‘नो मेकअप.. मेकअप लुक’ ही माझी संकल्पना आता कलाकारांना पटू लागलेय. मेकअपचं तंत्र फार नाजूक आहे. मेकअपचं जाड रोगण लावल्याने ‘खूबसूरत’ हिरॉइन ‘व्हॅम्प’ वाटू लागते. आता तंत्र प्रगत झालंय. पण ते लक्षात न घेणारे कलाकार विक्रम दोन-चार फटक्यांत मेकअप संपवतो याचा अर्थ हा मेकअप नीट करतच नाही किंवा त्याला मेकअप करताच येत नाही असं समजायचे. आज कलाकारांना माझी ‘नो मेकअप.. मेकअप लुक’ ही संकल्पना कळू लागलेय. पण त्यासाठी मला खूप झगडावं लागलंय.
विक्रम गायकवाड
रंगभूषा संकल्पक
चित्रपटसृष्टीतील नामांकित ‘आयफा’ अॅवॉर्डसाठी, ‘सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार विक्रम गायकवाड’, अशी माझ्या नावाची उद्घोषणा झाली आणि क्षणभर मी दचकलो. अॅवॉर्डसाठी माझं नाव पुकारलं जाणं मला नवीन नव्हतं. माझ्या पुण्यातल्या ‘बांबू हाऊस’मध्ये माझी भरपूर अॅवॉर्ड्स मांडलेली आहेत. पण हे अॅवॉर्ड माझ्यासाठी विशेष महत्त्वाचं होतं. अगदी आजवर ‘डर्टी पिक्चर’, ‘बालगंधर्व’, ‘जातिश्वर’ अशा चित्रपटांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांइतकच या पुरस्काराचं महत्त्व अनमोल होतं. कारण ‘आयफा’ अॅवॉर्डच्या स्पर्धेत ‘बाजीराव-मस्तानी’सारखे महत्त्वाचे नामांकित चित्रपट होते. पण चित्रपटसृष्टीतल्या जाणकारांनी ‘तनु वेडस् मनु’ या संपूर्ण मी रंगवलेल्या कंगना राणावतच्या अवघ्या एका कॅरेक्टरसाठी मला पुरस्कारपात्र ठरवलं. असं काय केलं होतं मी? या चित्रपटात कंगना राणावत खेळाडू तरुणी दाखवलीये. मी तिला बॉयकटचा विग दिला. सतत उन्हात खेळून खेळाडूंच्या त्वचेवर एक मातकट टेक्चर आलेलं असतं. ते टेक्स्चर तिच्या त्वचेवर हलकं पसरवलं. तिला कृत्रिम दात व हिरडय़ा दिल्या. त्यामुळे तिचे नाक व ओठ उचलले गेले जबडा किंचित पुढे आला. गालांची हाडं वर उचलली गेली. हे मी का केलं? कोणत्याही खेळाडूमध्ये आक्रमकतेची विशिष्ट अॅनिमल इन्स्टिक्ट असतेच. ती दाखवण्यासाठी मी तिचा जबडा पशूप्रमाणे केला. पशूंचे डोळे अत्यंत शार्प असतात. खेळाडूंचेही डोळे तसेच दिसावे यासाठी कंगणाचे डोळे त्याप्रमाणे रंगवून तिला शार्प लुक दिला. या छोटय़ा छोटय़ा गोष्टींची चित्रपटसृष्टीतील जाणकारांनी साक्षेपी नोंद घेतली आणि त्या कॅरेक्टरसाठी मत देऊन मला निवडलं. अॅवॉर्ड्स मॅनेज होतात असं भले कोणीही म्हणो! पण मला अॅवॉर्ड देण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. मला आनंद यासाठी वाटला की, माझ्या प्रयोगावर प्रेक्षकांनी दिलेली ही अर्थपूर्ण प्रतिक्रिया होती. याचा सरळ अर्थ असा की, प्रेक्षक सुजाण झाला आहे. तो मेकअप पाहत नाही. वाचू लागलाय. मेकअपचं व्याकरण त्यांना समजू लागलय. परीक्षकांपर्यंत हे प्रयोग ‘पोहोचणं’ हे खूप महत्त्वाचं आहे. अर्थात मी, मिकी कॉन्ट्रॅक्टर अगदी आधीच्या पिढीतले पंढरीनाथ जुकर, लक्ष्मणराव कासेगावकर, बाबा वर्धम, ओगले दादा अशा अनेकांनी त्यासाठी आपलं अवघं आयुष्य खर्ची घातलं आहे. मेकअपपासून कृत्रिम अवयवांद्वारे (Prosthetics) व्यक्तिमत्त्व उभं करणं हा रंगभूषेचा एक फार मोठा प्रवास संपन्न झाला आहे. रंगभूषेची ही पवित्र पालखी वाहण्याची, कलेची तन-मन-धन वेचून सेवा करण्याचं खूप मोठं कार्य माझे गुरुवर्य बबनराव शिंदे, ज्यांना मी बाबा म्हणत असे त्यांनी, केलं.
बाबांचा मुलगा अशोक माझा बालमित्र! मी लहानपणापासून त्यांच्या घरी जायचो. त्यांच्या घरी गदा, राक्षस, प्राणी भिंतीवर लावलेले असायचे. मी ते तासन्तास बघत राहायचो. बाबांनी माझा कल अचूक जाणला. ते मला बालनाटय़ासाठी सोबत नेऊ लागले. ते वेशभूषा पाहत असले की मला म्हणत, ‘विक्रम यांना मेकअप मार रे!’ मी त्या नाटकातल्या कलाकारांना थरथरत्या हातांनी मेकअप करू लागे. माझ्या हातांची ही थरथर आजही चालू आहे. ज्या दिवशी ती बंद पडेल त्यादिवशी माझी प्रगती खुंटेल!
मी सहावीत असल्यापासून काम सुरू केलं. हल्लीचे पालक मुलांना फक्त डॉक्टर, इंजिनीअर बनवण्याची स्वप्नं पाहतात. त्यापेक्षा त्यांचा कल ओळखून त्यांना खेळाडू, कलाकार बनवा. मी फक्त मॅट्रिक्युलेट आहे. तीन तासांचा पेपर पंधरा मिनिटांत सोडवून मी वर्गाबाहेर. कारण माझं टार्गेट पन्नास मार्काचं असायचं. कारण अभ्यास हा माझ्या अनेक अॅक्टिव्हिटिजमधला फक्त एक भाग असायचा. त्या शाळकरी वयात मी शरद तळवलकर, रामदास कामत, चित्तरंजन कोल्हटकर अशा मातब्बर मंडळींना मेकअप करत असे. नाटकात नटाच्या चेहऱ्याला रंग लावण्यापूर्वी मी आधी आरशावर ‘पाच तिलक’ आणि ‘एक तिलक’ नटाच्या भाळी लावत असे. मेकअप झाला की ही थोर मंडळी मला दरडावत, ‘‘विक्रम सरळ उभा राहा.’’ ते माझ्या पाया पडायचे. मी अवघडून जायचो. दचकायचो. एकदा बाबांनी मला समजावलं, ‘‘विक्रम ते तुला नव्हे, तुझ्या हातातल्या कलेला, रंगदेवतेला पाया पडतात आणि परकायाप्रवेश करतात!’’
मी स्वत: गुरू-शिष्यपरंपरेतून शिकत गेलो. स्वत:ला घडवत गेलो. ‘कमी तिथे आम्ही’ म्हणत मेकअप सोबत प्रॉपर्टी, कॉस्चुम सगळे विभाग सांभाळत गेलो. कुठलंही काम कमी प्रतीचं न मानता आत्मसात करत गेलो. म्हणूनच फिल्म इन्स्टिटय़ूटमधील मेकअप आर्टिस्ट अंजीबाबूंना एका हुशार मुलाची गरज आहे असं कळलं, तेव्हा बाबांनी त्यांना माझं नाव सुचवलं. सहा र्वष मी तिथे काम केलं. पुढे कायमस्वरूपी नोकरीसाठी प्रयत्न करू लागलो. घरची परिस्थिती बेताची होती. आईची जबाबदारी होती. पण तिथल्या लोकांनी मला चक्क हाकलून दिलं. ते म्हणाले, ‘‘तुझ्या हातात कला आहे. इथे काम करत राहिलास तर सरकारी बाबू म्हणून असाच निवृत्त होशील. आमचं काय झालं बघ!’’
दैवयोगाने त्याच वेळी अंजीबाबूंनी ‘नेहरू दि ज्वेल ऑफ इंडिया’ ही फिल्म घेतली होती. तिथे त्यांनी मला साहाय्यक रंगभूषाकार म्हणून घेतलं. शेवटी करिअरमध्ये तुम्हाला कामं मिळवून द्यायला बाहेरच्या लोकांची मदत एका मर्यादेपर्यंत मिळते. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचं क्राफ्टिंग तुमचं तुम्ही करायचं आणि काम मिळवायचं. स्वत:ची प्रतिमा स्वत: कष्टाने तयार केली की ती प्रतिमा तुम्हाला शेवटपर्यंत साथ देते.
एकदा संजय वैद्य नावाचा एक कलाकार बाबांकडे आला. श्याम बेनेगल यांच्या ‘सरदार पटेल’मध्ये त्याला घेण्यात येणार होतं. खान अब्दुल गफार खानच्या व्यक्तिरेखेसाठी त्याला तयार कर, असं मला बाबांनी सांगितलं. मी त्यांचं चित्र पाहिलं. बाजारातून एक मुसलमानी टोपी पैदा केली. खानसाहेबांचं नाक खूप मोठं! बाबा म्हणाले, ‘याच्या नाकाचं तूच काही तरी कर!’ मी वॅक्स मागवलं. कृत्रिम नाक तयार केलं. कृत्रिम केस आणले. मिशी तयार केली. दाढी- मिशा लावून हॉटशॉटवर फोटो काढले. ते घेऊन तो श्याम बेनेगलांकडे गेला. त्यांनी फोटो बघितले आणि तत्काळ प्रश्न केला, ‘‘पुण्यासारख्या ठिकाणी तुला हा मेकअप कोणी केला?’’ तो म्हणाला, ‘‘विक्रम- विकीने केला!’’ त्यांनी लगेच मला फोन केला. मी तेव्हा झापाच्या थिएटरमधल्या एका नाटकाच्या कलावंतांच्या मेकअपसाठी दौऱ्यावर होतो. श्याम बेनेगल यांचा माझ्या आयुष्यातला प्रवेश हा माझ्यासाठी फार मोठा टर्निग पॉइन्ट होता.
रंगभूषा ही स्पर्शाची कला आहे. मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, ‘‘पैसा बाजूला ठेवा. स्पर्शाचं महत्त्व ओळखा. ताकद ओळखा!’’ स्पर्शाच्या अनुभूतीखेरीज अभ्यास, चिंतन, शिक्षण, अनुभव, उत्स्फूर्तपणा याच्यातून रंगभूषाकार तयार होतो. कोणत्याही कलाकाराला मेकअप करताना, माझा विचार आणि काम एकाच वेळी सुरू होतं. मी कधीही खूप विचार करून मेकअपसाठी बसत नाही. मी मेंदूला अशीच सवय लावलेय की विचारांसोबत काम व कामासोबत विचार सुरू व्हावे. अर्थात त्यासाठी हवी सूक्ष्म निरीक्षण शक्ती! एखाद्या बागेत, फलाटावर, रस्त्यात, गर्दीत पक्षी, प्राणी, माणसं बघणं, त्यांना वाचणं, त्यांच्यात स्वभाव, व्यवसाय याचा अंदाज बांधणं हा माझा छंद आहे.
रंगभूषाकाराने माणसांची बायोलॉजिकल केमिस्ट्री वाचायला शिकलं पाहिजे. उदाहरणार्थ ताण आणि टक्कल यांचा घनिष्ठ संबंध आहे. मानसोपचारतज्ज्ञाच्या चेहऱ्यावर विशिष्ट तणावाचा भाव असतो. अशी गुंतागुंतीची कॅरेक्टर्स वाचायला मला फार आवडतात. ही अशी जिवंत व्यक्तिमत्त्वं ही माझी मेंदूतील बँक आहे. अशा माणसांचे केस, कपडे, हावभाव यांसकट मी त्यांना कंपासावर बसवतो. जेव्हा लेखक, दिग्दर्शक कथा सांगतो, तेव्हा ती व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्याच्या चेहऱ्यावर मी त्या बँकेतील चेहरा काढून बसवतो आणि मग त्या नटाच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा मी कायापालट करून टाकतो. थोडक्यात रंग हा दागिना आहे. हा दागिना घडवणारा मी सोनार. मी रंगभूषा करतो म्हणजे कलाकाराला आरशात अडकवतो आणि स्वत: निघून जातो. कलाकार जेव्हा आरशात स्वत:चं मूळ रूप शोधायला लागतो, तेच एका रंगभूषाकाराचं मोठं यश असतं. मी कलाकारांचा पूर्ण मेकअप होत नाही तोवर त्यांना आरसा दाखवत नाही.
अभिनेता मामुटीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मेकअप करत होतो. मेकअप आटोपला आणि मामुटी स्वत:ला आरशात पाहून दचकला. हा कोण माणूस आपल्या जागी असा त्याला संभ्रम पडला. अडीच र्वष तो आंबेडकरांच्या रूपात स्वत:ला बघत होता. ४० र्वष स्वत:चं रूप आरशात पाहिलेला माणूस या नव्या रूपात जगायला लागतो. मेकअप उतरला की पुन्हा त्याला प्रश्न पडतो की नक्की खरं कोण? हा की तो? हे सगळे ताकदीचे नट! ते अशा व्यक्तिरेखांमध्ये परकायाप्रवेश करतात तेव्हा मेकअप त्यांना ते करायला साहाय्यभूत ठरतो. त्यासाठी दिग्दर्शकाचा रंगभूषाकारावर पूर्ण विश्वास हवा.
लोकमान्य टिळक करताना ओम राऊत म्हणाला होता, ‘‘मला तुम्हीच हवे आहात. तुम्हाला वेळ असेल तेव्हाच हा चित्रपट करू!’’ वास्तविक लोकमान्य टिळकांच्या आणि सुबोध भावेंच्या चेहऱ्यात काहीही साम्य नाही. तरीही मी ते आणू शकलो. त्यामागे माझा वेगळा असा दृष्टिकोन आहे, कष्ट आहेत. मी सुबोधला म्हटलं होतं, ‘तू लोकमान्य टिळक नाही दिसलास तरी मला चालेल. पण तू सुबोध भावे मात्र दिसू नये!’ मेकअप झाल्यावर सुबोधने आरशात टिळकांना पहिलं आणि क्षणभर तोच अवाक् झाला. पुरस्काराच्या वेळी त्याने आवर्जून याचं श्रेय मला दिलं.
रंगभूषाकाराला त्याच्या कलेचं श्रेय देणारे कलाकार अपवादात्मक! मेकअप व्हॅनमध्ये दादा, दादा म्हणून मला चढवणारे कलाकार महत्त्वाच्या ठिकाणी आमचा उल्लेखही करत नाहीत, पण माझ्यासाठी ते फक्त कॅनव्हास आहेत. मी स्वत:च्या आनंदासाठी काम करतो. त्यांतून मला पैसेही मिळतात. तेव्हा या मंडळींनी आपलं नाव घ्यावं ही अपेक्षा गैरलागू आहे. तरीही रंगभूषाकारांना त्यांच्या कलेला राष्ट्रीय पातळीवर गौरवलं जावं असा मी सातत्याने प्रयत्न केला. अर्थात स्वत:ची किंमत कमी करण्यास आम्ही रंगभूषाकारही अंशत: जबाबदार आहोत. होतं काय, रंगभूषाकार कलाकाराचे फाजील लाड करतो, त्याला हळूवारपणे तासन्तास मेकअप करत गोंजारतो तेव्हा कलाकार आपली बुद्धी गहाण ठेवून रंगभूषाकाराने तयार केलेल्या प्रतिमेच्या प्रेमात पडतो.
आरशातल्या प्रतिमेच्या प्रेमात अडकलेला कलाकार खूप खूश होतो. आपल्या मेकअप दादाने तासभर खूप कसोशीने मेकअप केलाय या भावनेच्या भ्रमात तो अडकतो. इथे विक्रम गायकवाड काय करतो? मेकअपचे दोन चार स्ट्रोक चेहऱ्यावर देतो आणि म्हणतो झाला मेकअप! कलाकार चक्रावतो. ‘ओंकारा’च्या वेळी करिना कपूरचं तेच झालं. मेकअप मी माझ्या पद्धतीने केला. त्यावर ती वैतागली. म्हणाली, ‘माझ्या नसा दिसतात.’ शेवटी खूप वाद झाल्यावर तिला म्हटलं, ‘‘तुझी त्वचा इतकी मुलायम आहे, ही तुझ्या पूर्वजांनी दिलेली सौंदर्याची देणगी आहे. तुझं मूळचं सौंदर्य कसं उठावदार दिसेल हे मी पाहतोय. जर तू स्क्रीनवर अप्रतिम नाही दिसलीस तर या शूटिंगचा पूर्ण खर्च मी करेन!’’
‘नो मेकअप.. मेकअप लुक’ ही माझी संकल्पना आता कलाकारांना पटू लागलेय. आता ते म्हणतात, ‘‘ऐसा तो हमने कभी सोचा ही नही!’’ मेकअपचं तंत्र फार नाजूक आहे. मेकअपचं जाड रोगण लावल्याने ‘खूबसूरत’ हिरॉईन ‘व्हॅम्प’ वाटू लागते. याचं भान नसलेले रंगभूषाकार कॅमेराचं प्रगत तंत्र लक्षात न घेता, जुन्याच पद्धतीने रंगभूषा करत राहिले. पूर्वी सिनेमावर नाटय़सृष्टीचा प्रभाव असल्याने गडद मेकअपची गरज असायची. आता तंत्र प्रगत झालंय. पण ते लक्षात न घेणारे कलाकार विक्रम दोन-चार फटक्यांत मेकअप संपवतो याचा अर्थ हा मेकअप नीट करतच नाही किंवा त्याला मेकअप करताच येत नाही असं समजायचे. मात्र आज कलाकारांना माझी ‘नो मेकअप.. मेकअप लुक’ ही संकल्पना कळू लागलेय. पण त्यासाठी मला खूप झगडावं लागलंय..
आजवर सरस्वतीचा माझ्यावर अखंड वरदहस्त असल्याने कधीच मी अडलो नाही. अडखळलो नाही. फक्त एकदा एक अॅडफिल्म मी करत होतो. त्यात सनी देओलला ‘अग्निपुरुष’ बनवायचं होतं. ऑरेंज लेन्सेस, टक्कल, लाल चेहरा असा मी त्याला रंगवला. पण त्याला हा गेटअप काही केल्या पसंत पडेना. शूटिंग थांबलं. एवढय़ात माझी पत्नी ज्योत्स्ना काही कामानिमित्त सेटवर आली. तिने जी.डी. आर्ट्स केलंय. तिने सहज त्याच्या चेहऱ्यावर अग्निज्वाळा काढल्या आणि काय आश्चर्य! सनीला आणि दिग्दर्शकाला हा इफेक्ट खूप आवडला.
रंगभूषाकार अत्यंत प्रसंगावधानी असावा, हे माझ्या गुरूंनी सतत माझ्या मनावर बिंबवलं होतं. तसंच कोणत्याही असाइन्मेंटवर जाताना आजूबाजूचं निरीक्षण करत जा हेही सांगितलं होतं. श्याम बेनेगल यांच्यासोबत दक्षिण अफ्रिकेतील एका घनदाट जग्ांलात ‘मेकिंग ऑफ महात्मा’चं शूटिंग चालू होतं. पोलार्ड नावाचा मोठा अभिनेता गांधीजींच्या साहाय्यकाची भूमिका करत होता. अॅनी टेलर ही साहाय्यक त्याची मिशी आणण्यास विसरली. आता काय करायचं? मी शूटिंगच्या जागी येताना जंगलात काही घोडे चरताना पहिले होते. तिथल्या स्थानिक मदतनीसाला म्हटलं, गाडी घेऊन चल तिथे! तिथे घोडे चरायला सोडलेल्या माणसाला गाठलं, म्हटलं, मला थोडे घोडय़ांचे केस कापून दे! तो चिडला. म्हणाला, ‘मालक गोळी घालेल.’ शेवटी म्हटलं, ‘अरे मी असे केस कापेन की तुझ्या मालकाला कळणारसुद्धा नाही.’ अखेर दोनशे रॅम बिदागीवर तो तयार झाला. म्हटलं, ‘धर घोडय़ांचे पाय!’ मी कौशल्याने काळे, तपकिरी, पांढरे असे केस कापले. त्याची छान मिशी बनवली. तर पोलार्ड म्हणू लागला, ‘मी ही मिशी नाही लावणार? माझ्या नाकात शेपटीतले बॅक्टेरिया जातील!’ त्याला म्हटलं, ‘मी ही मिशी सर्जिकल स्पिरिटमध्ये बुडवली तर लावशील?’ मी ती मिशी त्याच्यासमोर स्पिरिटमध्ये बुडवून गम लावून अॅरेंज केली. त्याला ती इतकी आवडली की पुढे तो तीच मिशी लावू लागला. त्याच चित्रपटासाठी गांधीजींची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याला ठेच लागून रक्त येतं असं दाखवायचं होतं. कृत्रिम रक्त त्या बाईने आणलंच नव्हतं. परत पळालो. एका मळ्यातून स्ट्रॉबेरी जाम घेतला, सॉस घेतला आणि रक्ताचा इफेक्ट दिला. परदेशांत घडलेल्या या दोन्ही प्रसंगांत केवळ प्रसंगावधान दाखवल्यानं निर्मात्याचं पंचवीस लाख रुपयांचं नुकसान वाचवलं.
एकदा टांगेवाल्याला खुरटी दाढी-मिशी लावायची होती. आमचे साहाय्यक पुढे निघून गेले होते. जवळपास वैराण वाळवंटी रिफ्लेक्टर घेऊन एक लाइट बॉय उभा होता विडी ओढत! म्हटलं, ‘‘तुझी काडेपेटी दे!’’ दोन काडय़ा जाळल्या. त्या जळक्या काळ्या राखेतून टांगेवाल्याला दाढी-मिशी रंगवली. असंच एकदा कृत्रिम बॉडीपार्ट घेऊन साहाय्यक पुढे निघून गेला. दिग्दर्शकाला एका स्पॉटवर गळा चिरलेला माणूस दाखवायचा होता. तो म्हणाला, ‘‘विक्रमजी, आप है तो मुझे कोई चिंता नही!’’ मी फिरत फिरत निघालो. एक बाई मैद्याच्या रोटय़ा बनवत होती. तिच्याकडून एक गोळा घेतला आणि हवा तो बॉडीपार्ट बनवला. काम झालं. मी मेकअपसाठी नेहमी मोकळ्या हातांनी जातो. कोणताही ठरावीक ब्रॅण्ड वापरत नाही. ब्रॅण्डच्या खूप पुढे मी निघून गेलोय. मात्र माझा मेकअप कोणता कलाकार पेलू शकतो हा विचार मी निश्चितपणे करतो.
माझ्या संपूर्ण यशात माझ्या गुरूंच्या संस्कारांचं योगदान मोठं आहे. ते म्हणत, ‘‘इतरांनी मूर्ख, बावळट ठरवलं तरी तू सरळच वागायचं. वाकडा मार्ग स्वीकारायचा नाही. तसं वागलास तर विजय तुझाच आहे.’’ शाळकरी वयात हातून एक चूक घडली. मी ती बाबांसमोर कबूल केली. त्या वेळी मला थोपटत ते म्हणाले, ‘‘तू माझ्यासमोर आपली चूक कबूल करायला घाबरला नाहीस. याचा अर्थ पुढील आयुष्यात तू कशालाच घाबरणार नाहीस. तू यशस्वी होशीलच!’’ एकदा बाबासाहेब पुरंदरे माझ्या गुरूंना म्हणाले, ‘‘तुमच्या परीसस्पर्शाने विकीचं सोनं झालं!’’ बाबा उत्तरले, ‘‘मला सोनं नव्हे परीस घडवायचा आहे!’’ त्यांनी माझ्याकडून एक शपथ घेतली. ‘‘मी स्वार्थ न बाळगता तुला तयार केलं. तशी किमान दोन रंगभूषाकार मुलं तू तयार करायची!’’ आज फी न घेता मी हजारो रंगभूषाकार तयार केलेत. मी नेहमी म्हणतो, ‘सरस्वतीने माझ्याकडून फी घेतली नाही तर मी तुमच्याकडून फी का घेऊ? शल्य एकच आहे. व्यवहाराच्या बाजारातली भ्रष्ट प्रवृत्ती ही सुंदर कला षंढासारखी वापरतात. बदललेल्या माहोलमधली उगवती पिढी – तिला मी रोजगार निर्माण करून देऊ शकतो. पण माझ्या गुरूंचे संस्कार त्यांच्यात कसे रुजवू?
त्यासाठी श्रद्धेचं अधिष्ठान हवं. बाबासाहेब पुरंदरे, लतादिदींचं संगीत आणि शिवाजी महाराज ही माझी श्रद्धास्थानं आहेत. ‘जाणता राजा’ मला तोंडपाठ आहे. आयुष्याच्या वळणावर कोणताही अवघड प्रसंग येवो शिवाजी महाराजांच्या चरित्रातलं एखादं पान वाचावं.. आयुष्य जगायची उमेद मिळते. हिंमत येते. कधी तरी शिवाजी महाराजांवरील चित्रपट काढण्याचं स्वप्न मी पूर्ण करेन आणि ज्या समाजाने मला भरभरून यश दिलं, प्रेम दिलं..त्या प्रेमातून उतराई होईन!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा