वेदनाशामक औषधांची मात्रा स्वत: ठरवण्याचा अट्टहास तिला व्यसनाधीनतेच्या गर्तेत घेऊन गेला. एकाकी झालेल्या लॉरा वॉल्शची उमेदीची २० वर्षे त्यात गेली. पण त्याच लॉराने यातून बाहेर पडत, सन्मानाने जगण्याचा मार्ग शोधला व एक प्रथितयश उद्योजिका म्हणून नावारूपाला आली, तिच्या या अशक्य ते शक्य करून दाखविणाऱ्या प्रेरणादायी प्रवासाविषयी.
आपल्या आजारपणावर डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधांची मात्रा स्वत:ची स्वत:च ठरवणे, औषधेही आपल्या मर्जीने घेणे असे प्रकार अनेक जणांच्या बाबतीत दिसून येतात. विशेषत: मधुमेहासारख्या आजारावर तर आपली ‘शुगर’ किती वाढली/कमी झाली याचा अंदाज घेऊन इन्स्युलिन कमी-जास्त करणारे महाभागही आहेतच! तसेच डोकेदुखी, दातदुखी, कंबरदुखी आदी आजारांचे मूळ कारण न शोधता केवळ वेदनाशामक गोळ्या हव्या तशा घेत राहण्याचे प्रमाणही सर्रास दिसून येते. आपण एखाद्या दुखण्यासाठी जर वेदनाशामक औषधे घेत असू तर ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि मात्रेनुसारच घ्यायला हवी, हे किती महत्त्वाचे आहे हे लॉरा वॉल्शची कथा वाचताना लक्षात येईल.
अपघातामुळे झालेल्या दुखापतीच्या वेदना असह्य़ झाल्याने ‘प्रिस्क्राइब्ल्ड मेडिसिन’चा अतिरेक करत आपल्या सुदृढ आयुष्याशी खेळ करणाऱ्या लॉरा वॉल्श या ब्रिटिश स्त्रीची व्यसनाच्या गर्तेत खोल खोल रुतत जाण्याची कथा करुण आहे. लॉरा नंतर यातून बाहेर पडली असली तरी सर्वानाच ते शक्य होईल असे नाही. पण लॉरा यातून सावरली आणि एक प्रथितयश उद्योजिका म्हणून समाजात पुन्हा ताठ मानेने उभे राहिली.
लॉरा ज्या काळात व्यसनाधीन होती तेव्हा तिच्या चार महिन्यांच्या चिमुरडीचा झालेला मृत्यू आठवून ती आजही हळहळते. ‘‘१९८७ सालची गोष्ट आहे. या काळात मी फक्त माझ्यातच असायची. माझ्यासाठी इतर सर्व बाबी गौण होत्या अगदी माझी चिमुकली नताशासुद्धा! एकदा नताशा काही कारणाने आजारी होती त्या दरम्यान मी किती वेळ किंवा किती दिवस नशेत होते हेही मला आठवत नाही. माझ्या चार महिन्यांच्या आजारी मुलीला मी कधीतरी शुद्धीत असताना पाळण्यात निजवले असावे. पण मधल्या काळात मी माझ्यात नव्हतेच! ते बाळ तापाने फणफणले होते, तिचा श्वास हळूहळू धिमा पडत गेला, इवलासा देह गार पडत गेला आणि हे सगळं घडत असताना, तिची आई म्हणून मी घरात असूनही तिला वाचवू शकले नाही, साधं डॉक्टरला बोलवण्याचेही मला सुचले नाही. केव्हातरी शुद्धीत आल्यावर जेव्हा मी पाळण्यात शांतपणे निजलेल्या तिला हात लावला तेव्हा तो स्पर्श तिच्या निष्प्राण कलेवराला होता. आई म्हणून मी सपशेल हरले होते. मी उन्मळून पडले. माझ्या व्यसनांनी मला माझ्या बाळापासून कायमचे दूर केले होते.’’
तिला हे व्यसन लागले कसे हे विचारले असता ती विनासंकोच सगळा तपशील सांगते-ही ब्रिटिश स्त्री- पती आणि तीन मुले यांच्यासमवेत सुखाने संसारात रमली होती. १९८७ साली जेव्हा लॉरा २२ वर्षांची होती, मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या पोटदुखीसाठी उपाय म्हणून तिला को-प्रोक्झामॉल हे वेदनाशामक औषध डॉक्टरांनी लिहून दिले. त्याच वर्षी तिला अपघात झाला आणि आणखी एक वेदनाशामक औषध दिले गेले. वेदना होऊ लागल्या, त्रासाने जीव नको होऊ लागला की लॉरा हे औषध घेऊ लागली. तिचा आठ गोळ्यांचा डोस तिने स्वत:हूनच दरदिवशी तीस गोळ्या असा वाढवला आणि अनेक महिने तो तसाच चालू राहिला. ३० वेदनाशामक गोळ्या आणि २० कॅन्स अल्कोहोलचे कॉकटेल ही बाई रोज रिचवत असे. वेगवेगळी खोटी नावे धारण करून लॉरा निरनिराळ्या विक्रेत्यांकडून औषधे खरेदी करीत असे कारण तिच्या नावावर दिलेले औषध डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणातच मिळत असे.
आणि थोडे थोडके नव्हे तब्बल वीस वर्षे सातत्याने तिचे हे प्रताप सुरू होते. तिच्या या बेजबाबदार वागण्याला कंटाळलेल्या तिच्या नवऱ्याने अखेर वेगळे होण्याचा पर्याय निवडला, मुलांना घेऊन तो विभक्त झाला. लॉरा हळूहळू एकटी पडत गेली. तिचे मित्रमैत्रिणी, नातेवाइक सारेच तिला टाळू लागले. कित्येक दिवस सलगपणे ती बेशुद्धावस्थेत असे. वीस वर्षांत ५,००,००० पौंडहून अधिक रक्कम तिने केवळ आपल्या व्यसनावर उडवली होती. एक वेळ तर अशी आली की लॉरा स्वत:चे केसही विंचरू शकत नव्हती. एका वर्षी नशेत असलेल्या लॉराला ‘ख्रिसमस’ येऊन गेल्याचेही कळले नाही. तिचा भाऊ ‘ख्रिसमस’च्या शुभेच्छा देण्यासाठी तिच्या घरी आला तेव्हा तिची अवस्था पाहून व्यथित झाला. त्यानेच तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉइंट होता. त्यानंतर मात्र मी तिने स्वत:ला सावरले. सर्व प्रकारची वैद्यकीय वा इतर उपलब्ध मदत घेऊन यातून बाहेर पडायचेच हे तिने ठरवले.
२००५ साली ती पूर्ण कफल्लक बनली. आपण यातून बाहेर पडलो नाही तर लवकरच मृत्यूच्या दारात असू, हेही तिला जाणवले. कारण तिचे यकृत फारच नाजूक झाले होते. पोटापाण्यासाठी काहीतरी केले पाहिजे हेही लॉराच्या लक्षात आले. तिने पूर्वी एका क्लिनिंग सव्र्हिस कंपनीत काम केले होते, पण व्यसनाधीनतेमुळे तिची हकालपट्टी झाली होती. पुन्हा अशाच एका एजन्सीत तिने नोकरी धरली. दारोदार जाऊन कंपनीची माहितीपत्रके ती वाटत असे. याच दरम्यान व्यसनातून बाहेर पडण्यासाठीचे प्रयत्नही तिने सुरू केले. तिच्या भावाने तिला यात खूप मोलाची साथ दिली.
आज पन्नाशीकडे झुकलेली, पण ऐन तारुण्यातली उमेदीची वीस वर्षे व्यसनाधीनतेच्या गर्तेत गमावलेली हीच लॉरा वॉल्श आज लाखो पौंडांची उलाढाल असलेला स्वत:चा मोठा ‘क्लिनिंग’चा व्यवसाय इंग्लंडमध्ये यशस्वीपणे चालवते आहे. ज्या दुकानामधून ती ड्रग्ज (लॉराच्या बाबतीत वेदनाशामक आणि म्हणूनच गुंगीची औषधे) घेत असे त्याच ब्रिस्टल येथे, त्याच ठिकाणी आज तिच्या कंपनीचे कार्यालय आहे, हे विशेष.
आपल्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली याबद्दल लॉरा सांगते, ‘‘मला स्वत:चा व्यवसाय करायची इच्छा होती. काही दिवसांनी नोकरी करत असतानाच व्यावसायिक पातळीवर मी स्वत:च लोकांची घरे स्वच्छ करून देण्याचे काम सुरू केले. पण हळूहळू जम बसत गेला. माझ्या ‘अॅडव्हान्स्ड क्लिनिंग युके’ या कंपनीने यशाकडे झेप घेतली आणि बघता बघता आज ६२ कर्मचारी माझ्या कंपनीत काम करत आहेत. त्यापैकी काही माझ्यासारखेच व्यसनाधीन होते, पण आता त्यांनी आरोग्यपूर्ण जीवनाची वाट धरली आहे. आज माझी कंपनी वर्षांला पाच लाख पौंडहून अधिक नफा कमावते आहे.
लॉरा वॉल्श कोण होती, तिला बरीच वर्षे कशाचे व्यसन होते आणि त्यातून बाहेर पडून आज तिने किती यशस्वीपणे आपला व्यवसाय उभारला आहे, हे अशक्य कसे घडले याबाबतचा संपूर्ण तपशील लॉराने मनमोकळेपणाने ‘अशेम्ड’ या तिच्या पुस्तकात मांडला आहे.
नाथन पॅरी या तिच्या व्यवसायातील सहकाऱ्यासह ती विवाहबद्ध होते आहे. आजही तिचे समुपदेशनाचे सेशन्स सुरूच आहेत. ‘‘माझी दोन मुले रिकी आणि करिझा ही माझ्या जगण्याची प्रेरणा ठरली. माझ्यामुळे अनेक वर्षे केवळ सहानुभूती, तिरस्काराचे धनी ठरलेल्या माझ्या मुलांना आज त्यांच्या आईबद्दल खूप अभिमान वाटतो, हीच माझी सर्वात मोठी कमाई आहे’’ असे लॉरा म्हणते.
‘‘कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करण्याचा माझा स्वभाव जसा माझ्या व्यसनाला कारणीभूत ठरला, तोच स्वभाव आज मला उत्कर्षांकडे नेतो आहे. मला आता कामाचे व्यसन लागले आहे. आपल्या अंत:प्रेरणाना योग्य दिशा देणे आपल्याच हाती असते, हेही मला कळले.’’ हे लॉराचे म्हणणे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. अनेकांना निराशेतून यशाच्या वाटेकडे नेऊ शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा