‘‘भूमिका करण्याची एक गंमत असते. कलाकाराला त्या भूमिकेचा आत्मा सापडावा लागतो. हा आत्मा सापडला तर त्याच्या हातून ती भूमिका चांगली होते. एवढेच नव्हे तर, त्या भूमिकेचे सोने होते. मग, त्या कलाकाराला आणि रसिकांनाही त्यातून आनंद मिळतो. दोन दशके मी रंगमंचावरून नाना साकारला. २० वर्षे मी या भूमिकेशी संसार केला. लोक इतकी वर्षे संसारदेखील करीत नाहीत हल्ली. ही भूमिका म्हणजे माझ्यासाठी कलाकुसर करण्याचे कशिदाकाम ठरली. ’’ सांगताहेत सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. मोहन आगाशे.
माणूस आणि नट यांच्यामध्ये पुसटशी पण, रसिकांना न दिसणारी अशी एक रेषा आहे. देअर इज वन लाइन. नाटकाचा प्रयोग सुरू होण्यापूर्वी िवगेमध्ये उभा असताना मी मोहन आगाशे असतो. ही रेषा ओलांडून मी रंगमंचावर प्रवेश करतो तेव्हा ‘घाशीराम’मधील नाना असतो. ‘काटकोन त्रिकोण’मधील आबा किंवा बापट असतो. िवगेतून रंगमंचावर येतानाचा हा क्षण कमी वेळाचा असतो. पण, रंगमंच कलाकाराला ते बेअिरग सांभाळणे महत्त्वाचे असते. कॅमेऱ्यामध्ये माणूस ते कलाकार हा बदल इन्स्टंटली होऊ शकतो. मोहन आगाशे हा माणूस कलाकार म्हणून लगेच स्विच ओव्हर होऊ शकतो. पण, रंगमंचावर काम करताना या रेषेचे भान ठेवायला लागते आणि त्यानुसार आपल्यामध्ये बदल घडवावा लागतो. भूमिका करणे म्हणजे भूमिका जगणे आहे की नाही हे मला माहीत नाही. भूमिका करणे हा परकायाप्रवेश आहे असेही म्हटले जाते. कलाकार म्हणून मी परकायाप्रवेशाच्या वाटेवर आहे. हा परकायाप्रवेश अजून जमतो असे वाटत नाही.
भूमिका करण्याची एक गंमत असते. कलाकाराला त्या भूमिकेचा आत्मा सापडावा लागतो. हा आत्मा सापडला तर त्याच्या हातून ती भूमिका चांगली होते. एवढेच नव्हे तर, त्या भूमिकेचे सोने होते. मग, त्या कलाकाराला आणि रसिकांनाही त्यातून आनंद मिळतो. माणूस प्रेम कसा करतो यावरून त्याची संस्कृती ध्यानात येते. एखाद्याकडे पाहून प्रेम व्यक्तकरता येते. न पाहतादेखील प्रेम व्यक्त होऊ शकते. प्रेम व्यक्त करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला स्पर्शच करावा लागतो असे नाही. अभिनयाचेही काही अंशी असेच आहे. एक माणूस म्हणून अस्तित्वाच्या विविध पातळ्या अनुभवावयाच्या असतील तर त्यासाठी मनाची श्रीमंती असावी लागते. ही श्रीमंती व्यक्त करताना त्याला भान ठेवावे लागते. त्यामुळे कलाकार म्हणून काम करताना नाटकाचा लेखक कोण आहे, त्याची शब्दकळा आणि आकृतिबंध या बाबीदेखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून उपयोगाचे नाही. भावनिकदृष्टय़ा भूमिका सादर करताना अनुभवलेल्या भावना त्यामध्ये आल्या पाहिजेत. वैयक्तिक आयुष्यातून आलेले अनुभव व्यावसायिक आयुष्यात वापरायचे. एका अर्थाने हे ‘नॉन रिफण्डेबल लोन’च आहे. वैयक्तिक जीवनातील अनुभवांचे संचित म्हणजे ‘रूपी’ हे रंगमंचावरील अभिनयाच्या ‘बँके’मध्ये ठेवायचे आणि रसिकांना आनंद द्यायचा असतो.
अभिनयाचा फील घेणं वेगळं आणि अभिनयामध्ये वेडं होणं वेगळं. कलाकार म्हणून मी भूमिका करताना त्या व्यक्तिरेखेचा ‘फील’ रसिकांना दिला पाहिजे. काही कलाकार हे स्वत:चं व्यक्तित्व विसरतात. त्यातून गोंधळ निर्माण होतो. माणूस आणि कलाकार यातील भेद ओळखता आला तरच कलाकाराला जीवन जगणे सुसह्य़ होईल. नाटक संपले आणि रंगमंचावरून बाहेर आला की कलाकार हा कलाकार राहत नाही. तोदेखील अन्य लोकांप्रमाणे सर्वसामान्य माणूसच असतो. या बाबी समजून घेतल्या तर ठीक. नाही समजून घेतले तर, मी ‘तुकाराम’ अशी त्याची अवस्था होते. उद्या मी स्वत:ला ‘मोगॅम्बो’ म्हणवून घेतले तर चालेल का? अभिनय केव्हा करायचा आणि जीवन केव्हा जगायचे हे कलाकाराला समजले पाहिजे. हा एक प्रकारचा ‘अ‍ॅनास्थेशिया’च आहे. भूल उतरायला वेळ लागतो. तसे कलाकाराला भूलमधून बाहेर पडून माणूस व्हायला वेळ हा लागतोच. कलाकारानं भूमिकेसाठी वेडं होणं हे ‘हेल्दी’ वाटत नाही. ते त्याच्या सुदृढतेचे लक्षण नाही. या गोष्टीचा त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे कलाकारांमध्ये मानसिक आजाराचं प्रमाण अधिक आहे. भानावर येणं त्याच्यासाठी कठीण असते. २४ तास आपण कलाकार आहोत, असेच त्याला वाटू लागले तर ते त्याच्यासाठी अधिक धोकादायक ठरू शकते.
जब्बार पटेल या माझ्या मित्राबरोबर महाविद्यालयीन दशेपासून नाटकं करतो आहे. त्याच्याबरोबर ‘अशी पाखरे येती’ हे नाटक केले. एकदा या नाटकाचा प्रयोग सुरू असताना दुसऱ्या अंकामध्ये प्रकाशाची तिरीप आली ती थेट माझ्या नाकावरच. त्या प्रकाशामध्ये माझे नाक पाहून जब्बार म्हणाला, ‘हाच आपला नाना फडणीस.’ जब्बार हा असा भला माणूस आहे की तो कलाकाराला मधाचं बोट लावत असतो. त्याच्यावर विश्वास ठेवून कलाकार आनंदात राहतात की कधी तरी जब्बार आपल्याला भूमिका देईल. माझ्या वाटय़ाला मात्र असा अनुभव आला नाही. सहा महिने ‘घाशीराम’च्या तालमी झाल्या. मी ग्रुपमध्ये नाचायचो. त्यामुळे मला रिदमची चांगली जाण होती. या बलस्थानामुळेच मला ‘जैत रे जैत’ चित्रपटातील भूमिकादेखील मिळाली. ‘घाशीराम’मधील नाना हा इतिहासातील नाना नाही. तर, तो वर्तमानातील नाना आहे. अफाट बुद्धिमान, तोरा असलेला ऐटबाज. स्त्री हा त्याचा ‘वीकनेस’ असला तरी या नानामध्ये लंपटपणा नाही. असलाच तर, रगेलपणा आणि रंगेलपणा आहे. या भूमिकेसाठी मी मिश्या वाढवल्या. दोन दशके मी रंगमंचावरून नाना साकारला. २० वर्षे मी या भूमिकेशी संसार केला. लोक इतकी वर्षे संसारदेखील करीत नाहीत हल्ली. ही भूमिका म्हणजे माझ्यासाठी कलाकुसर करण्याचे कशिदाकाम ठरली. प्रत्येक वेळी प्रयोग करताना नवीन जागा सापडायची. नानाचा पाहण्याचा नवा लूक, पॉज घेण्याच्या वेगवेगळ्या शक्यता मी अजमावून पाहिल्या. माझ्यासमवेत काम करणाऱ्या कलाकारांना हे समजत होते. मी करीत असलेले बदल हे त्यांनी सांभाळून घेतले. त्यातून आम्हा कलाकारांना आणि रसिकांनाही आनंद मिळाला. ‘तो मी नव्हेच’मधील प्रभाकरपंत पणशीकर यांचा अपवाद वगळता एखाद्या भूमिकेशी एवढी वर्षे संसार केल्याचे ध्यानात येत नाही.
‘घाशीराम कोतवाल’ नाटकानंतर मी २० वर्षे ग्रीप्स थिएटर केले. मुलांसाठी ही अप्रतिम रंगभूमी आहे. पाश्चात्त्य रंगभूमीमध्ये मुलांकडे हुशार प्रेक्षक म्हणून आदराने पाहिले जाते. बालनाटके म्हणजे केवळ मनोरंजन नाही. ग्रीप्स रंगभूमीने मराठीमध्ये समृद्ध नाटके दिली. ही नाटके म्हणजे चीप करमणूक नव्हती. तर, पौष्टिक मनोरंजन होते. सध्याच्या काळात मुलांवर संस्कार करण्यासाठी आई-वडिलांकडे पुरेसा वेळ नाही. ते काम या नाटकांनी केले. मुख्य म्हणजे मी या नाटकांतून काम केले नाही. लेखक, कलाकार, संगीतकार, नेपथ्यकार, रंगभूषाकार या साऱ्यांची मोट बांधण्याचे काम केले. या कामातून मला अभिनयातून मिळणाऱ्या आनंदाइतकाच आनंद अनुभवता आला. श्रीरंग गोडबोले आणि अगदी लहान वयाची असल्यापासून विभावरी देशपांडे हे कलाकार या ग्रीप्स थिएटरशी जोडले गेले. एवढेच नव्हे तर, त्यांनी वैयक्तिकरीत्या काम करतानाही आपला ठसा उमटविला आहे. चांगल्या नाटकासाठी भावी प्रेक्षक जोडण्याची कला ग्रीप्स रंगभूमीच्या नाटकांनी यशस्वीपणे साध्य केली.

अमिताभ बच्चन, नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, मोहन जोशी, दिलीप प्रभावळकर, चंद्रकांत काळे हे कलाकार मला आवडतात. मोहन गोखले हा असाच एक हरहुन्नरी कलाकार होता. चित्रपटसृष्टीत काही जण नट म्हणून उत्तम आहेत. पण, त्यांचे काम आवडतेच असे नाही. कोणत्या कलाकाराची कुठली व्यक्तिरेखा साकारायला आवडेल असे मला विचारले जाते. पण, कलाकाराने अधाशीपणा करू नये असेच मला वाटते. दुसरा कलाकार चांगले काम करीत असेल तर ते बघावे. सगळेच मला हवे ही भूमिका योग्य नाही. वेगवेगळ्या वयांत वेगवेगळे कलाकार आणि भूमिका आवडतात. गेली ४० वर्षे पैसे न घेता रंगभूमी केली. नाटक शिकण्यासाठी फी दिली, असे समजून नाटक गंभीरपणे केले. शाळेत जाऊन अभ्यास न करणे योग्य आहे का?
नाटकाचा प्रेक्षक बदलत गेला. मी एखादे नाटक २० वर्षांचा असताना पाहिल्यावर मला ते आवडले होते. पण, आता पुन्हा पाहिले तर तेच नाटक आवडेल असे ठोसपणे सांगता येत नाही. आता नाटक आणि प्रेक्षक प्रगल्भ झाला की नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही. सामाजिक बदल नाटकांमध्ये प्रतििबबित होत आहेत. हा बदल नक्की झाला आहे. ग्रंथालयातील सगळी पुस्तके वाचणे अशक्य आहे. त्याप्रमाणेच प्रदर्शित होणारा प्रत्येक चित्रपट आणि सगळी नाटके पाहणे हेदेखील अशक्य आहे. दिलीप प्रभावळकर, स्मिता तळवलकर यांच्यासह युवा पिढीमध्ये सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, मृणाल कुलकर्णी हे कलाकार लेखनातून व्यक्त होतात. मला लिहिता येत नाही. मी लेखक नाही याचे दु:ख होते. त्यांना लिहिता येते याचे कौतुकही वाटते आणि रागदेखील येतो. उत्तम काम करणारे कलाकार त्यांच्या भूमिकांतून आणि लेखनाच्या माध्यमातून सगळीकडे पोहोचतात याबद्दल प्रचंड ‘असूया’ही वाटते. कलाकार दिवसेंदिवस लहान होत जातो आणि लेखक दिवसागणिक मोठा होत असतो असे म्हटले जाते. मेल्यावर तर लेखक आणखी मोठा होतो.
नुकताच मी ‘अस्तू’ हा चित्रपट पूर्ण केला आहे. नाटय़ कार्यशाळा (थिएटर वर्कशॉप) घेणारी नायिका आणि विस्मरण म्हणजेच अल्झायमर झालेले संस्कृतचे निवृत्त प्राध्यापक हे तिचे वडील असे कथानक आहे. नायिका भूमिकांचा खेळ घेत असते. तुमचे नाव, अस्तित्व, नातेसंबंध विसरून दुसरी कोणती गोष्ट करायला आवडेल, असा खेळ ती घेत असताना तिच्या डोळ्यांसमोर वडील येतात. जीवनाचा सारीपाट उलगडून विस्मयचकित करणारी ही गोष्ट आहे. अभिनय ही अशीच गोष्ट आहे.


‘चतुरंग मैफल’मध्ये पुढील शनिवारी  (२२ जून ) च्या अंकात  सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा 

Story img Loader