पारदर्शकता जशी डॉक्टरांकडून अपेक्षित आहे, तशीच रुग्णांकडूनही आहे. रुग्णाच्या अज्ञानाचा डॉक्टरांनी गैरफायदा धेऊन त्यांना गृहीत धरू नये. तसे रुग्णांनीही वागायला हवे.
माझी मुलं लहान असताना नेहमी तक्रार करायची, ‘आई, तुला पेशंट तपासायला फार वेळ लागतो, म्हणून तू रोज घरी यायला उशीर करतेस.’ तपासण्याव्यतिरिक्त रुग्णास द्यावा लागणारा वेळ हा डॉक्टर-रुग्ण संबंधात किती महत्त्वाचा असतो हे त्यांना तेव्हा साहजिकच कळायचं नाही. रुग्णाच्या तब्येतीच्या तक्रारींचं आकलन व तपासल्यावर निरीक्षणं करून, डॉक्टर त्याच्या आजाराचं अनुमान काढतात व खात्रीसाठी काही चाचण्या करून घेतात. त्यानंतर सल्ला व उपाययोजना सुरू होते.
या प्रक्रियेमध्ये डॉक्टर व रुग्ण यांमधील सुसंवाद फार महत्त्वाचा असतो. रुग्णाचं दृश्य शरीर व अदृश्य मन या दोन्हींचा विचार करून सुयोग्य संवाद व स्वच्छ व्यवहाराद्वारे डॉक्टर-रुग्ण संबंधात पारदर्शकता ठेवता येते. अर्थात संवादात प्रत्येक वेळी हे मला साधतंच अशी बढाई मी कधीच मारणार नाही; पण त्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न मात्र नक्की असतो.
काही दिवसांपूर्वी अपेंडिक्सच्या त्रासासाठी आमच्याकडे आलेल्या रुग्णाला शस्त्रक्रिया करावी लागणार हे सांगितल्यावर त्याने खर्चाचा अंदाज विचारला. त्यावर त्याला अंदाजे रुग्णालयाचे बिल, बेहोशीच्या डॉक्टरांचे पसे, औषधोपचारांचा खर्च, पॅथॉलॉजिस्ट व रक्तचाचण्यांचा खर्च वगरे गोष्टींसकट खर्चाचा साधारण अंदाज देण्यात आला; जो त्याला जास्त वाटला. त्यानंतर त्याने जवळच्या एका मोठय़ा रुग्णालयात जाऊन चौकशी करून तिथे शस्त्रक्रिया करून घेतली; कारण तिथे दिलेल्या खर्चाचा अंदाज खूप कमी होता. प्रत्यक्षात रुग्णालयातून सोडताना जेव्हा बिल हातात आले; तेव्हा ते त्याला दिलेल्या अंदाजापेक्षा कितीतरी जास्त होते. मग वादविवाद सुरू झाला व गोष्ट आटोक्याबाहेर जाऊ लागली. शेवटी ज्यांनी अंदाज दिला व शस्त्रक्रिया केली; त्या डॉक्टरांना बोलावण्यात आलं. ते म्हणाले, ‘मी तर यांना शस्त्रक्रिया करण्याचे माझे चार्जेस किती होतील; ते सांगितले. इतर खर्चाचा आढावा ते रुग्णालयाच्या काउंटरवर विचारून जातील असं मला वाटलं.’ अशा रीतीने सर्जनची फी म्हणजे पूर्ण बिल अशा गरसमजात राहून शेवटी बिलाची मोठी रक्कम कशीबशी चुकती करून त्याने डिस्चार्ज घेतला. शेवटी आमच्याकडे सांगितलेल्या खर्चाच्या दीडपट-दुप्पट पसे खर्च करून तो त्या रुग्णालयावर कायमचा चरफडत राहिला. पुरेशा माहितीचा अभाव व संवादातील त्रुटी हे यामागचे कारण!
१५ वर्षांपूर्वी आम्ही शस्त्रक्रिया करून बाहेर आल्यावर ‘रुग्णाच्या पोटात एक लिटर पू निघाला, आतडे फुटले होते’ असे सांगितले, की नातेवाईकांची पहिली प्रतिक्रिया अशी असे-‘डॉक्टर, आम्हाला त्यातलं काय कळणार? तुम्ही सांगाल त्यावरच विश्वास ठेवावा लागणार आम्हाला’! या उद्गारातून एक असहायतेचा, अविश्वासाचा सूर असायचा. ‘डॉक्टर उगीच आतली परिस्थिती गंभीर होती, असे सांगून जास्त पसे लाटणार ’ अशी संशयी नजर त्या वेळी जाणवत असे. पण लॅप्रोस्कोपी, एंडोस्कोपीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियांमध्ये दुर्बणिींना कॅमेरा असल्यामुळे शरीराच्या आतील परिस्थितीचे व शस्त्रक्रियेचे रेकॉìडग होत असते. ते शस्त्रक्रिया चालू असताना थेट प्रक्षेपणाद्वारे किंवा ती संपल्यावर सीडीमार्फत रुग्ण व नातेवाईक बघू शकतात. त्यामुळे  ‘याचि देही याचि डोळा’ ते बघायला मिळाल्यामुळे शंकेला जागा राहत नाही. डॉक्टर-रुग्ण संबंधात या नवीन तंत्रज्ञानामुळे पारदर्शकतेची एक पुढील पायरी गाठली आहे, हे निश्चित!   
कधी कधी आपल्याला झालेला आजार मनाने स्वीकारण्याची रुग्णाची व नातेवाईकांची तयारी नसते. एकदा एका बाईंना हृदयाच्या अनियमित ठोक्यांसाठी डॉक्टरांनी कायमस्वरूपी काही औषधं चालू केली. तेही त्या रुग्णाला सांगून. त्यानंतर पाच-सहा वर्षांनी चक्कर येण्याच्या त्रासाने त्यांना रुग्णालयात दाखल केले; तेव्हा हृदयाच्या अनियमिततेचा त्रास खूप वाढला होता; म्हणून अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने काही तासांत औषधोपचाराने आजार नियंत्रणात न आल्याने त्यांचा मृत्यू झाला. यावर ‘आम्हाला हृदयाचा त्रास असल्याचे सांगितलंच नव्हतं; मग आमचा रुग्ण हृदयाच्या त्रासाने गेलाच कसा?’ असा नातेवाईकांनी पवित्रा घेऊन दंगा केला. पण त्याआधीची अनेक वषर्र् आपण काही गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने रोज घेतो, नियमितपणे त्यांना दाखवतो; काíडओग्राम काढतो; मग हा त्रास हृदयाचा आहे हे आपल्याला माहीतच नव्हते; असे आपण कसे म्हणू शकतो?
डॉक्टर-रुग्ण संवादाचे हे काही नमुने! वैद्यकाच्या विविध शाखांमध्ये निष्णात झालेले पदव्युत्तर स्पेशालिस्ट व सुपरस्पेशालिस्ट कदाचित रुग्णाला फॅमिली डॉक्टरप्रमाणे पुरेसा वेळ देऊन सर्व गोष्टी समजावून सांगू शकत नाहीत; त्यामुळे डॉक्टर-रुग्ण संवादातील त्रुटी वाढत चालल्या असाव्यात. तसेच वैद्यकाच्या ज्ञानाअभावी सर्व गोष्टी कळल्या नाहीत; तरी डॉक्टरांवर विश्वास ठेवून सहकार्य करण्याची मानसिकताही कमी होत चालल्याचे लक्षात येते. ग्राहक सुरक्षा कायदा डॉक्टरांना लागू झाल्यावर तर हे परस्परविश्वासाचे नाते नष्ट होत होत हे संबंध अधिकच ताणले गेले व विश्वासाची, प्रेमाची जागा हक्काने, अधिकाराने घेतली. वास्तविक प्रत्येक डॉक्टर त्याचे ज्ञान, अनुभव, वैद्यकीय नपुण्य याचा वापर करून रुग्णाच्या समस्येचे निराकरण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. पण रुग्णाचे शरीर त्या उपायांना कसे साथ देईल; हे डॉक्टरांच्या हातात नसते.
डॉक्टरांनी रुग्णाविषयी दिलेली व त्यातून आपल्याला समजलेली माहिती आणि रुग्णाच्या स्थितीचे अंतिम परिणाम यात तफावत झाली की डॉक्टर-रुग्ण संबंध बिघडतात. दुसरे कारण असते-आकारलेला पसा! वैद्यकीय व्यवसायाप्रमाणे इतर अनेक क्षेत्रांत जास्त पसा मिळत असूनही ‘डॉक्टर म्हणजे रुग्णाचा खिसा कापणारे’ अशी कल्पना समाजात रूढ झालेली आहे; जी रुग्ण व डॉक्टर दोन्ही बाजूंना आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. करमणूक, हॉटेिलग, शॉिपग यावर मनसोक्त खर्च करणारा माणूस स्वत:च्या आरोग्याचे रक्षण करणाऱ्या, जोखीम घेणाऱ्या डॉक्टरकडे खर्च करताना मात्र आखडतो. डॉक्टरांच्या बाजूनेही पशाची अतिहाव धरणे, मेडिक्लेम कंपन्यांना फुगवून बिले देणे, अनतिक मार्गानी पसा मिळवणे, खोटी कागदपत्रे बनवून देणे अशा गोष्टींमुळे विश्वासार्हता गमावून डॉक्टर-रुग्ण संबंधात शेवटी बाधा येण्याची शक्यता असते.
 पारदर्शकता जशी डॉक्टरांकडून अपेक्षित आहे, तशीच रुग्णांकडूनसुद्धा आहे. रुग्णाच्या अज्ञानाचा डॉक्टरांनी गरफायदा वा पळवाट म्हणून उपयोग करून त्यांना गृहीत धरू नये. तसेच नातेवाईकांनी आजाराबद्दलची वास्तववादी माहिती डॉक्टरांकडून समजावून घेऊन रुग्णाच्या अवस्थेविषयी भावनेबरोबरच व्यवहारी पातळीवरही विचार करावा; म्हणजे अविवेकी निर्णय घ्यावेसे वाटणार नाहीत.
वैद्यकीय महाविद्यालयात आम्ही शिकलेले वैद्यकशास्त्र सामान्य माणसाला कळेल अशा भाषेत कसे सांगावे, हे आम्हाला कोणी शिकवत नाही. संभाषणकला अवगत करणे, श्रवणशक्ती व संयम वाढवणे, सहवेदना जाणणे, रुग्णाने सांगितलेल्या माहितीतून कशाला महत्त्व द्यायचे याची बौद्धिक चाळणी लावणे या गोष्टी अनुभवातूनच आत्मसात कराव्या लागतात. डॉक्टरांना दिवसागणिक बघाव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या, मिळणारा वेळ, कन्सिल्टग, वॉर्डची कामे, शस्त्रक्रिया, काही प्रमाणात रुग्णालयाचे व्यवस्थापन, स्वत:चे ज्ञान सुसज्ज ठेवण्यासाठी वाचन, चर्चासत्रे व परिषदा; कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्या; इतरांप्रमाणेच वाढलेले ताणतणाव या सर्व बदलांमुळे संवादाचे रूप बदलले व भावनिक गुंतवणूक थोडी कमी झाली, पण कोणत्याही डॉक्टरला आपला रुग्ण बरा होऊ नये असे कधीच  वाटत नाही, किंबहुना रुग्ण उपचारात अपेक्षित परिणाम न दिसल्यास डॉक्टरसुद्धा तितकाच अस्वस्थ असतो, पण ते तो कोणाला सांगू शकत नाही; ही वस्तुस्थिती आहे.
डॉक्टर-रुग्ण संबंध सुधारण्यात काही उपाय सुचवावेसे वाटतात. डॉक्टरांना पूर्ण सत्य माहिती देणे, इतरांच्या अनुभवांना प्रमाण मानून निष्कर्ष न काढणे; आपली लक्षणे, अन्य आजार, घेत असलेली औषधे न लपवणे, स्वत: तब्येतीची अनुमाने काढत मौल्यवान वेळ वाया न घालवणे, मेडिकल रेकॉर्ड जपणे व वेळेवर डॉक्टरांना दाखवणे, दिलेले सल्ले पाळणे, विश्वासाने डॉक्टरांना सहकार्य करणे- या रुग्णांकडून अपेक्षा! तर रुग्णांना औषधे व आजाराचे स्वरूप समजावून सांगणे, विविध चाचण्यांमागची कारणमीमांसा समजावणे, शस्त्रक्रियेची गरज, त्यातील संभाव्य धोके, अनपेक्षित परिणाम आधी समजावून सांगणे, रुग्णास इंटरनेटवरील माहितीचा सकारात्मक वापर करू देणे, विशेषत: शारीरिक वैगुण्य ठेवून देणाऱ्या शस्त्रक्रिया (उदा. स्तन काढणे, पाय किंवा बोट काढणे, मलविसर्जनाची जागा पोटावर करून देणे) रुग्णाला विश्वासात घेऊन मगच करणे, काढलेले भाग, खडे वगरे गोष्टी लगेच रुग्णास व नातेवाईकांस दाखवणे, रुग्णालयातून सोडताना सर्व रिपोर्ट्स परत करणे; रुग्णावरील सर्व गोष्टी लेखी पूर्वसंमतीने करणे; वास्तववादी माहिती देऊन दिलासा देणाऱ्या मित्राची भूमिका निभावणे या डॉक्टरांच्या जबाबदाऱ्या!
डॉक्टर-रुग्ण संबंध तणावपूर्ण होण्यात दोन्ही बाजू कारणीभूत आहेत, कारण ‘टाळी एका हाताने वाजत नाही.’ दोन्ही बाजूंकडून संवादात, व्यवहारात पारदर्शकता असेल तर  विश्वासास, अविवेकास, उद्रेकास जागा राहणार नाही. गरज आहे ती तारतम्य, समजूतदारपणा, आस्था, सबुरी, विश्वास आणि माणुसकीची!        
vrdandawate@gmail.com

Story img Loader