इवल्याशा पणतीचा इवलासा जीव, त्योच घेई परि समद्या अंधाराचा ठाव.. अशा या छोटय़ाशा पणतीच्या जीवावर सुरू झालेला कुसुमदीदीचा व्यवसाय आता सर्वदूर, पार सातासमुद्रापार गेला आहे. स्वतबरोबर अनेकांच्या कुटुंबांत आर्थिक स्थैर्याचा प्रकाश पसरवणाऱ्या कुसुमदीदींमधल्या समर्थ स्त्रीची ही खास दिवाळी भेट..
‘‘मिळवलेले ज्ञान, जोपासलेली कला-कौशल्ये ही जर व्यवसाय म्हणून स्वीकारली तर त्यातून मिळणारा आनंद द्विगुणित होतो. त्याचप्रमाणे आपल्यातली कला आणि कल्पकता जेव्हा आपल्याबरोबरच इतर दहा जणांचे संसार उजळून टाकते तेव्हा त्या आनंदाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.’’ गृहशास्त्र या विषयातून पदवी घेतलेली एक स्त्री जेव्हा तिच्या अनोख्या व्यवसायाबद्दल असे सांगते तेव्हा तिचे केवळ कौतुक वाटत नाही तर तिची ही भरारी अनेकांपर्यंत पोहोचवण्याचे मनोमन ठरवले जाते.
कुसुम मल-कोठारी या मूळच्या अकोल्याच्या. छोटय़ा शहरातील पदवीधर तरुणी, पण त्या तरुणीचा मुंबईतील एक यशस्वी उद्योजिका होण्यापर्यंतचा प्रवास ‘उत्सवी’ मार्गाने जाणारा आहे. दिवाळीसाठी लागणारे दिवे, कलाकुसरीच्या पणत्या, आकर्षक मेणबत्त्या, रांगोळ्या आदी बनवण्याचा त्यांचा उद्योग आता चांगलाच नावाजला गेला आहे.
ठाण्यातील वृंदावन सोसायटीत वास्तव्य असलेल्या कुसुमदीदी या व्यवसायाकडे वळल्या त्या हेतुपुरस्सर. आपल्याकडे सणांचं फारच कौतुक असतं. त्यात दिवाळी म्हटली की नवे कपडे, भेटवस्तू, मिठाया-फराळाचा खास बेत आणि आकाश कंदील, पणत्या यांची प्रकाशमयी सोबत, असं काहीसं समीकरण ठरलेलं. ‘रंगुनि रंगात साऱ्या..’ म्हणत अंगणाची, दाराची शोभा वाढवणाऱ्या रांगोळ्याही सणांचा कलात्मक आविष्कारच आहेत.
‘‘..या साजरीकरणात आपलाही वाटा हवा, असं वाटलं. शिवाय माझे पदवीपर्यंतचे शिक्षण गृहविज्ञान (होमसायन्स) या विषयातून झाले आहे. त्यामुळे गृहसजावट हा माझ्या आवडीचा आणि अभ्यासाचा विषय. मला पेंटिंगचीही आवड होती. याचं मी जरी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं नसलं तरी मला रंगसंगती, आकार याबाबतची सौंदर्यदृष्टी उपजतच होती. म्हणून या कलाकौशल्यांकडे व्यावसायिक हेतूने पाहावं असं वाटलं.’’ त्या सांगतात. कुसुम यांची मुले लहान होती. त्यावेळी पूर्ण वेळ नोकरीचा पर्याय कितीही प्रलोभनीय असला तरी शक्य नव्हता. म्हणून घरची जबाबदारी सांभाळून आवडीचे काहीतरी काम करावे म्हणून २००० साली दिवाळीत कुसुम यांनी या व्यवसायाचा श्रीगणेशा केला.
पूर्वीच्या काळी गेरूचा हात फिरवलेल्या मातीच्या लहानमोठय़ा आकाराच्या पणत्या दिवाळीत वापरल्या जायच्या. आता मात्र पणत्यांमध्ये बरीच विविधता आली आहे. मेणबत्त्या, रांगोळ्या यांचाही थाट तोच असला तरी नवनवे प्रकार आज उपलब्ध आहेत. आकर्षक रंगसंगतीने, नक्षीकाम करून सजवलेल्या मोहक रंगीत पणत्या आता घरोघरी विराजमान होऊ लागल्या आहेत. केवळ घरी वापरण्यापुरत्याच नाही तर भेट देण्यासाठी म्हणून पणत्या आवडीने खरेदी केल्या जात आहेत. पणत्यांचं मांगल्य, पारंपरिक महती कायम असली तरी तिचा आधुनिक अवतार परदेशातही नावाजला जाऊ लागला आहे. त्यामुळे पणत्यांना जगभरातून मागणी आहे.
कुसुम यांनी केवळ सातशे रुपयांच्या गुंतवणुकीतून पणत्या, त्यांच्या सजावटीचे साहित्य विकत आणलं. छान पणत्या तयार झाल्यावर नातेवाईकांना व काही परिचितांना त्या दाखवल्या. या पणत्यांचे खूप कौतुक झाले. मग कुसुम यांनीच आजूबाजूच्या दुकानांमध्ये जाऊन या पणत्या विकण्याचं ठरवलं. ‘‘आनंदाची गोष्ट म्हणजे पहिल्याच वर्षी त्या दुकानांमधून मला तीन वेळा पणत्यांची ऑर्डर मिळाली. त्याने माझा हुरूप वाढला.
घरगुती स्तरावर सुरू झालेल्या या उद्योगचा पसारा उत्तरोत्तर वाढतच गेला.’’ त्या उत्साहाने सांगतात. कुसुम यांनी हळूहळू मोठमोठाले शॉिपग मॉल्स, सुपर मार्केट अशा ठिकाणीही आपल्या पणत्या ठेवायला सुरुवात केली. एके दिवशी ‘डाबर इंडिया’ या नामांकित कंपनीकडून त्यांच्या ‘दिवाळी गिफ्ट हॅम्पर’साठी पणत्या तयार करून मिळतील का, अशी विचारणा करणारा फोन आला व कुसुम दीदी यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. अशा रीतीने तीन हजार पणत्यांची पहिलीवहिली ‘कॉर्पोरेट ऑर्डर’ त्यांना मिळाली. त्यानंतर कॉर्पोरेट गिफ्ट्स म्हणून वेगवेगळ्या आकारातील पणत्या, दिवे, पणत्यांचे स्टँड, लामणदिवे आदींसाठीची मागणी वाढू लागली. आता तर पाच फार्मा कंपन्यांचे ‘कॉर्पोरेट गिफ्ट्स पॅक’ बनवण्यात त्या दंग आहेत.
त्यांची कल्पकता दिवे, पणत्या यांच्यापुरतीच मर्यादित नाही. सध्या पारंपरिक रांगोळी काढायला सर्वानाच वेळ असतो असे नाही. त्यातच आताच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये रांगोळीसाठी अंगणही नाही. त्यामुळे दरवाज्यासमोरील जेमतेम जागेतच रांगोळी काढायची हौस भागवायची आणि आपली संस्कृती जपायची. अशा गृहिणींसाठी कुसुम यांनी क्रिस्टल, प्लास्टिक, कागदी, अॅक्रेलिक, लेस, स्टोन्स, इ. वापरून निरनिराळ्या तऱ्हेच्या सुंदर ‘प्लास्टिक रांगोळ्या’ बनवल्या. मोती, टिकल्या, आरसे, मणी, रंगीत काचा आदी साहित्य वापरून बनवलेल्या या रांगोळ्या दारात ठेवता येतात, काम झाले की उचलून ठेवून पुन्हा गरज भासेल तेव्हा वापरता येतात.
‘कॉर्पोरेट गिफ्ट्ससाठीची ऑर्डर पूर्ण करणे अत्यंत जबाबदारीचे काम असते. अत्यंत कौशल्याने हे काम हातावेगळं करावं लागतं. उत्पादनाचा दर्जा तर टिकवावा लागतोच, मात्र पॅकेजिंगही आकर्षक असावं लागतं. त्यासाठीही नवनव्या कल्पना लढवाव्या लागतात,’ असं कुसुमदीदी सांगतात.
दरवर्षी नवनवीन गोष्टींची बाजारातून मागणी असते. गेल्या काही वर्षांपासून व्ॉक्स कॅण्डल्स, फ्लोटिंग कॅण्डल्स, परफ्युम्ड कॅण्डल्स तसेच चमकदार क्रिस्टल पणत्या, दीपमाळ यांची मागणी खूप वाढली आहे. प्रवेशद्वाराजवळ एखाद्या नक्षीदार पितळी घंगाळात पाणी भरून त्यात फुलांच्या पाकळ्या आणि फ्लोटिंगकॅण्डल्स लावणं फारच विलोभनीय दिसतं. त्यामुळे जसा ट्रेंड असेल त्यानुसार उत्पादनांची निर्मिती केली जाते असे
कुसुमदीदी सांगतात.
