‘दीप्य ते दीपयति वा स्वं परं चेति इति दीप:’ स्वत: प्रकाशित होऊन दुसऱ्याला प्रकाशित करणारा दिवा आपल्या तेजाने एकटेपणाची, असाहायतेची, भीतीची जाणीव दूर करून मन प्रसन्न, उल्हसित करतो. कधी तो स्थापित दिवा असतो तर कधी शकुन दिवा, कधी नंदादीप तर कधी पीष्टदिवा, कधी लामणदिवा तर कधी सांज दिवा.. नानाविध नावं धारण करणारा हा दीप म्हणजे शुभशकुनाचं प्रतीक..
उदयाचली रवी आला, उजळत दाही दिशांना..
दिवसरात्रीच्या खोखोत सूर्य डोंगराआडून वर आला की दाही दिशा हलके हलके उजळून निघतात. सुवर्ण प्रकाशाचं साम्राज्य पसरतं. दिवसभर तळपून तो पश्चिम क्षितिजावर मावळतो आणि काळोखाची चादर आसमंतावर अंथरली जाते. या सीमारेषेवर, तिन्हीसांजेला देवापुढे दिवा लावला जातो. ‘तिमिर सरू दे ज्योत उजळू दे’ या भावनेने ‘शुभं करोति कल्याणम्’ अशी प्रार्थना करीत दीप ज्योतीला वंदन केले जाते. ही दीप ज्योत दिवसरात्र अहर्निश तेवून जगाला प्रकाश देत असते. देवघरात तेवणाऱ्या समईच्या किंवा निरांजनाच्या किंवा पणतीच्या स्निग्ध प्रभेने निर्माण झालेल्या शांत, मंगलप्रद, पवित्र, चैतन्यमय वातावरणाची किमया न्यारीच. कृतज्ञतेचा संस्कार जपत हा दीप सदैव पूजनीय, वंदनीय मानला जातो.
दीपवाली म्हणजे दीप + आवली म्हणजे दिव्यांची रांग किंवा ओळ. दीपावली हा दिव्यांचा उत्सव. घराबाहेर अंगणात, आजूबाजूच्या परिसरात पणत्या लावून हा प्रकाशाचा उत्सव साजरा केला जातो. उंच जागी टांगलेल्या आकाश कंदीलाच्या रंगीबेरंगी प्रकाशाने वातावरण नेत्रदीपक होते. पणतीच्या स्निग्ध, थंडावा देणाऱ्या लुकलुकणाऱ्या ज्योतींच्या आस्तित्वाने अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा हा वर्षांतील सर्वात मोठा सण.
शरदऋतूच्या मध्यावर येणाऱ्या अति प्राचीन अशा या सणाचा संबंध इतिहासाचे अभ्यासक आर्याच्या उत्तरध्रुव प्रदेशातील वास्तव्याशी जोडतात. सहा महिन्यांची रात्र संपून सहा महिन्यांच्या दिवसास प्रारंभ होणाऱ्या या आनंददायी काळात लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखं वाटत असे. दिवे उजळून अंधाराला पळवून लावत हा आनंदोत्सव साजरा होई. त्यातून दीपोत्सव करून आनंद प्रकट करण्याची प्रथा पडली असावी, असे म्हणतात. प्रभू रामचंद्र पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून १४ वर्षांचा वनवास संपवून सीतेसह अयोध्येत परतले. तेव्हा नगरवासीयांनी दीपोत्सव साजरा करून त्यांचे स्वागत केले. सर्व देवदेवतांना बंदिवासातून सोडविण्यासाठी विष्णूने वामनावतार घेऊन बलाढय़ बळीराजाच्या यज्ञाच्या वेळी जाऊन त्रिपादभूमी मागितली. दोन पावलांत पृथ्वी व स्वर्ग व्यापून तिसरे पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात गाडले. वामनाने बळीला ‘वर’ मागण्यास सांगितले, तेव्हा तो म्हणाला, ‘‘देवा, केवळ लोककल्याणासाठी मी हा वर मागत आहे. दिवाळीच्या या तीन दिवसांत जो कोणी यमाप्रीत्यर्थ दीपदान करील, त्याला यमयातना भोगाव्या लागू नयेत आणि त्याच्या घरात निरंतर लक्ष्मीचे वास्तव्य असावे.’’ त्यावर वामनाने ‘तथास्तु’ म्हटले आणि दीपदान व दिवाळी साजरी करण्याची पद्धत चालू झाली. सम्राट अशोकाने दिग्विजयाप्रीत्यर्थ हाच दीपोत्सव सुरू केला. सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या राज्याभिषेक समारंभाच्या निमित्ताने जो दीपोत्सव सुरू झाला तो अखंड आजतागायत चालूच राहिला, असे म्हणतात. भूतकाळातील ही समृद्ध परंपरा जपत आपल्या जीवनातील दिव्याचे महत्त्व ओळखूनच आसेतू हिमाचल हा दीपदेवतेचा उत्सव साजरा होतो.
दिवाळीच्या या उत्सवाच्या निमित्ताने मनाच्या गाभाऱ्यात अगणित दीप प्रज्वलित होतात. त्यांच्या सौम्य, शांत, आल्हाददायक प्रकाशात ‘दिव्याचा’ प्रवास दृग्गोचर होत जातो.
उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर भीषण रात्रीच्या उदरात घर्षणाने अग्नीची निर्मिती होते. उष्णतेबरोबरच प्रकाश पडल्यामुळे जणू रात्रीचा ‘दिवस’ होतो. या प्रकाशासाठीच्या साधनांतून दिव्याची जन्मकथा आकाराला येते. तिमिराकडून तेजाकडे चालू झालेला हा प्रवास अग्नीबरोबरच दीपालाही पूजनीय ठरवितो, देवत्व बहाल करतो. ओबडधोबड दगडाला मध्यभागी खड्डा आणि वातीसाठी एका बाजूला खाच, हे या दिव्याचं ढोबळ मूळ रूप. काही ठिकाणी शिंपल्यांचा दिवा म्हणून वापर. कालांतराने दगडी दिव्यांची जागा मातीने घेतली आणि वातीसाठी चोच केली गेली. ‘झाले इवली मग पणती, घराघरांतूनी मिणमिणती’ असे चित्र दिसू लागले. काळ पुढे सरकला आणि दिव्याच्या आकाराबरोबर त्यासाठी वापरलेले पदार्थही बदलले. खापर तांबा, पितळ, कास, सोने-चांदी, मेण यापासून तयार करण्यात आलेल्या दिव्याच्या आकारमानात व स्वरूपात उपयोग व गरजेनुसार बदल होत गेले. अनेकविध पशुपक्ष्यांच्या आकाराने आणि कलाकुसरीने या दिव्याला सौंदर्य बहाल करण्यात आले. मंगळागौरीच्या आरतीत ‘रतनांचे दिवे, माणिकाच्या वाती’ असा दिव्याचा उल्लेख आहे. ‘राजमंदिरी दासी आल्या रत्नदीप विझविण्या’ या गीतपंक्ती रामायण काळातील वैभव नजरेस आणून देत याला दुजोरा देतात. हे दिवे अनंत रूपात जागोजागी तेवत असतात. पंचारती हा मूठ असलेला आरतीदीप. ‘समई केले मला कुणी, देवापुढती नेओनी’ या दिव्याच्या स्वगतातून रोज सकाळ-संध्याकाळ घरातल्या देवापाशी समई-निरांजनाच्या स्वरूपात तो स्थिरावतो. रोजची देवपूजा, आरती याच्याशिवाय शक्यच नाही. समईच्या तेजकन्या मंद डोलायला लागल्याशिवाय पूजेचा प्रारंभच होत नाही. आरती म्हटलं की, प्रदूषण नाशकाचा वसा घेतलेलं साजूक तुपाचं निरांजन हवंच.
कोणत्याही धार्मिक कार्यात अग्रपूजेचा मान दिव्यालाच असतो. तेथे ‘स्थापित दिवा’ म्हणून त्याचा सन्मान होतो. सार्वजनिक कार्यक्रम, उत्सव यात पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्याशिवाय कार्यक्रमाचा शुभारंभ होत नाही. लग्न समारंभात बोहल्यावर वधू-वरांच्या मागे करवली रोवळीत लामणदिवा घेऊन उभी राहते. त्या वेळी तो ‘शकुन दिवा’ होतो. लग्नाच्या ‘झालीत’ जबाबदारीचं ओझं मुलाकडील लोकांच्या डोक्यावर देण्याचं काम कणकेचे दिवे टोपलीत बसून करतात. मंगळागौर, बोढण असलं की आरतीसाठी कणकेचे दिवे हवेतच. बारशाच्या वेळी ‘कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या’ असं म्हणून बाळराजांना पाळण्यात ठेवताना हेच दिवे पाळण्याच्या खाली साक्षीदार म्हणून तेवत असतात. पिठाचे म्हणून हे ‘पीष्टदीप’. नवरात्रात गरब्याच्या वेळी मातीच्या रंगीत, कोरीव सुगडात हे गर्भदीप प्रकाशमान होतात. श्रावण शुक्रवारी पुरणाच्या दिव्याच्या स्वरूपात यांची गोडी वाढते. जिवतीची व बाळगोपाळांची आरती करून घेण्याची हौस ते भागवतात आणि आरतीचा प्रसाद म्हणून खास चवीने पोटात जातात. औक्षण म्हणजे आयुष्यवर्धन. पाडवा, भाऊबीज, वाढदिवस, लढाईवर जाणारे जवान, वीरश्री खेचून आणणारे वीर अशा कोणत्याही मंगलप्रसंगी तबकामध्ये निरांजनाच्या ज्योती हव्याच. त्यांना साथ देतात डोळ्यांमधील कौतुकाचे, प्रेमाचे आनंदाश्रू. शंकराच्या मंदिरात अखंड तेवताना हा ‘नंदादीप’ होतो. देवघरात साखळीने अडकवल्यावर हा ‘लामणदिवा’ नाव धारण करतो. खंडोबाच्या नवरात्रात ‘दिवटीच्या रूपाने तो तळीआरतीत भाग घेतो. मंदिरात काकड आरती, शेजारतीत दिव्यांचा सहभाग असतोच. दीपदानाचं पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी अधिक महिन्यात जावयाला ‘दिवा’ देतात. त्रिपुरी पौर्णिमेला हेच दिवे द्रोणात बसून पाण्याच्या प्रवाहाबरोबर हेलकावे खात राहतात. पुण्यप्राप्तीबरोबरच दिव्यांच्या या रांगोळीने अवर्णनीय नेत्रसुख लाभते.
आषाढातील अमावास्या हा तर दीप पूजनाचा खास दिवस. या दिवशी घरातील सर्व दिवे घासूनपुसून त्यांची पूजा करून कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो. दिवाळी हा तर दिव्यांचा उत्सवच. प्रत्येक घर पणत्यांच्या आराशीने नटून जाते. वसूबारसेपासून भाऊबीजेपर्यंत पणत्यांच्या सोनेरी प्रकाशाच्या लक्ष लक्ष ज्योती उजळत असतात. हर्षोल्हासाची कारंजी उडवत प्रेमाची पखरण करत असतात. पितरांना प्रकाश देण्यासाठी टांगलेल्या आकाशदिव्याकडे बघताना आकाशातील तारेतारकांचा दीपोत्सवही भान हरपून टाकतो. दिवाळीचे सामुदायिकरीत्या स्वागत करण्यासाठी धनत्रयोदशीला सांजसमयी तलावाच्या काठांवर दिवे लावले जातात. सनईच्या मंद सुरावटी, फटाक्यांची आतषबाजी या पाश्र्वभूमीवर प्रकाशाच्या, तेजाच्या ज्योती तेवत राहतात. नर्तिकांचे दीपनृत्य मनाला आणि नजरेलाही आनंद देते. अय्यप्पा मंदिरात तर विजेचे दिवे नसतातच. मंदिराच्या गाभाऱ्यात उंच उंच मोठय़ा समयांची आरास असते. अंधाराच्या पटलावर प्रकाशाची हलती कमळं गाभारा भरून टाकतात. अवर्णनीय असं ते चित्र केवळ शब्दातीतच. योग विद्येच्या ज्योतीत्राटकात हीच दिव्याची ज्योत मन एकाग्र होण्यास मदत करते. हंडय़ा, झुंबरं दिवाणखान्यात अडकवली जातात. घरगुती दिवे पडवी, ओसरी उजळतात. दीपस्तंभ नावाडय़ांना मार्गस्थ करतात तर कंदील वाटाडय़ांना रस्ता दाखवतो. पालखीपुढे दिवटय़ा नाचतात. लढाईच्या वेळी तटावर मशाली आग ओकतात. बँडच्या तालावर गॅसबत्तींनी वराती झगमगतात. काळ्या पाषाणातील दीपवृक्ष, दीपमाळा या वास्तुरचना दिव्यांच्या रोषणाईने प्रकाशाची जणू शिल्पच रेखतात.
मृत्यूनंतर घरात दहा दिवस दक्षिणेकडे ज्योत करून पणती टोपलीखाली झाकून ठेवली जाते. आयुष्यभर साथ करणारा दिवा प्राणज्योत मालवल्यावर आत्म्याला मार्गस्थ करण्यासाठी असा तेवत ठेवला जातो. पूजा किंवा आरती करताना दिवा विझू नये किंवा त्याला धक्का लागू नये म्हणून आपण जागरूक राहतो. देवघरातला दिवा नको असेल तर उजव्या हातावरून फुंकर मारून त्याला शांत करून निरोप दिला जातो.
‘दीप्य ते दीपयति वा स्वं परं चेति इति दीप:’ स्वत: प्रकाशित होऊन दुसऱ्याला प्रकाशित करणारा दिवा आपल्या तेजाने एकटेपणाची, असाहायतेची, भीतीची जाणीव दूर करून मन प्रसन्न, उल्हसित करतो. शुभशकुनाचं प्रतीक म्हणजे हा दिवा.
फटाक्यांच्या आवाजाने मी भानावर आले. लखलख चंदेरी तेजाच्या या साऱ्या दुनियेच्या प्रवासाचा वेध घेताना दिवेलागण केव्हा झाली हे लक्षातच आले नाही. राजा बढे यांच्या या गीतपंक्ती गुणगुणतच मी दिवा लावायला देवघरात पळाले.
मावळत्या किरणात, पडे पाऊल दारांत
झाली बाई सांजवेळ, आल्या छाया अंगणात
परतला घरटय़ात, रानपाखरांचा थवा
लाविते गं सांजदिवा