आयुष्याची रांगोळी रेखताना, काही कटू क्षण कुठेही न सांधता नुसतेच सोडून द्यायचे असतात- रांगोळीतल्या ‘सोडलेल्या’ ठिपक्यांसारखे. आयुष्याच्या रांगोळीची खुमारी त्यामुळेच वाढते! .. रांगोळीचा छंद जोपासता जोपासता अचानक हाती गवसतो तो आनंदाचा घडा, दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा.. आमच्या दोन वाचक मत्रिणींनी पाठवलेल्या या आठवणी.. रांगोळीच्या. खास दिवाळीनिमित्ताने तुमच्याही आठवणी ताज्या करणाऱ्या..
ब दलत्या काळानुसार, सणावाराचं रूपही झपाटय़ानं बदलत चाललंय. सणांचे आता ‘इव्हेंट’ झालेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये!.. प्रायोजित कार्यक्रम, शोभायात्रा, जाहिरातींनी खचाखच भरलेल्या दैनिकांच्या लठ्ठ आवृत्त्या आणि शुभमुहूर्त साधून, घराच्या भौतिक श्रीमंतीमध्ये पडणारी भर- वर्षांतील कुठल्याही महत्त्वाच्या सणाला प्राप्त झालेलं हे बाह्य़रूप. पण याखेरीजही सणासुदीचं अद्याप टिकून राहिलेलं मनोहर रूप म्हणजे, दारी उमटणारी प्रसन्न रांगोळी!.. इतर सर्व गोष्टींपेक्षा सणाचं रांगोळीशी जडलेलं विलोभनीय नातं मला नेहमीच मोहवून टाकतं. हे नातं माझ्या परीनं निभावण्याचा खटाटोप म्हणजे माझ्यासाठी सणाच्या साजरेपणाचा विशेष आनंद!..
रांगोळी म्हणजे खरं तर अंगणाचा जन्मसिद्ध हक्क. झाडलोट केलेलं मातीचं सपाट, घट्ट अंगण. त्यावर शिंपलेला खमंग मृद्गंधी सडा. पाणी जिरलं की पुसटसा ओलावा तेवढा माघारी ठेवून, रांगोळीला हाक मारणारं अंगण!.. लहानपणी वाडय़ाच्या मागील दारी ही चैन मी माझ्या शेजार-मैत्रिणींसह मनमुराद लुटली! आता ही चैन इतिहासजमा होत चाललेली.. काँक्रीटचे रस्ते दारा-फाटकांना भिडले, इमारतींचे परिसर शिस्तबद्ध फरशांनी ताब्यात घेतले. ग्रॅनाइटच्या गुळगुळीत पायऱ्यांना तर मातीचं सक्त वावडं!.. मातीचं अंगणच लुप्त झालं खरं, पण सुदैवाने त्याने रांगोळीला मागे ठेवलं. रांगोळीही मोठी समजूतदार झालीय.. ओल्या मातीच्या अंगणाचा हट्ट तिने केव्हाच सोडून दिला! कुठल्याही पृष्ठभागावर आता ती आनंदाने बैठक जमवते.
रांगोळी आता अधिक औरस-चौरस, ठसठशीत आणि ‘वजनदार’ झालीय!.. इतक्या किलोची, तितक्या किलोची अशी ती किलो-किलोनं वाढतेय! पण ठिपक्यांच्या आटोपशीर रांगोळीचं शालीन लावण्य तिच्यात नाही. भपका आहे, पण मार्दव नाही. एकमेकांपासून समान अंतर राखण्याचा कटाक्ष ही ठिपक्यांची खासियत आणि जोडले न जाता नुसतेच मोकळे ‘सोडलेले’ ठिपके ही या रांगोळीची खरी रंगत! रांगोळीतल्या या ‘सोडलेल्या’ ठिपक्यांचा संदर्भ, वासंती गाडगीळांच्या आत्मकथेचं सूत्र फार चपखलपणे व्यक्त करतो. त्यांच्या आत्मकथेचं नावच मुळी ‘रांगोळीचे ठिपके’!.. आयुष्याची रांगोळी रेखताना, काही कटु क्षण कुठेही न सांधता नुसतेच सोडून द्यायचे असतात- रांगोळीतल्या ‘सोडलेल्या’ ठिपक्यांसारखे. आयुष्याच्या रांगोळीची खुमारी त्यामुळेच वाढते!.. असो.
निदान सणावारी तरी रांगोळीशी नातं निभावणं ही माझ्यासारख्या (प्रथितयश वगैरे!) डॉक्टरसाठी जरा कठीणच गोष्ट. प्रवेशद्वारासमोर रांगोळी सजविण्याची हौस भागविण्यासाठी रस्त्यावर बसणं आलं.. ‘डॉक्टर असूनही काय हा सडा- रांगोळीचा सोस?’ अशा आशयाने मग काही भुवया उंचावतातच. तरीही त्या भुवयांना नजरअंदाज करीत मी वर्षांतून दोन-चारदा तरी रांगोळी-सौख्य पदरी पाडून घेतेच!.. काँक्रीटच्या स्वच्छ धुतलेल्या पृष्ठभागावर रांगोळी रेखाटताना जाणवते, मातीच्या ओलाव्याची उणीव!.. रांगोळीला अलगद स्वत:मध्ये सामावून घेण्याची ओल्या मातीची असोशी काँक्रीटमध्ये नाही. अंगणातील मातीच्या ओल्या कुशीत रांगोळी कशी निर्भय, निर्धास्त असते! विस्कटण्याचं मुळी भयच नाही. वारा तर सोडाच, हलक्या पर्जन्यसरींनीदेखील ती डगमगत नाही. एवढंच काय दुसऱ्या दिवशीच्या झाडू-फडय़ालादेखील ती कधी कधी पुरून उरते! याउलट, फरशी/ काँक्रीटवरल्या रांगोळीचे अस्तित्व, हलक्याशा वाऱ्याच्या झुळुकीनेही लगेच धोक्यात येते!.. श्रीमंती ग्रॅनाइटवर रेखाटलेली शोभिवंत रांगोळी पाहून मनास प्रश्न पडतो- ‘माणसा माणसातली नातीही अशीच झालीत का- साध्या फुंकरीनेही विस्कटून जाणारी?’..
विस्कटलेल्या रांगोळीची माझी ही एक आठवण सांगण्याजोगी आहे- संक्रांतीच्या हळदीकुंकू समारोहानिमित्ताने, जिन्यामधल्या लँडिंगचा कोपरा रांगोळीने सजवण्याचे मी ठरवले. जाणारी-येणारी पावले आणि वारा यांच्यापासून रांगोळीची राखण व्हावी म्हणून मुद्दाम निवडलेला हा कोपरा. रांगोळी, रंगांचे डबे वगैरे घेऊन मी बैठक जमवली. मोर पिसाऱ्यासारखी विविध छटा असणारी भरगच्च नक्षी काढण्यात मी रंगून गेले. माझ्या अगदी बाजूलाच, माझी अत्यंत लाडाची मांजरीदेखील नंदीबैलासारखी पाय मुडपून, गुर्रऽऽ गुर्रऽऽचा लाडातला मंद ध्वनी आळवीत आसनस्थ झाली!.. तिच्यासाठी हा एकूणच प्रकार फारच कुतूहलजन्य असल्याने, ती तो मोठय़ा ‘तब्येती’ने न्याहाळत होती.
अध्र्या-पाऊण तासाच्या मेहनतीनंतर, मनासारखी मस्त रांगोळी जमल्याच्या खुशीत मी उठले. मी उठताच मांजरी उठणार हे तर ठरलेलेच!.. रांगोळीचे डबे वगैरे घेऊन मी उठले अन् वरच्या पायऱ्या चढू लागले. पायऱ्यांवर नेहमी माझ्या पुढे पायात पायात लुडबुडणारी मांजरी आज अद्याप मागे कशी, याचे नवल वाटल्याने मी मागे वळून पाहिले.. पॉलिश्ड गुळगुळीत फरशीवर मी अंथरलेल्या खरबरीत रांगोळीच्या गालिच्यावर यथेच्छ उलटी सुलटी लोळत, आपली पाठ खाजवण्याची हौस मांजरी पुरी करून घेत होती!.. आपल्या या रांगोळीवरील दिलखुलास लोळण्याचं माझ्याकडून नक्कीच कौतुक होण्याची अपेक्षा तिच्या डोळ्यातून बिलंदरपणे डोकावत होती!..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा