डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याबरोबर अनेक उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या रूपाताईंनी आपल्या या ‘चळवळ्या’ सोबत्याच्या विविध कार्यक्रम, मोहिमांतील जपलेल्या या आठवणी.
नरेंद्र म्हणजे आमच्या पिढीचं एक लखलखतं बावनकशी नाणं. १९४५-४६ ला जन्मलेली आमची पिढी आता सत्तरीकडे झुकतेय, पण का कोण जाणे, ही पिढी दिसायला म्हातारी झाली नाही आणि असायलाही. आणि याचं मूíतमंत प्रतीक म्हणजे नरेंद्र होता. तरुणांनाही लाजवेल अशा तडफेनं इतकी असंख्य अवधानं सांभाळणारा अष्टावधानी, अष्टपैलू असा तो हिराच होता. तो करीत असलेल्या कामांपैकी एकदेखील, इतकं इतकी वर्षे करीत राहणं मोठं मुश्कील आहे. कसा एवढय़ा कामांचा डोंगर तो पेलत असेल कल्पनाही करवत नाही. एवढं सगळं करू न कधी त्याचा आव नाही, अहंकार नाही, ताण नाही, चिडचिड नाही की प्रदर्शन नाही. वागणुकीत कमालीची सहजता, समोरच्या विषयीची आस्था आणि स्वभावातील साधेपणा. आपण कोणीतरी नेते आणि भोवतालचे अनुयायी असा आविर्भाव तर त्याच्यात कधीच पाहायला मिळाला नाही.
नरेंद्रमधील सर्वात महत्त्वाचे अनुकरणीय गुण म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्त्वातील निव्यार्जता, निर्मोहिता आणि प्रामाणिकपणा. मग ती अनौपचारिक चर्चा असो की जाहीर व्याख्यान! …
त्याच्या पारदर्शी चारित्र्यामुळेच त्याच्यावर लोकांचा अपार विश्वास बसला होता. या विश्वासामुळेच त्याला त्याच्या कामांमध्ये लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. मग ते काम अंधश्रद्धा निर्मूलनाचं असो, व्यसनमुक्तीचं असो, जातपंचायतविरोधी आंदोलनाचं असो की ‘एक उपवास कृतज्ञतेचा’ या अभियानाचं असो. ‘ग्रेट भेट’मधील निखिल वागळे यांनी ‘साधना’ साप्ताहिकाला मिळणाऱ्या चांगल्या जाहिरातींचा उल्लेख करून त्याचं रहस्य काय असं मिश्कीलपणे विचारल्यावर ‘विश्वास’ हेच उत्तर नरेंद्रने दिलं होतं. साधनेत जाहिरात दिल्यावर व्यावसायिक फायद्यातोटय़ाचं गणित कुणी करीत नव्हतं ते नरेंद्र दाभोलकर या संपादकावरील प्रचंड विश्वासामुळेच! साधनेचा गौरव विशेषांक तर कित्येकांच्या स्मरणात असेल.
आयुष्यभर विविध उपक्रम राबवून समाजात चेतना जागविण्याचं मिशन नरेंद्रने पत्करलं होतं. तो अत्यंत उपक्रमशील होता. त्याच्या कृतीत त्याची स्वत:ची वेगळी प्रतिभा दिसून येत असे. सुरू केलेला उपक्रम तडीस नेण्याची त्याची चिकाटी वाखाणण्यासारखी होती. मी स्वत: याची साक्षीदार आहे. तो काळ होता १९८६च्या सुमाराचा. सामाजिक कृतज्ञता निधी संकलनासाठी ‘लग्नाची बेडी’चे प्रयोग महाराष्ट्रभर करण्याचे ठरल्यावर, दौऱ्यांच्या तारखा ठरल्या. विदर्भाच्या सर्व जिल्ह्य़ांमधील दौऱ्यांमध्ये नरेंद्र आमच्याबरोबर फिरला. नाटकाचे प्रयोग त्यांच्या तराखा, त्यासाठी नाटय़गृह आरक्षित करण्यापासून, कलाकारांच्या निवासाच्या व्यवस्थेपर्यंतचे तपशील त्या त्या जिल्ह्य़ात ठरविण्यासाठी डॉ. बाबा आढाव, नरेंद्र व मी बैठकी घेत होतो. असेच आम्ही चंद्रपुरात मीटिंग घ्यायला गेलो असताना, रात्रीचा मुक्काम माझी मावशी डॉ. अनसूया देवईकर (बाबी मावशी) यांच्याकडे केला होता. दुसऱ्या दिवशी पहाटे यवतमाळला जायचं होतं. सकाळी उठून पाहतो तो आमच्या बॅगस्सकट गाडी घेऊन ड्रायव्हर पळून गेला होता. विचार करायला फुरसदच नव्हती. यवतमाळला वेळेवर म्हणजे सकाळी १०च्या सुमारास पत्रपरिषदेपूर्वी पोहचण्याच्या दृष्टीने लगेच बसने निघणं भाग होतं. मला अजूनही आठवतं कसाबसा चहा घेऊन आम्ही तिघं कडाक्याच्या थंडीत मावशीच्या घरातून बाहेर पडलो आणि समोरच्या बसस्टॉपच्या दिशेने अक्षरश: धावत सुटलो. डोक्यावर शाली पांघरून पहाटेच्या अंधारात रस्त्यावरून बाबा पुढे पळताहेत, त्यांच्यामागे मी आणि माझ्यामागे नरेंद्र असे आम्ही शेवटी एकदाचे बसमध्ये कसेबसे धडपडत चढलो होतो. यवतमाळला नानभाऊ एंबडवारांनी आम्हाला कपडे घेऊन दिले होते. याच्या आठवणी नरेंद्रसोबत नुकत्याच काढताना पुन्हा एकदा पोट धरून हसलो होतो. आता पुन्हा तसं खो खो हसायला नरेंद्र येणार नाही, या विचाराने मन विषण्ण होतं.. विशेषत: ‘साकृनि’च्या लेटरहेडवरील ३ ऑगस्टचं त्याचं शेवटचं पत्र या आठवडय़ात पोस्टमनने आणून दिलं तेव्हा तर ही स्मरणसाखळी पुन्हा जिवंत झाली. डोळ्यांत आसवं आली.
अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक सरकारने अविलंब मंजूर करावं यासाठी सह्य़ांचं अभियान सुरू करण्याचा कार्यक्रम नागपुरात २० फेब्रुवारी २०१३ रोजी संध्याकाळी नागपूरच्या हिंदी मोरभवनात ठरला होता. नरेंद्रचा फोन आला आणि ‘तुला नक्की यायचं आहे’ असं म्हणाला. त्याच दिवशी विदर्भ मोलकरीण संघटनेतर्फे वृद्ध घरकामगारांच्या पेन्शनच्या मागणीसाठी आम्ही ‘रोड शो’ आयोजित केला होता. तो आटोपून मोरभवनमध्ये पोहचायला मला ५-१० मिनिटे उशीर झाला होता. तोपर्यंत खोब्रागडे (निवृत्त सनदी अधिकारी) यांच्या उपस्थितीत वक्तशीर नरेंद्रने कार्यक्रम सुरू केला होता. आंदोलनाची पुढची दिशा कशी असावी यावर सुस्पष्ट व सविस्तर चर्चा त्या दिवशी झाली होती. फॉम्र्सवर लोकांच्या सह्य़ा आणण्यासाठी फॉम्र्सचं वितरण करण्यात आलं. सनदशीर मार्गाने सरकारला एखादी गोष्ट करण्यास भाग पाडण्याची कल्पना निर्विवादपणे चांगली असली तरी उपद्रवमूल्य वाढविण्याशिवाय काही वेळा गत्यंतर नसतं. तीच भाषा सरकारला जास्त चांगली कळते असाही विचार त्या दिवशी मांडण्यात आला होता. शेवटी महाराष्ट्र सरकारने जादूटोणाविरोधी कायद्यासाठी वटहुकूम काढण्याची घोषणा केली खरी. पण केव्हा? जेव्हा त्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य पणाला लावलेले नरेंद्र या जगात राहिलेच नाहीत तेव्हा.
गेल्या वर्षी, ४ ऑक्टोबर २०१२ ला नागपूरच्या सेवादल महाविद्यालयात सकाळी विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम ठेवण्यात आला होता. नरेंद्रसोबत मलाही बोलावलं होतं, पण त्याच दिवशी मी पडले आणि मला दुखापत झाली. मी फोनवर हे कळविलं तेव्हा माझ्या प्रकृतीची चौकशी करूनच नरेंद्र आयोजकांसोबत पुढे कार्यक्रमाला रवाना झाले हे मी कसं विसरू?
नरेंद्रबद्दलही आम्ही जेव्हा नागपुरात बोलत असू तेव्हा डॉ. भा.ल. भोळे नेहमी त्याच्या उत्कृष्ट संघटनकौशल्याची आणि कार्यकर्त्यांमधल्या त्याच्या लोकप्रियतेची तारीफ करीत असत. नरेंद्र हा स्वत: एक क्रीडापटू असल्यानेच त्याला हे साधतं असं आम्ही म्हणत असू.
‘साधना’ साप्ताहिकाला आजचं जे विलोभनीय स्वरूप आलं आहे, अंतर्बाह्य़ संग्राह्य़ रूप आलं आहे त्यामागे नरेंद्रची तपश्चर्या, अथक परिश्रम आणि प्रतिभा कारणीभूत आहे. स्वत: पत्रकार नसतानाही एक मासिक इतकं यशस्वीपणे चालविणं ही खरोखर किमया आहे. साथी विनोद शिरसाठसारख्या सहकाऱ्याला याचं श्रेय जाहीरपणे देण्याचा मनाचा उमदेपणा नरेंद्रजवळ होता. महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार मिळालेल्या साऱ्यांना साधनेचे अंक तीन वर्षेपर्यंत नि:शुल्क पाठविण्याचा निर्णय नरेंद्रने घेतला आणि आजतागायत आम्हाला खरोखर ‘साधना’चे अंक अगदी नियमितपणे पाठविले. महाराष्ट्र फाऊंडेशन आज त्याच्याविना पोरकं झालं.
आज या साऱ्या आठवणींच्या स्वरूपात डॉ. नरेंद्र दाभोलकर आम्हा कार्यकर्त्यांच्या मनात अमर आहेत. मारेकऱ्यांनी त्यांचं शरीर नष्ट केलं, पण या आठवणींना, त्यांच्या बहुआयामी कार्याला आणि त्यामागील त्यांच्या समर्पित वृत्तीला मात्र मरण नाही. ती त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या मनात चिरंतन राहील.
बहुआयामी कार्य, समर्पित वृत्ती
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याबरोबर अनेक उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या रूपाताईंनी आपल्या या ‘चळवळ्या’ सोबत्याच्या विविध कार्यक्रम, मोहिमांतील जपलेल्या या आठवणी.
आणखी वाचा
First published on: 31-08-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr narendra dabholkar and his work