‘‘आपल्या देशात दर आठ मिनिटाला एक मूल बेपत्ता होतं. त्यातली ४० टक्केमुलं पुन्हा कधीच त्यांच्या आईवडिलांना सापडत नाहीत. ही मुलं कुठे जातात, हा अस्वस्थ करणारा अनुत्तरित प्रश्न आहे..’’ अनाथ-बेवारस मुलांना दत्तक विधान प्रक्रियेद्वारे योग्य कुटुंबाच्या हवाली करत त्याचे भविष्य सुरक्षित करणाऱ्या, या मुलांसह कुमारी माता, बलात्कारित मुली-माता, घटस्फोटित-परित्यक्ता यांच्याही पुनर्वसनासाठीही आग्रही असणाऱ्या डॉ. प्राजक्ता कुलकर्णी यांचे ‘स्नेहांकुर’च्या स्थापनेपासूनच्या प्रवासातले हे अनुभव त्यांच्याच शब्दांत..
‘सामाजिक कार्यकर्त्यांने संस्थेत प्रवेश करताना घरची सुख-दु:ख घरीच ठेवायची असतात. तर संस्थेतून घरी येताना संस्थेच्या समस्या, व्याप सारे काही तेथेच टाकून घरी परतायचे असते. त्यातून ती जर कार्यकर्ती असेल तर घरात शिरून एक आई, एक पत्नी, एक सून, केवळ कुटुंबातील एक व्यक्ती बनायचे असते,’ असा रोकडा सल्ला अनेक जण आस्थेने देतात. तो आदर्श असला तरी फार अव्यवहार्य ठरतो हा गेली कित्येक वर्षांचा माझा अनुभव आहे. अशा साऱ्यांना ‘टीम स्नेहांकुर’ची दैनंदिनी सांगायची तरी कशी, हा प्रश्न पडतो. आजचेच पाहा. बलात्कारित आणि एच.आय.व्ही.बाधित महिलेच्या आज सकाळी ६ वाजता जन्मलेल्या बालिकेची पी.सी.आर.ए. चाचणी पॉझिटिव्ह आली. म्हणजे ते बाळ कायमचेच एच.आय.व्ही.ग्रस्त राहणार होते. मग लगेच त्याला आणि त्याच्या आईला ‘स्नेहालय’च्या ‘िहमतग्राम’मध्ये कायमचे पुनर्वसित करण्याची योजना सुरू झाली. सकाळी ९ च्या सुमारास जालना जिल्ह्य़ातून १४ वर्षांची आठ महिन्यांची गर्भवती तिच्या विधवा आईसह मदतीसाठी आली. तिचा ३५ वर्षांचा विवाहित चुलत भाऊच तिच्यावर तिचे वडील वारल्यापासून लंगिक अत्याचार करीत होता. आपण बलात्काराचा गुन्हा दाखल करू असे मी सुचवले तर, मुलीची आई हंबरडा फोडून रडू लागली. असे केल्याने तिच्या मोठय़ा मुलीचे ठरलेले लग्न हे लोक मोडतील, घरातून हाकलतील आणि खूनही करतील, असे त्या मायलेकी म्हणू लागल्या. तोच दुपारी आपल्या ७ वर्षांच्या अतिशय देखण्या मुलाला घेऊन पुण्यातून एक मध्यमवयीन दाम्पत्य आले. दोघेही चांगल्या घरातले व उच्चशिक्षित वाटत होते. मात्र पत्नीवर विवाहबाह्य़ संबंधांचा आळ घेऊन नवरा तिला रोज बडवायचा. आता तो तिच्यावर घटस्फोटासाठी जबरदस्ती करत होता. त्यापूर्वी आपला मुलगा एखाद्या चांगल्या (?)  कुटुंबाने दत्तक घ्यावा म्हणून ते ‘स्नेहांकुर’ केंद्राकडे आले होते. बायकोला मुलापासून दूर व्हायचे नव्हते. तर नवरा तिच्यावर मूठ उगारून मला म्हणायचा, ‘परित्याग करताना तुम्हाला ही बाई (त्याची पत्नी) निमूटपणे सही देईल, ही त्याची जबाबदारी.’ त्यांचा गोंडस मुलगा हे सारे शून्यात नजर लावून बघत होता. त्याला मी समजवण्याचा प्रयत्न केला तर सारे व्यर्थ. मात्र, सलग ६ तास तहान-भूक, नसíगक विधी सारं काही विसरून आई-बापांचा तमाशा पाहणाऱ्या त्या विमनस्क मुलाचा भेदरलेला चेहरा सारखा आठवत राहिला. हे सर्व चालू असताना एका मतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेचा मोबाइलवर एसएमएस आला. ‘सचेतन’ या शिर्डी येथील साई मंदिरात सापडलेल्या बेवारस मतिमंद मुलाचा सांभाळ करण्यासाठी दरमहा १० हजार रुपये व्याज मिळेल, एवढे पसे ठेव म्हणून दिले तरच सांभाळू, अशी अट एका संस्थेने ठेवली होती. त्याचे काय करायचे, हा प्रश्न होता. ‘स्नेहांकुर’मधून निघताना लष्करातील कर्नल अधिकारी सपत्नीक आले. त्यांचा १६ वर्षांचा तरुण मुलगा एका अपघातात जागीच ठार झाला होता. त्याच्या आठवणीने ते दोघेही हमसून रडत होते. अशा वेळी आपले काम थंडपणे केले तर त्यांचा गरसमज होऊ शकतो, म्हणूनच ते दोघे पूर्ण शांत होईपर्यंत त्यांची समजूत काढावी लागली.
अशा रोजच्या ताणतणावांना तोंड दिल्यावरही आजच्या दिवसातील बऱ्याच प्रश्नांच्या गाठी मला आणि आमच्या टीमला सोडवता आल्या नव्हत्या. माझ्याप्रमाणेच अजय वाबळे, बाळासाहेब वारुळे, रोहित परदेशी, रमेश सालके, सागर िशदे या आमच्या टीम मेंबर्सकडेही आणखी काही अस्वस्थ अनुभव आणि चच्रेचे मुद्दे होते, पण हे मागे ठेवून घरी परतले. कुशीत झेपावलेली माझी मुले- चेरी आणि ऋग्वेद लाडिकपणे बरेच प्रश्न विचार होते, पण त्यांचे बोलणे माझ्या सुन्न मेंदूत शिरत नव्हते. आपण एकीकडे मुलांसाठी काम करतो आणि आपल्याच मुलांवर अन्याय करतो, हा विचार आल्यावर एक अपराधी भावना मनात दाटली. बऱ्याच प्रयत्नानंतर मनाची सुन्नता आवरली. भूतकाळात डोकावताना  जाणवले की, गेले संपूर्ण दशक नवे प्रश्न, नव्या समस्या, त्यावरील तोडगे काढण्याची धडपड यातच गेले. या प्रामाणिक आणि प्राणांतिक धडपडीने आपले आणि ‘स्नेहांकुर’मधील सहकाऱ्यांचे जीवन आशयसंपन्न केले, अनेक बालके आणि त्यांच्या मातांचे भविष्य संरक्षित आणि उज्ज्वल झाले. तथापि, प्रश्नांचे भोवरे शांतवण्याऐवजी जास्तच खोलावत चालले आहेत. समोर येणाऱ्या समस्यांवरील उत्तरे शोधणे, न्याय मिळवून देणे, न्यायासाठी संघर्ष करणे हे दिवसेंदिवस अधिकच आव्हानात्मक होतेय.
 ‘स्नेहालय’शी असलेल्या माझ्या तोंडओळखीचं रूपांतर १९९७ साली अतूट नात्यात झालं. निमित्त ठरलं संस्थापक गिरीश यांच्याशी झालेला विवाह. त्या वेळी जागेअभावी एड्सबाधित महिला व मुले आमच्या अहमदनगरमधील जुन्या वाडय़ात आमच्यासोबतच राहात होती. संस्थेचे कार्यालय घरातच होते. बालवधू, कुमारी माता, विधवा, समस्याग्रस्त परित्यक्ता, फसवणूक व शोषण झालेल्या मुली-महिला, लालबत्ती भागातील महिला व त्यांची मुले हेच आमचे रोज भेटणारे गणगोत. नावे-गावे वेगळी. पण ‘शोषित’ या एकाच जातकुळीत मोडणारे. त्यांची पर्यायहीनता आणि दुरवस्था याने वेदनेचे कढ मनात दाटत. वर्तमानपत्रांचे रकाने रोजच बेवारस मरून पडलेल्या किंवा मारून फेकलेल्या नवजात बालकांच्या बातम्यांनी भरलेले असत, आई नसलेल्या मुलांचा पोरकेपणा, तरुण कुमारी मातांची ‘वाईट चालीच्या’ असा काळिमा लावून केली जाणारी निर्भत्सना हृदय पिळवटून टाकायची. लालबत्तीत ‘स्नेहालय’चे पायाभूत स्वरूपाचे काम सुरू होतेच. मग अशा  कुमारी माता, बलात्कारित मुली-महिला आणि त्यांच्या अनौरस-बेवारस बालकांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी आम्ही ठोस पर्याय शोधू लागलो. चिंतन, निरीक्षण आणि संवादातून ‘स्नेहांकुर’ची संकल्पना विकसित झाली. याच नावाने बालकांचे दत्तक विधान केंद्र व या मातांच्या पुनर्वसनाचे काम सुरू करण्याची प्राथमिक कल्पना मी मांडली. सार्वजनिक संस्थेत जो कल्पना मांडतो, त्यालाच मुंडावळ्या बांधल्या जातात. त्यामुळे ‘स्नेहांकुर’ साकारण्याची जबाबदारी माझ्यावरच सोपवण्यात आली. त्यासाठी कुमारी माता, दत्तक पालक, दत्तक बालके, काही पोलीस ठाण्यांचे प्रमुख अधिकारी, बाल कल्याण समित्यांचे सदस्य, अशा प्रसूती करणारे डॉक्टर्स अशा अनेकांशी मी दोन महिने संवाद साधला. त्या वेळी लक्षात आले की, नगर जिल्ह्य़ात या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोअ‍ॅक्टिव्ह पद्धतीने काम करण्याची गरज आहे. केवळ पोलीस आणि कुमारी मातांकडून आलेली बालके दत्तकेच्छुक पालकांना देणे, अशी पारंपरिक वाट चालून उपयोग होणार नाही. अनौरस बालकांएवढेच त्यांच्या मातांचे पुनर्वसनही महत्त्वाचे आहे.
पहिले आव्हान होते परवाने मिळविण्याचे. महिला आणि बालविकासाच्या क्षेत्रात आजही कठोर ‘परवानाराज’ आहे. महिला व बालसेवेचे प्रकल्प उभारण्यासाठी महिला आणि बालविकास विभागाचे विविध परवाने मिळवावे लागतात. त्यासाठी न लिहिण्यासारख्या आणि चांगले काम करणाऱ्यांना न शोभणाऱ्या कुप्रथांना तोंड हे द्यावेच लागते. पण तेव्हाचे महिला व बालविकास आयुक्त डी. एन. मंडलेकर यांनी ‘स्नेहालय’चे काम स्वत: पाहिले होते. त्यांनी २००३ साली ‘स्नेहांकुर’ दत्तक विधान केंद्राचा परवाना लगेच सन्मानपूर्वक दिला. मात्र दत्तक विधानासाठीच्या बालगृहाचा परवाना मिळवण्यासाठी २००५ साल उजाडले. परिणामी, ‘स्नेहांकुर’मध्ये दाखल झालेली बालके दत्तक विधानाच्या प्रतीक्षेत तिष्ठू लागली. दत्तक विधान केंद्र शहरापासून १५ कि.मी. दूर ‘स्नेहालय’च्या पुनर्वसन संकुलातच होते. त्यामुळे रात्री, अपरात्री मुलांना बघायला, वैद्यकीय उपचारांसाठी जावे लागे. या काळात ‘टीम स्नेहांकुर’ तयार होऊ लागली. सर्वप्रथम अजय वाबळे हा सच्चा कार्यकर्ता आम्हाला भेटला. २००५ मध्ये कायदेशीर अडचणी सोडवून दत्तक विधानाची प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. दरम्यानच्या काळात मी व अजयने समाजकार्य विषयाचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. कायदेशीर दत्तक विधान प्रक्रिया कशी करायची याचा अभ्यास केला. पुणे येथील भारतीय समाजसेवा केंद्राच्या संस्थापक ज्येष्ठ कार्यकर्त्यां लता जोशी, औरंगाबादच्या सुनीता तगारे अशांचे कामातील अडचणींबाबत मार्गदर्शन मिळविले. वर्ष २००५ च्या अखेरीस आमचे पहिले दत्तक विधान झाले. त्यानंतर आम्ही मागे वळून बघितले नाही. २०१२ सालापर्यंत ‘स्नेहांकुर’ प्रकल्पाने २१६ बालके दत्तक दिली. त्यात १५३ मुली होत्या. परित्यागीत मातांचे पुनर्वसन, दत्तक विधानइतकेच महत्त्वाचे असल्याने आजवर १५६ मातांचे शैक्षणिक, कौटुंबिक आणि आíथक पुनर्वसन ‘स्नेहांकुर’ने केले.
 मूल दत्तक गेल्यावर त्याच्या पालकांशी दैनंदिन संपर्क कमी होतो, परंतु कुमारी मातांचे आणि ‘स्नेहांकुर’चे संबंध अतूट असतात. त्यांचे लग्न झाल्यावर पहिले बाळंतपण माहेर या नात्याने ‘स्नेहांकुर’ करते. संसारात कटकटी झाल्या तर त्या आम्हीच निस्तरतो. आमची एक कुमारी माता न्यूझीलंडमध्ये परिचारिका म्हणून काम करते. आपल्या युरोपीयन नवऱ्याला तिने आमची ओळख नातेवाईक म्हणून करून दिली. हळूहळू आमच्या आजी-माजी कुमारी मातांचा एक आधारगट आकाराला आला आहे. या गटातूनच या महिलांना समुपदेशन, समर्थन, मार्गदर्शन, मदत मिळायला सुरुवात झाली आहे. त्याची प्रसिद्धी आम्ही जाणीवपूर्वक टाळतो. गरिबीमुळे इच्छा असूनही मूल सांभाळता येत नाही, असे म्हणणाऱ्या ९ िहमतवाल्या कुमारी मातांचे सक्षमीकरण करून त्यांची मुले सांभाळायला त्यांना ‘स्नेहांकुर’ने मदत केली. दत्तक प्रक्रियेपलीकडे जाऊन प्रत्येक संकटग्रस्त बालकाला आणि त्याच्या मातेला संरक्षित सबळ वर्तमान देण्याचा प्रयत्न आमच्या टीमने केला. दत्तक विधान केंद्रात परित्यागासाठी येणाऱ्या व्यक्ती वेगवेगळे प्रश्न घेऊन येतात. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी, विचार वेगळे, मनातील अपराधी, खंत वेगळी असते. खूप कौशल्याने ही परिस्थिती हाताळावी लागते.
‘स्नेहांकुर’चे आतापर्यंतचे अनुभव विलक्षण आहेत. फसवल्या गेलेल्या एका गरोदर मुस्लीम मुलीचा आम्हाला फोन आला. कुटुंबीय हवालदिल झाले होते. त्यांना आमच्याविषयी फार विश्वास वाटत होता. आमच्याकडे मदत मागणाऱ्या मातांचे बाळंतपण आम्ही अतिशय दर्जेदार खासगी रुग्णालयात करतो. त्यासाठीचा आíथक भार देणग्या गोळा करून सोसतो. डॉ. प्रीती आणि हेमंत देशपांडे, डॉ. प्राची आणि जयदीप देशमुख असे काही जण याकामी अहोरात्र मदत करतात. बऱ्याच वैद्यकीय अडचणींवर मात केल्यानंतर या मुलीचे बाळंतपण झाले. तिला प्रथेप्रमाणे िडक आणि आळिवाचे लाडू ‘स्नेहांकुर’तर्फे देण्यात आले. दिमतीला एक माजी कुमारी माता दिली. या अनुभवाने सद्गदित झालेले मुलीचे वडील मला भेटायला आले व म्हणाले, ‘‘मला या कामासाठी अल्प मदत करायची आहे.’’ हा बाप अतिशय सामान्य परिस्थितीतला होता. मी म्हणाले, ‘‘ही संस्था तुमची आहे. तुम्ही तुमच्या मुलीला आणि बाळाला इजा होऊ न देता सुयोग्य ठिकाणी पोहोचवलेत, हेच खूप आहे.’’ या गृहस्थांनी माझे न ऐकता धनादेश लिहिला ‘एक लाख फक्त’ या माणसाने आपल्या गंगाजळीतला मोठा भाग संस्थेला दिला. देताना त्यात कुठलीही उपकृत करण्याची भावना नव्हती. साश्रू नयनांनी तो म्हणाला, ‘‘तुमची संस्था आणि येथील बाळं बघून, मला जाणवले की, जन्माला येताना कुठल्याही धर्माचं लेबल आपल्यावर नसतं. नंतर आपण ते लावतो. माझ्या मुला-मुलींचा आंतरधर्मीय विवाह झाला, तर मला ते आता अधिकच आवडेल. त्याशिवाय ही जीर्ण आणि कृत्रिम बंधने, रूढी तुटणार नाहीत.’’ स्नेहांकुरच्या कामातून सेवेच्या पलीकडे जात वैचारिक बदलही घडतो, तो असा.
जन्मत: ९०० ग्रॅम वजन असलेली, कमी दिवसांची, एड्सबाधित आईची पुढे उपचारांनी निगेटिव्ह झालेली, अत्यवस्थ अवस्थेत सापडलेली मुलं जेव्हा त्यांच्या दत्तक पालकांबरोबर उडय़ा मारत संस्थाभेटीला येतात, तेव्हा आम्ही सर्व कार्यकत्रे श्रमसाफल्य अनुभवतो. माझ्यातील आई सुखावते, परंतु असे प्रसंग ताण-तणावांच्या तुलनेत कमीच असतात.
आपल्या देशात दर आठ मिनिटाला एक मूल बेपत्ता होतं. त्यातली ४० टक्केमुलं पुन्हा कधीच त्यांच्या आईवडिलांना सापडत नाहीत. दत्तक विधान केंद्रात यातली १०  टक्केमुलं येतात, असे गृहीत धरले तरी उरलेली ३० टक्के मुलं कुठे जातात, हा अस्वस्थ करणारा अनुत्तरित प्रश्न आहे.
असुरक्षित परिस्थितीत सापडलेली मुलं व आया यांना त्वरेने मदत करणे, घेऊन येणे या तातडीच्या हलचाली आमची टीम अहोरात्र करते. रात्रीच्या वेळेसाठी आया थांबायला तयार नसतात. त्यांचे कुटुंबीय किंवा बलात्कार करणारे त्यांना, त्यांच्या कुटुंबाला इजा करू  शकतात, ही भीती त्यांना असते. महिला आणि बालविकास विभागातील यंत्रणा याबाबत अनेकदा संवदेनाहीन असल्याचे जाणवते. बाल कल्याण समितीचे काही सदस्य कुमारी मातेच्या परित्यागासाठी संपर्क केल्यावर, ‘आम्हाला रात्री फोन करू नका, आमची बठक असेल तेव्हाच कुमारी माता समोर आणा, आज बठक घेणार नाही,’ अशी उत्तरे  देतात. त्यामुळे काही बालकांचे जीव गेले, हे आम्ही सप्रमाण निदर्शनास आणून दिले. पण सत्ता आणि अधिकारांपुढे मानवता-करुणेला झुकावे लागते. आपल्या झोपेने कुणाचा जीव जाणार असेल तर ती लागतेच कशी? हा एक मला नेहमी पडणारा प्रश्न आहे.
