‘डोअर स्टेप स्कूल’ ही मुलांना त्यांच्या घरी जाऊन शिक्षण देणारी संस्था. मुलांना साक्षर करावे, हा उद्देश घेऊन १९८७ पासून सुरू झालेल्या या संस्थेने झोपडपट्टी, मजूर वर्ग, भिकारी यांच्या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले. सुरुवातीला मुंबईत आणि आता पुण्यात काम करणाऱ्या या संस्थेचे ध्येय आहे, पुढल्या पाच वर्षांत पुण्यात ‘प्रत्येक मूल शाळेत जाणारे’ ही योजना राबविण्याचे शिक्षणाची ही दिंडी निघाली आहे, प्रत्येकाने त्यात सामील व्हायला हवं.- त्या डोअर स्टेप स्कूल’ चा हा प्रवास.
आतापर्यंतच्या आयुष्यात मागे वळून बघण्याचे क्षण तसे फारसे आलेच नाहीत. त्यावर विचार करण्याइतके किंवा त्यात रमून जाण्याइतके स्वास्थ्यही मिळालेले नाही. पण आज यानिमित्ताने पाहते आहे तेव्हा जाणवते. मुलांनी साक्षर होण्यासाठी आम्ही केलेले हरएक प्रयत्न, त्यातून मिळालेले चांगलेवाईट अनुभव आणि अजून ही शिक्षणाची दिंडी खूप लांब चालवत न्यायची आहे, याची तीव्र जाणीव.
अठराव्या वर्षी लग्न झाले- त्यानंतरची पंधरा वष्रे मुले-बाळे, घर असा चारचौघींसारखाच संसार केला. लग्नानंतर बी.ए. पूर्ण केले. त्यानंतर पंधरा वर्षांनी मुंबईतील सोशल वर्कचे कॉलेज ‘निर्मला निकेतन’ इथे नाव दाखल करण्यासाठी गेले तेव्हा लक्षात आले की आपण आपले बी.ए. उत्तीर्ण झाल्याचे सर्टिफिकेटदेखील युनिव्हर्सिटीतून आणलेले नाही! कॉलेजची दोन वष्रे पार पडली. त्यानंतरची दोन वष्रे कॉलेजनेच चालवलेल्या कुलाब्यातील ‘फॅमिली सर्व्हिस सेंटर’मध्ये फास्टर केअर वर्कर म्हणून काम केले आणि १९७४ मध्ये ‘निर्मला निकेतन’मध्येच रिसर्च असिस्टंट म्हणून काम सुरू केले. तिथेच पुढची जवळजवळ १३ वष्रे काढली. यादरम्यान कॉलेजमध्ये रिसर्च हा विषय शिकवणे, विद्यार्थ्यांच्या फिल्ड वर्कमध्ये गाइड म्हणून काम करणे, कॉलेजमधील इतर जबाबदाऱ्या उदा. अंगणवाडी सुपरवायझर्सच्या ट्रेनिंग सेंटरचे काम बघणे, अशा गोष्टींचा अनुभव ओघानेच मिळत गेला. त्या अनुभवांतूनच मुलांच्या प्राथमिक शिक्षणावर भर द्यावा हा विचार हळूहळू तयार होत गेला. त्याची कारणे मुख्य दोन- एक तर कॉलेजने सुरू केलेला ‘स्कूल सोशल वर्क’ हा प्रकल्प. या प्रकल्पाचे मुख्य स्वरूप प्राथमिक शाळेतून गळती होणाऱ्या पहिली-दुसरीच्या मुलांचा पाठपुरावा करून मुलांना शाळेत आणणे. त्यांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, शाळेतच मुलांसाठी बुक बँक, अभ्यास वर्ग चालवणे असे होते. थोडक्यात, आज जी ‘डोअर स्टेप स्कूल’ची इमारत उभी आहे त्याची पायाभरणी अशी या तेरा वर्षांत केलेल्या कामामध्येच आहे.
हे काम करत असताना पुन: पुन्हा येणारा एक अनुभव फार अस्वस्थ करणारा होता. आणि तो म्हणजे काही मुलांचे आणि शाळेचे न जमणारे गणित! त्यांची कारणे अनेक, पण परिणाम एकच- मुलांनी शाळेत अनियमित जाणे, गैरहजर राहणे आणि हळूहळू करीत शाळा सोडून देणे आणि एक दिवस कुठेतरी कामाला लागणे वा घरकामात बुडून जाणे. सातत्याने आलेल्या या अनुभवामुळे एक गोष्ट स्पष्ट जाणवली की या मुलांना आठ तास शाळेत जाऊन शिकणे शक्य नाही. मग प्रश्न असा उभा राहिला की ही जर शाळेत जाणार नसतील तर तीही त्यांच्या पालकांसारखीच पूर्ण निरक्षर राहणार की काय? की त्यांना शाळेबाहेर का होईना, पण थोडेतरी शिक्षण देणे शक्य आहे. त्यातूनच डोअर स्टेप स्कूलची संकल्पना विकसित झाली. मुले जिथे राहत असतील, काम करत असतील तिथे जाऊनच त्यांना शिकवावे, शक्य असेल तितक्यांना शाळेत दाखल करावे. शिकवणी वर्ग, वाचनालये, बालवाङ्मय इत्यादी उपक्रमांतून त्यांचे शिक्षण करून कमीतकमी वर्तमानपत्र वाचता येईल इथपर्यंत त्यांना साक्षर करावे.
‘डोअर स्टेप स्कूल’ ही संस्था सुरू झाली १९८७ ला. (पण संस्थेला रजिस्ट्रेशन मिळाले १९८९ला) त्या वेळची माझी विद्यार्थिनी (आणि आता संस्थेची सहसंस्थापक, सचिव आणि स्कूलचा मुंबईचा पूर्ण कारभार गेली पंचवीस वष्रे समर्थपणे चालवणारी) बीना शेठ. एम. एस. डब्ल्यू. झाल्यावरही नोकरी न करता ‘डोअर स्टेप स्कूल’च्या कामाला तिने आजपर्यंत वाहून घेतले आहे.
सुरुवातीला आम्ही कुलाब्यातील कफ परेडवरील आता आंबेडकर वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वस्तीत काम सुरू केले. कामाचा आराखडा तयारच होता. ३ ते १४ वष्रे वयोगटातील मुलांच्या प्राथमिक शिक्षणासंदर्भात काम करावयाचे होते. आपल्या उपक्रमातून आपण प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भातील तीन मुख्य समस्यांवर – मुले शाळेत दाखल होणे, दाखल झाल्यास पहिली, दुसरीतूनच गळणे आणि इयत्तेनुसार त्यांची शैक्षणिक पातळी न वाढणे- यावर काम करावयाचे हे ठरलेलेच होते.
गेल्या पंचवीस वर्षांत काय काय अनुभव आले, असा विचार केला तर प्रथम आठवतात ते मुलांना शाळेत नेण्या-आणण्यासाठी बसची सोय करण्यासाठी करावे लागलेले प्रयत्न. त्यात आलेले यश आणि अपयशही! शाळेत दाखल होताना मुले लहान असतात. बऱ्याच पालकांना त्यांना रोज शाळेत पोहोचविणे, आणणे जमण्यासारखे नसते आणि रस्त्यावरील रहदारी बघता इतक्या लहान मुलांना रस्त्यावर एकटे सोडणेही धोक्याचे वाटते. अशा वेळेस शाळेत नेण्या-आणण्याची सोय झाल्यास मुले नियमित शाळेत जाऊ शकतील, असा विचार. त्यासाठी ‘बेस्ट’चा एक रूटही आम्ही मिळवला. अर्थात हे सर्व करण्यात दोन-तीन वष्रे गेली, पण शेवटी यश मिळाले. ‘बेस्ट’ने आम्ही सुचवलेल्या मार्गाने आमच्या वेळेनुसार बस सोडण्याचे मान्य केले. पण प्रत्यक्षात हा प्रयोग फार चालला नाही, याचे कारण ठिकठिकाणच्या बसथांब्यांवर मुले बसच्या वेळेत हजर नसत व बस सुटून जाई. यावर मुलांना वेळेत बसस्टॉपवर आणण्यासाठी प्रत्येक थांब्यावर कोणातरी व्यक्तीची नेमणूक करणे आम्हालाही जमले नाही व पुढे बस थांबली व आम्ही आमचीच बस मिळविण्याच्या मागे लागलो. यातही बरीच वष्रे गेली.
दरम्यान, मुलांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी जाऊन शिकवायचे ठरवले, पण ही ठिकाणे वेगवेगळी असू शकतात हे लक्षात आले. झोपडपट्टय़ा हे त्यातील एक ठिकाण. पण फुटपाथवर राहणारी कुटुंबे, रस्त्यावर हिंडणारी मुले, घरकाम करणारी मुले, क्रॉफर्ड मार्केट किंवा चर्चगेटसारख्या ठिकाणी छोटीमोठी कामे करणारी मुले यांच्यापर्यंत पोहोचवयाचे असेल तर काहीतरी निराळी सोय हवी होती. त्याप्रमाणे पी. डिमेलो रोडवरच्या फुटपाथवरच एका झोपडीत आम्ही वर्ग चालवले आणि कफ परेडवरील मोठय़ा मोठय़ा इमारतींतून घरकाम करणाऱ्या मुलांसाठी झुलेलाल मंदिरात एक पूर्णवेळ शिक्षक ठेवून मुलांना जसजसा वेळ मिळेल तसतसे येऊन त्यांनी शिकून जावे, अशीही सोय केली. तरीही रस्त्यावरची, बाजार व रेल्वे स्थानकाच्या आसपासची मुले बाकी राहिलीच. त्यांच्यासाठी मग फिरत्या शाळेची कल्पना पुढे आली- एखादा जुना ट्रक मिळाला तरी चालेल, इथपासून सुरुवात करून एक बस घेऊन ती आतून वर्गासारखी बनवून घेतली आणि ती बस मुलांना शाळेत नेण्या-आणण्यासाठी आणि मधल्या वेळेत त्यात वर्ग लावून शाळेत न जाऊ शकणाऱ्या मुलांसाठी वापरायला सुरुवात केली. ‘स्कूल ऑन व्हील’ म्हणून चालू केलेला हा उपक्रम देशीविदेशी एक नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून मानला जातो. घरकाम करणाऱ्या मुलांना शिकवायला सुरुवात करताना प्रथम अडचण आली ती सर्वेक्षण करतानाच. मोठमोठय़ा, उंच उंच इमारतीतून सर्वेक्षण करण्यासाठी जाताना प्रथम परवानगी घेण्याचा प्रश्न आला. त्यातील एका सोसायटीकडून तर आम्हाला पत्र मिळाले की अशा काही शाळेची आम्हाला गरज वाटत नाही. आमच्या सोसायटीतील स्त्रीवर्ग किंवा मुलेच त्या मुलांना शिकवतील. तसेच कामवाल्या बाया एकाच ठिकाणी रोज भेटत राहिल्या तर त्यांच्यात गॉसिपिंग, इतर मालकांविषयी तक्रारी, त्यांच्यात तुलना करणं याचं प्रमाण वाढेल त्यामुळे नकोच. धन्यवाद.
त्यानंतर पुण्याला काम सुरू करताना आलेले अनुभव आणखी निराळे! मुख्य प्रश्न जागेचा, वस्त्यावस्त्यांतून समाज मंदिरे असतात आणि वापरता येऊ शकतात. पण या समाज मंदिरांचा बऱ्याच लोकांना एकत्र बसून दारू पिण्याच्या कामासाठीच उपयोग होतो असे लक्षात आले. दिवसा वर्ग घ्यायचा झाला तर रोज सकाळी रात्रीचा तो पसारा साफ करूनच वर्ग चालू करावा लागे. शिवाय दिवसा बसण्याची गरसोय होते असे पाहून निरनिराळ्या प्रकारे वर्ग चालू नये, असे प्रयत्न करणारी मंडळीही होतीच. शिकवून जाणारे अनुभव आले ते शिवाजीनगर येथील कलानिकेतनच्या समोर असलेल्या वस्तीत. येथील लोकांचे विविध व्यवसाय म्हणजे लहान लहान चोऱ्या, भीक मागणे, दिवसा जुने-पुराने विकणे. इथपासून ते इतर सर्व काही. इथल्या मुलांना शिकवायला सुरुवात केली. झाडाखालची जागा स्वच्छ करून घेणे इथपासून वर्गाला सुरुवात करावी लागली. वस्तीत जवळच सरकारी जनावरांचा दवाखाना आहे, तेथील व्हरांडय़ातही काही दिवस वर्ग लावला. पण पुढे तेथील डॉक्टर बदलल्यावर नवीन आलेल्या डॉक्टरांनी तेथे वर्ग घेण्यासाठी मनाई केली. दरम्यान, आमची वस्तीत ओळख झाली होती. त्यामुळेच तिथेच एक झोपडी उभी करायला लोकांनी मदत केली. मात्र इथेही रात्री दारूचा अड्डा वैगरे प्रकार सुरू झाले. प्रतिबंध म्हणून भक्कम कुलूप लावले तर खिडकीतून वर्गात घाण टाकणे, कुलूपाला घाण लावून ठेवणे असेही प्रकार झाले. त्या वेळी वस्तीतीलच एक मावशीबाई आमच्या मदतीला आली. तिने वस्तीला कसा आणि काय दम भरला तिलाच माहीत, पण आम्हाला होणारा त्रास थांबला. पुढे ह्या वस्तीतील काही मुले आम्ही ‘अंकुर’ या खासगी शाळेत घातली. त्यातील दोन-तीन मुले आज नववीपर्यंत पोहोचली आहेत.
वस्तीतील बऱ्याच मुलांना पुढे आम्ही तेथील एका शाळेत घातले. गंमत अशी की या मुलांना शाळेत नेण्या-आणण्याची सोय करण्याची बिलकूल जरूर पडली नाही. कारण रस्त्यातून वाहनांच्या गर्दीला चुकवत चुकवत जायचे आणि भीक मागायची हाच त्यांचा व्यवसाय. तो अंगात इतका मुरलेला की वर्ग बघायला आलेल्या पाहुण्यांसमोरही मुले पटकन हात पुढे करीत. दुर्दैव हे की मुलांना शाळेत जाताना घरातून डबा मिळत नसे, कारण घरात रोजच्या रोज चूल पेटेलच असे नाही. जेव्हा असेल तेव्हा खायचे, नसेल तेव्हा उपाशी राहायचे ही सवय. परंतु एकदा शाळेत घातल्यावर इतर मुले जेवणाच्या सुट्टीत डबा खातात आणि या मुलांकडे काहीच नसे (तेव्हा शाळेत जेवण मिळत नसे) असे बघून आम्ही या मुलांना जवळच्या झुणका भाकर केंद्रात नेऊन जेवण देण्यास सुरुवात केली. ह्यामुळे मुले नियमित येतील व मुलांची संख्याही वाढेल असे आम्हाला वाटले होते. आणि तसे झालेही, पण ते फक्त थोडे दिवसच! या वर्गात शिक्षिकांना आलेला आणखी एक निराळा आणि एकदम अचंबित करणारा अनुभव म्हणजे चोरून आणलेली घडय़ाळे, छोटे ट्रान्झिस्टर्स वगरे. ‘हे तुम्हाला घ्या बाई म्हणून’ बाईंना भेट देण्यासाठीही मुले कधी कधी घेऊन येत. मुले कुठेही आणि कशीही असली तरी निष्पापच! प्रेमासाठी आणि आपुलकीसाठी भुकेलेली, हेच खरे.
वस्त्यावस्त्यांवर जाऊन मुलांना शिकवण्याचे काम करीत असतानाच एका बांधकाम मजुरांच्या वस्तीवर काम करण्याची सुरुवात केली. बांधकाम व्यावसायिक ‘अजेंठा बिल्डर्स’च्या कर्वे रोडलगतच्या बांधकामावर आम्ही प्रथम काम केले. ते साल १९९९-२००० असेल. विशेष म्हणजे इथल्या मुलांना शिकवण्यासाठी या साइटवर आम्हाला त्यांनी बोलावून तर घेतलेच, पण वर महिना दोन हजार रुपयेही देण्याची सुरुवात केली. त्यांचे आम्हाला खूपच कौतुक वाटले. पुढे २००२-०३ मध्ये आम्ही पुण्यातील ३८० बांधकामांवरील मजुरांचा सव्‍‌र्हे केला. या सव्‍‌र्हेत निरनिराळे अनुभव, जास्त करून अडचणीच आल्या. या सव्‍‌र्हेत रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांमध्ये एक एम.ए. झालेला तरुण मी स्वत: पाहिला आहे. शिकून हवे ते काम मिळत नसेल तर मिळेल ते काम करावे हा विचार मनात येऊन त्याचा अवलंब करणे सोपे नाही. अशा वेळी पालकांची मुलांना शाळेत घालण्यासंबंधीची उदासीनता का असते किंवा का असावी, या प्रश्नाचे एक कारण लक्षात येते. या ३८० बांधकामांवर ५ ते १५ वयोगटातील शाळेत न जाणारी जवळजवळ ५००० मुले मिळाली. त्या वेळेस पुण्यात चालू असलेल्या बांधकामांची संख्या दीड हजारांच्या वर होती. ही यादी आम्ही पुणे महानगरपालिकेतून आणली. इथून पुण्यातील कामाचे स्वरूप थोडे बदलले. जास्त लक्ष बांधकाम मजुरांवर देणे सुरू केले. त्यामुळे वर्गाचे स्वरूप आणि त्रासही बदलले. कितीतरी अनुभव आले, चांगले आणि वाईटही. काही माणसे अडचणी उभी करणारी, तर काही मदतीला धावून येणारी..
‘पंचवीस वर्षांच्या कामाने मी शिणले आहे’ असे मला एकदाही वाटत नाही. याउलट रोज आणखीन आणखीन काम करावयास हवे, अजून किती प्रचंड काम उरले आहे याचीच जाणीव होते. पंचवीस वर्षांपूर्वी आम्ही कामाला सुरुवात केली ती चार हातांनी. हळूहळू चाराचे आठ, आठाचे सोळा, सोळाचे बत्तीस असे वाढत वाढत आज हजार हात या कामाला लागले आहेत. पण गरज हजारो हातांची आहे. आज आम्ही जे स्वप्न बघतो आहोत ती हजार हातांनी आधार दिलेल्या शिक्षणाच्या िदडीची. येत्या पाच वर्षांत पुणे शहरातील ‘प्रत्येक मूल शाळेत जाणारे असेल’ यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. ‘एक एक मूल मोलाचे नागरिक’ अभियान सुरू करण्यापाठीमागचा उद्देश तोच आहे.
जसे पाचाचे पंचवीस आणि पंचविसाचे हजार हात झाले तसेच हजाराचे हजारो हातही होतील आणि त्यात तुमचे सगळ्यांचेच हात सामील असतील, हा विश्वास वाटतो!
संपर्क- रजनी परांजपे
डोअर स्टेप स्कूल, ११०, परिमल आनंद पार्क, औंध, पुणे-४११००७ दूरध्वनी-९३७१००७८४४, भ्रमणदूरध्वनी.२०-२५८९८७६२
pune@doorstepschool.org / rajani@doorstepschool.org
वेबसाइट-www.doorstepschool.org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा