डॉ. अंजली जोशी
आजच्या पिढीत घटस्फोट ही सामान्य गोष्ट झालीय, असं कितीही कुणी म्हटलं, तरी ज्या व्यक्तीचा घटस्फोट होतो, त्याच्या मनाला लागणारी टोचणी त्यालाच माहिती! त्यातही घटस्फोटित स्त्रियांना विचारले जाणारे खवचट प्रश्न, घरून त्वरित दुसरं लग्न करण्यासाठी येणारा दबाव, सततची आपण ओझं असल्याची जाणीव, हे पुरुषांना सहसा भोगावं लागत नाही. यातून मार्ग काढणं, मन पुन्हा स्थिर करणं अशक्य नाही.. पण जवळच्या मंडळींचा पाठिंबा आणि ‘तू लढ,’ असं म्हणून ऊर्जा देणारा स्वर मात्र हवा आहे..
‘‘श्वेता, तुझी घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे का?’’ त्यानं विचारलं. पुनर्विवाहाची चर्चा करायला आम्ही या कॅफेत आलो होतो. आईबाबा मागे लागले होते, की एकदा तरी भेट त्याला म्हणून! इथे आलेय खरी, पण याचं नावही धड आठवत नाही. श्रीराम की श्रीरंग? बहुतेक श्रीरंगच! मी श्रीरंगकडे निरखून पाहिलं. फ्रेंच कट दाढी, गहुवर्ण, उभा चेहरा, माझ्यावर रोखलेले भेदक डोळे!
हा शेखरसारखा दिसत नाही, पण दिसण्यावर काय आहे? वागण्यात त्याच्यासारखाच असला तर? ज्यात त्यात संशय घेणारा? तिला वाटलं, आपण शेखरला लग्नाआधी भेटायचो, तेव्हा कुठे मागमूस लागला होता तो संशयी असल्याचा? तो खोदून खोदून काहीबाही विचारत राहायचा आणि आपणही त्याला बावळटासारखे सर्व तपशील पुरवत बसायचो. तेव्हा कुठे माहीत होतं, की हा जरा संधी मिळाली की आपले मोबाइलवरचे सर्व मेसेजेस आणि पोस्ट्स चोरून वाचत बसतो ते! प्रत्येक ठिकाणी आणायला यायचा, तेव्हा मारे वाटायचं की किती प्रेम आहे याचं आपल्यावर! पण तो सतत पहारा ठेवायचा हे लक्षातही आलं नाही तेव्हा.
‘‘सॉरी, मी चुकीचा विषय काढला का?’’ श्रीरंग विचारत होता. मी भानावर आले.
‘‘अं.. तसं काही नाही. मला घटस्फोट मिळालाय.’’ मी गडबडीनं उत्तर दिलं.
‘‘मग हरकत नाही. बरं, तुझ्या नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा काय आहेत?’’ त्यानं विचारलं.
मी गारठले. अगदी असाच प्रश्न तीन वर्षांपूर्वी शेखरनं विचारला होता. तेव्हा कळलंच नव्हतं काय बोलायचं ते! वधू-वर सूचक मंडळाच्या फॉर्ममध्ये अपेक्षांच्या रकान्यात आपण लिहिलं होतं, वय, उंची, शिक्षण, आवडीनिवडी वगैरे. पण ते झाले सामाजिक मानदंड! खऱ्या अपेक्षा या आंतरिक असतात. त्या नेमक्या शब्दांत मांडताच येत नाहीत. तेव्हा वाटलं लग्नाचा पायाच मुळी एकमेकांवर विश्वास ठेवणं असतो. ते तर अध्याहृतच आहे ना? त्यात काय बोलून दाखवायचं? शेखरनं मात्र सतत अविश्वासच दाखवला. मला जवळचे मित्र आहेत म्हणजे त्यांच्याशी ‘अफेअर’आहे, असा संशयाचा किडा सतत त्याच्या डोक्यात वळवळत असायचा. मग स्पष्टीकरण मागत राहणं, त्यातून वादविवाद. ज्या सहजीवनाचा पायाच डळमळीत आहे, तिथे एकत्र राहून फायदा काय?
‘‘तुला कम्फर्टेबल नसेल तर आपण नंतर कधी भेटू या का?’’ श्रीरंगनं परत विचारलं.
‘‘चालेल.’’ मी पडत्या फळाची आज्ञा घेत निघाले.
तरी मी आईबाबांना सांगत होते, की एवढय़ात दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव नको. जखमा अजून ओल्या आहेत. घाव पुरते भरले नाहीत. दुसऱ्या कुणाकडे स्वच्छ मनानं अजून पाहता येत नाही. आपण माणसं ओळखण्यात कमी पडलो याचं शल्य टोचतंय. धास्ती वाटत राहते, की नवीन जोडीदार तसाच मिळाला तर? पण आईबाबांनी आग्रहच केला.
‘‘अजून किती वाट पाहायची? घटस्फोट आलाय ना हातात? उशीर केलास तर वय अजून वाढेल. एकदा काय ते आमच्या डोळय़ांसमोर लग्न होऊन जाऊ दे! आधीच दुसरं लग्न, म्हणजे निवडीचे पर्यायही कमी. तरी बरं, तुझी नोकरी चालू आहे आणि पदरात मूल नाही.’’
आईबाबांकडे मी आलेय खरी, पण हल्ली त्यांचं घर अनोळखी वाटतं. लग्नाआधी कसे लाड व्हायचे, हट्ट करता यायचे. लग्नानंतर पहिल्यांदा घरी आले, तेव्हा आईनं किती बडदास्त ठेवली होती, पण विभक्त झाल्यानंतरचं घरी येणं वेगळं असतं. वेगळं राहण्याचा निर्णय घेऊन घरी आले, तेव्हा थंडच स्वागत झालं. जवळच्या माणसांची नातीही लग्नाच्या तराजूतच तोलली जातात.
सुरुवातीला घरातल्या मंडळींकडून समजावण्याचे प्रयत्न झाले. ‘‘आम्हीही नाही का जुळवून घेतलं? हल्लीच्या मुली थोडीही तडजोड खपवून घेत नाहीत. एका हातानं टाळी वाजत नाही. तुझंही काही तरी चुकत असेल.’’ एक ना दोन! आजूबाजूचे लोक तडजोडीच्या नावाखाली ढकलतच असतात आपल्याला परत त्या वेदनांच्या खाईत. पण मी ठाम राहिले. शेखर मला डोळय़ांसमोरही नकोसा वाटत होता. शेवटी पिटिशन दाखल केली. मग वकील, कोर्ट, समुपदेशक, मध्यस्थ, जुळवण्याचे प्रयत्न, सगळं चालू झालं. या प्रवासात आपण खऱ्या अर्थानं एकटे असतो. दुसऱ्यांना नाही कळणार हे अनुभवणाऱ्यांच्या वेदना.
आईबाबांनी पाठिंबा दिला खरा, पण त्यामुळेच ते ओझं वाटतंय! पडती बाजू घ्यायला लागतेय. मी परत आल्यानंतर त्यांच्यावर एक जबाबदारी नव्यानं येऊन पडलीय याचं दडपण क्षणाक्षणाला जाणवत राहतं. आईबाबांचं एक साधं-सोपं गणित आहे. माझं लग्न झालं की त्यांची जबाबदारी संपली. लग्नाचा इतका वेदनादायी अनुभव स्वत:च्या मुलीच्या वाटय़ाला येऊनही ती लग्न करूनच परत सुखी होईल, हा त्यांचा अढळ विश्वास कशाच्या जोरावर टिकून आहे कोण जाणे! कालच बाबांनी विचारलं, ‘‘श्वेता, तुझे जे जवळचे मित्र आहेत, त्यातला कुणी अनुरूप वाटतोय का?’’
‘‘बाबा, मी त्यांना मित्र म्हणून पाहते. जोडीदार म्हणून नाही.’’ मी उत्तर दिलं, पण वाटलं, की हे मित्र लग्नाआधीही होते. पण तेव्हा आईबाबांनी हा प्रश्न विचारला नव्हता. तेव्हा आपल्याच जातीतला, संस्कृतीतला, आपली भाषा बोलणारा, अशा अटी होत्या. आता घटस्फोटांनंतर या अटी शिथिल झालेल्या दिसताहेत. ‘कुणीही चालेल, पण एकदाचं लवकरात लवकर लग्न कर,’ अशी घायकुती त्यांच्या बोलण्यात दिसते. मग मनावरचं दडपण आणखीनच वाढतं. पुढे काय, हा प्रश्न माझ्यापुढेही आ वासून उभा आहेच. जोडीदाराची उणीव भासत राहते. दीर्घकाळाच्या सहवासाची ओढ वाटते. जोडीदारासाठी लग्नसंस्थेला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात येतंय. म्हणून तर श्रीरंगची भेट घ्यावी लागली. बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावरच्या काकू भेटल्या. त्यांनी खवचटपणे विचारलंच, ‘‘बरेच दिवस मुक्काम दिसतोय इथे!’’
‘‘घटस्फोट घेतलाय मी!’’ आवाजावर नियंत्रण ठेवत मी उत्तर दिलं. त्या बघतच राहिल्या. इतक्या स्पष्टपणे सांगणारी स्त्री त्यांना भेटली नसावी. लोकांना दुसऱ्यांना टोचण्यात इतका आनंद कसा मिळतो? यांच्या भिशीच्या ग्रुपमध्ये मी इथे आल्याचा विषय केव्हाच चावून चोथा झाला असेल. दुसऱ्यांच्या वेदना यांना गॉसिपचा विषय कशा वाटू शकतात?
घरी आले, तर आतापर्यंत वरून बाल्कनीतून बघणाऱ्या आईनं हटकलंच- ‘‘काय गं, काय विचारत होत्या त्या?’’
‘‘मी एवढे दिवस इथे का, असा गहन प्रश्न पडला होता त्यांना. मी सांगून टाकलं स्पष्टपणे! जे घडलंय ते का लपवायचं? मग लपवण्याचा ताण येतो. कशाला घ्यायचा हा अधिकचा ताण? तुम्हालाही तेच सांगत असते. माझ्याबद्दल कुणी विचारलं की तुम्ही विषय बदलता, नाही तर काही तरी थातूरमातूर उत्तरं देता. असं का वागता चोरटय़ासारखं? जसा काही माझाच अपराध आहे! मुळात हा दोन व्यक्तींचा पटण्या-न पटण्याचा प्रश्न आहे. इतरांना त्यात नाक खुपसण्याची गरज काय?’’ माझी इतक्या दिवसांची खदखद बाहेर आली.
‘‘अगं, इतर काय म्हणतील याचाही विचार करायला नको का? आता बघ, त्या काय वाटेल ते पसरवतील तुझ्याबद्दल.. श्वेताला काही संस्कारच नाहीत, हिला घटस्फोट मिरवण्याचीच गोष्ट वाटते!’’ आई म्हणाली.
‘‘कोण आहेत हे बोलणारे लोक? ज्यांना कुचाळक्या करण्याशिवाय दुसरा काही उद्योग नाही ते? यातला एक तरी माणूस माझ्या मदतीला आला का? त्या परिस्थितीतून जात असताना एकानं तरी विचारपूस केली का? मग त्यांना कशाला एवढं महत्त्व द्यायचं?’’ माझा संताप आता शिगेला पोहोचला होता.
‘‘आधी श्रीरंगच्या भेटीत काय झालं ते सांग!’’ आईनं विषय बदलत म्हटलं.
मग मीही ते थोडक्यात सांगून विषय आटोपता घेतला.
संध्याकाळी एका लग्न समारंभाला जायचं होतं. आईच्या सूचना चालूच होत्या- ‘‘साधाच ड्रेस घाल. जास्त मेकअप करू नकोस. उगाच तुला बघून कुणी काही म्हणायला नको!’’
मग माझीही धुसफुस झाली. ‘‘बघू दे कुणाला कसं बघायचंय ते. त्यांनी आपल्याकडे कसं बघावं हे आपण नाही ठरवू शकणार. आपण स्वत:कडे कसं बघायचं ते आपल्या हातात आहे ना? घटस्फोट झालाय म्हणजे मी आनंदी राहायचं नाही? मी स्वत:साठी छान राहू शकत नाही? नटू शकत नाही?’’
शेवटी पडती बाजू घ्यायलाच लागली. आईबाबांच्याच घरात राहतेय ना अजून! एकटय़ा आईला सांगून काय होणार? सगळय़ा समाजातच खोलवर झिरपलंय हे. आपण लग्नसंस्थेला इतकं अत्युच्च महत्त्व दिलंय, की त्यात बिनसलं म्हणजे भयंकरच! जसा काही अक्षम्य अपराधच. आणि त्यातही या अपराधाची शिक्षा स्त्रीनंच भोगली पाहिजे.
लग्न समारंभाला पोहोचलो आणि तिथल्या वधूचा हर्षोल्हासित, स्वप्नाळू चेहरा पाहून वाटलं, की मी अगदी अशीच होते. शेखरबद्दलची मनातली संतापाची ज्वाला धडधडत पेटून उठली. माझ्या स्वप्नांचा, आनंदाचा चुराडा केल्याची शिक्षा त्याला मिळालीच पाहिजे. ‘४९८ अ’चं कलम लावून त्याला तुरुंगात गेलेलं पाहिलं, की माझा तळतळणारा आत्मा शांत होईल! काही क्षण मी त्या धगीत होरपळत राहिले. मग त्या धगीची झळ मला इतकी बसू लागली की मीच राख होऊन जाईन असं वाटायला लागलं. सगळं बळ एकवटत मी स्वत:ला शांत केलं.
जुन्या खुणा पुसण्याचा प्रयत्न करतेय, पण त्या सहजासहजी मिटल्या जात नाहीत. कुठली तरी कळ दाबली जाते आणि विचारांचा वारू चौखूर उधळतो. कुठलाही विषय असो, शेखरच्या स्मृती त्याच्याशी लगडलेल्याच असतात. त्या ओढून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तरी त्या मनाचे लचके तोडतच बाहेर पडतात.
मी प्रयत्नपूर्वक स्वत:ला थांबवलं. आपल्या विचारांचा आणि भावनांचा ताबा शेखरला का द्यायचा? आपल्या जीवनात फक्त शेखरचे कटू अनुभव व्यापून राहिले नाहीत. चांगलेही आहेत. अडीअडचणीला मदत करणारे जिवलग मित्रमैत्रिणी आहेत, रात्री मला झोप लागल्यानंतरच झोपणारे आईबाबा आहेत, समजून घेणारे किती तरी परिचित-अपरिचित लोकही आहेत. ते जीवनाची ऊर्जा पुरवतात. मग नव्यानं उमेद वाटते. पुढे चांगलं घडेल असा विश्वास वाटतो.
रात्री घरी परतल्यानंतर मी डायरीत लिहिलं, ‘‘घटस्फोटाचा प्रवास खडतर आहे, पण या प्रवासात मी स्वत:ला गवसले. स्वत:चा गाभा ओळखायला शिकले. कुठल्या गोष्टींत आपण तडजोड करू शकतो आणि कुठल्या नाही, हे सुस्पष्टपणे ओळखू शकले. कठीण प्रसंगांत कोण आपल्या पाठीशी उभं राहतं आणि कोण मजा पाहतं, हे पारखायला शिकले. अजूनही विचार छळतात. भावनांत वाहून जायला होतं. पण त्यातून सावरायला शिकतेय. विवाहभंग झाला तरी मी दुभंगून गेले नाही. उलट दुभंगून जाता जाता अभंग झाले आहे!’’