‘‘उन्हात जाऊ नकोस गं काळी पडशील.’’
‘‘जास्त पोहू नकोस. आधीच सावळी आहेस, त्यात टॅन होशील…’’
‘‘डाळीचं पीठ आणि दूध, हळद एकत्र करून लेप लाव, जरा तरी उजळशील… ‘‘बाकी अटी नाहीत, फक्त मुलगी गोरी हवी.’’

आपल्या आजूबाजूला असंख्य वेळा, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या परिस्थितीत हे संवाद अगदी आजही कानावर पडत असतात. गोरं म्हणजेच सुंदर हे आपल्या मनावर अगदी पक्कं ठसवलं गेलं आहे. इतकं की, त्यामुळे आपला मूळचा, भारतीयांची ओळख असलेला गव्हाळ रंग झाकोळला गेला आहे. आणि फक्त भारतातच ही परिस्थिती नाही. परदेशांतही सगळ्यांचं गृहीतक हे की, ‘व्हाइट’ असणं म्हणजेच सुंदर, अगदी आजही. त्यामुळेच मग ‘ब्राऊन’ रंगाला उजळवण्यासाठी फेअरनेस क्रिम्स आकर्षक जाहिरात पद्धती वापरून गळी उतरवली जातात. आणि मूळच्या सावळ्या, तजेलदार त्वचेची पार वाट लागते. मग करायचं तरी काय? कारण खास सावळ्या रंगासाठी म्हणून कोणतंच क्रिम किंवा डेली केअर प्रॉडक्ट त्यावेळी नव्हतं. यावर अभ्यास आणि अनुभवाच्या जोरावर एका मराठी डॉक्टर दाम्पत्यानं उत्तर शोधलंय त्यासाठी महाराष्ट्र ही जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या डॉ. अभिजीत आणि डॉ. गौरी देसाई या दोघांनी अमेरिकेत सावळ्या रंगाच्या कांतीसाठीच्या संशोधनाची सुरुवात केली.

Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Commodification of beauty
स्त्री ‘वि’श्व : सौंदर्याचं वस्तूकरण
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
Child Marriage, Supreme Court, Child Marriage Prevention Act,
बालविवाहाचा फेरा : भारत मुक्त कधी होईल?
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल
Solutions to achieve educational goals by inculcating interest in learning
सांदीत सापडलेले…!: उपाय

डॉ. अभिजीत देसाई हे त्वचाशास्त्रज्ञ (dermatologist) आहेत तर डॉ. गौरी या पॅथॉलॉजिस्ट आहेत. हे दोघेही गेली २३ वर्षे याच क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय सौंदर्यप्रसाधनांचे सल्लागार म्हणून नेमलं गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, गोऱ्या रंगाबद्दल किंवा तो अधिक उजळावा याविषयीची माहिती जगभरात आहे. मात्र सावळ्या किंवा गव्हाळ वर्णाचं महत्त्व फारसं कुणालाच नाही. त्वचा कोणत्याही रंगाची असली तरी निरोगी असणं महत्त्वाचं आहे कोणीच सांगत नाही, हे त्यांना खटकत होतं.

आपल्याकडे आपण जो गोरा रंग मानतो तो परदेशात विशेषत, अमेरिकेत ‘ब्राऊन’च समजला जातो. त्यामुळे मग दक्षिण आशियाई देश, मलेशिया, पाकिस्तान, श्रीलंका, लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि अर्थातच भारतातले लोक हे ‘ब्राऊन’ असतात. भारतात आपण ज्यांना गोरे म्हणतो तेही परदेशात गेल्यावर ‘ब्राऊन’च असतात. आपल्याकडे सावळा, गव्हाळ, गहू वर्ण, गोरा, गोरापान अशा रंगांच्या श्रेणी आहेत. पण युरोप किंवा अमेरिकेत मात्र अगदी सगळ्या आशियाई लोकांना ब्राऊन म्हटलं जातं, असं डॉ. देसाई सांगतात. आणि त्यामुळेच त्यांनी फक्त भारतीय किंवा आशियाई लोकांचा, नाही तर अगदी लॅटिन अमेरिका ते दक्षिण आफ्रिकेपर्यंतच्या सावळ्या रंगाचा आणि त्याच्या विविध छटांचा विचार केला असल्याचं सांगितलं. डॉ. अभिजीत यांनी दिलेली माहिती काहीशी विस्मयकारकच आहे. ते म्हणाले, ‘‘ब्राऊन स्किन आणि भारतीयांची सावळी वा गव्हाळ त्वचा ही जगात सर्वांत सुंदर त्वचा मानली जाते आणि जगातील ५० टक्के लोकसंख्येची त्वचा ही ‘ब्राऊन’आहे. इतकंच नाही तर ‘ब्राऊन स्किन’ ही सर्वांत फोटोजेनिक समजली जाते. त्यांचे फोटो नैसर्गिकरीत्याच सुंदर येतात.

‘ब्राऊन’ वर्ण चमकदार असल्याने त्यावर हलकासा मेकअपही चेहऱ्याला सुंदर बनवतो. महत्त्वाचं म्हणजे पाश्चिमात्यांच्या तुलनेत ‘ब्राऊन’ त्वचेचं ‘एजिंग’ उशिरा होतं म्हणजे त्याला वार्धक्य जरा उशिराच शिवतं, पण याबद्दल माहिती नसल्यानं गव्हाळ वर्णाबद्दल अभिमान वाटण्याऐवजी अनेकांना न्यूनगंडच वाटतो. म्हणूनच ‘ब्राऊन’ त्वचा असणाऱ्या ५० टक्के लोकसंख्येच्या त्वचेसाठी कोणतीही सौंदर्यप्रसाधने का नसावीत,असा आमचा विचार सुरू झाला आणि त्यातून निर्माण झालं ‘ब्राऊनकाईंड’ हे उत्पादन.’’ डॉ. अभिजीत देसाई आणि गौरी देसाई यांनी खास ‘ब्राऊन स्किन’साठी अमेरिकेत सुरू केलेला ‘ BrownKind’ हा केवळ सौंदर्यप्रसाधनांचा एक ब्रँड नाहीये. तर ती आहे नवीन ओळख! सावळ्या त्वचेचा मूळचा पोत न बिघडवता त्याची काळजी घेण्यासाठी देसाई दाम्पत्यांनं अनुभवाच्या जोरावर ही उत्पादने घडवली आहेत. चेहऱ्याची काळजी अनेक जण घेतात परंतु संपूर्ण शरीराचा, एकूणच त्वचेचा फारच कमी लोक विचार करतात, याचं डॉ. अभिजीत यांना वाईट वाटतं. उलट भारतातही ‘एजिंग’,‘टॅनिंग’बद्दल भीती घालून विविध उत्पादने लोकांच्या गळ्यात मारली जातात आणि लोक त्याला बळी पडतात, असं त्यांना वाटतं. त्यासाठीच त्यांनी आणि डॉ. गौरी यांनी खोलवर याविषयीचं संशोधन केलं आणि मगच उत्पादने बाजारात आणली गेली. या उत्पादनांमध्ये अन्य घटकांबरोबरच आवळा, कोको ( Cacao) आणि Rainbow Algae (एक एकपेशीय वनस्पती) यांचा समावेश आहे, असं डॉ. गौरी यांनी स्पष्ट केलं.

एक पॅथेलॉजिस्ट या नात्यानं डॉ. गौरी यांनी यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्या म्हणाल्या, ‘‘फक्त सौंदर्यप्रसाधनेच नाहीत तर एकूणच त्वचा किंवा सौंदर्यशास्त्रातला अभ्यास हा ९० टक्के गौरवर्णाबद्दलच असतो. ‘ब्राऊन’ त्वचेबद्दल अनेकदा फक्त एकच वाक्य सांगितलं जातं की, त्यात मेलनिनचं प्रमाण जास्त आहे. हे मेलनिन म्हणजे काय, त्याचा उपयोग काय, हे कुणालाच माहिती नसतं. मेलनिनशिवायही इतरही घटक असल्यामुळे गव्हाळ त्वचेला आपोआपच एक संरक्षण मिळतं. त्याचं एजिंग म्हणजे सुरकुत्या पडणंही खूप उशिराने सुरू होतं. मेलनिनमुळे ‘ब्राऊन स्किन’मध्ये पिग्मेंटेशनचं (रंगद्रव) प्रमाण जास्त असतं. आणि हा एक ‘वय होण्याचा’ भाग असू शकतो त्यामुळे ‘ब्राऊन’ स्कीन गोरी कशी होईल यावर भर देण्यापेक्षा पिग्मेंटेशेन’ कसं कमी करता येईल, त्याचं टोनिंग एकसारखं कसं राहील, डार्क स्पॉट्ससारख्या समस्या कशा कमी होतील यावर आमचा भर आहे,’’

खरं तर हे दोघेही भारतात वैद्याकीय ‘प्रॅक्टिस’ करतात. तरीही त्यांनी ‘ब्राऊनकाईंड’ब्रँडची विक्री फक्त अमेरिकेत सुरू केली. त्यामागे खास कारण होतं. एक तर सौंदर्यप्रसाधनांमध्ये अमेरिका ही जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. तसंच इथं श्वेतवर्णीयांची संख्या जास्त असली तरी जगभरातून येणाऱ्या ‘ब्राऊन’ आणि ‘ब्लॅक स्किन’चे (कृष्णवर्णीय) लोक इथं राहतात. त्यामुळे या रंगांच्या प्रत्येक छटा डॉक्टरांना अभ्यासता आल्या. अर्थात अमेरिकेत हे उत्पादन सुरू करण्याचा मार्ग अजिबात सोपा नव्हता. जगभरातील बाजारपेठांमध्ये गोरेपणा आणि ‘अँटी एजिंग’च्या क्रिम्सने धुमाकूळ घातला आहे. सगळ्याच प्रकारच्या त्वचांना त्याची गरज आहे का याचा विचारच केला जात नाही. सरसकट सगळ्यांसाठी ही उत्पादने असल्यासारखी त्याची जाहिरात केली जाते. पण प्रत्येक रंगाच्या त्वचेची गरज वेगवेगळी असते, ती जाणून घेऊन त्याप्रमाणे त्यासाठीची कॉस्मेटिक्स वापरली गेली पाहिजेत, याची जागरूकताच नाही, असं डॉ. गौरी यांचं म्हणणं आहे. त्यासाठी त्यांनी अनेक चाचण्या घेतल्या. या चाचण्या घेताना डॉ. गौरींना पॅथॅलॉजिस्ट असण्याचा खूप फायदा झाला. कोणत्या उत्पादनांत कोणते घटक किती प्रमाणात हवे आहेत याचं समाधान होईपर्यंत हे दोघेही अगदी करोना काळातही अविरत मेहनत करत होते.

करोनाची साथ संपल्यानंतर या उत्पादनांच्या चाचण्या सिंगापूरमधल्या अत्यंत उच्च दर्जाचं तंत्रज्ञान असलेल्या प्रयोगशाळांमध्ये करण्यात आल्या. तसंच अमेरिकेतील स्वतंत्र प्रयोगशाळांमध्येही सर्व प्रकारच्या ब्राऊन आणि ब्लॅक त्वचांवर उत्पादनाची सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासण्यासाठी विविध चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतरच विविध उत्पादनं बाजारात आणण्यात आली. यामध्ये क्लिन्सर्स (फेस वॉश)पासून ते मॉईश्चरायझर्स आणि अगदी व्हिटॅमिन सी सिरमपासून ते डार्क स्पॉट करेक्टर्सची रेंज आहे. ही उत्पादने सध्या फक्त अमोरिकेत उपलब्ध आहेत.

खरं तर साध्या चेहऱ्यापासून ते अगदी पायाच्या नखापर्यंत असंख्य प्रकारची सौंदर्यप्रसाधने बाजारात सहजपणे उपलब्ध आहेत. पण आपली त्वचा आहे तशीच ठेवून ती जास्तीत जास्त निरोगी, नितळ कशी ठेवता येईल यासाठीची उत्पादने अगदी कमी आहेत. गौरी देसाई यांच्या मते ‘ब्राऊनकाईंड’ हे त्यांच्यासाठी केवळ एक उत्पादन नाही, तर ते दोघेही याकडे एक चळवळ म्हणून बघतायेत. जवळपास १०० वर्षांपासून चालत आलेली ‘गोरेपणा म्हणजेच सौंदर्य’ ही व्याख्या बदलणं अजिबात सोपं नाही याची त्यांना जाणीव आहे. पण आपल्या त्वचेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्याची ही सुरुवात ठरू शकते असं त्यांना वाटतं. आपल्या त्वचेवर प्रेम करायला शिकवण्यासाठी कदाचित ही पहिली पायरी ठरू शकते, असं त्यांचं म्हणणं आहे.

वैद्याकीय क्षेत्रात नाव आणि पैसा मिळवून आपलं आयुष्य हवं तसं घालवता येणं हे या मराठी डॉक्टर दाम्पत्यासाठी अजिबातच अवघड नव्हतं. पण फक्त आपल्यापुरताच विचार न करता त्यांनी आपलं वैद्याकीय क्षेत्रातलं ज्ञान आणि अनुभव पणाला लावत एका नवीन विचाराची सुरुवात केली आहे. ‘ब्राऊनकाईंड’ हे नाव आपल्या उत्पादनांसाठी ठेवताना डॉ. देसाईंनी एक वेगळाच विचार मांडला आहे. Brown हा आपण ज्या रंगासह जन्माला येतो त्याचं प्रतिनिधित्व करणारा शब्द तर Kind म्हणजे तुमच्या त्वचेवर प्रेम करा, त्याची काळजी घ्या आणि यामध्ये एक छोटासा own आहे, ज्याचा अर्थ ‘ own your shade of Brown,’ असा विचार करून हे नाव ठेवण्यात आल्याचं डॉ. गौरी सांगतात.

परदेशात राहून भारतात आपला व्यवसाय किंवा अन्य काही करणारे अनेक जण आहेत. पण भारतात राहून मराठी माणसानं अमेरिकेत तेही कॉस्मेटिक्सच्या, अर्थात सौंदर्यप्रसाधनांच्या क्षेत्रात उतरणं हे कौतुकास्पद पण तितकंच आव्हानात्मकही नक्कीच आहे.

ketakijoshi.329@gmail.com

Story img Loader