‘‘वयोमानानुसार लोकांचे सांधे काम करेनासे होतात. त्यामुळे येणारं परावलंबित्व अस्वस्थ करणारं असतं. त्यावर शस्त्रक्रिया करता येते; परंतु ती महागडी असते. मग मी पूर्णपणे एतद्देशीय सांधे विकसित करण्यासाठी संशोधन करण्याचं ठरवलं. अथक परिश्रमानंतर २००५ मध्ये ‘इंडस नी’चं संशोधन पूर्ण झालं. मी तर डॉक्टर आहे, सांधे बसवणं हे माझं काम, ते तयार करणं माझं काम नाही असं म्हणून गप्प राहिलो नाही. ‘इंडस नी’सोबतच ‘इंडस हिप’देखील आम्ही विकसित केला. ‘इंडस नी’चा फायदा आज देशभरातल्या हजारो रुग्णांना झाला, होतोय. माझ्या कामाची सरकारनेही दखल घेतली. १९९१ मध्ये ‘पद्मश्री’, २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि अलीकडेच २०१२ मध्ये ‘पद्मविभूषण’ या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सरकारने माझा सन्मान केला. माझ्या आयुष्यात अनेक टर्निग पॉइंट्स आले आणि त्यांनी माझ्या आयुष्याला दिशा दिली. याचं समाधान कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठं आहे.’’

अपार कष्ट, जोखीम पत्करण्याची तयारी, ओळखीचा उपयोग योग्य रीतीने करून घेण्याचं चातुर्य आणि अखंड धडपड ही स्वभाववैशिष्टय़ केवळ व्यापार करण्यासाठी उपयुक्त असतात असं कुठे आहे? या वैशिष्टय़ांना आपुलकी, करुणा आणि दुसऱ्यांना मदत करण्याच्या तळमळीचं अस्तर लाभलं, एक सामाजिक दृष्टिकोन मिळाला तर  वैद्यकीय पेशालाही वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवता येतं. माझी अर्धशतकाहूनही मोठी वैद्यकीय कारकीर्द हेच सांगते.

१९६५ मध्ये एमएस पूर्ण व्हायला तीन महिने शिल्लक असताना आणि त्याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे खिशात पुरते १०० रुपयेही नसताना मी स्वत: पुढे होऊन, ओळख काढून पुण्यात कॅम्पातलं

डॉ. मोटवानींचं हॉस्पिटल चालवायला मागण्याचं धाडस केलं. आज उभ्या असलेल्या संचेती हॉस्पिटल आणि कॉलेजच्या साम्राज्याची मुहूर्तमेढ झाली ती तिथूनच. त्यावेळी मी ससून हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक विभागात असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत होतो. मात्र, डोळ्यात स्वप्न होतं ते स्वत:च्या हॉस्पिटलचं. जहांगीर किंवा रुबी हॉलसारखं आपलंही हॉस्पिटल असावं असं मला मनापासून वाटत होतं. त्यातूनच मी ही जोखीम पत्करली. हा माझ्या आयुष्यातला एक मोठा टर्निग पॉइंट.

अर्थात त्यापूर्वीही काही मजेशीर योगायोग माझ्या आयुष्यात टर्निग पॉइंट ठरले. दहावीत असताना मला टायफॉइड झाला होता. आम्ही राहत होतो पुण्यातल्या नारायण पेठेत. २१ दिवसांच्या या तापात डॉ. सोमण मला तपासायला यायचे. त्यांनी ज्या आपुलकीने, प्रेमाने (आणि आमची बेताची आर्थिक परिस्थिती बघून फीची अपेक्षा न ठेवता) माझ्यावर उपचार केले, त्यातूनच ‘आपणही डॉक्टर व्हावं’ असं बीज मनात कुठेतरी रुजलं. टायफॉइड झाला नसता, तर कदाचित वैद्यकीय पेशाचा विचार डोक्यातही आला नसता. अर्थात मॅट्रिकला मार्क्‍स मिळाले अवघे ४६ टक्के. तरीही फर्गसन कॉलेजला सायन्सला प्रवेश घेतला. तिथे मला दोन मित्र मिळाले- अशोक लक्ष्मण कुकडे आणि विजय रघुनाथ कर्णिक. दोघांचेही वडील डॉक्टर. या दोघांचीही बुद्धिमत्ता माझ्यापेक्षा जास्त होती; पण माझी कष्ट करण्याची क्षमता जास्त होती. या दोघांच्या साथीने अभ्यास करून इंटर सायन्सला डिस्टिंग्शन मिळवलं आणि आम्ही तिघंही बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झालो. हे दोन मित्र नसते, तर डॉक्टर होण्याच्या इच्छेच्या त्या बीजाला अंकुर फुटलाही नसता कदाचित.

कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षांला असताना सगळ्या शाखांच्या टम्र्स दीड-दीड महिना कराव्या लागायच्या. ऑर्थोपेडिकची टर्म करताना ओपीडीत रुग्ण म्हणून एक बाई आल्या होत्या. त्यांचा जबडा तीन आठवडय़ांपासून बंदच होत नव्हता. भूल देऊन तो बंद करावा लागेल, असं सगळे म्हणत असताना मी थोडा आगाऊपणा करून तो हाताने बंद केला. माझ्या हातात कौशल्य आहे हे तेव्हा लक्षात आलं. पुढे ऑर्थोपेडिककडे जायचं असा निश्चय त्यावेळी कुठेतरी झाला. मात्र, अभ्यासेतर गोष्टींकडे जास्त लक्ष दिल्याचा परिणाम म्हणून एमबीबीएसला मार्क्‍स यथातथाच मिळाले. नापास झालो नाही एवढं खरं, पण पोस्ट ग्रॅज्युएशनला अ‍ॅडमिशन काही मिळाली नाही. मग मी पुण्यात डॉ. कोयाजी यांच्याकडे नोकरीला लागलो. माझी रुग्णांशी वागणूक, तळमळीने काम करणं त्यांना आवडून गेलं. मला ऑर्थोपेडिकमध्ये एमएस करण्याची इच्छा आहे हे कळल्यानंतर त्यांनी मला मुंबईतल्या त्यांच्या एका मित्राकडे- डॉ. कूपर यांच्याकडे पाठवलं. केईएम हॉस्पिटलच्या डीनकडे एमएससाठी विचारणा केली. त्यांच्याकडे अ‍ॅडमिशन शक्य नव्हती पण केईएम हॉस्पिटलचं एक कॉन्व्हल्सण्ट होम होतं. मुंबई महापालिकेच्या सगळ्या हॉस्पिटल्समधून प्लास्टर करून घेतलेले रुग्ण या कॉन्व्हल्सण्ट होममध्ये राहत होते. इथे मला रजिस्टार म्हणून कामावर घेण्याची तयारी त्यांनी दाखवली. खरं तर इथल्या कामात कोणतंच आव्हान नव्हतं. उपचार अगोदरच करून घेतलेले रुग्ण इथे राहायचे. त्यांच्या दैनंदिन तक्रारी बघायच्या, कोणाची प्लास्टर्स घट्ट झाली असतील तर सैल करून द्यायची, ब्लड प्रेशर तपासायचं इतकी बारीकसारीक कामं होती. त्यामुळे कोणी ही पोस्ट घ्यायला तयार नसायचं, पण मी मात्र पगार आणि मुंबईत राहण्याची संधी बघून ‘हो’ म्हणालो. (त्यापैकी मुंबईत राहण्याचा फायदा मला आजही होतोय. मुंबईत राहिल्याने सतत काम करण्याची सवय मला लागली. आज वयाच्या ऐंशीव्या वर्षीही मी सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत सलग काम करूशकतो. दुपारी काम बंद ठेवण्याची सवय मला नाही.)

१५ फेब्रुवारी १९६३ रोजी मला नियुक्तीचं पत्र मिळालं आणि एक मार्चपासून मी काम सुरूकरणार होतो. तेवढय़ात योगायोगाने काही चक्र  फिरली. मुंबईत दंगलींसारख्या कारणांमुळे जखमींची संख्या वाढल्याने या कॉन्व्हल्सण्ट होमचं रूपांतर ऑर्थोपेडिक सेंटरमध्ये करण्याचा निर्णय मुंबईच्या महापालिका आयुक्तांनी १६-१७ फेब्रुवारी दरम्यान जाहीर केला आणि मी कॉन्व्हल्सण्ट होमऐवजी या ऑर्थोपिडिक सेंटरचा रजिस्टार झालो. डॉ. तळवलकरांसारखे नामांकित ऑर्थोपेडिक सर्जन या सेंटरचे प्रमुख म्हणून आले. त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी ध्यानीमनी नसताना चालून आली. योगायोग. दुसरं काय? अर्थात नशिबाने दिलेल्या या संधीचा फायदा करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर होती. सुरुवातीला माझं एकंदर ज्ञान बघून डॉ. तळवलकरांच्या तळपायाची आग मस्तकाला जात होती. अगदी ‘तुला खिडकीतून बाहेर फेकून देईन’ इथपर्यंत मला ऐकून घ्यावं लागलं. मात्र, रुग्णांच्या नोट्स ठेवणं वगैरे कष्टाची कामं मी ज्या नेटाने आणि जिद्दीने करत होतो ते बघून त्यांचा दृष्टिकोन हळूहळू बदलला. अपार कष्टाचा वारसा मला माझ्या आईकडून मिळाला होता. त्या जोरावर मी माझ्या अ‍ॅकॅडमिक उणिवा भरून काढू लागलो. (नंतरच्या काळात मी अनेक पदव्या संपादन केल्या. एफआरसीएससारखी वैद्यकीय क्षेत्रातली पदवी मिळवली. ऑर्थोपेडिकमध्ये डॉक्टरेट मिळवली. तरीही माझा पिंड अ‍ॅकॅडमिक नाही, असं मला वाटतं. माझ्या अ‍ॅकॅडमिक यशातली उणीव खऱ्या अर्थाने भरून काढली ती माझा मुलगा डॉ. परागने. सध्या तो संचेती हॉस्पिटलची जबाबदारी उत्तम सांभाळतो आणि दर दोन महिन्यांनी कोणत्या तरी आंतरराष्ट्रीय परिषदेत पेपर वाचतो.) त्यात मी प्लास्टर उत्तम करू शकतो, हे कौशल्य डॉ. तळवलकरांच्या लक्षात आलं. मग त्यांनी मला खूप शिकवलं. त्यांच्याच मदतीने मी पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये एमएसच्या टम्र्स भरल्या आणि असिस्टंट प्रोफेसर या पूर्ण वेळ पदावर रुजू झालो. मध्यंतरीच्या काळात मोटवानी हॉस्पिटल यशस्वीरित्या चालवू लागलो. अर्थात ससूनमध्ये पूर्णवेळ पदावर असल्याने मी स्वत:च्या नावावर हॉस्पिटल घेऊ  शकत नव्हतो. त्यावेळी डॉ. तळवलकरांनी पुण्यात स्वत:च्या नावावर हॉस्पिटल घेऊन मला चालवायला दिलं. मी म्हणजे त्यांचा दुसरा मुलगा असं ते म्हणायचे. नंतर मी ससूनमधली पोस्ट मानद करून घेतली आणि खऱ्या अर्थाने स्वत:च्या नावाने हॉस्पिटल चालवू लागलो.

१९७२ मध्ये मी देशातलं पहिलं ऑर्थोपेडिक डेडिकेटेड स्पेशालिटी हॉस्पिटल सुरूकेलं हे तर सर्वाना माहीत आहे. मात्र, यामागेही एक योगायोग टर्निग पॉइंट ठरला आहेच. शिवाजी नगरमधल्या सध्याच्या जागेत मी अगोदर छोटं हॉस्पिटल सुरूकेलं होतं. त्याला लागून एक मोठ्ठी झोपडपट्टी होती. त्यामुळे हॉस्पिटल वाढवायला फारसा वाव नव्हता. त्यात झोपडपट्टीतल्या लोकांचे प्रातर्विधी उघडय़ावर होत असल्याने रुग्णांना प्रादुर्भाव होण्याचा मोठा धोका होता. या चिंतेत मी असताना अचानक ही झोपडपट्टी रातोरात येरवडय़ाला हलवण्यात आली. शिवाजीनगर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या गाडय़ा या झोपडपट्टीलगतच्या भागात स्लो व्हायच्या आणि त्या दरम्यान चोरीचा माल या झोपडपट्टीत टाकला जायचा असं काहीतरी कारण यामागे होतं. पण त्यामुळे ही जागा मोकळी झाली. ती जागा कृषी महाविद्यालयाची होती. नंतर ती महसूल खात्याने संपादित केली. ती मिळवण्यासाठी मी केलेल्या प्रयत्नांना यश आलं आणि हॉस्पिटलचा विस्तार करता आला. आज संचेती हॉस्पिटल आशियातलं तिसऱ्या क्रमांकाचं ऑर्थोपेडिक हॉस्पिटल्स म्हणून ओळखलं जातं.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे १९७४ मध्ये मी संचेती हॉस्पिटलला अध्यापन केंद्र अर्थात कॉलेज म्हणून मान्यता मिळवली. डॉ. तळवलकर माझे गुरूआहेत. एकदा मी गुरुदक्षिणा म्हणून गणपतीची मूर्ती घेऊन त्यांना भेटायला गेलो होतो. ते म्हणाले की, ‘ती मूर्ती मला नको. त्याऐवजी तू मला एक वचन दे. तू सातत्याने नवनवीन गोष्टी शिकत राहशील आणि स्वत: शिकून न थांबता त्या इतरांना शिकवत राहशील.’ मी अर्थातच त्यांना ते वचन दिलं. संचेती हॉस्पिटलमध्ये अध्यापन केंद्र सुरू करणं हा वचनपूर्तीचाच एक भाग होता. त्यावेळी मी बरीच खटपट करून आणखी एक महत्त्वाचं काम करून घेतलं. ते म्हणजे संचेती हॉस्पिटलमधल्या टीचिंग फॅसिलिटीला बी.जे. हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक विभागाचा विस्तारित भाग म्हणून मान्यता मिळवून घेण्याचं. सरकारी हॉस्पिटलने एखाद्या खासगी हॉस्पिटलच्या अध्यापन केंद्राला स्वत:शी जोडून घेण्याचं हे भारतातलं पहिलंच उदाहरण. याला एमसीआयनेही मान्यता दिली. पुणे विद्यापीठाने ना हरकत प्रमाणपत्र दिलं. अशा कामांसाठी सरकार दरबारी, संबंधित कार्यालयांमध्ये खेटे घालण्यात मी कधीही कंटाळा केला नाही. या माझ्या धडपडय़ा स्वभावाची मला कायम मदत होत आली आहे. डॉ. तळवलकरांना दिलेलं वचन मी आजही पाळतोय. शल्यकर्मातली नवनवीन तंत्रं आत्मसात करतो आणि ती इतरांना त्याच उत्साहाने शिकवतो.

कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, माझा पिंड दुसऱ्यांना मदत करण्याचा आहे. सामाजिक कामांची मला मनापासून आवड आहे. हा वारसा मला वडिलांकडून मिळाला. माझे वडील खरं तर किराणा व्यापारी. पुढे दहा बाय दहाच्या जागेत दुकान आणि मागे तेवढय़ाच जागेत घर अशी आमची परिस्थिती होती, पण दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती त्यातही जागी होती. मी १४-१५ वर्षांचा असताना एकदा त्यांच्यासोबत शिरुरला जात होतो. बस वाटेत थांबली होती आणि एक हमाल वरच्या कप्प्यातून बॅग काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याला ते जमत नव्हतं. वडील मला म्हणाले की, ‘‘त्याला मदत कर.’’ माझं वय अल्लड होतं. मी म्हणालो, ‘‘कशाला? ती कुठे आपली बॅग आहे?’’ त्यावर वडील म्हणाले की, ‘‘बॅग आपली नसली, तरी ती काढताना त्याला त्रास होतोय हे आपल्याला दिसतंय ना? मग मदतीला गेलंच पाहिजे.’’ हे माझ्या मनावर कोरलं गेलं. कॉलेजमध्येही मी सतत दुसऱ्यांच्या मदतीला हजर असायचो. त्यामुळे अ‍ॅकॅडमिक यश जरा कमी मिळालं पण पुढे वैद्यकीय पेशात असताना सामाजिक कामाचा एक दृष्टिकोन सतत जिवंत ठेवता आला. लहान मुलांतल्या पोलिओवर उपचार करण्यासाठी ठिकठिकाणी घेतलेली शिबिरं हा त्याचाच भाग.

बालकाचं बाल्य हिरावून घेणारा आणि पुढच्या सगळ्या आयुष्यावर परावलंबनाची तलवार टांगणारा पोलिओ. या पोलिओवर उपचार करण्यासाठी मी शेकडो शिबिरं घेतली. स्वत: कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेलो असल्याने मला कनिष्ठ आर्थिक स्तराची दु:ख अधिक जाणवत होती. पोलिओचे रुग्णही बहुसंख्येने कनिष्ठ आर्थिक स्तरातून आलेले. त्यामुळे त्यांच्यावर मोफत उपचारांची गरज अधिक होती. या भावनेतून मी पोलिओवरच्या उपचारांसाठी ही शिबिरं घेतली. याचा फायदा हजारो मुलांना झाला. या कामाची सरकारनेही दखल घेतली. १९९१ मध्ये ‘पद्मश्री’, २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि अलीकडेच २०१२ मध्ये ‘पद्मविभूषण’ या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सरकारने माझा सन्मान केला.

सरकारने राबवलेले लसीकरणाचे कार्यक्रम आणि एकंदर जनजागृतीमुळे पोलिओच्या रुग्णांमध्ये गेल्या काही वर्षांत लक्षणीयरित्या घट झाली. त्यानंतर मी लक्ष केंद्रित केलं ते ज्येष्ठ नागरिकांवर. ‘पिडिअ‍ॅट्रिक टू जेरिअ‍ॅट्रिक’ असं मी या प्रवासाला म्हणतो. वयोमानानुसार लोकांचे सांधे काम करेनासे होतात. त्यामुळे येणारं परावलंबित्व अस्वस्थ करणारं असतं. अशा रुग्णांना सांधेबदलाच्या शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला आम्ही डॉक्टर्स देतो. अर्थात या शस्त्रक्रियेचा खर्च पूर्वी फार होता. मुळात हे सांधे परदेशातून आयात करावे लागत होते. त्यामुळे शस्त्रक्रियेचा खर्च सांगितला की, रुग्ण चेहरा पाडून निघून जायचे. डॉक्टर म्हणून हे कुठेतरी आपलं अपयश आहे, अशी टोचणी सतत लागून राहायची. काही रुग्णांच्या बाबतीत प्रायोजक मिळवून शस्त्रक्रिया करून देत होतो. त्याला अर्थातच मर्यादा होत्या. त्यात परदेशातून आयात केलेले सांधे भारतीयांच्या जीवनपद्धतीला अनुसरून कुठे होते? भारतीय माणसाला खाली मांडी घालून बसण्याची सवय असते. परदेशात तयार झालेल्या गुडघ्याच्या सांध्यांचं प्रत्यारोपण केलं, तरी तो गुडघा मांडी घालू शकत नव्हताच. यातूनच मी पूर्णपणे एतद्देशीय सांधे विकसित करण्यासाठी संशोधन करण्याचं ठरवलं. २००० मध्ये मी हे संशोधन सुरू केलं. अथक परिश्रमानंतर २००५ मध्ये ‘इंडस नी’चं संशोधन पूर्ण झालं. मग वेळ आली ती हे कृत्रिम सांधे निर्माण करण्याची. पुण्यातल्या अनेक ऑटोमोबाइल कंपन्यांशी संपर्क साधला, पण त्यांनी किमान हजार सांधे तयार करण्याची ऑर्डर असेल तरच काम करूअशी अट घातली. प्रायोगिक तत्त्वावर काम सुरूअसताना हे कसं परवडणार? अर्थात हार मानण्याचा माझा स्वभाव कधीच नव्हता. मी सांधे तयार करण्यासाठी लागणारी उपकरणं, यंत्रं विकत घेतली आणि चक्क संचेती हॉस्पिटलच्या तळघरात कृत्रिम सांध्यांची निर्मिती सुरू केली. त्यासाठी मी स्वत: इंजिनीअिरगची भाषा शिकलो, जगभरातल्या कृत्रिम सांधेनिर्मिती कारखान्यांना भेटी दिल्या, ते तंत्रं खोलात जाऊन जाणून घेतलं. मी तर डॉक्टर आहे, सांधे बसवणं हे माझं काम, ते तयार करणं माझं काम नाही असं म्हणून गप्प राहिलो नाही. ‘इंडस नी’सोबतच ‘इंडस हिप’देखील आम्ही विकसित केला.

‘इंडस नी’चा फायदा आज देशभरातल्या हजारो रुग्णांना झाला आहे, होतोय आणि यापुढेही होत राहणार आहे. परदेशातून आयात केलेल्या सांध्याची किंमत ९० हजार रुपये होती. आम्ही तयार केलेल्या सांध्याची किंमत केवळ ३० हजार रुपये आहे. त्यामुळे गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा खर्च निम्म्याहून कमी झाला. ही शस्त्रक्रिया अनेकांच्या आवाक्यात आली. त्यात प्रायोजकांच्या मदतीने आम्ही अधिकाधिक रुग्णांना मदत करतो आहोतच. आम्ही तयार केलेल्या गुडघ्याची लवचिकता जास्त असल्याने पूर्वी चालणं कठीण झालेले रुग्ण शस्त्रक्रियेनंतर चक्क मांडी घालून बसू शकतात. ज्येष्ठ नागरिकांचा आत्मविश्वास टिकून राहण्यासाठी स्वयंपूर्णता किती महत्त्वाची आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. यात एक डॉक्टर म्हणून मला मिळणारं समाधान खूप मोठं आहे. माझ्या आयुष्यात जसे अनेक टर्निग पॉइंट्स आले आणि त्यांनी माझ्या आयुष्याला दिशा दिली, तसा टर्निग पॉइंट या ‘इंडस नी’मुळे हजारो रुग्णांच्या आयुष्यात मला आणता आला याचं समाधान कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठं आहे.

मला भेटणारे अनेक लोक म्हणतात की, आमच्यात गुण होते, पण संधी मिळाली नाही. तेव्हा मला प्रकर्षांने वाटतं की, संधी कधीच ढळढळीत समोर दिसत नाही. अवघड परिस्थितीत तर अनेक संधी लपलेल्या असतात. त्या शोधाव्या लागतात, ओळखाव्या लागतात. त्यांचा उपयोग करून घेण्यासाठी जोखीम पत्करण्याची तयारी ठेवावी लागते, अविरत कष्ट करावे लागतात, अखंड धडपड करावी लागते. मग त्या संधी आयुष्यातले टर्निग पॉइंट्स होतात आणि आपलं आयुष्य एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात.

डॉ. कांतिलाल संचेती

सायली परांजपे

sayalee.paranape@gmail.com

 

Story img Loader