पद्मविभूषण पंडित जसराज
एक दिवस संगीतसाधना सुरू असताना मनात एक विचार तरळला. त्या विचारांतून ईश्वरी शक्तीला प्रश्न केला, ‘‘तू इतकं सुंदर संगीत निर्माण केलंस तशीच प्रकृती आणि पुरुष.. स्त्री आणि पुरुष ही जोडीसुद्धा बनवलीस. पण शास्त्रीय संगीतात हे द्वैत मिटवून अद्वैत साधणं इतकं कठीण का जातं? ’’ स्त्री और पुरुष गायक कलाकारोंके स्केलमे फरक होनेसे उनके स्वरमिलनपर बंधन आए ऐसा क्यू? ये दुरी कैसे मिट जाएगी? खूप विचार करत होतो. एक दिवस अचानक प्रेरणा झाली. ‘‘मुच्र्छनामें ढुँढो।’’ बस ऐसे सारे रागोंमे घुमते रहिए। मला उत्तर मिळाले आणि काय सांगू? मी आनंदाने भावविभोर झालो. शिवशक्तीच्या स्वरमीलनाचा ‘जसरंगी’ हा प्रयोग हळूहळू लोकांच्या पचनी पडत गेला.
माझी संगीतसाधना नेमकी कधी सुरू झाली ते मला आठवतसुद्धा नाही. हां, पण माझ्या घराण्यात गेल्या चार पिढय़ांपासून संगीतसाधना सुरू आहे. संगीत हे जणू आम्हा सगळ्यांच्या रक्तातूनच वाहात आहे. अगदी तरुण वयात लाहोरमध्ये मी एका संगीताच्या वर्गात शिकवत असे. आता मी चांगला शिकवत होतो की नाही ते ठाऊक नाही. पण माझ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत अव्वल मार्क्स मिळायचे. त्यामुळे ते माझ्या शिकवण्यावर खूश असायचे. ही गोष्ट एकोणीसशे पंचेचाळीस पूर्वीची म्हणाना!
संगीताचे संस्कार बालवयापासून झाले तर अतिशय उत्तम! लेकीन संगीत एक अजब चीज है। किसे पल्ले पडता है किसके पल्ले नही पडता। उभं आयुष्य सरतं. पण संगीतसागराचा तळ काही गाठता येत नाही. मी मूळचा तबलावादक. माझे बंधू प्रतापनारायणजी यांनी बालवयातच मला तबला वादनाचे धडे दिले. मीसुद्धा आवडीने शिकत होतो. खूप जुनी गोष्ट आहे. पार एकोणीसशे पंचेचाळीस मधली! लाहोर इथे सरस्वती कॉलेजच्या इमारतीत आमचं कुटुंब राहात होतं. एक दिवस आकाशवाणीच्या एका कार्यक्रमासाठी पंडित कुमार गंधर्वजी लाहोरमध्ये आले. आमच्या घरीच ते उतरले. जेवणखाण झालं. संध्याकाळी ते त्या संगीत जलशासाठी निघाले. माझे थोरले बंधू पंडित मणिरामजी यांना त्यांनी विचारलं, ‘‘तबल्यावर साथ द्यायला मी जसराजला घेऊन जाऊ?’’ बडेभय्या म्हणाले, ‘‘घेऊन जा’’ मी पंडित कुमार गंधर्वासोबत त्या कार्यक्रमाला गेलो. त्यांना तबल्याची साथ केली. घरी आलो. दुसऱ्या दिवशी पंडितजी निघून गेले आणि एक उदयमान कलाकार अमरनाथ चावला आमच्या घरी आले. ते स्वत: उत्तम गायक होते. त्यांनी संगीतावर एक पुस्तक लिहिले आहे. ते माझ्या वडीलबंधूंना म्हणाले, ‘‘गुरुजी ज्या कलाकाराला आम्ही आमचा आदर्श मानतो, जर तो कलाकार चुकीचं गात असेल तर काय म्हणावं?’’ बडेभय्या न समजून त्यांना म्हणाले, ‘‘अमरनाथभय्या कोण चुकीचं गायलंय?’’ अमरनाथजी उत्तरले, ‘‘काल कुमारजी रेडिओवर भीमपलास गात होते. भीमपलासचा ठहराव धैवतऐवजी निशादवर करत होते. हे शास्त्रीय संगीताच्या नियमात बसतं का?’’ खरंतर मी लहान तोंडी मोठा घास घेणं चूक होतं. पण मी पटकन बोलून गेलो, ‘‘रागाच्या शुद्धतेला धक्का न लावता उलट त्याची सुंदरता पंडितजी वाढवत होते. कोणतंही स्वातंत्र्य न घेता ते अत्यंत निर्दोष भीमपलास आळवत होते. त्यात त्यांचं काय चुकलं?’’ अमरनाथजी फटकन म्हणाले, ‘‘देखो-भैया, तुम तो मरा हुआ चमडा बजाते हो। तुम्हे रागदारीके बारेमें क्या मालुम? तुम चुप बैठो!’’
मनाला ठेच लागली. मी काय चुकीचं बोललो होतो. तरीही मी गप्प बसलो. त्यानंतर दोन दिवसांनंतरची घटना! माझे थोरले बंधू मणिरामजी यांचा जन्माष्टनिमित्त मोठा कार्यक्रम होता. शहराच्या मध्यभागी शामियाना उभारला होता. मोठे व्यासपीठ सजवले होते. मी बंधूंच्या आधी बैठक व्यवस्था पाहण्यासाठी कार्यक्रमस्थळी गेलो. बंधूंच्या गायनासाठी व्यासपीठाच्या मध्यभागी सुंदर बैठक तयार करण्यात आली होती. हार्मोनियम आणि तबला वादकाची बैठक व्यवस्था पॅरापिटच्या खाली केलेली होती. नाटकाच्या रंगमंचाच्या खाली असते ना तशी! मी आयोजकांना भेटून म्हटले, ‘‘अरे भाई, तबला वगैरे बजानेवाले कहाँ बैठेंगे? ऐसे नीचे बैठेंगे?’’ ते फटकन मला म्हणाले, ‘‘अरे भाई किस आदमीकी मजाल है जो पंडित मणिरामजीके बाजुमे बैठके तबला बजाए?’’ मनावर आणखी एक तीव्र आघात झाला. तो सहन झाला नाही. मला रडू कोसळलं. मी रडतरडत शामियानाच्या बाहेर आलो. दोन दिवसांपूर्वीची जखम ताजी असताना त्यावर पुन्हा हा दुसरा घाव! रस्त्यावर उभं राहून मी हमसाहमशी रडू लागलो. थोडय़ाच वेळात बडेभय्या आले. त्यांनी विचारलं, ‘‘जसराज कुठे आहे?’’ कोणीतरी सांगितलं, ‘‘तो रस्त्यावर रडत उभा आहे.’’ ते तडक माझ्याकडे आले. मला जवळ घेत म्हणाले, ‘‘काय झालं बाळा? तुला कोणी ओरडलं, मारलं का? का रडतोयस तू एवढा?’’ मी काहीच बोललो नाही. तसं तेच पुढे म्हणाले, ‘‘चल, आपल्याला कार्यक्रम करायचा आहे ना?’’ मी चटकन म्हटलं, ‘‘मी नाही आज तुम्हाला तबल्याची साथ देणार! तुम्ही संगीत विद्यालयातून बोलवून आणा कोणाला. मी नाही येणार तिथे!’’ त्यांनी खूप समजूत काढली माझी. शेवटी कोणालातरी बोलवून आणलं आणि कार्यक्रम केला. पण मी तिथे पाय टाकला नाही.
रात्री पंडित मणिरामजींनी मला जवळ बोलवलं. म्हणाले, ‘‘जसराज उद्यापासून मी तुला संगीत शिकवणार!’’ मी गप्प बसलो. ते नेहमी आपल्या विद्यार्थ्यांना सांगत, ‘मात्रा गिनगिनके मत सिखो! ताल शरीरमे घुमना चाहिए!’’ त्यांनी म्हटलं, ‘‘कसला विचार करतोयस?’’ मी म्हणालो, ‘‘तुम्हाला असं वाटेल की मी थोडे दिवस गाणं शिकेन आणि ते अर्धवट सोडून पुन्हा तबला वादनाकडे वळेन आणि गाणं देईन सोडून! पण तसं होणार नाही. आजपासून मी कधीही तबल्याला हात लावणार नाही. तरीही मला थोडा विचार करू दे! जर मला मनापासून, आतून असं वाटलं की गाणं शिकायचंच आहे तर मी स्वत:हून तुम्हाला सांगेन.’’
दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता मला बंधूंच्या स्वरांनी जाग आली. मी उठलो, हातपाय धुतले. त्यांच्यासमोर बैठक घेतली. त्यांना वंदन केलं आणि हातात तंबोरा घेतला. माझ्याकडे पाहून ते प्रसन्नपणे हसले. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी वृंदावनातील नगरजनांना नंदाघरी कृष्णाचं दर्शन झालं. म्हणून वृंदावनात जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी नंदउत्सव साजरा करण्यात येतो. माझ्या जीवनात ‘ताल’ प्रवेशला होता. संगीताचं दर्शन मात्र नंदउत्सवाच्या दिवशी जनतेला झालं.
माझ्या आयुष्यातील संगीतमय प्रवासाची ही शुभंकर सुरुवात होती. ईश्वराने दैवी आवाजाची देणगी बहाल केली होती. कडी मेहनत और लगनने इस देन को चार चाँद लगाए और फिर हमने कभी पिछे मुडकर नही देखा।
गुरुवीना कौन दिखो मार्ग? या प्रवासाचे माझे मार्गदर्शक होते माझे थोरले बंधू पंडित मणिरामजी. संगीत परंपरा चार पिढय़ांपासून आमच्या कुटुंबात होती. उस्ताद घग्गे- नझिरखाँसाहेब हे आमच्या घराण्याचे महागुरू! त्यांचा जन्म मेवातमध्ये झाला. म्हणून आम्ही त्यांचे सर्व शिष्य स्वत:ला मेवाती घराण्याचे पाईक मानतो. माझ्या आजोबांना त्यांनी संगीत शिकवलं. आजोबांनी माझे वडील पंडित मोतीराम आणि काका जोतीराम यांना गाणं शिकवलं. माझे थोरले बंधू पंडित मणिरामजी आमच्या वडिलांकडे गाणं शिकले आणि मी पंडित मणिरामजींचं शिष्यत्व पत्करलं. पंडित मणिरामजींशिवाय मी अनेकांकडून मार्गदर्शन घेतलं. माझे आध्यात्मिक गुरू साणंदचे महाराज महाराणा जयवंतसिंगजी! ते स्वत: मेवाती घराण्याचे होते. ते वीणावादन करत. संगीताची त्यांना खूप जाण होती. अनेक गायकांना त्यांनी राजाश्रय दिला होता.
संगीतकी एक विशेषता है। संगीत का कोई धर्म नही होता। संगीत हे जात, धर्म, पंथ, भेदाच्यापलीकडे आहे. कोणत्याही धर्माचा गायक असो त्याला वाद्यांची साथ देण्यासाठी कोणत्याही जातीधर्माचे साथीदार त्याच्यासोबत बैठकीवर बसतात. संगीत जलशासाठी स्टेजवर बसणाऱ्या प्रत्येक गायक-वादकाचा धर्म एकच! संगीत! संगीत! संगीत हे भौगोलिक सीमांच्याही पलीकडे आहे. लाहोरमधली ही घटना आहे. एका शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमासाठी हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्याबरोबर मी एकदा लाहोरला गेलो होतो. माझी तब्येत थोडी नरमगरम होती. म्हणून मी त्यांना म्हटलं, ‘‘मुझे आज माफ करिए! आप कार्यक्रम के लिए अकेले जाईए!’’ ते निघून गेले. तिथे गेल्यावर त्यांना जाणवलं की इथे पंडित जसराजींना तर बोलवलंच पाहिजे. त्यांनी मला निरोप धाडला. यकीन मानिए आम्ही ऑडिटोरियममध्ये पाय टाकला आणि लोकांनी टाळ्यांचा गजर केला. लोकांचं ते उत्स्फूर्त स्वागत पाहून हमारी तो तबियत खूश हो गयी। हमारे चौटालासाब भी बहोत खुष हुए। त्यांना बरं वाटलं की, आपण आग्रहाने पंडित जसराजजींना इथे आणलं आणि त्यांचं लोकांनी एवढं स्वागत केलं. ते म्हणाले, ‘‘पंडितजी लोकांना तुमचं थोडं गाणं ऐकवा ना!’’ मी डोळे मिटून भैरव रागातली बंदिश सुरू केली. ‘मेरो अल्ला मेहेरबान’ मी भान विसरून गात होतो. अंतमे अल्लाह का आलाप लिया और पता नही कैसे उसके साथ ओम भी जुड गया! अल्ला ओम.. अल्ला ओम. जणू ती दिव्य शक्ती माझ्या मुखातून दुनियेला संदेश देत होती, ‘अल्ला.. ओम सब एक है!’ माझा स्वत:वर ताबा राहिला नाही. मी गात राहिलो. अल्ला.. ओम.. हजारोंच्यावर श्रोते त्या सभागृहात होते. सगळे भान विसरून जणू ट्रान्समध्ये गेले होते. एका क्षणी मी थांबलो. सर्वत्र शांतता पसरली आणि दुसऱ्या क्षणी लोकांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला. माझ्या डोळ्यात पाणी तरारलं. लाहोरसारख्या ठिकाणी माझ्या गाण्याला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो. सचमुच संगीत का कोई धर्म नही होता। कोई मजहब नही होता। संगीत हर प्राणीमात्र के जमीरको छुनेवाली कला है। कलाकार आणि रसिकाचं नातं इतकं शुद्ध, इतकं पवित्र असतं. त्यांच्या मनात एकमेकांबद्दल द्वेष नसतो. दुश्मनी नसते. असतो तो निव्वळ आदर! निखळ प्रेम! संगीत ही अशा विशुद्ध प्रेमाची गंगोत्री आहे.
एक दिवस संगीतसाधना सुरू असताना मनात एक विचार तरळला. त्या विचारांतून ईश्वरी शक्तीला प्रश्न केला. ‘‘तू इतकं सुंदर संगीत निर्माण केलंस तशीच प्रकृती आणि पुरुष.. स्त्री आणि पुरुष ही जोडीसुद्धा बनवलीस. पण शास्त्रीय संगीतात हे द्वैत मिटवून अद्वैत साधणं इतकं कठीण का जातं? शास्त्रीय संगीत स्त्री-पुरुष एकत्र गातात तेव्हा स्त्री आणि पुरुष गायकाला आपला सूर कायम ठेवायचा असतो. आपला राग कायम ठेवायचा असतो. स्त्री सरगम कर रही है तो अपने रागमें करती है। पुरुष गायक कलाकार को अपने सुरोंमे उसको जबाब देना है। स्त्री और पुरुष गायक कलाकारोंके स्केलमे फरक होनेसे उनके स्वरमिलनपर बंधन आए ऐसा क्यू? ये दुरी कैसे मिट जाएगी? खूप विचार करत होतो. एक दिवस अचानक प्रेरणा झाली. ‘‘मुच्र्छनामें ढुँढो।’’ स्त्री चंद्रकंस गाईल तर पुरुष मधुकंस गाईल, पुरुष मधुवंती गाईल तर स्त्री नटभैरव गाईल! बस ऐसे सारे रागोंमे घुमते रहिए। मला उत्तर मिळाले आणि काय सांगू? मी आनंदाने भावविभोर झालो.
दैवी प्रेरणेतून उत्तर मिळालं आणि त्याचा पहिला प्रयोग पुण्यातील प्रेक्षकांसमोर केला. संजीव अभ्यंकर- श्वेता जवेरी यांनी केलेला हा प्रयोग पुण्याच्या रसिकांना खूप आवडला. माझी एक शिष्या माझ्याजवळ बसली होती. ती म्हणाली, ‘‘चाचाजी ये तो तलवारकी धारपें चलना है! इतना याद रखना बहोत मुश्किल है!’’ पण पंडित संजीव अभ्यंकर, पंडिता अश्विनी भिडे, पंडित रतनमोहन शर्मा यांच्यासारखे उत्तम कलाकार हे शिवधनुष्य लीलया पेलतात याचा मला आनंद वाटतो. सुरुवातीला हा प्रयोग पचवणं लोकांना कठीण जात होतं. पण लोक शांतपणे ऐकत गेले. समजून घेण्याचा प्रयत्न करत गेले. कधीतरी कुणीतरी काहीबाही बोलूनही गेलं. पण शिवशक्तीच्या स्वरमीलनाचा ‘जसरंगी’ हा प्रयोग हळूहळू लोकांच्या पचनी पडत गेला. लोकप्रिय होत गेला. आता वेगवेगळ्या घराण्याची गायकी गाणारे कलाकारसुद्धा हा प्रयोग सादर करतात आणि लोकंसुद्धा त्याचा आस्वाद घेतात.
संगीत भगवान की देन है! ही ईश्वरी कला जनसामान्यांपर्यंत नेणारे आम्ही फक्त त्या ईश्वरी शक्तीचे दूत आहोत. आम्ही केवळ संगीतकलेचे साधक आहोत. जोवर ही कला, हा ईश्वरी आवाज आमच्यासोबत आहे तोवर आम्हाला पैसा, प्रसिद्धी, पुरस्कार सर्व काही मिळतं. पण माझ्या मनाला सदैव एक विचार अस्वस्थ करत असे. वृद्ध कलाकारांच्या कलेचा सन्मान होतो. त्यांना पद्मश्री, पद्मविभूषणसारखे मानाचे पुरस्कार मिळतात. पण त्याने वृद्धापकाळात त्यांची रोजीरोटीची चिंता कशी मिटेल? कलेच्या साधनेत उभं आयुष्य व्यतीत केलेले हे कलाकार.. निवृत्ती उत्तर आयुष्य, त्यातील व्याधींना कसे सामोरे जातील? सरकारकडून अशा वयोवृद्ध कलाकारांना किमान पेन्शन तरी मिळायला हवी!
माझ्या या चिंतेचे पडसाद नकळत घरात उमटत. दुर्गाने, माझी लेक दुर्गा जसराज हिने ही चिंता नेमकी जाणली. वयोवृद्ध कलाकारांसाठी काहीतरी करायला हवं हे माझे स्वप्न तिने तिच्या नजरेने पाहिलं आणि यशस्वीपणे सत्यात उतरवलं. दुर्गा मोठमोठय़ा कंपन्यांशी संपर्क साधते आणि वयोवृद्ध कलाकारांच्या बायपाससाठी, डायलीसीससाठी त्यांच्याकडून आर्थिक साहाय्य मिळवते. ती बुजूर्ग स्त्री-पुरुष कलाकारांसाठी खूप काम करत आहे. तिच्यासाठी तिच्या बापूंची अर्थात माझी इच्छा
हीच या कार्याची प्रेरणा ठरली याचं मला अतीव समाधान आहे.
हम संगीत के साधक है। मैने दुनियाको गाना सुनाया बस्स। रसिकांना, त्यांच्या आयुष्यातील चंद क्षणांना आनंद दिला. पण रसिक चाहत्यांचं खूप खूप प्रेम मला मिळालं. मध्यंतरी एका कॉन्सर्टसाठी पुण्याला गेलो होतो. केदार पंडित माझ्यासोबत बसले होते. कार्यक्रमाची वेळ झाली तसं मधुराजी गमतीने म्हणाल्या, ‘‘मी शामियानात जाऊन बसते. पेंडॉल जरा भरल्यासारखा वाटेल!’’ त्यावर केदार पंडित चटकन म्हणाले, ‘‘बापूजी गाए और खाली पेंडॉल मिले ऐसा तो होही नही सकता!’’ खरोखर व्यासपीठावर मी जाताच लोकांनी ज्या प्रेमाने माझं स्वागत केलं.. सचमुच देखनेवाली बात थी। एकदम जबरदस्त भरा हुआ पेंडॉल। कोणताही कलाकार असा तुडुंब भरलेला मंडप पाहतो ना तेव्हा आनंदाने त्याचा ऊर भरून येतो. कलाकाराचं खरं वैभव हेच! मला स्वत:ला पद्मश्री, पद्मविभूषण पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय, चार विद्यापीठांनी मला डॉक्टरेट पदवी दिलीय. पण विश्वभरांतील रसिक श्रोत्यांकडून मला जे प्रेम, जो आदर मिळतो त्याला तोड नाही.
चाळीस वर्षांपूर्वी कॅनडात कार्यक्रमासाठी गेलो होतो. व्हॅन्कुव्हरमध्ये कार्यक्रम होता. हॉलमध्ये ३५ ते ४० श्रोते बसले होते. आयोजक आनंदाने मजजवळ आले. म्हणाले, ‘‘पंडितजी, आपल्या कार्यक्रमाला केवढी गर्दी झालेय!’’ त्यानंतर दहा-पंधरा वर्षांपूर्वी झाकीर हुसेन आणि माझा लिंकन थिएटरमध्ये कार्यक्रम होता. अकराशेवर श्रोत्यांनी थिएटर खचाखच भरला होता. झाकीरभाई उत्स्फूर्तपणे माझा हात हातात घेऊन म्हणाले, ‘‘देखिए बापू आपको सुनने के लिए इतनी तादाद मे लोग आये है!’’ मी व्यासपीठावर येताच त्या सर्वानी आसनावरून उठून टाळ्यांचा कडकडाट केला. अशा वेळी मन भरून येतं. मी ईश्वराला प्रार्थना करतो. ‘‘आप हमें यहाँ तक ले आए है! तो अब पिछे मत लेके जाईए!’’ कोई कुछ भी कहे, हर वक्त मनमें थोडी घबराहट तो रहती ही है!’’
आज माझ्या नावाने ‘पंडित जसराज इंडियन क्लासिकल म्युझिक अॅकेडमी’ अशी संगीत विद्यालये परदेशात अनेक जागी सुरू झाली आहेत. ही तरुण पिढी परदेशात जन्माला आली आहे, ती तिथे स्थायिक झाली आहे. पण त्यांचं मन भारतीय आहे. त्यांना भारतीय शास्त्रीय संगीतात रुची आहे. या संगीत विद्यालयांमध्ये अनेक भारतीय आणि परदेशी विद्यार्थी शास्त्रीय संगीत शिकत आहेत. वर्षभरातून एकदा मी या सर्व संगीत विद्यालयांना भेट देतो. त्यांना संगीताचे धडे देतो. माझी एक शिष्या तृप्ती मुखर्जी तिथे विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत शिकवण्याचे फार मोठे कार्य करत आहे. ती स्वत: उत्तम गाते. अमेरिकेत ‘व्हाइट हाऊस’मध्ये तिचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम झाला आहे. गतवर्षी भारत सरकारने पद्मश्री किताब देऊन तिच्या कार्याचा गौरव केला. माझ्या शिष्याचं हे यश पाहून मला फार समाधान वाटतं.
संगीत गुरुमुखी विद्या आहे. पण हल्ली गुरुकुल परंपरा राहिली नाही. संगीत शिकणारे विद्यार्थी तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. कोणी त्यावर टीका करतात. मी उलट म्हणतो, शास्त्रीय संगीताला जे साहाय्यक ठरतंय त्याचा जरूर उपयोग करून घ्यावा. त्यात काय वाईट आहे? लकीर के फकीर नही बनना चाहिए बस्स! स्काइपवरून गुरू शिष्याला शिकवतात. गुरू समोर दिसतायत. शिष्य लक्ष देऊन शिकतोय. एकदम सही बात है! कोई झंझट नही! आजची ही तरुण मुलं शास्त्रीय संगीत मनापासून शिकत आहेत. तयारीने उत्तम गाताहेत. मैफिली गाजवत आहेत.
आमच्यासारख्या बुजूर्ग कलाकारांसाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती असू शकते? जय हो!
madhuri.m.tamhane@gmail.com
(सदर समाप्त)