग्न करतात. आणि जेव्हा त्याच्या लक्षात येते ५०-५० म्हणजे भलतेच प्रकरण आहे तेव्हा त्यांची तारांबळ उडते. त्यांना स्वयंपाक शिकावा लागतो, कपडे धुवावे लागतात, बाजारहाट करावी लागते. सुरुवातीला करतात पण मग हे कायमचे करणे शक्य नाही याची त्यांना जाणीव होते आणि वादांना सुरुवात होते. लग्नाच्या पहिल्या एक-दोन वर्षांत घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्याचं हेही एक कारण.
आताचा काळ हा विलक्षण वेगाने संक्रमण घडवणारा आहे. आणि अशा काळात काही जणांवर काही काळ थोडाफार अन्याय होऊ शकतो. म्हणूनच आपण कोणालाही कोणतेही लेबल न लावता वस्तुस्थितीचे भान ठेवत, एकमेकांवर आरोप न करता ही कोंडी समजुतीने उकलण्याचा प्रयत्न करूया. कदाचित २०१४ चा हा उत्तम संकल्प ठरेल!     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा