विद्यादान साहाय्यक मंडळाची त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्या मदतीने १० लाख रुपये जमा करून ६४ विद्यार्थ्यांचं आयुष्य मार्गी लावलं. या समाजकार्याबरोबरच ‘फायझर’ कंपनीत मार्केटिंग मॅनेजर पदावर असणाऱ्या आणि घर नीटनेटकं ठेवण्यासाठी पहाटे २ ते ५ या वेळेचा वापर करणाऱ्या गीता शहा यांच्या  या विलक्षण करिअरविषयी-
८ जुलै २००६ च्या लोकसत्ता ठाणे वृत्तान्तमध्ये ‘प्रतिकूलतेतही फुलली गुणवत्ता’ या मथळ्याखाली प्रशांत विशे या शहापूरच्या मुलाने घरात अठराविशे दारिद्रय़ असूनही शालान्त परीक्षेत ९१.१३ टक्के गुण मिळवल्याची बातमी झळकली आणि अनेक सहृदय माणसांचे पाय त्या दिवशी प्रशांतच्या घराकडे वळले. त्या लोंढय़ात गीता शहा व सत्यजित शहा हे ठाण्याचं दाम्पत्यही होतं. शहापूरला जाण्याआधी गीता प्रथम ‘डी मार्ट’मध्ये गेली आणि तिथून साडय़ा, कपडे, १० किलो साखर, चहा, दुधाचे पॅक, बिस्किटं, कडधान्यं.. अशा अनेक वस्तू खरेदी करून तिने प्रशांतचं घर भरून टाकलं. त्या मुलाची इंजिनीअर होण्याची इच्छा कळल्यावर शिक्षण संपेपर्यंत आपल्या घरी राहण्याची ऑफरही तिने त्याला तिथल्या तिथे दिली. पुढे सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळेपर्यंत प्रशांत आपला मित्र अनिल पडवळ याच्यासह तिच्या घरी ३ महिने राहिलाही. एवढय़ावरच ती थांबली नाही तर वीज तोडल्यामुळे आठ वर्षे चिमणीच्या मिणमिणत्या प्रकाशात अभ्यास करणाऱ्या प्रशांत, प्रमिला व प्रवीण या भावंडांसाठी तिने शहापूर व कल्याणच्या इलेक्ट्रिसिटी बोर्डात अनेक चकरा घातल्या व त्यांची १७-१८ हजार रुपयांची थकबाकी सेटल करून भरूनही टाकली. जुलै महिन्यात बातमी प्रसिद्ध झाली आणि ऑगस्टमध्ये प्रशांतची झोपडी प्रकाशाने उजळून निघाली. आज अतिशय शिस्तबद्धपणे अनेक विद्यार्थ्यांच्या सर्वागिक विकासासाठी झटणाऱ्या विद्यादान साहाय्यक मंडळाची संकल्पना गीताच्या मनात रुजण्याचा हाच तो सोनेरी क्षण.
प्रशांतशी संपर्क वाढल्यावर तिच्या लक्षात आलं की, शहापूरामध्ये गुणवंत मुलांची खाणच आहे, फक्त परिस्थितीचा अडसर काय तो मध्ये आहे. तेव्हापासून अशा मुलांना शक्य तेवढी मदत देण्याचं काम तिने वैयक्तिक पातळीवर सुरू केलं. त्याचबरोबर हे काम एक व्रत म्हणून मोठय़ा प्रमाणात करण्यासाठी तिने देणगीदार, कार्यकर्ते व मार्गदर्शक जमवायला सुरुवात केली. ८ विद्यार्थी, ७ देणगीदार आणि पन्नास हजार रुपयांची गंगाजळी एवढी प्रारंभिक तयारी झाल्यावर १५ ऑगस्ट २००८ या दिवशी तिच्या ‘विद्यादान साहाय्यक मंडळा’चं पहिलं पाऊल पडलं आणि अवघ्या चार वर्षांत १३१ देणगीदारांच्या मदतीने १० लाख रुपये उभे करून ६४ विद्यार्थ्यांच्या सर्व विवंचना मिटवून त्यांना शिक्षणाकडे एकाग्र करण्यात संस्थेने यश मिळवलं. जिच्या अथक परिश्रमाने व कुशल नेतृत्वाने ही गोष्ट साध्य झाली ‘ती’ म्हणजेच गीता सत्यजित शहा. जोगेश्वरी येथील एका फार्मास्युटिकल कंपनीत मार्केटिंग सव्र्हिसेस विभागाची प्रमुख आहे.
विद्यार्थी दत्तक घेणं, त्यांना शैक्षणिक मदत पुरवणं हे काम अनेकजण करतात. पण गीताच्या ‘विद्यादान साहाय्यक मंडळा’चं वेगळेपण म्हणजे इथे कार्यरत असलेली विद्यार्थी व पालक कार्यकर्त्यांमधील भक्कम साखळी. यातील पालक कार्यकर्त्यांची व्याख्या म्हणजे, ‘आपल्या मुलांसाठी तो जे जे करतो, ते ते त्याने या मुलांसाठी करणे.’ यात मुलांच्या वैयक्तिक अडचणी सोडवण्याबरोबर त्यांच्या कुटुंबाच्या पाठी उभं राहणंही आलं. संस्थेच्या या धोरणामुळेच प्रशांतच्या वडिलांचं नाक व कानाचं ऑपरेशन ठाण्याच्या कौशल्य हॉस्पिटलमध्ये सुखरूप पार पडलं; तसेच चंद्रपूरच्या सरकारी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळालेल्या, आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या राहुल भालकेचं बस्तान इतक्या दूरवरही नीट बसलं.
सामाजिक जाणिवांचा वसा गीताला तिच्या आईवडिलांकडून मिळाला. कामवाल्या बाईला कामाला लागण्यापूर्वी जेवूखाऊ घालणाऱ्या आणि आंब्याच्या मोसमात पहिला आंबा देवाला, दुसरा बाईला आणि नंतर मुलाबाळांना देणाऱ्या आईचे संस्कार गीता व तिच्या भावंडांच्या मनावर न उमटले तरच नवल. वडिलांच्या स्वभावातही सहसंवेदना काठोकाठ भरलेली. एकदा ते धार्मिक पर्यटनाला गेले असताना, ग्रुपमध्ये असलेल्या अंधांना त्यांनी तिथली प्रत्येक गोष्ट स्पर्शाने व वाणीने ज्या प्रकारे समजावली तो प्रसंग गीताच्या मनावर कायमचा कोरला गेलाय. स्नेह देणाऱ्या या गोष्टी गीताला घडवत गेल्या. म्हणूनच शालेय वयात, कुल्र्याला प्रीमियर कॉलनीत राहताना तिने समोरच्या झोपडपट्टीतील लहान मुलांना शिकवण्याचं स्वत:हून ठरवलं. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावरही स्वावलंबन म्हणून जेव्हा तिने टय़ूशन्स सुरू केल्या तेव्हाही गरीब मुलांना विनामूल्य शिकवण्याचं तिचं व्रत कायम राहिलं.
एम. कॉमला प्रवेश घेतल्या घेतल्या तिचं लग्न झालं. नंतर दहा जणांच्या एकत्र कुटुंबात राहूनही तिने या डिग्रीपाठोपाठ मॅनेजमेंटचा डिप्लोमा पूर्ण करताना नेत्रदीपक यश मिळवलं. त्यानंतरची ७/८ वर्षे नोकरी, घर व मुलाच्या संगोपनात गेली. मात्र २००१ मध्ये ठाण्याला येऊन स्वतंत्र  घर  केल्यावर आपल्यापाशी भरपूर वेळ उरतोय असं तिला जाणवू लागलं.(नोकरीसाठी ठाण्याहून जोगेश्वरीला जाण्यायेण्यात दिवसाचे १२ तास कारणी लागत होते तरीही). आसपास चौकशी केल्यावर शेजारच्या इमारतीत काम करणाऱ्या बाईच्या मुलाची करुण कहाणी तिला समजली. आयुष्याचे काही महिनेच बाकी उरलेल्या त्या मुलाला काही ना काही वाचून दाखवण्यासाठी मग ती शेवटपर्यंत जात राहिली.
ते छोटं पर्व संपलं आणि तिच्या वाचनात ‘सोसवा’ या वांद्रेस्थित एनजीओची जाहिरात आली. हा ट्रस्ट बांधकाम मजुरांच्या मुलांना शिकवण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यांच्यामार्फत तिने ठाण्यातील ‘हिरानंदानी इस्टेट’ विभागासाठी काम करायला सुरुवात केली. सलग २ वर्षे आपले सगळे शनिवार तिने या मुलांना अभ्यासाबरोबर स्वच्छता संस्कार शिकवण्याच्या कामी लावले.
त्याच दरम्यान एकदा तिला समजलं की, अनिकेत आमटे, जगनभाऊ व हेमलकसाहून आलेल्या काही आदिवासी बांधवांनी तिथल्या कार्याचं (फोटोद्वारे) आणि हस्तकलेचं एक प्रदर्शन ठाण्याच्या कृष्णाई हॉलमध्ये भरवलंय. ही तिथे पोहोचली. तो प्रदर्शनाचा शेवटचा दिवस होता. (ही देवमाणसं आपल्या गावात आलीयेत, त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं.. तिच्या मनानं घेतलं. चौकशी केली तर रात्रीच्या जेवणाची सोय झाली होती आणि मंडळी दुसऱ्या दिवशी पहाटे पाचलाच निघणार होती. घरी जाता जाता तिचा विचार पक्का झाला आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी १५/२० जणांसाठी चहा, नाश्ता घेऊन ती पहाटे चारलाच तिथे जाऊन धडकली.
याच प्रदर्शनात आनंदवन स्नेही मंडळाच्या ठाणे शाखेचे सर्वेसर्वा भाऊ नानिवडेकर यांनी अभिप्राय लिहिण्यासाठी एक रजिस्टर ठेवलं होतं. अभिप्रायाबरोबर काहींनी संस्थेसाठी काम करण्याची इच्छाही प्रदर्शित केली. या वहीमुळे ‘आनंदवन स्नेही मंडळा’ला दोन हिरकण्या सापडल्या, एक गीता शहा व दुसरी रंजना कुलकर्णी. ही घटना २००६ ची. त्यानंतर या मंडळातर्फे आनंदवन आणि हेमलकसा येथील वस्तूंच्या विक्रीसाठी स्टॉल मिळवणं, त्या स्टॉलवर स्वयंसेवकाचं काम करणं, त्याचबरोबर अन्य देणग्या मिळवून त्यांच्या कामाला हातभार लावणं ही कामं सुरू झाली, आजही चालू आहेत. पण स्वतंत्रपणे काहीतरी करण्याची ऊर्मी गीताला स्वस्थ बसू देईना आणि ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून संधीनं अचानक दार ठोठावलं. तिच्या जगण्याला नवा आयाम मिळाला.
विद्यादान सा. मंडळाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली तेव्हा शहरी भागातून मदत मिळवायची आणि शहापूर येथील एक शिक्षक सुभाष हरड यांच्यामार्फत गरजू व हुशार मुलांपर्यंत पोहोचवायची, असा सरधोपट मार्ग होता. परंतु या वाटेने मुलांशी नाळ जुळेना. पैलतीरावर मुलं दिसत होती, परंतु त्यांचा हात कसा पकडायचा ते उमजेना. गीता म्हणाली, ‘दुसऱ्यावर अवलंबून राहण्याचा हा काळ अत्यंत बेचैनीचा होता. शेवटी भाऊंनी प्रत्येक कार्यकर्त्यांची दोन विद्यार्थ्यांशी मोट बांधली. कामाची विभागणी झाली आणि कोंडी सुटली.’
त्यानंतर आपआपल्या विद्यार्थ्यांची सर्वागीण प्रगती होते की नाही ते बघणं ही सर्वस्वी त्या पालक कार्यकर्त्यांची जबाबदारी झाली. फोनद्वारे नियमित संपर्क सुरू झाला. त्यांना राहण्यासाठी प्रथम शहापूर स्टेशनजवळ आणि आता ठाण्यात भाडय़ाने जागा घेऊन वसतिगृहाची सोय करण्यात आली. महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी ठाण्याला व दुसऱ्या रविवारी शहापूरला कार्यकर्त्यांची मीटिंग होऊ लागली. या मीटिंग्जना हजर राहणं विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक ठरलं. शहापूरच्या मीटिंगसाठी किमान ३/४ कार्यकर्त्यांनी स्वत:च्या खर्चाने जायचं यावर एकमत झालं. स्थानिक कार्यकर्त्यांबरोबर होणाऱ्या चर्चेतून मार्ग निघू लागला. या सर्वाचा शिस्तबद्धपणे समन्वय साधण्याचं काम गीताने आपल्याकडे घेतलं आणि विद्यादान साहाय्यक मंडळाची घडी बसू लागली. विद्यार्थ्यांच्या संदर्भातील अनेक प्रश्न सोडवताना समता विचार प्रसारकचे संजय मंगोसर, माजी आमदार संजय केळकर, मंडळाचे ट्रस्टी अरुण सेठ आणि आमचे भाऊ यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्यामुळेच हे शक्य झालं, हे गीताने आवर्जून सांगितलं.
थोडं स्थिरस्थावर झाल्यावर मुलांमध्ये सामाजिक जाणिवा रुजाव्यात यासाठी तिचे प्रयत्न सुरू झाले. त्यानुसार आता त्यांना दरवर्षी ८ ते १० दिवस पुण्यातील शिंदेवाडी आणि सोमनाथ येथील श्रमशिबिरांना पाठवण्यात येतं. त्याचप्रमाणे वेळेचं व ताणतणावाचं नियोजन, चारित्र्य संवर्धन, संभाषणचातुर्य, मुलाखत तयारी.. अशा विविध विषयांवर तज्ज्ञांकडून कार्यशाळा घेतल्या जातात. इतक्या मुलांचा सर्वागीण विकास हे एकटय़ा दुकटय़ाचं काम नव्हेच. गीताच्या खांद्याला खांदा लावून स्वाती आगटे, रंजना कुलकर्णी, सुहास चांदेकर, सुयोग मराठे, गोपाळ आठवले, संदीप भागवत आणि अन्य कार्यकर्ते यांची टीम जीवाचं रान करतेय. म्हणूनच संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या ठाण्याच्या वेध परिषदेतील ‘शनिवारची डायरी’ या निबंध स्पर्धेत गेली सलग २ वर्षे विद्यादान सा. मंडळाची मुलं बक्षिसं मिळवत आहेत. गीताच्या भाषेत ‘नाही रे गटाने, आहे रे गटा’शी स्पर्धा करून मिळवलेलं हे यश म्हणजे आमच्यासाठी एक टॉनिकच आहे.
‘आधाराने वाढलेल्या मुलांनी स्वत:च आधारवड बनणं, हे आमचं सर्वात मोठं यश..’ गीता सांगते, ‘बी. ई. कॉम्प्युटर होऊन टी.सी.एस. कंपनीत लागलेला जयवंत निपुर्ते आणि ऑटोमोटिव्ह एक्स्चेंज प्रा. लिमिटेड या फॉच्र्युन ५०० कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करणारा प्रशांत विशे या तरुण मुलांना, ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हाताखाली धडे गिरवताना बघणं यापेक्षा मोठा आनंद तो कोणता?’
संवादचातुर्य (कम्युनिकेशन स्किल) यावर जर एखादी स्पर्धा ठेवली तर गीताला ऑलिम्पिक पदक मिळण्यात कोणतीच हरकत नाही, असे तिचे सहकारी छातीठोकपणे सांगतात, म्हणूनच ‘फायझर’ या कंपनीने ‘मार्केटिंग मॅनेजर’ या कळीच्या जागी तिची नेमणूक केलीय. सकारात्मक वृत्ती, समोरच्या व्यक्तीचं मन जाणून घ्यायचं कसब आणि धो धो उत्साह या गुणांमुळे ‘बेस्ट एम्प्लॉयी’ हा किताब तिने केव्हाच खिशात टाकलाय. मेडिकल रिप्रेझेंटिव्हजच्या संदर्भातील ए टू झेड कामं, तसंच राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय मीटिंग्जचं आयोजन या तिच्यावर कंपनीने सोपवलेल्या जबाबदाऱ्या. त्यासाठी तिला मधून मधून दौऱ्यावरही जावं लागतं. हा प्रवासातला वेळ ती कामाच्या नियोजनासाठी व पाहिलेलं नवं काही टिपून ठेवण्याच्या कारणी लावते. लेखनाप्रमाणे वाचन हाही तिचा आवडता छंद. तिच्याकडे रोज ६ मराठी व २ इंग्रजी वृत्तपत्रं येतात. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा ती वाचतच असते. त्याचबरोबर घर नीटनेटकं ठेवणं हे तिचं पॅशन आहे. या कामासाठी तिची वेळ पहाटे २ ते ५. (ही वडिलांनी लावलेली सवय) गीताचं माहेरचं व सासरचंही आडनाव शहा असलं तरी ती मराठी इतकं सुरेख बोलते आणि इतकं शुद्ध लिहिते की, समोरचा मंत्रमुग्ध व्हावा. दर ३ महिन्यांनी रक्तदान करणं हा तिच्या जीवनाचा एक भाग आहे. तिच्यातील प्रामाणिक व सात्त्विक विचारांचं तेज तिला बघताक्षणी जाणवतं.
पत्नीच्या प्रत्येक गोष्टीस १०० टक्के पाठिंबा देणारा जोडीदार तिला लाभलाय. पर्यावरण हा त्याच्या प्रेमाचा विषय. स्वत: इंजिनीअर असणाऱ्या सत्यजित शहांनी आपला व्यवसाय सांभाळून दहा वर्षे एकहाती लढत ठाण्याच्या घोडबंदर परिसरातील धूर ओकणाऱ्या दोन कंपन्यांना आपलं चंबूगवाळं उचलायला भाग पाडलंय.
‘जो न्याय विद्यादान सा. मंडळाच्या मुलांना तोच आपल्या मुलाला’ हे गीताने ठामपणे ठरवल्यामुळे ऐपत असूनही तिने गेल्या वर्षी देणगी न देता आपल्या मुलासाठी सुमेधसाठी ठाण्याच्या पाश्र्वनाथ इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आईच्या या खंबीरपणाचा त्याला अभिमान वाटतो.
तुझी एनर्जी, नव्या नव्या गोष्टींसाठी तुझ्याकडे असणारा वेळ यापाठचं रहस्य काय, यावर तिचं उत्तर होतं, ‘नोकरी, घर आणि विद्यादान, आनंदवन मंडळाचं काम या गोष्टी वेगळ्या नाहीतच मुळी. रोज सकाळी ‘थिंग्ज टू डू’ लिहिताना.. आज कोणती भाजी आणायची त्याच्या खालीच कोणत्या विद्यार्थ्यांला/ पालक कार्यकर्त्यांला फोन करायचा ते लिहिते. आनंदवन स्नेही मंडळाचं काही ना काही काम असतंच.. त्यापाठोपाठ ऑफिसच्या मीटिंग्ज संदर्भातील कामं.. सवयीनं जमून जातं सगळं.’ थोडं थांबून ती  म्हणाली, ‘सध्या माझ्या कामाच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे ते ‘विद्यादान साहाय्यक मंडळासाठी पालक कार्यकर्ते वाढवणं. या घडीला माझ्याकडे ८५ विद्यार्थी आणि ४० कार्यकर्ते आहेत. दिवसेंदिवस मुलांचा ओघ वाढतोय. या वाढत्या हातांची गरज पुरवण्यासाठी आम्हाला अनुभवी हातांची नितांत गरज आहे. चालक तो आहे, पण आपण पालकाची भूमिका निभावायला हवी. त्या मुलांच्या आशा विझू न देण्याची जबाबदारी आपली आहे.
‘हो, हे शक्य आहे!’ या विश्वासाने घातलेली ही साद संवेदनशील माणसांपर्यंत पोहोचेल?    ४
गीता शहा संपर्क- भ्रमणध्वनी- ९८२१०३४४३६
ईमेल- geetasumedh@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी