कवी किंवा लेखक बाहेरच्या जगात वावरताना केवळ कवी नसतो तो अनेकांसारखाच एक असतो. एकाच वेळी अनेक भूमिका वठवत असतो. फक्त त्याचं मन काहीतरी सतत टिपत असतं, शोधत असतं. हा शोध घेताना मला अगदी सुरुवातीपासून जाणवली ती जगण्यातली निर्थकता, आपलं हजारो तुकडय़ांत झालेलं विभाजन, आपलं बदललेलं राजकीय वास्तव आणि गुंतागुंतीचे होत गेलेले सामाजिक संदर्भ. हे सगळं अस्वस्थ करतं मला. मग ही अस्वस्थता अचानक शब्दांतून उतरते, त्याची कथा होते तर कधी कविता. ‘निर्थकाचे पक्षी’ किंवा ‘मी माझ्या थारोळ्यात’ असे कवितासंग्रह असोत की ‘पावसात सूर्य शोधणारी माणसं’ किंवा ‘अस्वस्थ मी अशांत मी’ हे कथासंग्रह असोत माझ्या आत चालू असलेली उलथापालथ माझ्या संग्रहांच्या नावातूनही व्यक्त होत राहाते..
हजारो शब्द त्याच्या अर्थासकट कवी किंवा लेखकाच्या मनात एखाद्या चक्रीवादळासारखे फिरत असतात. त्यांच्या गुंत्यात तो कायमचा अडकलेला असतो. हा गुंता सोडवत सोडवत नेमक्या शब्दापर्यंत पोचणं ही दमवणारी गोष्ट असते त्याच्यासाठी. या साऱ्यातून वाचकांपर्यंत जे पोचतं ते हिमनगाच्या छोटय़ाशा टोकाएवढंच असतं. जे वाटतं ते नेमकं शब्दात पकडणं खरंच कठीण असतं कवीसाठी. म्हणूनच मग तो पुन्हा पुन्हा लिहीत राहतो. कधी कधी तेच ते, पण वेगळ्या शब्दात, वेगळ्या प्रतिमांचा वापर करून. पुन: पुन्हा सांगत राहतो कवी अथवा लेखक विविध भावभावनांविषयी, कधी मिळालेल्या वा न मिळालेल्या प्रेमाविषयी तर कधी वर्ग, जात, धर्म आणि लिंगभेदामुळं वाटय़ाला आलेल्या वेदनेविषयी.
कोणताही कवी अथवा लेखक एखादी कविता किंवा कथा लिहून थांबत नाही. त्या कवितेत जे सांगितलं असतं त्यानं त्यापेक्षा जास्त काहीतरी मनात उरलेलं असतं त्याच्या! ज्या जगात तो राहात असतो त्या जगात घडणारी प्रत्येक गोष्ट त्याच्यावर येऊन आदळत असते. हे सारंच आतल्या आत भणभणत राहातं वादळासारखं. मनाला छेदत जाणारा त्या वादळाचा तो आवाज अस्वस्थ करत असतो त्याला. त्या अस्वस्थतेतून बाहेर पडण्यासाठी तो शोधत राहतो नेमका शब्द. कधी तो सापडतो तर कधी सापडल्यासारखा वाटतो. कागदावर उतरवतो तो ते सारंच. मग पुन्हा एकदा नवं काही. तरी आत खोल काहीतरी उरतंच जे सारखं वर येत राहातं मनाचा तळ ढवळून.
ही प्रक्रिया चालू राहाते सतत त्याच्या मनात. त्यामुळेच ‘ब्राह्मण नाही हिंदूही नाही’ किंवा ‘नरेची केला हीन किती नर’ म्हणत केशवसुत पुन: पुन्हा सांगत राहातात ‘नव्या मनूची गोष्ट’. विजय तेंडुलकरांना ‘सखराम बाईंडर’ अपुरा पडतो हिंसेविषयी सांगताना. माणसातलं हे जनावर मग त्यांच्या ‘कन्यादान’ या नाटकामध्ये डोकावतं. कधी ‘घाशीराम कोतवाल’ तर कधी ‘कमला’सारख्या नाटकांमधून बाहेर पडत राहातं. नामदेव ढसाळांना ‘गोलपीठा’मधून जे सांगायचं होतं ते संपलेलं नसतं म्हणूनच ‘निर्वाणा आगोदरची पीडा’पर्यंत येऊन पोचतात ते. तरी दशांगुळे काहीतरी उरतंच. कारण कवीच्या मनात सतत चालू असतो एक संघर्ष. कधी त्याचा त्याच्या बा जगाशी, तर कधी स्वत:चा स्वत:शीच. आतल्या आत झुंजत असतो तो. स्वत:ला तपासून पाहात असतो आणि स्वत:ला शोधत असतो. हा शोध अखंड चालू असतो. हा सगळा काळ हा आत्मशोधाचा काळ असतो. या प्रक्रियेमध्ये तोही घडत असतो. लेखकाच्या घडण्याची ही प्रक्रिया थांबली की मात्र तो संपून जातो.
मला स्वत:ला हा स्वत:चा शोध फार महत्त्वाचा वाटतो. जगण्यातल्या अनेक विसंगतींना तोंड देत स्वत:ला शोधू पाहताना खऱ्या अर्थानं संघर्ष सुरू होत असतो आपला आपल्याशी. एक संवेदनशील आणि सर्जनशील लेखक म्हणून या संघर्षांला मीही सतत तोंड देत असतेच.
‘निरन्वय’ या संग्रहातील ‘प्रतीक्षा’ नावाच्या माझ्या पहिल्याच कवितेत मी म्हटलंय,
एक दिवस संध्याकाळी
काळोखभरल्या पानांनी कातर होऊन
ती बाहेर पडली.
तेव्हापासून तिचे डोळे काजवे झाले
वीसएक वर्षांची असताना लिहिलेल्या कवितेतला हा तुकडा आज वाचते तेव्हा वाटतं काळोखभरल्या पानांनी कातर होऊन बाहेर पडलेल्या माझा हा आत्मशोधाचा प्रवास तेव्हापासूनच सुरू झाला असावा.
कसली अस्वस्थता होती ती. जी काळाच्या त्या रेषेवर सुरू झाली आणि आजही घेरून आहे. अनेकदा बाहेरून सारंच आलबेल आहे असं वाटत असतं आपल्याला, पण तसं ते नसतं हे हळूहळू लक्षात यायला लागतं आपल्या. माझं वाचन खूप झाल्यामुळे असेल किंवा अनेक लेखक कवी, विचारवंतांचा सहवास लाभल्यामुळे असेल पण मला खूप लवकर प्रश्न पडायला लागले असावेत. जगण्याविषयी आणि माझ्या या व्यवस्थेतल्या स्थानाविषयीही. त्यावेळी कळत नव्हतं हे व्यवस्थेतलं स्थान काय असतं ते? पण हातात बांगडय़ा घालायच्याच, कपाळाला कुंकू लावायचंच असं माझ्या काकांनी मला सांगितल्यावर मी त्या घालायच्या नाकारल्या. अनेक र्वष पुरुषांसारखं कडं घालत होते हातात. कोणीतरी सांगितलं पुरुष उजव्या हातात आणि बायका डाव्या हातात घडय़ाळ घालतात. मग मुद्दाम उजव्या हातात घालायला लागले. पुढं कुठंतरी ऐकलं मोठं बटबटीत कुंकू नाही लावायचं चांगल्या घरातल्या बायकांनी. मग मुद्दामहून सगळ्यात मोठी टिकली कपाळावर चिटकवायला लागले आणि लिहूनही टाकलं
‘कुंकू बरं दिसतं म्हणून रेखावं,
त्यात फार काही नसतं,
फक्त त्यानं दिलेल्या ओल्या जखमांचं
कोळलेलं कोरडेपण असतं.’
माझ्या कथांना आणि कवितेलाही उपरोधाची धार सुरुवातीपासून होती. ‘निरन्वय’मधील अनेक कवितांत ती जागोजागी दिसते.
पहाटे पहाटे साखरझोपेत जेव्हा मी
द्रौपदीची वस्त्रं फेडणारा दु:शासन
पाहिला तेव्हा
संध्याकाळी पाहायला येणारा
मुलगा आठवला.
आणि मग रेडिओ विव्हळला-
‘उघडय़ा पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या.’ (संदर्भहीन- निरन्वय)
त्या काळात वाचलेल्या पाश्चात्त्य तशाच भारतीय कथा, महाकाव्य, त्यातली पात्रं, घटना आणि त्यात आलेली मिथकं मी तपासून पाहायला लागले आणि या साऱ्यात बाईच्या वाटय़ाला आलेलं दुय्यमत्व जाणवायला लागलं. शब्दांत आक्रमकपणा यायला लागला आणि माझ्या लेखणीला माझ्या नकळत धार येत गेली.
लग्नानंतर तर या व्यवस्थेनं मला दिलेलं दुय्यम स्थान प्रकर्षांनं जाणवायला लागलं. आपल्या अंगात असलेलं बंड लग्न नावाची व्यवस्था साफ चिरडून टाकते. विशेषत: बाईच्या बाबतीत. तुमचे विचार समजण्याची शक्ती नसणारी किंवा त्या जगाशी काही संबंध नसलेली माणसं तुमच्या आयुष्यात येतात. लिहिता म्हणजे काय करता नेमकं हे माहीत नसलेली आणि काही वाचायचा त्रासही न घेणारी माणसं आजूबाजूला भेटतात तेव्हा आपल्या या शब्दांचं काय करायचं, हा प्रश्न पडायला लागतो. असा प्रश्न मला वाटतं प्रत्येक लेखक-कवीला पडत असणार. पण बाईला तो जास्त पडत असावा.
परंपरेच्या चौकटीत बांधल्या गेलेल्या, व्रतवैकल्याचा आधार घेणाऱ्या, सारे सणवार साग्रसंगीत करणाऱ्या, चार लोकांत सुनेची भूमिका व्यवस्थित वठविणाऱ्या स्त्रिया माझ्या आजूबाजूला होत्या आणि मीही त्यांच्यासारखंच व्हावं अशी अपेक्षाही करत होत्या. मनानं तशा निर्मळ पण या व्यवस्थेनं परंपरांच्या बेडीत जखडून ठेवलेल्या या स्त्रियांना माझी घुसमट मला सांगता येत नव्हती आणि त्यांना ती कळतच नव्हती. मनमुक्त भिरभिरता येईल, मनसोक्त वाचता येईल, हवं तसं उडता येईल अशा घरातून आलेली चिमणी बंदिस्त झाली घरटय़ात. सून, पत्नी, वहिनी, जाऊ, आई अशा विविध भूमिकांमध्ये वावरताना होणारी दमछाक जाणवायला लागली. ती सगळ्याच मुलींना जाणवते, पण हे करावंच लागतं बाईला, रुजवावं लागतं तिला नव्या घरात असं आपली व्यवस्था जन्मापासून कानीकपाळी ओरडत असते मुलीच्या, अगदी आजही. नव्या घरात व्यवस्थित रुजायचं असेल तर छाटाव्या लागतात तरारून येणाऱ्या, पण इतरांना नको वाटणाऱ्या तुमच्या अस्तित्वाच्या फांद्या.
हे सारं माझ्या भोवतालच्या बायका विनातक्रार करत होत्या. या व्यवस्थेचा हा भाग आहे हे त्यांनी मनाच्या पाटीवर आदिम काळापासून गिरवून ठेवलं होतं. आदर्श सून, पत्नी आणि आईविषयीच्या अनेक मिथकांनी गच्च भरलेल्या पाटीवर आपल्या मनातला अलवार पक्षी रेखण्यासाठी जागाच मिळत नाही बाईला. स्वत:च्या हातांनी या पक्ष्याचे पंख मिटून लोटून देते ती मनाच्या तळाला. त्या तळघराची दार बंद करून जगणाऱ्या बाईत माझंही रूपांतर होतं आहे हळूहळू याची जाणीव व्हायला लागली मला आणि माझा आवाज आणखी प्रखर होत गेला. मी माझ्या कवितेतून, कथेतून तो उमटवू लागले. गेली अनेक र्वष ज्या स्त्रीविषयी मी लिहिते आहे ती एकीकडे या व्यवस्थेनं शोषण केलेली, पुरुष या केंद्राभोवती फिरणारी स्त्री आहेच, पण दुसरीकडे स्वत:ला सापडलेली, आत्मशोधाकडे निघालेली, व्यवस्थेला जाब विचारणारी, निर्णय घेण्याची क्षमता बाळगणारी, स्वत:ला तपासून पाहणारी आणि स्त्रीच्या लैंगिकतेविषयी मोकळेपणानं बोलणारी स्त्रीही आहे.
स्त्री ही माझ्या लेखनाच्या केंद्राशी आहेच, पण तरी माणूस म्हणून असलेलं माझं जगणंही माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. एक माणूस म्हणून माझा संघर्ष हा जसा परंपरेशी, या परंपरेतल्या कर्मकांडाशी आहे तसाच तो जात, धर्म, लिंग यावर आधारलेल्या मानवी व्यवहाराशी, संपूर्ण समाजाशी, त्याच्या सत्ताकारणाशीही आहे. जातिव्यवस्था, धर्मव्यवस्था किंवा लिंगव्यवस्था आपल्याला हवी तशी वापरणाऱ्या लोकांची मानसिकता मला अस्वस्थ करत जाते. जगात कुठेही झालेला बलात्कार हा मला माझ्या स्त्रीत्वावर झालेला बलात्कार वाटतो.
‘काय असते जात बाईची
आणि कोणता असतो धर्म?
बदलतो का वेदनेचा स्तर
जात बदलली तर?
शरीराला ओरबाडणाऱ्या चेहऱ्यांवर
कसलं असतं समाधान
बाईला भोगल्याचं की
जातीला भोगल्याचं?’ असे प्रश्न मला पडत राहातात.
नितीन आगे, भोतमांगे कुटुंब असो की अखलाखसारखे जात आणि धर्मव्यवस्थेचे बळी असोत, बाबरी मस्जिद पाडल्यावर झालेल्या किंवा पुढे गोध्रामध्ये उसळलेल्या दंगली असोत, २६-११चा हल्ला असो, तालिबान्यांचं कसाबकृत्य असो की धर्माच्या नावावर उसळलेला उन्माद असो, परंपरांच्या विरोधात लिहिलं म्हणून पेरूमल मुरुगनसारख्या लेखकाला करावी लागलेली त्याच्यातल्या लेखकाची हत्या असो की गेल्या तीन-चार वर्षांत झालेल्या दाभोळकर, पानसरे, कलबुर्गीसारख्या लोकांच्या हत्या किंवा रोहित वेमुल्लाची आत्महत्या असो या साऱ्या गोष्टी मला अस्वस्थ करतात. आणि मग, ‘मला कळत नाही मी कोणत्या युगात आले आहे नेमकी.’ अशा वेळी माझ्या मनात शब्द उमटतात,
‘गळ्यातून उमटू नये एकही शब्द म्हणून
आवळून फास
लटकावताहेत मला
आत्महत्येच्या झाडावर.
या दिशाहीन दशकात
ओतलं जातं आहे
माझ्या घशात
राष्ट्रवादाचं ग्राईपवॉटर
मेंदूच्या आत भरताहेत
भुसा हिंसेचा
विकासाच्या
बेडक्या फुगवून
आखाडय़ात उतरलेले लोक
कापताहेत माझी
लिहिती बोटं
आणि कोणत्याही
फुटपाथवर
रेखाटताहेत माझं
थारोळ्यात पडलेलं चित्र.’
कवी किंवा लेखक बाहेरच्या जगात वावरताना केवळ कवी नसतो तो अनेकांसारखाच एक असतो. एकाचवेळी अनेक भूमिका वठवत असतो. फक्त त्याचं मन काहीतरी सतत टिपत असतं, शोधत असतं. हा शोध घेताना मला अगदी सुरुवातीपासून जाणवली ती जगण्यातली निर्थकता, आपलं हजारो तुकडय़ांत झालेलं विभाजन, या शहरालाच नाही जगातील प्रत्येकाला लागलेली भौतिक विकासाची चटक, आपलं बदललेले राजकीय वास्तव आणि गुंतागुंतीचे होत गेलेले सामाजिक संदर्भ. हे सगळं अस्वस्थ करत असतं मला. मग ही अस्वस्थता कधीतरी अचानक शब्दांतून उतरते, त्याची कथा होते तर कधी कविता. ‘निर्थकाचे पक्षी’ किंवा ‘मी माझ्या थारोळ्यात’ असे कवितासंग्रह असोत की ‘पावसात सूर्य शोधणारी माणसं’ किंवा ‘अस्वस्थ मी अशांत मी’ हे कथासंग्रह असोत माझ्या आत चालू असलेली उलथापालथ माझ्या संग्रहांच्या नावातूनही व्यक्त होत राहते.
‘श्रीकांत विनायकची गोष्ट’ ही अशीच अस्वस्थतेतून लिहिली गेलेली कथा आहे. कुठंतरी भेटलेली माणसं अचानक माझ्या कथेचा भाग होऊन जातात. मग ते श्रीकांत विनायक असोत, ‘सत्तेची काठी’ मधला वसंता असो, की ती ‘रत्नप्रभा जाधव वर्तमानपत्रातील बातमी होते तेव्हा’ या कथेतील रत्नप्रभा जाधव असो, ‘ओल हरवलेली माती’ या कथेतली फातिमाबी असो की ‘महिषासुरमर्दिनी’मधली सती असो. माझ्या आजूबाजूला किती वेगवेगळ्या प्रकारची माणसं राहात असतात. त्यांच्या स्वभावाचे विलक्षण कंगोरे पाहून थक्क व्हायला होतं. कोणत्याही कथेतलं पात्र साकार होण्याआधी ते कुठंतरी, कोणात तरी किंवा एकाच वेळी अनेक माणसात भेटलेलं असतंच आपल्याला. कधी कधी तर कोणाचं एखादं वाक्यही तुमच्या कथेचं कळीचं वाक्य होऊन जातं. मला आठवतं मी ‘जस्ट बिट्विन अस’ या पुस्तकातील भारतीय लेखिकांच्या मुलाखती वाचत होते. त्यात एक कवयित्री म्हणाली होती की तिचं लग्न केवळ सत्तर दिवस टिकलं होतं. न टिकण्याची कारणं अनेक होती. मुख्य कारण होतं तिचं सर्जनशील मन समजू न शकणारा नवरा. पहाटेची वेळ ही तिच्या वाचनाची ठरलेली वेळ होती आणि लग्न झाल्यावर मात्र पहाटे पहाटे मार्केटमध्ये जाऊन तिला मासे आणावे लागत आणि ते साफ करून सगळ्या घरासाठी शिजवावे, तळावे लागत. हे करत आयुष्य काढणं शक्य नव्हतं तिला आणि तेही कवितेची किंमत मोजून. हे सारं मला कित्येक दिवस अस्वस्थ करत होतं. आणि त्या वाक्याभोवती फिरणाऱ्या माझ्या मनात अचानक पहिली ओळ आली. ‘पाच महिने तेवीस दिवसांचा सहवास..सहवास म्हणायचा की कारावास हे मात्र ठरवायला लागेल. नाहीतर कोणत्या कारणासाठी अशी सहाव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी बॅग उचलून बाहेर पडले मी.. अनंत दीनानाथ बावीस्कर या मुखदुर्बळ माणसानं लग्न कशासाठी केलं माझ्यासारख्या मुलीशी हा राहून राहून प्रश्न पडतो मला. अर्थात वंदना लक्ष्मण कुडाळकर या आपला एकटीचा कोपरा शोधू पाहाणाऱ्या बाईनेही लग्न का केलं असा प्रश्न अनंत बावीस्करलाही पडला होताच.’ ही कथा ‘अस्वस्थ मी अशांत मी’ या नव्या संग्रहात ‘पाच महिने तेवीस दिवस’ या शीर्षकानं लवकरच येते आहे.
कितीतरी प्रसंग, कितीतरी माणसं ओळखीची, अनोळखी, कधी एखाद्या चित्रपटातलं अस्वस्थ करणारं पात्र तर कधी कुठं प्लॅटफॉर्मवर भेटलेली एखादी स्त्री किंवा पुरुष, जी माझ्या कथांतली पात्र होऊन जातात. ‘ओल हरवलेली माती’ या कथेतली फातिमाबी मला अशीच भेटली होती. दहिसर ते अंधेरी प्रवासात आणि रुतून बसली कायमची. माझ्या कथेचं पात्र झाली तेव्हाच पाठ सोडली तिनं माझी.
माझी कथा असो की कविता माझं लेखन हे माझ्या काळाचं आहे. आज जगण्यात खोलवर दडलेली, सतत सलणारी आणि विषण्ण करणारी वेदना ते अधोरेखित करतं आहे. ही वेदना कदाचित भौतिक विकासाच्या मागे लागलेल्या माणसाच्या नजरेला दिसत नसेलही. पण मला जाणवत राहाते. अर्थात माझा माणसातल्या माणूसपणावरही तेवढाच विश्वास आहे. कारण मला वाटतं,
माणसं वाईट नसतात तशी
त्यांना माहीत असतो
दया, करुणा, सहवेदना
या शब्दांचा नेमका अर्थ
पण तरीही दहशतीच्या उन्हात
शोधताना सावली स्वत:पुरती सुरक्षित
माणसं होत जातात मनानं घट्ट
बाहेरच्या वादळांना थोपवून धरतात
शूर वीराप्रमाणं
आपल्या जगण्याभोवती रचतात
भक्कम तटबंदी
आणि साजरं करतात आयुष्य हौशीनं
माणसं खरंच वाईट नसतात तशी,
फक्त जगण्याचा प्रयत्न करतात आटोकाट
मरेपर्यंत.
या अशा माणसांचं जगणं जर जाणून घ्यायचं असेल तर मला या समाजातलं एक होऊन राहावं लागतं. पण ज्या समाजात मी राहात असते तो समाज काही समविचारी लोकांनी बनलेला नसतो आणि तशी अपेक्षा करणंही चुकीचं आहे. अनेकदा अशा समाजाला समजून घेण्यात आयुष्य जातं आपलं. पण लेखकाला ते करावं लागतं. आज लेखकाला त्याच्याच काळात लिहिणारे लेखक समजून घेणंही कठीण झालं आहे. अशा काळात जगताना माणसाच्या मनातलं भय आणि त्यासोबतच त्याच्या मनातल्या महत्त्वाकांक्षा, राजकीय लालसाही समजून घ्याव्या लागतात. हा सारा प्रयत्न मी करते आहे. माझ्याबरोबर इतरांच्या जगण्याच्या मागची सृष्टीही पाहण्याचा प्रयत्न करतेय. पाहू कितपत जमतंय ते. शेवटी एवढंच म्हणेन
हिरवी ओल जपून ठेवली
काळजात कायमची
तर सोपं होतंच आकांताला छेद देत जगणं
बारोमास उन्हाळ्यातही.
नीरजा ( साहित्यिका )
neerajan90@yahoo.co.in