दिवे किंवा पणत्या घराच्या कुठल्याही कोपऱ्यात अखंड तेवत ठेवणं, वास्तुशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानलं जातं. अनेक कार्यालयांमध्येही अशा बऱ्याच गोष्टी पाळल्या जातात. त्यामुळे कुसुम यांच्याकडील पणत्यांना वर्षभर मागणी असते. गरजेनुसार, आवडीनुसार त्यांचा आकार मात्र बनवून द्यावा लागतो.
विशेष म्हणजे कुसुमदीदींची ही उत्पादने सातासमुद्रापार पोहोचली आहेत. परदेशस्थ भारतीय आणि भारतीय संस्कृतीची थोडीबहुत जाण असणारी परदेशी मंडळी आपल्याकडील पणत्या, दिवे, रांगोळ्या यांच्या अगदी प्रेमात पडलेली असतात. त्यामुळे या उत्पादनांना जगभर मागणी असते. म्हणूनच तर कुसुमदीदींच्या पणत्या अमेरिका, इंग्लंड, मॉरिशस, डर्बन अशा अनेक देशांत आपली सांस्कृतिक पाळंमुळं अधिक घट्ट करत आहेत.
ही उत्पादने बनवण्यासाठी त्यांनी एक वर्कशॉप घराजवळच्याच एका रिकाम्या फ्लॅटमध्ये सुरू केले. आता कामाचा व्याप वाढला असून एकूण दहा-बारा अशिक्षित कुटुंबे त्यांनी मदतीला ठेवली आहेत. वर्षभर कुसुमदीदींचे काम सुरूच असल्याने त्यांनाही कायमस्वरूपी रोजगाराची सोय झाली आहे.
दिवाळीनंतर दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर कुसुमदीदी व त्यांच्या गटाचे काम नव्या जोशाने सुरू होते. पुन्हा नवीन डिझाइन्स केल्या जातात व संबंधितांना पाठवल्या जातात. त्यांच्याकडून संमती मिळाली की काम सुरू. साधारण मार्च-एप्रिलमध्ये परदेशातील ऑर्डर्सचे कंटेनर्स जायचे असतात. त्या आधी सर्व तयार व्हायला हवे असते. त्यामुळे वर्षभर उसंत नसते. कुसुम यांच्या घरच्या सर्व मंडळींची (सासरच्या आणि माहेरच्या) याकामी त्यांना मोलाची मदत होते. त्यांचे पती आता याचं मार्केटिंग पूर्णपणे सांभाळतात, त्यामुळे निर्मितीवर त्या भर देऊ शकतात.
कुसुमदीदींचा हा पणत्या आणि रांगोळीचा व्यवसाय आता चांगलेच बाळसं धरू लागला आहे. आपल्यातील सृजनशील कौशल्यांच्या माध्यमातून त्यांनी जे व्यावसायिक यश मिळवलं ते नक्कीच अनुकरणीय आहे. इवल्याशा पणत्यांच्या निमित्ताने त्यांच्याकडे काम करणाऱ्या दहा-बारा कुटुंबाच्या चुलीही पेटत्या राहतायत हेही नसे थोडके..
म्हणूनच कुसुम कोठारी, प्रकाशाचं एक स्वयंभू बेट आपलं सभोवताल एखाद्या पणतीसारखंच उजळून टाकते आहे, याचा हेवा वाटल्याशिवाय राहात नाही!
उत्सव दिव्यांचा : इवल्याशा पणतीचा…
इवल्याशा पणतीचा इवलासा जीव, त्योच घेई परि समद्या अंधाराचा ठाव.. अशा या छोटय़ाशा पणतीच्या जीवावर सुरू झालेला कुसुमदीदीचा व्यवसाय आता सर्वदूर, पार सातासमुद्रापार गेला आहे. स्वतबरोबर अनेकांच्या कुटुंबांत आर्थिक स्थैर्याचा प्रकाश पसरवणाऱ्या कुसुमदीदींमधल्या समर्थ स्त्रीची ही खास दिवाळी भेट..
आणखी वाचा
First published on: 10-11-2012 at 03:24 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali light panti