प्रेमात पडणं जितकं सहज असतं तितकं कठीण त्यातून बाहेर पडणं. अनेकदा प्रेमभंगाचा कटू घोट पचवावाच लागतो. जे तो पचवू शकत नाहीत, पचवू इच्छित नाहीत ते मग आत्महत्येचा विचार करतात. काही तर अमलातही आणतात. जिया खानने तेच केलं. पण ‘मरणं सोपं असतं, जगणं कठीण’. या कठीण आयुष्याला आपलंसं कसं करता येईल हे सांगणारा सायको थेरपिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अंजली पेंडसे यांचा लेख.
‘‘तसा तो काही खूप देखणा वगैरे नव्हता. पण उंची सहा फूट एक इंच होती आणि एकूण मस्त म्हणजे स्मार्ट होता. जिथे जाईल तिथे त्याचं छान इंप्रेशन पडायचं. त्याचा मित्र माझ्या भावाचाही मित्र. म्हणून एकदा घरी आला. तेव्हा ओळख झाली. मग कळलं माझ्याच ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये त्याचंही ऑफिस आहे. म्हणजे चार मजले वरती. दुसऱ्याच दिवशी तो मला शोधत माझ्या ऑफिसमध्ये आला. थोडय़ा दिवसांनी त्याने ‘फ्रेंडशीप’साठी विचारलं.’’ जेमतेम तेवीस वर्षांची ती डोळ्यांतले पाणी मधूनच पुसत मला सांगत होती.
‘‘फक्त फ्रेंडशीपसाठी.. असं विचारलं?’’ मी .
ती म्हणाली, ‘‘हो. म्हणजे त्याच्या भावाचं लग्न व्हायचं होतं. ते झालं की लगेच तो मला लग्नासाठी विचारणार होता. अहो, आम्ही रोज भेटत होतो. बोलत होतो. एकमेकांबरोबरच्या सहवासाची, संसाराची अगदी मुलाबाळांचीही स्वप्न रंगवत होतो. आम्हा दोघांना पगार चांगले असल्याने कुणावर अवलंबून नव्हतो. आई-वडील दोघांचेही- संमती देतील याची खात्री होती. सुरुवातीला तो आला की ऑफिसमधल्या मैत्रिणींच्या, सहकाऱ्यांच्या खाणाखुणा चालत. भुवया उंचावल्या जायच्या. पण याने त्यांची स्वत:हून ओळख करून घेतली. इतकंच काय आम्ही एंगेजमेंट ठरली की लागणाऱ्या अंगठय़ासुद्धा पसंत करून ठेवल्या होत्या!’’ आता तिचा बांध फुटला. ती हुंदके देऊन रडायला लागली. तिच्या भावनांचा भर ओसरल्यावर मी विचारलं, ‘‘मग, असं एकदम काय झालं?’’ आता तिच्या दु:खाची जागा रागाने घेतली. कडवटपणाने घेतली. म्हणाली, ‘‘एकदम वगैरे काही नाही. चांगले तीन महिने तो त्या दुसऱ्या मुलीबरोबर हिंडत होता. मला ऑफिसमध्ये नसून बाहेरच्या कामात गर्क असल्याचं सांगत होता. परवा तो मला भेटायला आला. आम्ही कॉफी प्यायला गेलो. तिथेच त्याने सांगितलं. त्याच्या वडिलांच्या मित्राच्या मुलीबरोबर त्याची एंगेजमेंट झाली. मुलीच्या वडिलांचा मोठा व्यवसाय आहे आणि ही एकुलती एक मुलगी आहे. म्हणजे त्यांच्यासाठी कोरा चेकच की! सासऱ्याने पुण्यात तीन बीएचकेचा फ्लॅट याच्या नावाने बुक केलाय. लग्नानंतर त्याच्या कंपनीत याला जॉब देऊन वर फॉरेनचं पोष्टिंग देतोय. हे सगळं सांगतानाही तो इतका कूल होता. वर निर्लज्जपणाने मला म्हणाला, ‘‘आय अॅम सॉरी. पण तू मनात काही ठेवू नकोस. एखादा छान मुलगा बघ आणि लग्न कर.’’ ‘‘नालायक ०. अहो, माझ्यावर घरचे इतके चांगले संस्कार आहेत की मला त्याला धड सणसणीत शिव्यासुद्धा देता येत नाहीत. आधी मला वाटलं तो माझी गंमत करतोय. पण तो गंभीर आहे लक्षात आल्यावर मी सुन्नच झाले. तडक घरी निघून आले. काही सुचत नव्हतं. मग त्याचे माझे संभाषण पुन:पुन्हा डोक्यात येऊ लागले. त्याच्याशिवाय जगण्याची मी कल्पनाही करू शकत नाही. लोकांना कळलं तर हसतील मला. कीव करतील माझी. मी इतकी वाईट आहे का की त्याने मला सोडून द्यावं? मला स्वत:चीच दया यायला लागली. वाटलं पुढचं एवढं मोठं आयुष्य मी कसं जगणार? दुसऱ्या कुणाबरोबर लग्न करण्याची कल्पनाही भयानक वाटतेय. शेवटी आई भाजी आणण्यासाठी बाहेर गेली तेव्हा सुरी घेतली आणि नसच कापली. हे असलं जगण्यापेक्षा मेलेलं चांगलं. पण तिथेही दुर्दैव बघा. पैशांचं पाकीट विसरली म्हणून आई लगेचंच वाटेतून घरी आली आणि ..’’ बँडेज बांधलेल्या मनगटावरून ती हळूच हात फिरवत राहिली.
‘‘हं! मरायचा तुझा बेत तर फसला. मग आता काय त्याचा सूड वगैरे घ्यायचा तुझा प्लॅन आहे का?’’ मी सहजपणे विचारलं. तिच्या चेहऱ्यावर नजर रोखली आणि ओठांवरून जीभ फिरवत थोडी मिश्कील हसले.
‘‘अं?’’ तिने चमकून माझ्याकडे पाहिलं. ती माझ्याकडे बघत राहिली. एक खजिल, खिन्न, संकोची हसू आणि मग ‘ओ! माय गॉड!!’ म्हणत थोडी मोकळी हसली. मी मनातल्या मनात एक सुटकेचा नि:श्वास टाकला. ही मुलगी हळूहळू का होईना, पण काळोखातून बाहेर येऊन जगण्याचं नवं गाणं नक्की शिकणार होती. नव्या सुरावटीवर गाणार होती.
वयात येताना, वयात आल्यावर प्रत्येकाच्या मनात स्वत:साठी अनुरूप असा राजकुमार-राजकुमारी डोकावू लागते. तरुणपणाच्या श्वासाचा गंध या आकृतीला असतो. स्वप्नांचे रंग तिला मनात ‘मेड फॉर इच अदर’चे स्थान देतात. जगण्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर या आकृतीला प्रत्यक्षात साकारणारी खरी व्यक्तीच दिसते, भेटते आणि प्रेमात पडून एकमेकांशिवाय जगणंच नाही याची ग्वाही मिळते. पण ही परिकथेतली राजकुमारी-राजकुमार स्वप्नांऐवजी कटू सत्याचे रंग दाखवू लागले की, अवघ्या अस्तित्वालाच हादरा बसल्यागत होतं. कधी प्रेम एकतर्फीच असतं. दुसऱ्या व्यक्तीचा सकारात्मक प्रतिसाद हा फक्त स्वप्नरंजनात आणि दिवास्वप्नात असतो. हे सत्य पचवणं अवघड वाटतं आणि दु:खाचा-निराशेचा प्रवास सुरू होतो. कधी क्वचित स्वत:चे जीवन संपवण्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीचेच जीवन संपवण्याचा क्रूर प्रयत्नही होतो.
प्रेमात पडणं ही घटना जितकी सकारात्मक तरल आणि सुंदर भावना आणते त्याच्या उलट प्रेमभंगाची घटना नकारात्मक, नैराश्य, दु:ख आणि कटुतेच्या भावना आणते. प्रेमभंगाची कारणं काहीही असोत- माणसं, परिस्थिती किंवा आणखी काही- आपण नाकारले गेलो हे सत्य मुळातच पटणं कठीण वाटतं. मग ते पटून पचवणं अधिकच पुढची गोष्ट झाली. माणसात मुळातून हादरायला होतं. एक सुन्नपण, रितेपण, दु:ख, निराशा, विषण्णता, कडवटपणा, संताप, त्वेष, सूड, बदला, एकटेपण अशा साऱ्या भावनांचा आवेग इतका असतो की तो मनात पेलवत नाही. लोकांनी हसणं, तुच्छ लेखणं, कीव करणं, दया दाखवणं, सहानुभूती दाखवणं याची कल्पनाही अहम्ला पीडा देते. प्रेमातल्या व्यक्तीने नाकारणं माणसाला इतकं हतबल करतं की सारासार बुद्धी संपते. विवेक संपतो. तर्कभावना मागे पडते. असह्य़ होणाऱ्या नकारात्मकतेतून सुटकेचा मार्ग म्हणजे आपण मरणं-आत्महत्या करणं ही भावना, हा विचार इतका प्रबळ होतो की तो अनेकदा माणसं कृतीत आणतात. कधी फास लावून घेतात, विषारी औषध पितात, नसा कापून घेतात, जाळून घेतात किंवा आणखी काही- पण जगणंच नाकारतात. अलीकडेच जिया खान या कोवळ्या वयातल्या अभिनेत्रीने असंच केलं.
मग आपल्याला प्रश्न पडतो, ‘अरे हे काय मरायचे कारण आहे? हे काय मरायचे वय आहे? तारुण्य म्हणजे प्रेमात पडणंच आहे? तारुण्यातल्या साऱ्या सकारात्मक शक्ती आणि सकारात्मक ऊर्जा एकाच आवडीच्या व्यक्तीवर उधळून द्यायच्या आणि त्यातच जगण्याची कृतकृत्यता मानायची हाही तारुण्याच्या कच्च्या वयाचा उथळपणा नाही का? मग याच वयातल्या याच शक्ती, ऊर्जा आणि जोश वापरून उत्तम करिअर करायचं, वेगवेगळ्या छंदांमध्ये रमायचे, खेळातून आणि इतर स्पर्धात्मक कृतींमधून भाग घ्यायचा, पराक्रम गाजवायचा, आपल्या क्षमता नवं नवं शिकून वाढवायच्या. नवी कौशल्य आत्मसात करायची आणि नव्या आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जायचे हे सगळं भान प्रेमात पडल्यावर विसरायला कसं होतं? आपल्याला आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रिणी, नातलग, परिचित, आप्त, गुरुजन ही सगळी नाती या एकाच प्रेमभंगामुळे फोल वाटू लागतात ही चूक नाही का? या साऱ्या नात्यातल्या माणसांचा विश्वास तरुण मुलांना का वाटत नाही याचाही आपण विचार करायला पाहिजे. मन मोकळं केलं की भावनांचा निचरा होतो आणि मग दु:ख, निराशा अशा भावना आत्महत्या करण्याएवढय़ा प्रबळ राहत नाहीत.
प्रेमातल्या व्यक्तीनेच आपल्या अस्तित्वाची आणि साऱ्याच सुंदरतेची ग्वाही द्यावी अन्यथा आपण कुणीच नाही हे का ठरवलं जातं? स्वत:चा विश्वास जर वाटत नसेल तर आपण नीट विचार करत नाही हे नक्की. आपल्यातले गुण, आपल्या क्षमता, आपली बुद्धी, आपली कौशल्य, आपली विजिगीषा- कुणी एखाद्या व्यक्तीने नाकारल्याने लयाला जात नाही. आपण नीट विचार केला तर ज्या सहजपणे प्रेमात पडतो त्याच सहजपणे त्याचा भंगही स्वीकारायला हवा. तरुणपणात ही मनाची पक्वता नसते. पण मग इतर प्रेमाची माणसं- घरातली, बाहेरची आहेत ना! त्यांची मदत नि:संकोचपणे घ्यायला हवी. खरं तर शहाणपणाची गोष्ट म्हणजे आपलं तरुणपण स्वीकारतानाच मनाची दिशा आपल्या करिअर करण्याकडे वळवायला हवी.
सोहम आणि नीला यांचा एक छान ग्रुप आहे. बारा-तेरा जणांचा. कॉलेजमधलेच सगळे आहेत, पण एका वर्गात नाहीत. एक-दोन वर्षं मागे-पुढे असा ग्रुप आहे. नीलापेक्षा सोहम दोन र्वष पुढे होता. एका प्रश्नमंजूषेच्या स्पर्धेत ते दोघे पार्टनर होते आणि त्यांनी कॉलेजात ढाल जिंकून आणली. या स्पर्धेची तयारी करण्यासाठी ते दोघे बरेचदा भेटले. एकमेकांच्या घरीही गेले. या सगळ्या कालावधीत नीलाला सोहम खूप आवडायला लागला. ती त्याच्या प्रेमात कधी पडली ते तिलाही कळलं नाही. सोहमलाही नीला आवडत होती, पण तो उघडपणे दाखवत नव्हता. शेवटी नीलाने एक दिवस पुढाकार घेतला आणि आपलं प्रेम व्यक्त केलं. सोहम गंभीर झाला. म्हणाला, ‘‘नीला मी विचारत नाही हे बघून कधीतरी तूच विचारशील ही मला अपेक्षा होती. मी खोटं बोलणार नाही. मलाही तू आवडतेस, पण माझी एक हुशार चुणचुणीत स्मार्ट अशी मैत्रीण म्हणून. मला आधी माझं करिअर करायचं आहे. त्यामुळे शैक्षणिक कर्ज घेऊन मी परदेशी पुढे शिकायला जाईन. शिक्षणानंतर मग चांगली नोकरी बघेन. त्यानंतरच मी लग्नाचा विचार करीन. त्यामुळे अजून चार-पाच र्वष तरी थांबावं लागेल आणि खरं सांगू का? माझ्या जोडीदाराच्या कल्पनेत तू छान असलीस तरी बसत नाहीस. वाईट वाटून घेऊ नकोस आणि इतकी छान मैत्रीही तोडू नकोस. आपण एकमेकांवर कायम हितचिंतक म्हणून विश्वास ठेवू शकतो.’’ नीलमला वाईट वाटलंच. पुढे काही दिवस अस्वस्थही वाटलं. पण सोहम नेहमीसारखाच वागत होता. ग्रुपला सारं माहीत होतं. पण त्यांनीही तो विषय बाजूला सारला. आता काही वर्षांनंतर सोहम, नीलाचे वेगवेगळे जोडीदार असले तरी त्यांच्यासह दोन कुटुंबाचीच मस्त मैत्री आहे. हे करता आलं पाहिजे आणि सांभाळताही आलं पाहिजे. या काही वर्षांच्या अभ्यासाने आपली क्षमता, आपली कौशल्यं, आपले व्यक्तिमत्त्व सर्व अंगांनी विकसित होतंच, पण पुढील यशस्वी आणि संपन्न जीवनाचा पायाही याच वयात घालता येतो. ज्ञानार्जन, विद्यार्जनाचे महत्त्व लक्षात ठेवले की ट्रॅक चुकत नाही. या वयात भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणं नैसर्गिक आहे. सहज आहे. म्हणून कुणाचं दिसणं, कुणाचं बघणं, कुणाचं बोलणं, कुणाचं छेडणं, कुणाचा स्वभाव, कुणाची हुशारी – असं काही ना काही आवडणंही साहजिक आहे. पण मनाला अभ्यासाचा, करिअर उत्तम करण्याचा लगाम घातला असला तर मैत्रीची मर्यादा पाळली जाते. मित्र-मैत्रीण हे प्रेमिक होत नाहीत. किंबहुना अशा वयातल्या चांगल्या मित्र-मैत्रिणींची मैत्री ही जीवनभराची मैत्री होऊ शकते. जगण्यातले एक मोठे अॅसेट अशी हेल्दी मैत्री ठरू शकते.
तशी ही दोरीवरची कसरतच आहे. करिअर करायचं- तेही प्रेमात न पडता! पण, समजा कधी चुकून प्रेमात पडून प्रेमभंग झालाच तर त्यामुळे आपण जगण्यापासून पळून जाण्यापेक्षा अधिक पक्वतेने जगण्याचा विचार करायला हवा. सामोरं येईल तसं आयुष्य झेलून सुंदर करण्याच्या आपल्या मनाच्या क्षमतेवर भरवसा ठेवायला हवा. जसा वेळ जातो, काळ जातो तशा मनातल्या भावनाही बदलतात. आपलं जगणं समृद्ध करण्याचा ठेका कुणा एकालाच दिलेला नसतो. कारण आपलं जगणं आपणच समृद्ध करत असतो. आवडत्या माणसाची साथ मिळाली तर छानच! पण नाही तर पुढे दुसरंही कुणी आवडू शकतं. पण हा चान्स आपण स्वत:ला द्यायला हवा! कारण
‘अशीच असते यौवन मात्रा
शूल व्यथांचे उरी वहावे
जाळत्या जखमा वरी स्मिताचे
गुलाबपाणी शिंपित जावे!’
प्रेमभंग झाल्यास, रडू येत असल्यास भरपूर रडावं, जवळच्या मित्र-मैत्रिणीला सांगावं, एकटं न राहता घरातल्या माणसांबरोबर किंवा मित्र-मैत्रिणींबरोबर राहावं, आपल्याला कसं वाटतं आहे हे पुन:पुन्हा बोललं तरी चालेल. त्यामुळे भावनांचा निचरा होतो, आपल्या मनात जे येईल ते लिहून काढावे आणि पुन्हा न वाचता कागद फाडून फेकून द्यावे. हळूहळू बरे वाटू लागते. आपल्या जगण्याचा नव्याने विचार करायला हवा. त्याचबरोबर आपल्या रुटीनमध्ये नवी रचना, नवे बदल करावेत. ज्यामुळे मन रमेल अशा कृती कराव्यात. मुख्य म्हणजे ज्याने नाकारले त्या व्यक्तीला मनातून क्षमा करावी आणि शुभेच्छा द्याव्या. म्हणजे त्या व्यक्तीबद्दलच्या कडवट,नकारात्मक भावनांवर मात करू शकतो. त्यातूनही सावरता येत नसेल तर मानसोपचार तज्ज्ञांची, समुपदेशकांची मदत अवश्य घ्यायला हवी. अशी एखादी घटना झाली की अनेकदा ती व्यक्ती स्वत:ला कमी समजायला लागते. आपण नकाराच्याच लायकीचे आहोत, अशी भावना मनात निर्माण होते. पण त्याऐवजी आपली किंमत त्या व्यक्तीला कळली नाही हे मनाला समजवून सांगायला हवे. एखाद्या व्यक्तीच्या नाकारलेपणाने आपलं आयुष्य खराब होत नाही. आपल्याला दुसरा आणखी चांगला पार्टनर मिळणार असेल – हा विचार करावा. यातून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपले लक्ष आपल्या करिअरवर केंद्रित करावे, अभ्यासावर लक्ष केंद्रित करत या घटनेकडे अनुभवविश्व वाढवणारा अनुभव म्हणून पहावे. या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी स्वत:ला भरपूर वेळ द्यावा.आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपले कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी, आप्त आहेत जे आपल्यावर प्रेम करतात, त्यांना आपण हवे आहोत हे लक्षात ठेवायला हवं.
मनाचं सौंदर्य म्हणजे मन लवचीक असतं. ते पुन्हा जगण्यामध्ये रस घेऊ लागतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा