चित्रा पालेकर
पुरुषांच्या विवाहबाह्य संबंधांविषयी अनेक चित्रपट आहेत, मात्र एका कुटुंबवत्सल स्त्रीला तिचं स्वत्व सापडण्यासाठी कुणा परपुरुषाच्या प्रेमात पडावं लागणं आणि त्याचे अपेक्षित भयंकर परिणाम सहन करत असतानाही त्याला शरण न जाता स्त्रीनं स्वत:साठी ठामपणे उभं राहणं हे विरळाच. ती ‘परमा’ चितारताना अपर्णा सेन यांनी केलेलं धाडस प्रेक्षकांना अनेक स्तरांवर विचार करायला लावणारं आहे. राखी यांचा सर्वागसुंदर अभिनय आणि अपर्णा सेन यांच्या कॅमेरा-लेखणीची ही किमया पाहावी अशीच.
छायाचित्रकाराच्या ‘कॅमेरा-लेन्स’मधून दिसणाऱ्या दुर्गामातेच्या ‘क्लोजअप’पासून ‘परमा’ चित्रपट सुरू होतो आणि कोलकात्यातल्या एका सुखवस्तू कुटुंबाच्या मोठय़ा वाडय़ात एक तरुण छायाचित्रकार दुर्गापूजा उत्सवाचे फोटो काढत असल्याचं आपण पाहतो. पूजेची तयारी करता करता बायका, कुटुंबातली छोटी सून परमाच्या मायाळू स्वभावाविषयी कौतुकानं बोलतात. मंडपात पुरुषांशी गप्पा मारत बसलेला परमाचा नवरा, आपल्या पुतण्याचा बालपणीचा मित्र आणि आता आंतरराष्ट्रीय कीर्तीचा छायाचित्रकार असलेल्या राहुलविषयी आदरमिश्रित उत्सुकता दाखवतो. या सर्व गजबजाटात फोटो काढताना, कॅमेऱ्याच्या लेन्समधून अचानक ‘परमा’चा अत्यंत सुंदर, संवेदनशील चेहरा ‘क्लोजअप’मध्ये दिसल्यावर राहुल थक्क होतो आणि मग, स्वत:च्या सौंदर्याची अजिबात जाणीव नसलेल्या, कामं करत शांतपणे वावरणाऱ्या परमाच्या नकळत तिचे आणखी फोटो काढतो. या पहिल्याच ‘सीन’मध्ये दिग्दर्शिका अपर्णा सेन चित्रपटाचा ‘टोन’ निश्चित करते. यात ती आपल्याला तिन्ही प्रमुख पात्रांची ओळख करून देते. त्या ‘त्रिकोणी’ कथेत पुढे ‘काय’ घडू शकतं, हे सूचित करते. आणि चित्रपटाचा आशय ‘दृश्य स्वरूपाच्या तपशिलां’तून व्यक्त करण्यास मोकळी होते.
अपर्णा सेन यांना जगभरातले सिनेरसिक मुख्यत: सत्यजित रायच्या ‘तीन कन्यां’पैकी एक असलेली बंगाली अभिनेत्री म्हणून दोन दशकं ओळखत होते. १९८० मध्ये ‘३६ चौरंगी लेन’ या इंग्रजी चित्रपटानं ती ओळख पार बदलून टाकली. स्वत: दिग्दर्शित केलेल्या या पहिल्याच चित्रपटात आपण केवळ अभिनेत्री नसून पटकथालेखन आणि दिग्दर्शनही अतिशय समर्थपणे करू शकतो, हे अपर्णा सेननी सिद्ध केलं. आणि त्यानंतर पाच वर्षांनी, राखी गुलजारना घेऊन दिग्दर्शित केलेल्या ‘परमा’ या दुसऱ्या चित्रपटात त्या कित्येक पावलं पुढे गेल्या. त्यांच्या बहुतेक चित्रपटांत मध्यवर्ती पात्र एखादी स्त्री असून संपूर्ण चित्रपट त्या स्त्रीच्या आयुष्यातल्या घटनांभोवती फिरतो. चित्रपटाची लय त्या स्त्रीच्या भावनिक चढउतारांच्या अनुषंगानं निश्चित केलेली असते. ‘३६ चौरंगी लेन’ची अँग्लो इंडियन नायिका व्हायोलेट मध्यम वयाची शाळा मास्तरीण आहे. बिनलग्नाची, साधंसुधं एकाकी जीवन जगणारी. चित्रपटाची लय नायिकेच्या आयुष्याप्रमाणेच संथ आहे. त्यात ‘नाटय़पूर्ण’ घटनांची रेलचेल नाही. मात्र व्हायोलेटचा एकटेपणा तो अत्यंत तरलतेनं पोहोचवतो. ‘परमा’ हा बंगाली चित्रपट नेमका याच्या उलट आहे. अनेक पात्रांनी, तणावपूर्ण घटनांनी गजबजलेला. ‘बोल्ड’ आणि ‘कॉम्प्लेक्स’! चित्रपटाची नायिका परमा हिच्या गुंतागुंतीच्या भावनांप्रमाणेच! पहिल्या हृदयस्पर्शी चित्रपटाच्या यशानंतर दुसरा चित्रपट ‘विवाहबाह्य संबंधां’सारखा वादग्रस्त विषय घेऊन, प्रेक्षकाला अनेक स्तरांवर विचार करायला लावणारा बनवावा.. आणि तेही १९८५ मध्ये, याला काय म्हणावं?
‘परमा’- बंगाली उच्चार ‘पोरोमा’- या शब्दाचा अर्थ थोर किंवा आदर्श स्त्री. चित्रपटाच्या सुरुवातीला राखी गुलजारनं अभिनित केलेली देखणी, कुटुंबवत्सल नायिका आपल्या परमा या नावाप्रमाणेच ‘आदर्श गृहिणी’ आहे. मोठय़ा एकत्र कुटुंबात पत्नी, आई, सून, वहिनी, नोकरांची मालकीण, अशा अनेक भूमिका एकाच वेळी हसतमुखानं निभावताना तिला स्वत:साठी एका क्षणाचीही फुरसत मिळत नाही. किंबहुना, ती मिळावी, असा विचारही तिच्या मनाला शिवत नाही. चोवीस तास कुटुंबीयांच्या मागण्या पुरवण्यातच तिला आनंद वाटतो. आणि एक दिवस, ‘भद्र’ लोकांच्या या बंगाली कुटुंबात, स्वच्छंदी, मुक्त जीवन जगणारा राहुल प्रवेश करतो. प्रसिद्ध ‘लाइफ’ मासिकासाठी भारतीय गृहिणीच्या दैनंदिन जीवनाचे फोटो काढण्याच्या कामानिमित्त तो कोलकातामध्ये आला आहे. वर्षभरापूर्वी कॅमेऱ्यातून दिसलेला परमाचा चेहरा अजून त्याच्या स्मरणात असल्यामुळे, तिलाच मॉडेल म्हणून घेण्याचं तो ठरवतो.
‘फोटोसेशन्स’च्या निमित्तानं घडलेल्या राहुलच्या सहवासात, आपलं ‘घर आणि कुटुंब’ या संकुचित जगाबाहेरचं विशाल विश्व परमाच्या दृष्टीस पडतं. सांसारिक जबाबदाऱ्यांखाली दबून गेलेल्या बालपणीच्या आवडी पुन्हा मनात उगवतात. हळूहळू स्वत्व जागं होतं. आणि त्याचबरोबर, पुरुषसत्ताक समाजाचे नीतिनियम झुगारून जगण्यातलं ‘थ्रिल’ आणि आनंदही ती अनुभवते. तसं पाहिल्यास विवाहित स्त्रीची परपुरुषाशी जवळीक झाल्यास त्यातून ज्या ज्या गोष्टी- आकर्षण, शारीरिक संबंध, मानसिक आणि कौटुंबिक समस्या, इत्यादी उपजतात हे समाज गृहीत धरतो, त्या सर्व ‘क्लिशे’ घटना ‘परमा’त घडतात. तरीही हा चित्रपट मला उत्कृष्ट का वाटतो? याचं उत्तर त्यातला दृष्टिकोन आणि त्याची ‘सिनेमॅटिक ट्रीटमेंट’.
पुरुषांच्या विवाहबाह्य संबंधांवर भारतात अनेक चित्रपट आजवर बनले आहेत. नवऱ्याच्या व्यभिचारामुळे घरसंसार सोडून जाणारी स्त्रीदेखील प्रगतशील दिग्दर्शकांनी रंगवली आहे. पण जवळपास ४० वर्षांपूर्वी मध्यमवर्गीय, घरंदाज गृहिणीच्या विवाहबाह्य संबंधांवर चित्रपट जवळजवळ नव्हते. तिला ‘स्वत:च्या प्रेमप्रकरणा’मधून झालेली आपल्या अस्तित्वाची जाणीव कुणी दर्शवली नव्हती. ओलेत्या स्त्रीदेहावरून पुरुषांच्या ‘नयनसुखा’साठी कॅमेरा फिरवणं नवं नव्हतं, पण स्त्रीची सेक्शुअॅलिटी, लैंगिक इच्छा हे विषय मात्र ‘टॅबू’ होते. मग स्त्रीला त्यातून मिळणारा आनंद न संकोचता, मुक्तपणे पडद्यावर दाखवण्याचा तर प्रश्नच नव्हता! हे धाडस अपर्णा सेननी त्या काळी ‘परमा’त केलं. ‘स्त्री ही केवळ नवऱ्याची, किंबहुना कुठल्याही पुरुषाची लैंगिक गरज भागवणारी ‘वस्तू’ नसून स्वत:च्या लैंगिक इच्छा असलेली ‘माणूस’ आहे; तिलाही लैंगिक सुखाचा हक्क आहे,’ हे परमा आणि राहुलच्या शृंगारिक दृश्यांमधून त्यांनी अधोरेखित केलं आणि ते करताना आपल्या चित्रपटातल्या ‘भारतीय नारी’च्या प्रतिमेला तडे पोहोचवले.
‘परमा’संबंधीची आणखी एक स्तुत्य गोष्ट म्हणजे त्यातल्या गंभीर विषयाची खेळकर हाताळणी! चित्रपटाच्या सुरुवातीला परमाच्या नातेवाईकांचं तिच्याशिवाय पान हलत नाही, हे दाखवताना दिग्दर्शिका लांबलचक दृश्यांऐवजी एका ‘मोन्ताज’चा वापर करते. त्या ‘मोन्ताज’मधून नातलगांच्या सतत मागण्यांमधला स्वार्थ मजेशीरपणे सुचवते. त्याचप्रमाणे एका प्रसंगी परमाचा नवरा तिच्याबरोबर रात्री संभोग करताना स्वत:च्या बिझनेससाठी जपानी कंपनीचं कंत्राट मिळवण्यासंबंधी बोलत राहतो. त्या एका शॉटमधून दिग्दर्शिका, नवऱ्याची असंवेदनशीलता, तसंच नवरा-बायकोमधलं नातं, हे दोन्ही अतिशय मिश्कीलपणे प्रस्थापित करते.
चित्रपट माध्यमातल्या विविध घटकांचा अचूक उपयोग करून कमीत कमी ‘फूटेज’मध्ये जास्तीत जास्त गोष्टी व्यक्त करण्यात अपर्णा सेन यांचा हातखंडा आहे. पटकथा त्यांनी स्वत:च लिहिली असून त्यात राहुलला छायाचित्रकार बनवणं, हा खरोखर ‘मास्टर स्ट्रोक’ आहे. त्यामुळे कथानक सहजपणे दृकस्वरूपात पुढे सरकतं. शिवाय ‘मूव्ही-कॅमेरा’ आणि त्यातल्या पात्राचा ‘स्टिल-कॅमेरा’ अशा दोन कॅमेऱ्यांचा वापर करत, स्वत:चा आणि पात्राचा असे दोन्ही दृष्टिकोन दिग्दर्शिका दाखवू शकते. ‘स्टिल-कॅमेऱ्या’तून पाहणारा राहुल आणि त्यातून ‘त्याला दिसत असलेला परमाचा क्लोजअप’ हे दोन्ही शॉट्स जेव्हा आपण एकामागोमाग एक पडद्यावर पाहतो, तेव्हा राहुल त्या चेहऱ्याकडे आकर्षित का झाला आहे, हे आपल्याला शब्दांशिवाय तात्काळ समजतं. फोटोशूटची सुरुवात झाल्यावर, राहुलनं काढलेल्या ‘क्लोजअप्स’मधून त्याला आणि आपल्यालाही, त्या सुंदर चेहऱ्यामागे लपलेला परमाचा बुजरा आणि आत्मविश्वास गमावलेला चेहरा दिसतो. राहुल ‘सेलिब्रिटी’ असल्यामुळे आणि त्यानं काढलेले देशोदेशीचे फोटो पाहिल्यामुळे प्रभावित झालेलं कुटुंब परमाचे फोटो काढण्यासाठी त्याला लगेच परवानगी देतं. पण युद्धाच्या धुमश्चक्रीचे आणि क्रांतीच्या धोकादायक वातावरणाचे ते फोटो, राहुलचा धाडसी स्वभाव आणि लौकिक ज्याप्रमाणे सिद्ध करतात, त्याचप्रमाणे छायाचित्रांच्या निमित्तानं परमाच्या आयुष्यात शिरकाव झालेल्या धोक्याचीही सूचना देतात. फोटोशूटसाठी पहिल्यांदा बाहेर पडल्यावर राहुल परमाला एका अर्धवट बांधकाम झालेल्या उंच पुलापाशी नेतो. तिथल्या तुटक्या जिन्यावरून वर चढण्याची अत्यंत भीती वाटत असूनही, आपण दिलेला शब्द पाळण्यासाठी परमा तो धोका पत्करते. आणि वर पोहोचल्यानंतर अनपेक्षितपणे ३६० अंशातलं दूर क्षितिजापर्यंतचं अफाट जग पाहून प्रचंड मोहरून जाते.. तृप्त होते. हे दृश्य जणू काही तिच्या प्रेमप्रकरणाचं रूपक आहे. आपल्या तोवरच्या आयुष्यात दबून गेलेल्या मनाला, शरीराला सुखकर वाटणाऱ्या जाणिवा जागृत झाल्यावर आणि स्व-केंद्री नवऱ्याला त्यांची पर्वा नाही हे लक्षात आल्यावर, परमा आपल्याभोवतीचं सुरक्षिततेचं कवच उतरवते.. घर-संसाराला तडे जाण्याचा, स्वत:च्या नावाला बट्टा लागण्याचा धोका पत्करते.. तृप्तीच्या आकांक्षेनं स्वत:ला आणि समाजाला अमान्य अशा प्रेमप्रकरणात झोकून देते. सामाजिक चौकटीच्या बाहेरचं ‘केवळ स्त्री’ म्हणून असलेलं आपलं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करते. हॉटेलच्या खोलीतल्या चोरटय़ा प्रेमप्रकरणाच्या दृश्यात शृंगारातील उत्कटता आणि शरीरांच्या जवळिकीतून मिळणारा निर्भेळ आनंद या दोन्ही भावनांचा मिलाप दिग्दर्शिका इतक्या सुंदर रीतीनं करते, की त्या दृश्यांना अश्लीलतेचा अजिबात स्पर्श होत नाही. ती दृश्यं पाहताना परमाच्या नसानसांतून सळसळणारा आनंद आपल्यापर्यंत पोहोचतो. राहुलचं मिश्कील वागणंबोलणं परमासारखंच आपल्यालाही हसवतं. प्रियकरापासून ताटातूट होताना झालेली परमाची निराश अवस्था आपल्याला अस्वस्थ करते.
संपूर्ण चित्रपटात अपर्णा सेनच्या दिग्दर्शकीय कौशल्याला प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर अशोक मेहता यांच्या चित्रणाची साथ मिळाल्यानं तो अतिशय प्रेक्षणीय झाला आहे, यात शंका नाही. पण त्याइतकाच महत्त्वाचा घटक आहे, राखी गुलजारांचा अप्रतिम अभिनय. घरंदाज, एकत्र कुटुंबातल्या सुनेपासून ते प्रियकराच्या मिठीतल्या प्रियेपर्यंत परमाची सर्व रूपं त्या अक्षरश: जगतात. राहुलबरोबर पावसात रस्त्यावरून चालताना सँडल तुटल्यावर परमा ज्या बेफिकिरीनं पायातल्या दोन्ही सँडल काढून भिरकावते आणि अनवाणीच पुन्हा चालायला लागते, तेव्हा तिच्या सर्वागातून ‘मुक्त’ झाल्याचा आनंद ओसंडताना दिसतो आणि तो साधा शॉट माझ्यासाठी अविस्मरणीय बनतो. परमाला राहुलसमोर सुरुवातीला जाणवणारा संकोच, मैत्रिणींच्या पार्टीत वाटणारा न्यूनगंड, स्वत:चा तोल प्रथम जातो तेव्हा नवऱ्याच्या मदतीसाठी फोनवरून तिनं केलेला आक्रोश, राहुलच्या सहवासातलं तिचं खळखळून हसणं आणि नवऱ्याने ‘व्होर’ अशी शिवी दिल्यावर उद्ध्वस्त होणं, असे राखी गुलजारांच्या चेहऱ्यावर उमटणारे अगणित भाव आणि त्यांच्या सूक्ष्म छटा पाहिल्यानंतर विसरणं अशक्य होतं.
या चित्रपटात टाळीची, अलंकारिक वाक्यं नाहीत. तो मुख्यत: ‘व्हिज्युअल्स’मधून पोहोचतो. तरी त्यातले काही संवाद खूप महत्त्वाचे आणि विचार करायला लावणारे आहेत. प्रेमप्रकरण सुरू असताना परमा तिच्या घटस्फोट घेऊन स्वतंत्र राहणाऱ्या मैत्रिणीला, शीलाला विचारते, ‘‘ते पाप आहे का?’’ शीला उत्तर देते, ‘‘माझे विचार इतरांसारखे नाहीत. त्यामुळे मला ते पाप वाटत नाही. शिवाय, कुठलीही व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीची मालमत्ता असूच शकत नाही.’’ पण याचबरोबर ‘‘अशा प्रकरणात माणसं दुखावली जातात,’’ याकडे परमाचं लक्ष वेधून ‘‘तूही राहुलवर हक्क सांगू शकत नाहीस,’’ असं समजावते. आणि पुढे, परमा केवळ लैंगिक स्वातंत्र्यात न अडकता आर्थिकदृष्टय़ादेखील स्वतंत्र व्हावी यासाठी शीला सहाय्य करते.
राहुल निघून गेल्यावर कुटुंबात झालेल्या स्फोटात परमा होरपळून निघते, पण शरणागती पत्करत नाही. जीवन सर्वागानं, सर्वार्थानं अनुभवलेली परमा आपल्या आयुष्याची दोरी इतरांच्या हातात देणं नाकारते. अत्यंत शांतपणे, आत्मविश्वासानं स्वत:च्या भविष्याविषयीचे निर्णय स्वत: घेऊ लागते. परमाचं परिवर्तन दाखवताना नीती-अनीतीच्या पितृसत्ताक, दांभिक कल्पना लाथाडणारा, शिवाय सिनेमा म्हणूनही उत्कृष्ट असलेला हा चित्रपट माझ्यासाठी अतिशय परिपूर्ण असा अनुभव होता. चाळीस वर्षांपूर्वी आणि आता पुन्हा पाहतानाही!