मागील वर्षी जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्याने आमच्याकडून सर्व अविवाहित, परित्यागीत मातांची यादी मागितली. न दिल्यास कारवाई करू, अशी नोटीस दिली. मनस्ताप पत्करून आम्ही भांडणे केली. तुमच्या हातात ही नावे पडल्यावर ती कोणालाही मिळून या मुलींना ब्लॅकमेल केले जाऊ शकते. त्यातील अनेक जणी मागचे विसरून संसारात रममाण आहेत. त्या उद्ध्वस्त होऊ शकतात. याबाबत न्यायालयाचे आदेश, बाल न्याय अधिनियमातील तरतुदी दाखवल्यावर आणि रस्त्यावर उतरण्याची तयारी केल्यावर या प्रकरणी अधिकाऱ्याने माघार घेतली. खरे तर ही सगळी पोटदुखी ‘स्नेहांकुर’ कोणालाही नियमबाह्य़ कपर्दकिाही देत नसल्याने उफाळते. अडवणुकीची संधी सोडली जात नाही. सर्वत्र वादाच्या भोवऱ्यात असणारे पोलीस कर्मचारी व अधिकारी मात्र बेवारस बाळांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशीलतेने, पदरमोड करून काम करताना मी पाहते. कमी दिवसांची आणि कमी वजनांची बाळे जगविताना मोठा खर्च येतो. त्यासाठी दररोज लहान देणगीदारांकडे आम्ही कटोरा घेऊन जातो, पण बिल फार झाले म्हणून एखाद्या बाळाचे व्हेन्टिलेटर काढा, असे आम्ही कधीच म्हणत नाही.
या कामात समाजाचा तळ आणि बदलती जीवनमूल्ये रोज जवळून अनुभवयाला मिळतात. कुत्र्यांनी लचके तोडलेलं बाळ, पण एकही बघ्या हात लावायला तयार नाही. आई मेल्याने दारूडय़ा बापाकडे परत ताबा देऊ नका, असे असहायपणे बाल कल्याण समितीला सांगणारी ८ वर्षांची आणि नंतर बलात्काराची शिकार झालेली दुर्गा, रस्त्यांवरच्या भिकारी मुलांच्या टोळ्या, वाहत्या रस्त्यांच्या मधोमध घाणीने बरबटलेल्या आईच्या स्तनांना लोंबणारी बाळं, ही सगळी मुलं आईवडिलांच्या प्रेमाला, दोन घासाला, औषधाला मुकलीत हे विदारक सत्य आहे. शिक्षणाची बात फारच लांब. पराकोटीच्या अवहेलनेला तोंड देणाऱ्या या मुलांच्या जिद्दी डोळ्यात मला घर, आई, बाबा यांची अंधुक होत चाललेली स्वप्न दिसतात. कितीही थकलं तरी पुन्हा उठण्याची चेतना देतात.
पालक आणि घर यांना मुकलेल्या सर्व बालकांना दत्तक विधान प्रक्रियेद्वारे घर-कुटुंब आणि प्रेम मिळवून दिले पाहिजे. त्यासाठी महिला व बालविकास विभागात संवेदनशील अधिकारी पदासीन हवेत. बाल कल्याण समित्यांवर बालकांच्या चिंतेने झोप उडालेले सहृदय कार्यकत्रे नेमले जायला हवेत. दत्तक घेणाऱ्या दाम्पत्यांच्या संख्येत वाढ होत असली तरी समाजात दत्तक बालकांकडे नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते. निखळ आनंद देणाऱ्या दत्तक बाळाने भविष्यात काही प्रश्न निर्माण केले तर त्यांच्या रक्तातच दोष आहे, असे अमानुष ताशेरे काही जण ओढतात. मोठय़ा वयाची मुले कुटुंबाशी समरस होणार नाहीत, म्हणून त्यांना दत्तकासाठी नाकारले जाते. अशा झापडबंद विचारसरणीचे अनेक कौटुंबिक बळी मी पाहते. बालकासाठी तळमळणाऱ्या स्त्रीच्या मनाचा आक्रोश तिच्या कुटुंबीयांनी कायमचा कानाआड केलेला बघितला आहे. मालमत्ता हडप करण्यासाठी सख्या भावाला दत्तकाची भीती घालून निपुत्रीक ठेवणारे भाऊबंद आम्हाला भेटतात. बालकांच्या निरागस प्रेमाची चव अशांनी एकदा जरी चाखली तर त्यांचे जीवन आणि जग सुंदर होताना दिसेल.
दत्तक विधानाचे गुंतागुतीचे काम करताना आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक बदल झाले. आज पन्नास कर्मचारी ‘स्नेहांकुर’मध्ये काम करतात. हे सगळे हाडाचे कार्यकत्रे आहेत. ‘टीम स्नेहांकुर’ कधीही फोन-मोबाइल बंद ठेवत नाही. जिथून फोन येईल तेथे त्याच क्षणी आमचे कार्यकत्रे पळतात. बाळाची नाळ बांधणे ते संडास साफ करणे, गाडी चालविणे ते मोबाइल इन्क्युबेटरमध्ये नवजात बाळ सांभाळणे, पोलीस ठाणे ते बाल कल्याण समिती, अशी कुठलीही कामे ‘टीम स्नेहांकुर’ लीलया करते. संस्थेत काम करताना वैयक्तिक राग, लोभ बाजूला ठेवून ध्येयासाठी काम करायला आम्ही शिकलो. काम वाढत गेलं तसं मला माझी निर्णयक्षमता, मुसद्दीपणा, धाडस वाढवावे लागले. कर्तृत्ववान नवऱ्याच्या प्रत्येक अनुभवातून न शिकता स्वत: अनुभव घेऊन शिकण्याची उमेद वाढवावी लागली. कार्यकत्रे फक्त वैचारिक बोध देऊन बरोबर राहात नाहीत, तर ते वैयक्तिक प्रेम, विश्वास, समान-महान ध्येय या पायावर टिकतात. त्यासाठी दत्तक विधानाच्या क्षेत्रातील अनुभवविश्व समृद्ध केलं. अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्व, यशस्वी व्यक्ती आम्हाला पालक म्हणून लाभल्या. अनेक दत्तक पालक आता ‘स्नेहांकुर’चे कार्यकत्रे म्हणून बालकांसाठी काम करतात. ‘स्नेहांकुर’च्या प्रेरणेतून काहींची स्वत:च्या बालसेवी संस्था सुरू करण्याची धडपड जारी आहे. या कामाचा परीसस्पर्श लाभला नसता, तर आम्हाला खऱ्या प्रेमाची आणि ज्या जगात आपण जगतो तेथील कठोर वास्तवाची अनुभूती कधीच मिळाली नसती, म्हणूनच ‘स्नेहांकुर’ बनले आहे आमच्या जीवनाची ऊर्जा आणि ध्यास.
संपर्क – डॉ. प्राजक्ता कुलकर्णी, स्नेहांकुर केंद्र,             लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड, अहमदनगर.
    मो. ९०११०२६४८२
    ईमेल-prajgk@gmail.com
वेबसाईट- http://www.snehankur.org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्त्री-भ्रूणहत्येविरुद्ध एल्गार
मागील ८ वर्षांपासून ‘स्नेहांकुर’ स्त्री-भ्रूणहत्येविरुद्ध अनेक उपक्रम लोकसहभागातून राबविते. अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामीण आरोग्य केंद्रातील परिचारिका, शहरी व ग्रामीण भागातील वैद्यकीय व्यावसायिक, ग्रामसेवक, विविध स्वयंसेवी संस्थांचे कार्यकत्रे अशांच्या कार्यशाळा घेते. बेवारस, अनौरस बालके, कुमारी माता, बलात्कारित महिला आढळल्यास आपण काय भूमिका बजावली पाहिजे, याची माहिती आम्ही देतो. त्यामुळे स्नेहांकुरच्या कामासाठी एक सुसंघटित कार्यजाळे नगर जिल्ह्य़ात तयार झाले आहे. जिल्ह्य़ाच्या कानाकोपऱ्यातून जागरूक नागरिकांकडून बेवारस टाकून दिलेल्या बालकांची माहिती आम्हाला कळवतात. त्यानंतर आम्ही त्वरित पावले उचलतो. बालके व कुमारी मातांचा जीव वाचविणाऱ्यांना रोख बक्षीस आणि जीवरक्षक पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. अशामुळे अनेक जण आपले नागरी कर्तव्य उत्साहाने आणि चोख बजावितात. मे २०१२ मध्ये हजार मुलांमागे नगर जिल्ह्य़ात ८३३ मुली जन्मल्या. यानंतर प्रचंड जनजागृती केल्यानंतर, सरकारी यंत्रणांनाही सोबत घेऊन अवघ्या ५ महिन्यांत हा जन्मदर ८३९ पर्यंत नेण्यात आम्हाला यश आले. सध्या हा जन्मदर ८७९ पर्यंत सुधारल्याचा अनुमान आहे. या उपक्रमामुळे अभिनेता आमिर खान विशेष प्रभावित झाला. ‘‘सत्यमेव जयते’’ या त्याच्या गाजलेल्या कार्यक्रमातून ‘स्नेहांकुर’चे काम आमिरने देशासमोर आणले. देशभरातील सुमारे १३० जिल्ह्य़ातून ‘स्नेहांकुर’सारखे काम सुरू करण्यासाठी विशेषत: तरुण पुढे आले. स्नेहांकुरचे कार्यबीज असे सर्वत्र विस्तारते आहे. ‘सत्यमेव जयते’द्वारा कामाचा प्रचार झाल्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेच मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, छत्तीसगढ या ठिकाणाहूनही समस्याग्रस्त कुमारी माता आणि बलात्कारित महिला ‘स्नेहांकुर’कडे धाव घेत आहेत. अर्थात, असे काम वाढत चालल्याचा ‘स्नेहांकुर’ला आनंद नाही. समाजातील मुली आणि महिलांबद्दलचा जुनाट दृष्टिकोन बदलला जाईल आणि मुलांना टाकून देणं थांबेल, त्या दिवसाची आम्हाला प्रतीक्षा आहे.

स्त्री-भ्रूणहत्येविरुद्ध एल्गार
मागील ८ वर्षांपासून ‘स्नेहांकुर’ स्त्री-भ्रूणहत्येविरुद्ध अनेक उपक्रम लोकसहभागातून राबविते. अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामीण आरोग्य केंद्रातील परिचारिका, शहरी व ग्रामीण भागातील वैद्यकीय व्यावसायिक, ग्रामसेवक, विविध स्वयंसेवी संस्थांचे कार्यकत्रे अशांच्या कार्यशाळा घेते. बेवारस, अनौरस बालके, कुमारी माता, बलात्कारित महिला आढळल्यास आपण काय भूमिका बजावली पाहिजे, याची माहिती आम्ही देतो. त्यामुळे स्नेहांकुरच्या कामासाठी एक सुसंघटित कार्यजाळे नगर जिल्ह्य़ात तयार झाले आहे. जिल्ह्य़ाच्या कानाकोपऱ्यातून जागरूक नागरिकांकडून बेवारस टाकून दिलेल्या बालकांची माहिती आम्हाला कळवतात. त्यानंतर आम्ही त्वरित पावले उचलतो. बालके व कुमारी मातांचा जीव वाचविणाऱ्यांना रोख बक्षीस आणि जीवरक्षक पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. अशामुळे अनेक जण आपले नागरी कर्तव्य उत्साहाने आणि चोख बजावितात. मे २०१२ मध्ये हजार मुलांमागे नगर जिल्ह्य़ात ८३३ मुली जन्मल्या. यानंतर प्रचंड जनजागृती केल्यानंतर, सरकारी यंत्रणांनाही सोबत घेऊन अवघ्या ५ महिन्यांत हा जन्मदर ८३९ पर्यंत नेण्यात आम्हाला यश आले. सध्या हा जन्मदर ८७९ पर्यंत सुधारल्याचा अनुमान आहे. या उपक्रमामुळे अभिनेता आमिर खान विशेष प्रभावित झाला. ‘‘सत्यमेव जयते’’ या त्याच्या गाजलेल्या कार्यक्रमातून ‘स्नेहांकुर’चे काम आमिरने देशासमोर आणले. देशभरातील सुमारे १३० जिल्ह्य़ातून ‘स्नेहांकुर’सारखे काम सुरू करण्यासाठी विशेषत: तरुण पुढे आले. स्नेहांकुरचे कार्यबीज असे सर्वत्र विस्तारते आहे. ‘सत्यमेव जयते’द्वारा कामाचा प्रचार झाल्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेच मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, छत्तीसगढ या ठिकाणाहूनही समस्याग्रस्त कुमारी माता आणि बलात्कारित महिला ‘स्नेहांकुर’कडे धाव घेत आहेत. अर्थात, असे काम वाढत चालल्याचा ‘स्नेहांकुर’ला आनंद नाही. समाजातील मुली आणि महिलांबद्दलचा जुनाट दृष्टिकोन बदलला जाईल आणि मुलांना टाकून देणं थांबेल, त्या दिवसाची आम्हाला प्रतीक्षा आहे.