परदेशात दिवाळी साजरी करताना रक्ताच्या नातेवाईकांबरोबर इतर जातीधर्मांची, देशाची मित्रमंडळीही ही धमाल अनुभवतातच, पण एकटे राहणारे, विद्यार्थी यांनाही जाणीवपूर्वक सामील करून घेतल्याने ही सर्वसमावेशक दिवाळी सांस्कृतिकदृष्टय़ा अधिक प्रगल्भ होत जाते.
उमाताईंची सकाळपासून लगबग चालू होती. दिवाळीचा पाडवा कालच झाला. आज भाऊबीज. रोहित-अनुयाचा पहिला दिवाळसण. कालपासूनच अनुयाची आई राहायला आलेली. सासूबाई तर केव्हापासून या मुहूर्ताची वाट पाहतायत, आपल्या नातवाला लाडकी नातसून कधी ओवाळतेय याची! मुहूर्त? भाऊबीजेला? चक्रावलात ना? अहो, उमाताईंचा रोहित राहतोय अमेरिकेत.. अन् हा दिवाळसणही साजरा होतोय तिकडेच. उमातरईच्या मुलीने बरोबर सात वाजता लॅपटॉप उघडला. वेबकॅम चालू केला. ठरलेच होते काल तसे! तिकडून रोहित बोलत होता. अनुयाची धांदल दाखवत होता. साडी नेसून छान सजलेली अनुया. सिल्कच्या शेरवानीतला रुबाबदार रोहित. अनुयाने रोहितला ओवाळले. हजारो मैल दूरच्या आजीने लॅपटॉपवर त्यांची दृष्ट काढली!
हो, सध्या आपल्याकडील दर दहा घरांमागे एका घरातले हे दृश्य आहे. मुलं अमेरिका, इंग्लंड, युरोप, ऑस्ट्रेलियात जात आहेत शिकायला-नोकरी करायला. तिकडेच स्थायिक होत आहेत. आपल्याला वाटते घरापासून दूर, एकटी ही मुलं तिकडे काय करत असतील, आपण इकडे सण साजरे करत असताना? पूर्वी जेव्हा तंत्रज्ञान इतके विकसित नव्हते आपल्याकडे; तेव्हा कितीतरी उमाताईंचा घास अडकला असेल ना मुलांच्या आठवणीने?
खूप वेळा वाटते, रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्यालाही इथे भारतात- सणांचा एक विसावा वाटतो; जवळचे नातेवाईक भेटण्याची एक संधी असते. परंपरेनुसार खाण्याच्या पदार्थापासून, नात्यांच्या मधुर बंधनांपासून ते घर सजवणे, नवीन खरेदीपर्यंत ते एक ‘साजरे’पण असते. ही परदेशातील मुलं काय करत असतील बरं? खरंच, कशी असेल दिवाळी त्यांची?
माझ्या मैत्रिणीचा मुलगा सांगत होता, आमची दिवाळी वीक-एण्डला साजरी होत असते. म्हणजे भारतात जरी गुरुवार-शुक्रवार पाडवा-भाऊबीज असेल तरी आम्ही ती त्याच शनिवारी-रविवारी साजरी करतो. अन् दिवाळी फक्त तेव्हाच नसते. आधीचे दोन-तीन, नंतरचे दोन-तीन वीक-एण्डस् ती साजरी होत असते. आम्ही जवळचे सर्व मित्र, तिथे असलेले मोजके नातेवाईक यांची तयारी आधीच सुरू  होते. काय करायचे, कुठे जमायचे, मेनू काय, कुणी काय काय आणायचे.. इत्यादी इत्यादी इत्यादी.
एका वीकएण्डला आकाशकंदील बनवण्याचा प्रोग्राम ठरतो. सर्व मित्र दूर तिथे अमेरिकेत परत एकदा शाळकरी आयुष्य जगतात. आकाशकंदिलांसोबत पोटभर गप्पा, मस्ती, पदार्थाची रेलचेल होऊन ही ‘दिवाळीपूर्व संध्या’ संपते.
खूप ठिकाणी आपल्यासारखे ‘दिवाळी पहाट’चे गाण्याचे कार्यक्रमही असतात. ठिकठिकाणची महाराष्ट्र मंडळे हे कार्यक्रम ठरवतात. आपल्याकडचे मोठमोठे कलावंत तिथेही हजेरी लावतात. माझी भाची सांगत होती, पुण्यात असताना जमले नव्हते, पण इथे मी ‘दिवाळी पहाट’मध्ये संजीव अभ्यंकरांचे गाणे ऐकले.  इतकच काय स्वामीनाथन मंदिर व इतर मंदिरे ही उजळून निघतात दिवाळीत. सजूनधजून येणारी कुटुंबे, तिथल्या आरत्या-प्रसाद, देवळातच होणाऱ्या भेटीगाठी आपण भारतातून- कुटुंबापासून दूर असल्याची हुरहुर कुठल्या कुठे पळवतात.
ही मंडळी आपल्या वेशभूषेविषयीही दक्ष असतात. जरीच्या साडय़ा, शरारे, दागिने बाहेर निघतात. एरवी अमेरिकन वेशात असलेल्या मुली मेंदी लावून, नटूनथटून मिरवताना दिसतात. मुले-पुरुषही कुडते, शेरवानी, धोती, जाकीट अशा भारतीय वेशात येतात. नटणे-सजणे व सण या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू. त्यामुळे हे निमित्त ही मंडळी कसे सोडतील?
आणि हो, दिवाळी म्हणजे -पहाटेचे उठणे- तेल उटणे. हा विधी तर व्हायलाच हवा. इट इज मस्ट! एरवी घडय़ाळाच्या काटय़ावर-वारांच्या वाटांवर धावणारी ही मंडळी त्या दिवशी हा विधीही समारंभपूर्वक, हसत खेळत एन्जॉय करतात. एरवी शाम्पू, बॉडी-स्प्रे यांनी सुगंधित होणारी अमेरिकेतील ही स्नानगृहे तेल उटण्याचा सुगंध घेतात. खूप जणांची मने मग लहानपणच्या जुन्या घरात जातात. तिथल्या आठवणी जागवतात. आणि या आठवणींबरोबर मग फराळ तर हवाच. चितळे-हल्दीराम यांनी हे काम सोपे केले असले तरी घरातल्या प्रत्येक स्त्रीला स्वत:च्या हातचे काहीतरी करण्याची हौस असतेच. एरवी सर्व काही ‘झटपट’वर येणाऱ्या रेसिपीज बनवणारी दिवाळी आधीचा वीकएण्ड किचनमध्ये घालवते. जगात सर्वदूर आपली मराठी मंडळी पसरलेली आहेत. कॅनडात सत्तरच्या दशकात स्थायिक झालेली काही कुटुंबे आहेत. त्यांच्या घरांमध्ये आजही सर्व सण अगदी पारंपरिक पद्धतीने साजरे होतात. पूर्वी फार दळणवळण नव्हते. इतर स्टोअर्समधून आपल्याला लागणारे पदार्थ अगदी शोधून आणावे लागायचे. काही पर्याय शोधावे लागायचे, पण आता तसे नाही. ‘इंडियन स्टोअर्स’मधून सर्व काही मिळते. भारतात जाणारे-येणारे खूप जण असतात. नातेवाईक त्यांच्याबरोबर सामान पाठवतात. आता कुरियर सेवाही आहेत. त्यामुळे फराळाचे करणे अगदी सोपे झाले आहे.
परदेशातील ही दिवाळी आपली मंडळी अशी दिलखुलासपणे साजरी करताना दिवाळीचा महत्त्वाचा भाग ‘फटाके’ कसा विसरेल? अमेरिकेसह इतरही देशांत आवाजाचे फटाके वाजवण्यास परवानगी नाही. ही मंडळी फुलबाजा-भुईनळे यांसारख्या फटाक्यांचा आनंद घेतात आणि सामाजिक आरोग्यही सांभाळतात. फटाक्यांबरोबरच दिवाळी पणत्यांशिवाय पुरीच होऊ शकत नाही. हा दीपत्सोव साजरा करण्यासाठी आज भारतातून उत्कृष्ट, कलापूर्ण पणत्यांची निर्यात होत आहे. रांगोळ्या-पणत्या-आकाशकंदील यांनी सजलेली घरे, नटलेली- सजलेली मुले, त्यांचे आनंदी चेहरे फेसबुकवर बघून आपण वडीलधारे नक्कीच खूश होत असू.         
पण इथून काही दिवसांसाठी का होईना तिथे गेलेल्या आई-वडील, सासू-सासऱ्यांना इथल्या दिवाळीबद्दल साशंकताच असते. कल्पना व्यवसायाने डॉक्टर. दिवाळीचे दिवस सुट्टीचे ठेवता येतात तिला. एक वर्ष तिच्या सासूबाई तिकडे होत्या. ती सांगत होती, ‘‘सासूबाईंना अगदी संस्कृतीचा उमाळाच आला होता. ही अमेरिकन नातवंडे, त्यांना किती शिकवू असे झाले होते. माझ्या मुलीने ‘दिनदिन दिवाऽऽळी, गाई-म्हशी ओवाऽऽळी’ सुरू केल्यावर त्या अगदी थक्क झाल्या. मग आम्ही जेव्हा पिझ्झा कटरने ओल्या नारळाच्या करंज्या कातल्या तेव्हा तर त्या इतक्या हसत होत्या! माझ्या मैत्रिणीकडे तुळशीच्या लग्नाला गेलो होतो. तुळशीचा फोटो व पूजेतला बाळकृष्ण यांचे लग्न पाहून त्यांनी टीका नाही केली तर त्यांचे डोळे पाणावले होते. आम्हा मुलींचे कौतुक करून, पोटभर आशीर्वाद देऊन त्या मायदेशी परतल्या.’’
पण इथे, परदेशात, दिवाळीत एकत्र यायला फक्त रक्ताचेच नातेवाईक पाहिजेत असे नाही. या सणामध्ये सर्व मित्रमंडळी, मित्रांचे मित्र, सहकारी यांना सामावून घेतले जाते. अमेरिकेत किंवा अन्यत्रही बॅचलर्स, विद्यार्थी, एकटे रहाणारे खूप आहेत. त्यांचा सणही एकटेपणाने जाऊ नये याची खास काळजी घेतली जाते. त्याशिवाय महत्त्वाचे म्हणजे इथे जाती-जमाती-प्रदेश-धर्म या सगळ्या रेषा पुसून जातात. तिथल्या स्थानिक लोकांनाही आपल्या समारंभामध्ये सामावून घेतले जाते आणि जिथे ‘सर्वसमावेशकता’ असते ती संस्कृती अधिक प्रगल्भ होत जाते.
सतीश कंपनीच्या कामासाठी मध्ये तीन वर्षे अमेरिकेत होता. त्यातल्या दोन दिवाळी त्याने तिकडेच साजऱ्या केल्या. तो सांगत होता, ‘‘ इथली माझी पहिली दिवाळी होती. सुरुवातीला खूप एकटे वाटत होते. फोनवर भारतात बायकोशी बोललोही. तीही थोडी अस्वस्थच. पण मुलांसाठी तिने दिवाळीची तयारी सुरु केलेली. मला वाटले, चला दिवाळी येईल-जाईल, कामाच्या दिवसात कळणारही नाही. मात्र रोज फोन करायचा भारतात. एक दिवस लंचमध्ये माझ्या ऑफिसमध्ये काम करणारे सगळे भारतीय एकत्र आले, मलाही बोलावले अन् दिवाळी सेलिब्रेशन प्लॅन झाले. ‘काँट्री’ गोळा झाली. एकाचे अपार्टमेंट थोडे मोठे होते. त्याच्याकडे जमायचे ठरले. त्या वीकएण्डला खूपच धम्माल केली. अनोळखी लोकांमधली ती दिवाळी पण प्रेमाने भारलेली, म्हणूनच कायमची स्मरणात राहून गेली!’’
माझी बहीण प्रवीणा-सत्तरच्या दशकात कॅनडात स्थिर झालेली आणि तिची मैत्रीण अमीना-पाकिस्तानी. सुरुवातीचे खडतर आयुष्य-स्थैर्यासाठीचा संघर्ष- एकमेकींच्या साथीने पार पाडलेल्या-कठीण प्रसंगात एकमेकींना सावरलेले -मदतीला धावून आलेल्या -एकमेकींची मुले गरजेनुसार सांभाळलेली- परक्या प्रदेशात भाषाही येत नसताना एकमेकींसाठी असलेल्या दिवाळीत प्रवीणा एकवेळ मला -सख्ख्या बहिणीला विसरेल, पण अमीनाला विसरू शकेल? की अमीना प्रवीणाशिवाय ईद साजरी करू शकेल?
खूप वर्षे परदेशात स्थायिक झालेल्यांची दुसरी पिढी तिथेच जन्मलेली, वाढलेली. या पालकांशी बोलताना एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे आपली संस्कृती टिकविण्याची धडपड. एखादा माणूस परदेशात जातो, तिथे स्थिरावताना तिथली संस्कृती, हवापाणी, खाणे-पिणे या सर्वाशी अ‍ॅडजस्ट होण्याचा प्रयत्न होतो. त्या संक्रमणाच्या काळात कुठेतरी पोरकेपण जाणवते, सांस्कृतिक-सामाजिक दृष्टीने अधांतरी वाटते. मूळ घराची ओढ- आठवण तर असतेच, आणि ती नाळ कधीच तुटू नये असे वाटते. यासाठी मदतीला येतात हे सण. स्वत्व टिकविणारे-दिलासा देणारे.
अशा अमेरिकेतच जन्मलेल्या पूजा-जानकी-नील-नीरज या मुलांशी जेव्हा मी बोलले, तेव्हा त्यांच्यातही या सणांची ओढ-आवड जाणवली. पूजाला ही ‘सक्ती’ कधीच वाटली नाही. उलट पोशाख-खाणे-सण याचे वेगळेपण तिला तिच्या मैत्रिणींमध्ये ‘स्पेशल’ बनवून जाते.
जानकीने या वर्षी तिच्या अमेरिकन मैत्रिणींना भोंडला व गरबा या कार्यक्रमासाठी बोलावले होते. आईच्या जुन्या सिल्कच्या साडीचे परकर-पोलके शिवून घेतले. सध्या आजी तिकडे आलीय. तिने जानकीच्या केसांचा खोपा घातला. त्यात दोन्ही बाजूने कानातल्या कुडय़ा माळल्या. आजीची भोंडल्याची गाणी, आईच्या खिरापती त्या अमेरिकन टीन-एजर्सनी खूप एन्जॉय केले.
नीरजला गणेशोत्सव खूप आवडतो. पाच दिवसांचा ‘गजानन’ घरी येतो. खूप खूप डेकोरेशन प्लॅन होते (त्यात तुळशीबागेतले मखरही असते). डेकोरेशनमध्ये फ्रेंच, कॅनेडियन, पंजाबी मित्रांचा सहभाग असतो. रोज पूजा, आरती, प्रसाद व्यवस्थित (गळ्यात जानवे घालून) पार पडते. नीरज वर्षभर गणपती-दिवाळीची वाट पाहतो. त्याच्या आठ़वणींत मला आठवले ते थेम्समध्ये केलेले गणपती विसर्जन आठवले.
नील त्याच्या घरातील ‘हल्दीकुंकू ऑफ संक्रांट’चा प्रोग्राम सांगत होता. नीलच्या आईकडे या संक्रांतीला १८० बायका आल्या होत्या. नीलच्या मावशीने पाठवलेल्या ‘चितळ्यांच्या’ तिळाच्या वडय़ा, गाण्याचे प्रोग्राम, काळ्या साडय़ांचा ड्रेसकोड, मैत्रिणीच्या ‘कॅनेडियन’ सुनेला घातलेले हलव्याचे ‘पाटणकरांचे’ दागिने. दुसरीच्या नातीचे चॉकलेटस्ने केलेले ‘बोरनहाण’ हे सर्व फोटो पाहून, वर्णन ऐकून मला मज्जाच वाटली. नील या सर्व गोष्टी अभिमानाने सांगत होता.
आपल्यातले काहीजण जगभर गेले. जाताना ही संस्कृतीची ‘बीजं’ घेऊन गेले. सर्वदूर ही बीजं पसरली गेली. तिथल्या मातीत रुजली. एखादं रोपटं एका ठिकाणाहून दुसरीकडे लावलं तर कोमजतं. कदाचित सुकतंही, पण ही रोपटी जगली ती या संस्कृतीमुळे. या सणांमुळे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
youth murder due to love affair in beed
बीड : प्रेम संबंधातून बीड येथील युवकाचा खून करून मृतदेह कालव्यात फेकून दिला
minor girl posted her video with boyfriend on Instagram
नागपूर : अल्पवयीन प्रेयसीने ‘इंस्टाग्राम’वर व्हिडिओ टाकला अन् प्रियकर अडकला…
Pankaja Munde and Dhananjay Munde vs Suresh Dhas new controversy on political stage after elections
मुंडे बहीण-भाऊ विरुद्ध सुरेश धस, निवडणुकीनंतर राजकीय पटलावर नवा वाद
Story img Loader