दिवाळी हा सण मागील वर्षभरात झालेल्या कुरबुरी आणि नकारात्मकता विसरण्याचा सण आहे. तुम्हाला प्राप्त झालेल्या विवेकावर प्रकाश टाकण्याची आणि पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची, स्वागत करण्याची ही वेळ आहे.
ते लाची पणती तेवण्यासाठी त्याची वात तेलात बुडालेली असावी लागते पण त्याचे टोक मात्र तेलाच्या बाहेर असावे लागते. जर वात पूर्णपणे तेलात बुडालेली असली तर ती प्रकाश देऊ शकणार नाही. आयुष्य हे दिव्यातल्या वातीसारखे आहे. तुम्हाला या जगात राहावे लागते, पण त्याच्यापासून अलिप्तही राहावे लागते. जर तुम्ही जगातल्या भौतिक गोष्टींमध्ये पूर्णपणे बुडून गेलात तर तुम्ही जीवनात आनंद आणि ज्ञान मिळवू शकणार नाही. जगात राहूनही त्यातल्या सांसारिक गोष्टीत बुडून गेला नाहीत तरच आनंदाचा आणि ज्ञानाचा प्रकाश पडू शकेल..
दिवाळी आणि प्रकाशाचं वेगळंच नातं आहे. दिवाळी हा पाच दिवसांचा उत्सव काíतक मासाच्या त्रयोदशीला सुरू होतो. पहिला दिवस धनत्रयोदशी, दुसरा दिवस नरक चतुर्दशीचा, तिसऱ्या दिवशी अमावास्येला लक्ष्मी पूजन केले जाते. चौथ्या दिवशी प्रतिपदा म्हणजेच पाडवा आणि त्यानंतर द्वितीयेला असते भाऊबीज. सारे लखलखते दिवस.
दिवाळी हा विवेकाच्या प्रकाशाचा सण आहे. यात चांगल्याने वाईटावर मिळवलेला विजय, प्रकाशाने अंधारावर मिळवलेला विजय आणि ज्ञानाने अज्ञानावर मिळवलेला विजय साजरा केला जातो. दिवे लावले जातात ते केवळ घर सजवण्यासाठी नव्हे तर जीवनातले हे गहिरे सत्य सांगण्यासाठीसुद्धा. विवेकाचा आणि प्रेमाचा दिवा प्रत्येक हृदयात लावा आणि मग बघा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कसे प्रफुल्ल हास्य फुलेल ते.
प्रत्येक माणसात काही ना काही चांगले गुण असतात. आणि तुम्ही लावलेला प्रत्येक दिवा याचेच प्रतीक आहे. काहींमध्ये संयम असतो, काहींमध्ये प्रेम, सामथ्र्य, उदारता असते, तर काहींमध्ये लोकांना एकत्र आणण्याची क्षमता असते. तुमच्यातील सुप्त गुण हे पणतीसारखे असतात, म्हणूनच विवेकाची एकच पणती लावण्यात समाधान मानू नका, हजारो दिवे लावा. कारण अज्ञानरूपी अंधकार घालवण्यासाठी तुम्हाला खूप दिवे लावावे लागतील. तुमच्यातील विवेकाचा दिवा लावून आणि ज्ञान प्राप्त करून तुम्ही तुमच्यातील सर्व क्षमतांना जागवा. जेव्हा ते लावले जातील आणि तेवू लागतील तीच खरी दिवाळी!
आणखी एक महत्त्वाचे प्रतीक आहे ते म्हणजे फटाके. जीवनात बऱ्याचदा तुम्ही फटाक्यासारखे होता. साचलेल्या भावना, नराश्य, राग यांचा कधी स्फोट होईल नेम नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या भावना, इच्छा, नावड, तिरस्कार यांसारख्या भावना दाबून ठेवता तेव्हा त्याचा कधीतरी स्फोट होणारच. फटाके फोडणे ही आपल्या पूर्वजांनी बाटलीबंद भावना मोकळ्या करण्यासाठी तयार केलेली पद्धत आहे. जेव्हा तुम्ही बाहेर एखादा स्फोट बघता तेव्हा तुम्हाला तुमच्यातही तशाच भावना निर्माण झालेल्या जाणवतात, आणि स्फोटाबरोबरच केवढातरी प्रकाश निर्माण होतो, तर जेव्हा तुम्ही या भावनांचा निचरा करता तेव्हा पावित्र्य निर्माण होते.
जोपर्यंत तुमच्यातील साचलेल्या भावनांचा निचरा होत नाही तोपर्यंत तुम्हाला नावीन्याचा अनुभव येणार नाही. दिवाळी म्हणजे वर्तमानात असणे. त्यामुळे भूतकाळातील पश्चात्ताप आणि भविष्याची काळजी टाकून द्या आणि वर्तमान क्षणात राहा.
भेटवस्तू आणि मिठाई, फराळ यांची देवाणघेवाण करण्यातही प्रतीकात्मकता आहे. भेटवस्तू आणि मिठाई देणे हे मनातील पूर्वीचा कडवटपणा टाकून देऊन भविष्यासाठी मत्रीचे नूतनीकरण करणे याचे प्रतीक आहे. या दिवाळीत अशी भेट देऊन तुम्ही भूतकाळातील कडवटपणा नाहीसा करू शकता.
कोणताही उत्सव साजरा करणे हे सेवेशिवाय पूर्ण होत नाही. आपल्याला देवाकडून जे काही मिळाले आहे ते आपण इतरांबरोबर वाटून घ्यायला हवे. कारण दिल्यानेच आपल्याला मिळते. हा खरा उत्सव आहे. साजरा करणे याचा असाही अर्थ आहे की, सर्व मतभेद दूर करून आत्म्याचे तेज वाढवणे. समाजातील प्रत्येकाने विवेकपूर्ण व्हायला हवे. आनंद आणि विवेक पसरवायला हवा आणि हे तेव्हाच होईल जेव्हा सर्वजण एकत्र येऊन विवेकात राहून उत्सव साजरा करतील.
दिवाळी हा सण मागील वर्षभरात झालेल्या कुरबुरी आणि नकारात्मकता विसरण्याचा सण आहे. तुम्हाला प्राप्त झालेल्या विवेकावर प्रकाश टाकण्याची आणि पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचे स्वागत करण्याची ही वेळ आहे.
जेव्हा खऱ्या विवेकाचा उगम होतो तेव्हाच उत्सव सुरू होतो. बऱ्याचदा उत्सव साजरा करताना तुम्ही तुमची एकाग्रता आणि सजगता घालवून बसता. उत्सवात ही सजगता टिकवून ठेवण्यासाठीच प्राचीन ऋषींनी प्रत्येक सणांत पूजा आणि पावित्र्याचा समावेश केला आहे. याच कारणासाठी दिवाळीतही पूजेचा भाग असतो. दिवाळीतील आध्यात्मिक विचारांनी या उत्सवाला एक सखोलता मिळते. कोणताही उत्सव हा आध्यात्मिक असायला हवा आणि अध्यात्माशिवाय सखोलता येत नाही.
दीपावली म्हणजे दिव्यांच्या रांगा ज्या आपण आयुष्यात कमावलेल्या विवेकाच्या द्योतक आहेत. सत्य आणि प्रेम यांनी अज्ञानावर मिळवलेला हा जय आहे.
सत्यभामेने नरकासुराचा केलेला वध हा या विजयाचे प्रतीक आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराचा वध केला गेला होता. नरकासुर (नरक) राजाला असा वर मिळाला होता की त्याचा मृत्यू फक्त स्त्रीच्या हातूनच येईल. श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामा हिच्या हातून त्याचा वध केला गेला.
केवळ सत्य्भामाच नरकासुराचा वध का करू शकली ? सत्य म्हणजे खरे आणि भामा म्हणजे प्रिय. असत्य किंवा प्रेमाचा अभाव यांना नरकावर विजय मिळवता येत नाही. िहसक मार्गाने तो घालवता येत नाही. केवळ प्रेम आणि समर्पण यानेच नरकापासून सुटका होऊ शकते. अिहसा, प्रेम आणि समर्पण हे स्त्रीचे उपजत गुण आहेत. त्यामुळे फक्त सत्यभामाच नरक नष्ट करून पुन्हा एकदा प्रकाश आणू शकली आणि नरकासुराची शेवटची इच्छा अशी होती की त्याचे जाणे म्हणजेच अंधकार नाहीसा होण्याचे प्रतीक म्हणून प्रत्येक घरात दिवे लावून साजरे केले जावे.
अशा प्रकारे प्रेम आणि विवेकाच्या प्रकाशाचा उगम साजरा करणारा हा उत्सव आहे, तसेच याच दिवशी दैत्यांचा राजा रावण याच्यावर विजय मिळवून राजा श्रीराम अयोध्येत, स्वत:च्या राज्यांत परत आले. अयोध्या म्हणजे जे नष्ट करू शकत नाही ते. राम म्हणजे आत्मा. जेव्हा जीवनात आत्म्याचे राज्य असते तेव्हा ज्ञानाचा प्रकाश पडतो. जीवन सर्वत्र आहे. पण जेव्हा जीवनात आत्मा जागवला जातो तेव्हा दिवाळी साजरी होते.
दिवाळीबद्दल अनेक दंतकथा असल्या तरी प्रत्येक हृदयात विवेकाचा दीप चेतविण्यासाठी आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित आणण्यासाठी दिवाळी साजरी केली जाते. जीवनाचे अनेक पलू आणि अनेक स्तर आहेत. त्या सर्वावर प्रकाश टाकणे हे आपले महत्त्वाचे काम आहे. कारण त्यातला एक जरी पलू अंधारात असला तरी जीवन पूर्णपणे खुलणार नाही. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक पलूवर तुम्ही ज्ञानाचा प्रकाश टाकण्याची गरज आहे हे तुमच्या ध्यानात आणून देण्यासाठीच दिव्यांच्या माळा लावल्या जातात. विवेकाची गरज सगळीकडेच आहे. कुटुंबातील एक व्यक्ती जरी अंधारात असेल तरी तुम्ही आनंदी राहू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाच्या मनात विवेकाचा दीप चेतावायला हवा. आणि तेच पुढे जाऊन संपूर्ण समाजात आणि पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसाच्या बाबतीत करायला हवे.
जो विवेकी असतो त्याच्यासाठी दररोज, अगदी प्रत्येक क्षणच दिवाळी असते. ही दिवाळी जागरूक राहून आणि मानवतेची सेवा करण्याचा संकल्प करून साजरी करायला हवी. तुमच्या हृदयात प्रेमाचा, घरात समृद्धतेचा दीप चेतवा, दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी करुणेचा, अज्ञानरूपी अंधकार घालवण्यासाठी ज्ञानाचा आणि देवाने आपल्यावर जो समृद्धतेचा वर्षांव केला आहे त्यासाठी कृतज्ञतेचा दीप चेतवा. ही दिवाळी तुम्हा सगळ्यांना खूप खूप आनंदाची जावो.
विवेकाच्या प्रकाशाचा सण
दिवाळी हा सण मागील वर्षभरात झालेल्या कुरबुरी आणि नकारात्मकता विसरण्याचा सण आहे. तुम्हाला प्राप्त झालेल्या विवेकावर प्रकाश टाकण्याची आणि पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची, स्वागत करण्याची ही वेळ आहे.
आणखी वाचा
First published on: 10-11-2012 at 03:24 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali festival of light