समजायला लागल्यापासून जाणवायला लागली ती स्वत:ची शिक्षकी पेशाची आवड, शिकविण्याची आंतरिक ओढ. मोठं झाल्यावर आपण शिक्षकी पेशाच स्वीकारायचा असं मी मनोमन ठरवून पण टाकलं! माहेर मुंबईत असल्यामुळे ‘पिंटो-व्हिला’ (किंग जॉर्ज हायस्कूलची ज्येष्ठ भगिनी) सारख्या दर्जेदार शाळेत शालेय शिक्षण झालं. नंतर रुपारेल महाविद्यालयात कला शाखेकडे प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये असताना माझं लग्न झालं. नवरा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात प्राध्यापक. हुरुपाने व नेटाने मीही माझं बी.ए. व एम.ए. पूर्ण केलं. गुणवत्तेच्या आधारे मला त्याच महाविद्यालयात नोकरी मिळाली. स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद झाला, पण फार टिकला नाही. प्रापंचिक अडचणींमुळे मला नोकरी सोडून द्यावी लागली.
 दुधाची तहान ताकावर भागवावी तसं स्वत:च्या मुलांबरोबर इतर मुलांनाही मी शिकवू लागले (शिकवणी नव्हे). जमेल तसं समाज प्रबोधनाचं कामही करू लागले. पण मनाला समाधान मिळेना. मुलं मोठी झाल्यावर मनाने उचल घेतली. परत शिक्षकी पेशांत शिरायचा मी विचार करू लागले. संस्थेची अनेक महाविद्यालये होती. माझ्या पतीची बदली होत असे. त्यामुळे मला शक्यतो संस्थेतच नोकरी करायची होती. त्या वेळी आम्ही श्रीरामपूर येथे होतो. संस्थेच्या बहुसंख्य महाविद्यालयांतून माझा विषय (संस्कृत) बंद झालेला  होता. काय करावं या विचारात असतानाच महाविद्यालयाचे प्राचार्य वसंतराव रोकडे यांनी सांगितलं की, महाविद्यालयात नव्याने एम.ए. इंग्रजीचे वर्ग सुरू होत आहेत. त्याला मी प्रवेश घ्यावा. त्याप्रमाणे मी प्रवेश घेतला आणि तोच माझ्या आयुष्यातला टर्निग पॉइंट ठरला.
तब्बल दहा वर्षांनंतर मी परत विद्यार्थिदशेत प्रवेश केला. तिचा आनंद उपभोगला. एम.ए.ची परीक्षा मी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. गुणवत्तेच्या आधारे मला संस्थेच्या महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मिळाली. मन आनंदाने भरून गेलं. श्रीरामपूर, वाशी, कोपरगाव, मंचर, औंध, पिंपरी इ. विविध ठिकाणी काम करायची संधी मिळाली. ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी विषयाची भीती घालवण्यासाठी व त्यांचे इंग्रजी सुधारण्यासाठी मी विविध उपक्रम राबविले. त्यांना नीट इंग्रजी बोलता यावे म्हणून खास प्रयत्न केले. विद्यार्थ्यांचे अलोट प्रेम मला लाभले. महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असताना विद्यार्थ्यांच्या विकासाबरोबर माझा स्वत:चा विकासही होत गेला. उणीपुरी वीस वर्षे नोकरी करून मी निवृत्त झाले. या वर्षांनी मला भरभरून आनंद, समाधान दिले. जिवाभावाचे सहकारी दिले. आयुष्यभर पुरतील अशा सुखद आठवणी दिल्या. आयुष्याच्या संध्या-छाया सुखकर झाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा