आजच्या डाएट कॉन्शस वातावरणात दिवाळीचे पदार्थ खाणं अनेक तरुणींसाठी यक्षप्रश्न निर्माण करतात, पण ते खाल्ल्याशिवाय दिवाळीची गंमत ती काय! म्हणूनच आपल्या आधुनिक स्वयंपाकघरात आणि ‘डाएट’मध्ये बसणाऱ्या; लहान-मोठे सगळ्यांना आवडणाऱ्या सोप्या बेक्ड करंज्या आणि तिखट-मिठाचे नमकपारे. यंदाच्या दिवाळीतला हा डाएट फराळ..
मा झं लग्न दसऱ्याच्या दिवशी झालं. मधुचंद्राहून परत येईपर्यंत दिवाळी उजाडली. स्वयंपाकाची मला आधीपासूनच आवड होती. शिवाय रोजचे पदार्थ करायची सवय होतीच; थोडे-फार बेकिंगसुद्धा करून माहीत होते. परंतु दिवाळीचा फराळ कधीच केला नव्हता, किंबहुना फराळाचे पदार्थ करायला मला उगीच भीती वाटायची. घरातल्या स्त्रियांना विविध स्वरूपाचे पाक करताना मी पहिले होते आणि ‘एवढं अवघड काम आपल्याला नक्कीच जमणार नाही’ म्हणून त्याच्याकडे कधी लक्ष दिले नव्हते. सुरुवात कशी करायची आणि काय करायचे हे सुचेना. माझ्या सासूबाई ओल्या नारळाच्या अतिशय उत्कृष्ट करंज्या करतात- बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ आणि ओलसर. त्यांच्या पिढीच्या नव्वद टक्के मराठी बायकांप्रमाणे त्यादेखील दिवाळीच्या कित्येक दिवस आधीपासून तयारीला लागतात. शंकरपाळे, करंज्या, चकल्या आणि चिवडा आवडीने बनवतात आणि घरातल्या लोकांना डबे उघडण्यापासून थांबवायचा प्रयत्न करत त्यांची दिवाळीची तयारी सुरू होते.
अखेर, दिवाळीचा दिवस उजाडला की आम्ही सगळे एकत्र येतो आणि दिवाळीच्या फराळाची आमचीच एक ‘पॉटलक पार्टी’ करतो. तिन्ही घरातल्या बायकांनी केलेला फराळ मांडला की घर लहानसं दुकान आहे की काय असं वाटू लागतं. त्या दिवशीची न्याहारी म्हणजे विविध प्रकारचे लाडू, चिवडे, करंज्या आणि त्या वर्षी प्रयोग करून पाहिलेला एखादा नवीन पदार्थ. या फराळाची न्याहारी मला अगदी नवीन होती. माझ्या आईकडे दिवाळीचा फराळ बशीच्या एका बाजूला असे; मूळ पदार्थ तिखटा-मिठाचा असे- बहुदा इडली किंवा सांजा. फराळाला एवढे महत्त्व असेल हे मला ठाऊक नव्हते!
लग्नानंतरची पहिली दिवाळी मी एक चिवडा आणि नारळाची वडी असे दोन साधे-सुधे पदार्थ करून भागवली. मग पुस्तकं वाचून आणि प्रयोग करून करून, जरा लाडू-साटोरी करणे जमू लागले. बेकिंग आणि स्वयंपाकाचे क्लास घेऊ लागल्यापासून मला अशा कित्येक तरुणी भेटल्या ज्यांना फराळाचे पदार्थ करून पाहायची इच्छा होती, पण त्यात असणारे भरपूर तेल-तुपाचे प्रमाण पाहून त्या घाबरायच्या. त्यांची समस्या मी समजू शकते. आपल्या आजी-आजोबांच्या तुलनेत आपली स्थिती वेगळी आहे. पूर्वीचे लोक सहज दोन-तीन करंज्या, एखादं-दुसरा लाडू, बशीभर चिवडा-शेव इत्यादी एकाच वेळेला खाऊ शकत असत. आज आपण विचारदेखील करू शकत नाही. त्यात ‘जीवनशैलीशी निगडित आजार’ नावाची एक टांगती तलवार कायमच डोक्यावर असते. असे असताना तळण्यासाठी तेल ठेवणे हासुद्धा भयानक विचार आहे असे वाटू लागते. एकीकडे हे सारे आणि एकीकडे लहानपणच्या खाऊच्या आठवणी. कशी व्हायची ती दिवाळी आनंदी?
आणखी एका गोष्टीमुळे आपण घरी फराळ बनवायला घाबरतो. पिढीजात चालत आलेल्या पाककृती कठीण आणि वेळखाऊ आहेत असा आपला समज आहे. ऑफिस ते घर ट्रॅफिकशी लढून, दमल्यावर पाक करायला आणि तळणीच्या कढईसमोर उभं राहायला आपल्यात ना शक्ती असते ना उत्साह. त्यात आई-आजी अंदाजाने प्रमाण सांगतात. हा अंदाज त्यांच्या स्वयंपाकघरात अगदी बरोबर ठरतो, पण आपल्या स्वयंपाकघरात फक्त फजिती होते. अशा परिस्थितीत बाहेरून फराळ आणणे सोपे ठरते. अर्थात बाहेरून आलेल्या, डालडा घातलेल्या फराळाला घरच्या साजूक तुपाचा सुंदर, खमंग वास नसतो. घरी केलेल्या फराळात असलेले प्रेम नसते. शेवटी दिवाळी म्हणजे काय, एकत्र येणे, आपल्या चांगल्या तब्येतीला ‘सेलिब्रेट’ करणे. या सगळ्यात बाहेरचा फराळ बसतो का? एखादा पदार्थ तरी घरी करावा असं मला वाटतं. मग तो एखादा सोपा पदार्थ असला तर काय हरकत आहे, असा विचार करून मी या दोन पाककृती तयार केल्या- पारंपरिक चवीच्या आणि तरीदेखील करायला सोप्या. आपल्या आधुनिक स्वयंपाकघरात आणि ‘डाएट’मध्ये बसणाऱ्या; लहान-मोठे दोघांना आवडणाऱ्या. या दिवाळीत सोप्या करंज्या आणि तिखटा-मिठाचे नमकपारे करूनच पाहा- आपल्या माणसांना आपण केलेली एखादी वस्तू खायला द्या आणि ती अगदी परफेक्ट जरी झाली नाही तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहा आणि त्या तेजात दिवाळी उजळ करा!

सोप्या, ओल्या नारळाच्या बेक्ड करंज्या

‘या रेसिपीमध्ये मी पाश्चात्त्य बेकिंगमधली गोड  ‘शॉर्ट क्रस्ट  पेस्ट्री’ ही पद्धत वापरली आहे. मिक्सर किंवा फूड प्रोसेसरमध्ये पटकन एकत्र येणारे हे पीठ करायला अगदी सोपे आहे आणि िक्लग किंवा प्लास्टिकच्या कागदामध्ये ठेवल्यास लाटायलादेखील सोपे आहे. करंजीचे सारण एरव्ही गॅसवर शिजवले जाते; त्याऐवजी इथे आपण ते पटकन मायक्रोवेव्हमध्ये शिजवतो आहोत, त्यामुळे वेळ कमी लागतो आणि पदार्थ लवकर तयार होतो.  

करंजीची पारी करायचे साहित्य :

  • २ कप मदा
  • २ मोठे चमचे पिठी साखर
  • ५ मोठे चमचे फ्रिजमधील थंड साजूक तूप
  • एक चिमूट मीठ
  • २-३ मोठे चमचे फ्रिजमधील थंड पाणी
  • २ मोठे चमचे वितळलेले तूप (करंजीवर लावण्यासाठी)

करंजीच्या सारणासाठी लागणारे साहित्य :

  • २ कप खवलेला ओला नारळ
  • ४ मोठे चमचे कंडेन्स्ड मिल्क
  • २ मोठे चमचे पिठी साखर
  • ३ मोठे चमचे पिस्त्याची भरड
  • १/४ लहान चमचा वेलदोडय़ाची पूड
  • एक चिमूट केशर

कृती :
प्रथम सारण करण्यासाठी नारळ, कंडेन्स्ड मिल्क, पिठी साखर, पिस्त्याची भरड, वेलदोडय़ाची पूड आणि केशर काचेच्या किंवा प्लास्टिकच्या भांडय़ात एकत्र करावे. मायक्रोवेव्हमध्ये एक मिनिटभर शिजवावे.
नंतर बाहेर काढून एकजीव करावे व पुन्हा तीस सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवावे.  शिजल्यावर सारण एकजीव झाले पाहिजे; फार ओलसर वाटल्यास आणखीन तीस सेकंद शिजवावे. मग गार करण्यास बाजूला ठेवावे.
पारी करायला, मदा, तूप, पिठी साखर आणि मीठ एकत्रित मिक्सर किंवा फूड प्रोसेसरमध्ये ठेवून ‘पल्स’ करावे (क्षणभर फिरवावे). असे केल्यास मिश्रण पावाच्या चुऱ्यासारखे दिसू लागेल.
आता त्यात एक-एक करून २-३ मोठे चमचे अगदी थंडगार पाणी घालून पुन्हा पल्स करावे. मिश्रण जरा एकत्र येऊ लागेल. दिसायला कोरडे दिसले तरी त्यात आणखी पाणी घालू नये. लाटताना पीठ एकत्र येईल. अर्धवट एकत्र आलेले पीठ िक्लग फिल्म किंवा प्लास्टिकमध्ये घट्ट बांधून, थोडे चपटे करून फ्रिजमध्ये २०-२५ मिनिटे ठेवावे.
मग त्याचे िलबाएवढे भाग करून प्रत्येक भाग प्लास्टिकच्या दोन कागदांमध्ये लाटावा. त्याच्या मधोमध दोन लहान चमचे सारण ठेवावे आणि कागदाच्या आधाराने पारी दुमडावी. कडा दाबून, कातण्याने कापावे. अशा सगळ्या करंज्या करून घ्याव्यात.
बेकिंग ट्रे वर तूप लावावे किंवा बटर पेपर लावावा. त्यावर करंज्या ठेवाव्यात.
ओव्हनमध्ये १७५ डिग्री तापमानावर करंज्या १५-२० मिनिटे भाजाव्यात. मग त्या बाहेर काढून त्यावर वितळलेले तूप लावावे आणि पुन्हा ५-१० मिनिटे करंज्या भाजाव्यात. तयार झाल्यावर त्यांचा रंग गुलाबी होतो आणि करंज्या खुसखुशीत होतात.
गार करून डब्यात भराव्या; फ्रिजमध्ये आठवडाभर टिकतात.
*  *  *
पटकन होणारे बेक्ड नमकपारे
नमकपारे म्हणजेच तिखटा-मिठाचे खारे शंकरपाळे. सगळ्यांनाच आवडतात. आज मी थोडी फार बिस्किटासारखी रेसिपी तयार केली आहे. हे खारे शंकरपाळे नुसतेच किंवा थंडगार चटणीत किंवा दह्यात बुडवूनदेखील सुरेख लागतात. स्टार्टर म्हणून द्यायला काहीच हरकत नाही!

साहित्य :

  • २ कप मदा
  • १ कप कणीक
  • १/४ कप तेल
  • १ लहान चमचा भरडलेला ओवा
  • १/२ लहान चमचा तिखट
  • स्वादानुसार मीठ
  • १/४ लहान चमचा बेकिंग पावडर
  • साधारण १/४ कप थंड पाणी (गरजेप्रमाणे कमी-जास्त)

कृती :

  • प्रथम पाण्याव्यतिरिक्त इतर सारे साहित्य एखाद्या मोठय़ा भांडय़ात एकत्र करावे.
  • मग थोडे-थोडे करत, गार पाणी घालून पीठ एकत्र करावे.   फार मळू नये. भिजवलेले पीठ घट्ट असावे. झाकण घालून १५-२० मिनिटे बाजूला ठेवावे.
  • पिठी किंवा तेल न लावता भिजवलेले पीठ ५ मिलीमीटर जाडी होईल इतके लाटावे. मग त्याचे आवडेल तसे चौकोनी किंवा शंकरपाळ्यासारखे आकार कापावेत.
  • काटय़ाने प्रत्येक तुकडय़ावर भोके पाडावीत.
  • नमकपारे बेकिंग ट्रे वर लावलेल्या बटर पेपरवर ठेवावीत.
  • ओव्हनमध्ये १७५ डिग्रीवर १५-२० मिनिटे, सोनेरी होईपर्यंत भाजावे.  गार करून डब्यांत नमकपारे भरून ठेवावेत.

Story img Loader