१९६२ मध्ये लिहिल्या गेलेल्या ‘आज काय नाटक होवचा नाय’ या एकांकिकेचं ‘वस्त्रहरण’ म्हणून नामांतर होतं काय, आणि आपटत-धोपटत गेली ५४ वर्षे हे नाटक जनमानसात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करतं काय.. हा नाटय़सृष्टीत घडलेला एक चमत्कारच आहे. ५००० च्या वर प्रयोग झालेल्या या नाटकाला सुरुवातीला कोणी हात लावायला तयार नव्हता.. आपटत-धोपटत म्हणजे नेमकं काय घडलं, या देशविदेशात गाजलेल्या आणि अस्सल मालवणी भाषेतल्या नाटकाच्या बाबतीत- तो अनुभव नाटककाराच्याच लेखणीतून..
एकोणीसशे बासष्ट साल. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधील ते माझं पहिलं वर्ष. ख्यातनाम दिग्दर्शक दामू केंकरे आमचे वर्गशिक्षक. महाविद्यालयीन क्षेत्रात जे. जे.चा नाटकाच्या बाबतीत प्रचंड दबदबा. कारण केंकरे सरांनी दिग्दर्शित केलेली एकांकिका हमखास नंबरात यायचीच. नाटक तर माझ्या रोमारोमांत भिनलेलं होतं; परंतु जे. जे.तील त्यावेळचा कळीदार, देखणा विद्यार्थीवर्ग पाहिल्यावर नट म्हणून आपली अजिबात वर्णी लागणार नाही म्हणून एखादी एकांकिका लिहून कुणाच्यातरी वशिल्यानं केंकरेसरांपर्यंत सरकवावी, असा बाळबोध विचार माझ्या मनात आला.
आमच्या गावात जत्रा, हनुमान जयंती, रामनवमी या धार्मिक उत्सवांनिमित्त आमचे गाववाले मेळे किंवा लळित हे नाटय़प्रकार करीत. दशावताराचाच तो एक भाग असायचा. कुठलीही लिखित संहिता हातात नसताना पौराणिक कथानकाच्या आधारे स्वत:च पात्रांची आणि संवादाची रचना करायची आणि उत्स्फूर्तपणे सादरीकरण करायचं. लळितामध्ये तर तीस ते चाळीस पात्रांचा सहभाग असायचा. काही कलावंत तर एकाच वेळी पाच-पाच, सहा-सहा भूमिका साकारायचे. परंतु एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत जाताना पहिल्या भूमिकेचा त्यात अजिबात लवलेशही नसायचा. बरं, भूमिका साकारत असताना प्रेक्षकांना कळणार नाही अशा तऱ्हेने आपसातही संभाषण करायचे. नारद आणि विष्णूचा जर प्रवेश असेल आणि विष्णूच्या भूमिकेतील पात्र जर खणखणीत संवाद बोलला असेल तर मुनिवर्य नारद विचारायचे, ‘‘भाग्या, येवडा चोख पाठांतर कसा काय केलंस बुवा?’’ त्यावर भगवान विष्णूच्या भूमिकेतील भाग्या उत्तर द्यायचा, ‘‘तुका म्हायत नाय काय मेल्या, भूमिका रंगूसाठी बायलेक म्हयनोभर मायेराक पाठवलंय ता?’’ हा खासगीतील संवाद झाल्यावर भगवान विष्णू मूळ भूमिकेत जाऊन मुनिवर्य नारदांना विचारायचे, ‘‘मुनिवर्य, आपण पृथ्वीतलावरून फेरफटका मारून आलात तर मानवजातीची परिस्थिती कशी काय आहे..?’’
नारद : नारायण.. नारायण. देवा, मानवाने इतकी प्रचंड प्रगती केलीय, की कुठल्याही क्षणी तो आपल्या स्वर्गावर आक्रमण करणार.. नारायण.. नारायण.. (याचवेळी नारदाला ढेकर येतो. मग विष्णू खासगीत विचारतो.) विष्णू- मेल्या जेव्नबिव्न इलंस की काय?
नारद- व्हय तर. पिठी-भात आणि खारो बांगडो खाऊन इल्लंय!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही नटांची नटगिरी आणि टवाळकी आम्ही पोरं रंगमंचावरील मेकअप्च्या आडोशासाठी बांधलेल्या किंतानाच्या भोकातून पाहायचो.
आमच्या गाववाल्यांना वास्तववादी नेपथ्य करण्याचा भारी सोस. एखाद्या झाडाचं दृश्य असेल तर रंगवलेलं झाड न दाखवता झाडाचा अख्खा बुंधाच तोडून आणून तो मंचावर उभा करायचे. एकदा तर ‘अयोध्यापती’ या लळिताच्या खेळात आमच्या गाववाल्यांनी राजा दशरथाला झाडावर चढून बसण्यासाठी वडाचा अख्खा बुंधा पारंब्यासकट रंगमंचावर उभा केला होता. राजा दशरथाच्या भूमिकेत गावचा सरपंच होता. त्याचं वजन शंभर किलोच्या आसपास. श्रावणबाळ आई-वडिलांची कावड िवगेत ठेवून पाणी भरण्यासाठी पाणवठय़ापाशी येतो. तांब्या पाण्यात बुडताक्षणीच् ‘बुड-बुड’ आवाज होताच राजा दशरथाने आवाजाच्या दिशेने बाण सोडायचा- असा प्रसंग. श्रावणबाळाने पाण्यात तांब्या बुडवला आणि त्याच क्षणी उजवीकडे राजा दशरथ धनुष्यबाणासकट रंगमंचावर उताणा पडला. श्रावण काळजीच्या सुरात दशरथ राजाकडे धावत जाऊन विचारता झाला, ‘‘दादानू, तुमका खंय लागला तर नाय ना..?’’ रामायणातील प्रसंग नेमका उलटा झाला होता. राजा दशरथाने, ‘‘बाळ, तुला कुठे लागलं तर नाही ना?’’ असं विचारायला हवं होतं. पण इथे ‘‘दादानु, तुमका खंय लागला तर नाय ना?’’ असं श्रावणबाळाने अयोध्यापतींना विचारताच अयोध्यापतींच्या भूमिकेत असलेला गावचा सरपंच राजा दशरथ चेहऱ्यावरील बेअिरग कायम ठेवत म्हणाला, ‘‘खाली पडलय, पण धनुष्यबाण पडूक नाय दिलय. तू पान्यात परत तांबयो बुडव. मी परत बाण सोडतय. ह्य़ो ७७७शिडी धरु ची सोडून इडी फुकीत बसलो.. ’’ ही शिवी सरपंचाने बॅकस्टेजच्या माणसाला हासडली होती. प्रेक्षकांच्या साक्षीने राजा दशरथ शिडीने झाडावर चढल्यावर त्याने श्रावणबाळाला फर्मान सोडलं, ‘‘तू तोंडानं बुडबुड आवाज केल्याशिवाय मी बाण सोडूचय नाय..’’
असे नाटकातील नाटय़मय घडलेले प्रकार आठवून असंच एखादं मालवणी भाषेतच नाटुकलं लिहावं असा विचार आला आणि दोन दिवसांत वीस पानी ‘आज काय नाटक होवचा नाय’ ही एकांकिका लिहिली. त्यावेळी

जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या कॅन्टीनमध्ये (१९६२) पत्र्याचं टेबल होतं. वर्गातील मित्रांना ती एकांकिका वाचून दाखवताना क्षणाक्षणाला हास्यकल्लोळ उडत होता. पत्र्याची टेबलं बडवली जात होती. प्रो. शांताराम पवारांच्या कानावर ही बातमी गेली. त्यांनी तो प्रकार वाचल्यावर म्हणाले, ‘‘अरे, हा तर जगावेगळा प्रकार आहे. धम्माल आहे. दामूला (प्रो. दामू केंकरे) वाचून दाखव.’’ मला धीर आला. केंकरेसरांना वाचून दाखवण्याअगोदर ज्यांनी मला नट म्हणून रंगमंचावर आणलं त्या दिग्दर्शक दीनानाथ लाडांना वाचून दाखवली. त्यांनाही ती एकांकिका आवडली. पण त्यात शिवाजी, तानाजी, बाजीप्रभू देशपांडे या ऐतिहासिक पात्रांचा समावेश असल्यामुळे हा विडंबनप्रकार प्रेक्षक सहन करणार नाहीत, त्याऐवजी दुसरं कुठलं तरी कथानक निवड, अशी सूचना त्यांनी केली.

पृथ्वीची उलथापालथ करणाऱ्या महापराक्रमी पाच पतींच्या डोळ्यांदेखत द्रौपदीचं ‘वस्त्रहरण’ होणं हे पहिल्यापासूनच मला खटकत होतं. मनातल्या मनात महर्षी व्यासांची क्षमा मागून ‘द्रौपदी वस्त्रहरणा’चंच विडंबन करण्याचा माझ्या डोक्यात विचार आला. ऐन द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगाच्या वेळी बायकोच्या भीतीने दु:शासनच मैदान सोडून पळ काढतो. मग आयत्या वेळी प्रश्न उभा राहतो.. आता दु:शासन कोण? अर्जुनाची भूमिका करणारा ‘पार्टी’ दोन पावशेर मारूनच आलेला असतो. दु:शासन पळून गेल्यावर तो तात्या सरपंचाला विचारतो,
अर्जुन : तात्यानू, मी केलय तर?
तात्या : काय ता?
अर्जुन : वस्त्रहरण.
तात्या : कोणाचा?
अर्जुन : या बाईचा.
तात्या : (संतापून) अरे ७७७ द्रौपदीचा ‘वस्त्रहरण’ अर्जुन कसा करतलो?
अर्जुन : मगे काय झाला? माझीच बायको आसा ना ती? एखाद्या विषयाचं विडंबन करताना तो विषय किंवा त्या अनुषंगाने येणारी पात्रं वाचकांना किंवा प्रेक्षकांना परिचित असायला हवीत. कोकण ही आमच्या भोळ्याभाबडय़ा, पण तेवढय़ाच तल्लख डोक्यांची भूमी. अर्जुनच्या रूपाने एक पराकोटीची मुग्धता मला गवसली. प्रो. पवारसरांच्या सूचनेनुसार केंकरेसरांकडे एकांकिका घेऊन गेलो. आपल्या एका विद्यार्थ्यांने एकांकिका लिहिलीय हे पाहून कुतूहलाने सात-आठ पानं त्वरित त्यांनी नजरेखालून घातली. वाचताना ते गालातल्या गालात हसत होते. ‘‘चांगला आहे प्रकार. आपण स्पर्धेत करू,’’ असं म्हणून ते वीस पानी हस्तलिखित त्यांनी टेबलाच्या खणात ठेवलं. चार दिवसांनी त्यांना भेटायला गेलो तर केंकरेसरांच्या टेबलाच्या खणातून ते हस्तलिखित गहाळ झालं होतं. तेव्हा झेरॉक्सची पद्धत उपलब्ध नव्हती. १९६२ ते १९७४ या कालावधीत आठवून आठवून लिहिलेली ‘आज काय नाटक होवचा नाय’ ही एकांकिका तीन वेळा हरवली. शेवटी ‘..होवचा नाय’ हे नकारात्मक नाव बदलून ‘वस्त्रहरण’ या नावाने ६ नोव्हेंबर आणि ८ नोव्हेंबर १९७५ असे लागोपाठ दोन प्रयोग रवींद्र नाटय़मंदिरात केले. निर्माते होते माझे गुजराती मित्र छबील वसाणी आणि स्वत: मी. प्रेक्षक हसत होते, परंतु क्षणाक्षणाला प्रयोग मात्र कोसळत होता. मालवणीसम्राट राजा मयेकर, लोकनाटय़ाचा बादशहा मधू कडू, नैसर्गिक विनोदाची देणगी प्राप्त झालेले मधु आपटे (गोप्या) आणि लावणीसम्राज्ञी संजीवनी बिडकर असा तगडा नटसंच असतानाही प्रयोग कोसळत होता. कारण नाटकातलं नाटक आणि विडंबननाटय़ हा प्रकार प्रेक्षकांना लक्षात येत नव्हता.

मात्र १९७७ मध्ये झालेल्या आंतर-गिरणी नाटय़स्पर्धेत आणि १९७८ मध्ये झालेल्या कामगार कल्याण नाटय़स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रात ‘वस्त्रहरण’ पहिलं आलं. कामगार कल्याण स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीला (ठाणे) परीक्षक होते- नटश्रेष्ठ मामा पेंडसे, कांदबरीकार नयना आचार्य आणि ‘ठाणे वैभव’चे संपादक नरेंद्र बल्लाळ. तर अंतिम फेरीला परीक्षक होते- ज्येष्ठ नाटय़समीक्षक माधव मनोहर, साहित्यिक डॉ. स. गं. मालशे आणि कवयित्री शांताबाई शेळके. स्पर्धेचा दर्जा लक्षात यावा म्हणून परीक्षकांचा मुद्दाम उल्लेख केलाय.

‘वस्त्रहरण’ नाटकावर मच्छीचा (मच्छिंद्र कांबळी) पहिल्यापासूनच जीव होता. प्रत्यक्ष स्पर्धेत जरी त्याचा सहभाग नसला तरी हे नाटक कुणीतरी व्यावसायिक रंगमंचावर आणावं असं त्याला मनापासून वाटत होतं. पण प्रत्येक ठिकाणी ‘कसला ता मालवणी रोंबाट?’ अशी कुत्सित भाषा आमच्या कानावर पडत होती. दरम्यानच्या काळात ‘ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट’ टीव्ही असताना विनायक चासकरांनी राजा मयेकर आणि स्पर्धेतील कलावंतांना एकत्रित आणून दूरदर्शनवर ‘वस्त्रहरण’चं दर्शन घडवलं. महाराष्ट्राचं लाडकं दैवत पु. ल. देशपांडे आणि चित्रपती व्ही. शांताराम यांच्या पाहण्यात ‘वस्त्रहरण’ आल्यामुळे पुन्हा प्रक्षेपण करण्यास त्यांनी दूरदर्शनला विनंती केली आणि त्यांनी ती मान्यही केली. एवढंही करून ‘वस्त्रहरण’ला हात लावण्यास कुणा निर्मात्याची हिंमत होत नव्हती. मच्छिंद्रची तार सटकली. स्पर्धेतील बहुतेक कलावंतांना त्याने गोळा केलं. तात्या सरपंचाची वस्त्रं स्वत:च्या अंगावर चढवली आणि ‘वस्त्रहरण’चं जहाज घेऊन हा सिंदबाद कोकणच्या सफरीवर निघाला. परंतु कोकणातल्या प्रेक्षकांनी ‘वस्त्रहरण’च्या माध्यमातून मच्छिंद्र कांबळी आमच्या दशावताराची टिंगल टवाळी करतोय!’ असा गैरसमज करून घेऊन या सिंदबादला आल्या पावली परत पाठवलं.

मात्र, प्रबळ इच्छा, जोडीला अथक प्रयत्न आणि वर नशिबाचीही साथ मिळाली तर अशक्य गोष्टही साध्य करता येते. ‘ती फुलराणी’त फुलराणीच्या (सुरुवातीच्या काळात) बापाची- म्हणजे दगडोबाची भूमिका करणारे राजा नाईक आणि मधू कडू हे दोघेही कोहिनूर मिलचे कामगार आणि रंगकर्मी. ‘वस्त्रहरण’वर त्यांचा प्रचंड जीव होता. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे त्यावेळचे सेक्रेटरी मनोहर नरे (तेही कोकणातले!) यांनाही स्पर्धेतील ‘वस्त्रहरण’ आवडलं होतं. परंतु नाटय़क्षेत्राशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. परंतु राजा नाईक आणि मधू कडू या दोघांनी नरेंना ‘वस्त्रहरण’ रंगमंचावर आणण्यासाठी पटवलं. मला नरेंसमोर उभं केलं. नरेंनी मला अट घातली. ते म्हणाले, ‘‘गिरणीतील कलाकारांवर माझा प्रचंड जीव आहे. त्यातील जे हुशार आहेत त्या सर्वाना संधी द्यायची आहे.’’ माझ्यापुढे हे मोठंच धर्मसंकट होतं. स्पर्धेच्या कलावंतांना घेऊनच ‘वस्त्रहरण’ केलं तरच त्याला यश मिळू शकेल, हे पटवण्यात एक महिना गेला. शेवटी त्यांनी नाटकाच्या तालमी पाहण्याचा आग्रह धरला. ‘वस्त्रहरण’साठी मच्छिंद्र कुठलीही अग्निपरीक्षा द्यायला तयार होता. नरेंनी तालीम पाहिली. त्यांच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव दिसत नव्हते. तालीम संपल्यावर त्यांनी टॅक्सी मागवली. टॅक्सीत त्यांचे सहकारी राजाभाऊ मुसळे बसले. नो संभाषण. मला वाटलं, बहुतेक फाशी! टॅक्सी एका पॉश बारसमोर थांबली. थोडासा गळा ओला झाल्यावर नरेंनी शांत चेहऱ्याने खिशात हात घातला. काही नोटा मुसळेंच्या हातात दिल्या. त्या मुसळेंनी माझ्यासमोर धरल्या. म्हणाले, ‘‘नीट मोजून घ्या!’’ पन्नास रुपयांच्या बारा नोटा- म्हणजे सहाशे रुपये होते. मी विचारलं, ‘‘कसले पैसे?’’ ‘‘तुमच्या बारा प्रयोगांची ही अ‍ॅडव्हान्स बिदागी. नाटक चालल्यास प्रत्येक शंभर प्रयोगांनंतर वाढविण्यात येईल.’’ पन्नास तर पन्नास! मी ते स्वीकारले. कारण अनेक निर्मात्यांच्या पायऱ्या झिजवूनही अपमानच पदरी पडला होता. आणि एक नवा निर्माता नाटक करायला शेवटी तयार झाला होता.

दोनच दिवसात ‘ओमनाटय़ गंधा’ आणि ‘वस्त्रहरण’ नाटकाचा नारळ राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या रंगमंचावर फोडण्यात आला. मच्छिंद्रच्या अंगात तात्या सरपंच संचारला होता. त्याला गोप्याची भूमिका करणारा दिलीप कांबळी जीव तोडून साथ देत होता. दिग्दर्शक रमेश रणदिवेंचा मास्तर म्हणजे सहजसुंदर अभिनयाचं मनोहारी दर्शन. ‘वस्त्रहरणा’तील प्रमुख पात्रं ही माझ्याच गावातली. मी स्वत: अनुभवलेली. तालीम पाहताना वाटायचं, ही माझ्या गावची माणसं माझ्या कलावंतांना कधी भेटली? इतकी जिवंत! शनिवार, १६ फेब्रुवारी १९८० रोजी दुपारी साडेचार वाजता शिवाजी मंदिरात शुभारंभाचा प्रयोग करायचं ठरलं. जाहिरातही सोडली. मामा पेडणेकर व्यवस्थापक होते. नाटक दोन दिवसांवर आल्यावर मामांच्या लक्षात आलं की, ८४ वर्षांनी येणारं सूर्यग्रहण १६ फेब्रुवारीलाच ठीक ४ वाजता येतंय. शनिवार, अमावस्या, राहू-केतू सूर्याचा ग्रास घेणार.. सर्वच अशुभ ग्रहांची युती होणार होती. अशावेळी नाटकाचा शुभारंभ करणे इष्ट नाही, असा मामांनी प्रस्ताव मांडला. एकतर १९७५ मध्ये दोनच प्रयोगात नाटक पडलं होतं. पेडणेकर कुठलीही रिस्क घ्यायला तयार नव्हते.
१६ तारखेऐवजी १५ तारखेला शुभारंभाचा प्रयोग आटपून घ्यायचा, असा त्यांनी नरेंना सल्ला दिला. नरेंनी त्वरित होकार दिला. १५ तारखेची घोषणा होताच मच्छिंद्रचा चेहरा पडला. मच्छिंद्र माझ्या कानात कुजबुजला, ‘१५ तारखेक प्रयोग कसो होतलो? माझो ‘महासागर’ नाटकाचो प्रयोग पुण्यात आसा.’ १५ तारखेला कुठल्याही परिस्थितीत शुभारंभाचा प्रयोग करायचाच, यावर मामा ठाम होते. मामांनी मच्छिंद्रला ‘महासागर’ नाटकात एकतर तुझी रिप्लेसमेंट तरी दे, किंवा नाटक तरी सोड.. असा सल्ला दिला. मच्छिंद्र नाटक सोडण्यास तयार नव्हता. मग आता तात्या सरपंच कोण? मनोहर नरे, राजाभाऊ मुसळे, मामा पेडणेकर आणि ‘वस्त्रहरणा’तील कौरव- पांडवांनी मला घेराव घातला. सर्वाचा एकच सूर होता- ‘गवाणकरानु, कायव करा, पण तात्या सरपंचाच्या भूमिकेत तुमीच उभे ऱ्हवा.’ एवढेच बोलून ते थांबले नाहीत, तर डायरेक्ट त्या सर्वानी मला तालमीतच टाकलं.

१५ तारखेला रात्री साडेआठ वाजता ‘वस्त्रहरण’ नाटकाच्या शुभारंभाची तिसरी घंटा शिवाजी नाटय़मंदिरात घणघणली आणि मी क्षणभर कोमातच गेलो. डोळ्यासमोर काजवे चमकणं, पोटात गोळा येणं, बोबडी वळणं म्हणजे काय, याचा अनुभव एकाच वेळी मला आला. नाटकाच्या तालमींना मी रोज जात होतो. त्यामुळे नकलेवर ताबा होता. तरीही माझ्याच नाटकात भूमिका करणारे कलावंत मला श्रद्धेने प्रॉम्प्टिंग करीत होते. शिवाय नाटकात प्रॉम्प्टरचं पात्र मी निर्माण केलं होतं त्यालाही चेव चढला होता. तशात सतीश दुभाषी डोक्यावर चष्मा ठेवून पहिल्या रांगेत नाटक पाहायला बसले होते. पहिल्या दोन-तीन वाक्यानंतर त्यांनी धो-धो हसायला सुरुवात केल्यावर माझ्या डोळ्यांसमोरील काजवेबिजवे लुप्त पावले होते. मंतरलेल्या रंगमंचाच्या फळ्यांनी माझ्या पावलांना धीर दिला होता. शुभारंभाचा प्रयोग दुभाषींच्या शाबासकीने पार पडला होता.

दुसऱ्या दिवशी- म्हणजे १६ तारखेला सूर्यग्रहणाच्या दिवशी सरपंचाची वस्त्रं मच्छिंद्र कांबळीने परिधान केली. अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर मालवणी भाषेची पताका मच्छिंद्र कांबळीने स्वत:च्या खांद्यावर घेतली. तो आरपार तात्या सरपंचमय झाला होता. याही प्रयोगाला दुभाषी मास्तर हजर होते. मच्छिंद्र दुभाषी मास्तरांचा पिंगेज् क्लासेसमधील विद्यार्थी. माझ्यादेखत गुरुजींनी विद्यार्थ्यांला कडकडून आशीर्वाद दिला होता. परंतु ६० प्रयोग होईपर्यंत संस्था ६० हजारांच्या तोटय़ात होती. मनोहर नरेंनी १९८० च्या ऑगस्ट महिन्यात ‘वस्त्रहरण’ बंद करण्याचा निर्णय घेतला. मामा पेडणेकर म्हणाले, ‘नाटक चांगल्या ठिकाणी प्रयोग करून बंद करू या.’ मामांनी पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरातील तारीख मिळवली. मच्छिंद्रने कपाळावर हात मारला. म्हणाला, ‘शिरा पडांदे त्या कर्मावर. टिळक स्मारक मंदिरातील प्रेक्षकांना हसवचा म्हणजे मोठा धर्मसंकट!’

रात्रीचा प्रयोग होता. दोन घंटा दिल्यानंतर कळलं की, महाराष्ट्राचं लाडकं दैवत पु. ल. देशपांडे, त्यांच्यासोबत वसंतराव देशपांडे, सुनीताबाई अशा सहा दिग्गज व्यक्ती तिकीट काढून बसले होते. हे आणखीन एक मोठं धर्मसंकट होतं. ज्या विनोदसम्राटानं संपूर्ण महाराष्ट्राला बरगडय़ा मोडेपर्यंत हसवलं, त्यांना आपण कसं हसवणार? मच्छिंद्रला म्हणालो, ‘‘बाबू, आज तुझी खरी कसोटी आसा! सगळी ताकद पणाक लाव. आज जिंकलव तर ह्य़ाच आयुष्यभर पुरवून पुरवून जगू.’’ तो म्हणाला, ‘‘तुम्ही कायव काळजी करू नुका. आज आम्ही काय करतव ता बगीतच ऱ्हवा.’’

नाटकातला लीलाधर कांबळी म्हणाला, ‘मी विंगेतून भाईंकडे पाहत होतो. वाक्या-वाक्याला ते उत्स्फूर्त दाद देत होते.’ मी हवेत तरंगत होतो. नाटक संपल्यावर भाई रंगपटात आले आणि मला म्हणाले, ‘‘गवाणकरानु, हसून हसून जा जा दुखूचा ता सगळा दुखल्याला आसा. पण ही मालवणी कोंबडी माका बीन गरम मसाल्याशिवाय खाल्ल्यासारखी वाटली. तेवा फुडच्या टायमाक माका ह्य़ा नाटक मालवणीत बगूचा आसा.’’ एवढंच बोलून ते थांबले नाहीत, तर भाईंनी आम्हाला तीन पौष्टिक अटी घातल्या. त्या अशा- या नाटकाचा महोत्सवी प्रयोग छत्रपती शिवाजी स्मारक मंदिरात करायचा. त्या महोत्सवी प्रयोगाला अध्यक्ष म्हणून मला बोलवायचं. आणि अट क्रमांक तीन- नाटक संपल्यानंतर शिवाजी मंदिरसमोर असलेल्या ‘गोमांतक’ हॉटेलात बांगडय़ाच्या तिकल्याचं जेवण घालायचं. शब्दसृष्टीच्या परमेश्वरानं आमच्यावर आशीर्वादाचा अमृतवर्षांव केला होता. बरोब्बर चार दिवसांनी- म्हणजे १९ ऑगस्ट १९८० ला भाईंनी मला पत्र पाठवलं. ते पत्र म्हणजे माझ्या आयुष्यातील टर्निग पॉइंट होता. आणि मच्छिंद्रच्यासुद्धा! भाईंच्या हस्ताक्षरातील त्या आंतरदेशीय पत्राने आम्हाला आंतरराष्ट्रीय प्रवास आणि कीर्ती मिळवून देण्याचे मार्ग सोपे करून टाकले होते. दोन ओळी तर अशा होत्या- ‘‘खरं सांगू? तुमचं नाटक पाहिल्यावर या नाटकात आपल्याला काम मिळायला हवं होतं असं मला वाटलं.’’ आम्हाला आकाश ठेंगणं वाटलं. भाईंच्या पत्रातील दोन ओळी छापायची मी नरेंना विनंती केली. जे. जे. स्कूल ऑफ आर्टचं डोकं होतं. भाईंच्या पत्रातील पहिल्याच ओळीने शिवाजी मंदिरला ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड लागला. पाहता पाहता दर दिवशी तीन- तेही ‘हाऊसफुल्ल’ प्रयोग व्हायला लागले. आचार्य अत्रेंच्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकानंतर नाटय़सृष्टीत ‘वस्त्रहरण’ची ब्लॅकने तिकिटं जाऊ लागली. सहाशे प्रयोग कधी झाले कळलंच नाही.

सहाशे प्रयोगानंतर मच्छिंद्रने स्वत:ची ‘भद्रकाली प्रॉडक्शन’ ही संस्था सुरू केली. ‘वस्त्रहरण’मधून स्वत: मच्छिंद्र, रमेश रणदिवे आणि संजीवनी जाधव बाहेर पडले. परंतु मनोहर नरेंनी रमेश पवार या अष्टपैलू नटाला घेऊन वर्षभरात नाटकाचे दोनशे प्रयोग केले. मच्छिंद्रने स्वत:ची ‘भद्रकाली प्रॉडक्शन’ ही संस्था सुरू करून मालवणी मुलखावर एक प्रकारचे उपकारच करून ठेवले. कारण ‘वस्त्रहरण’च्या माध्यमातून मालवणी प्रेक्षकांची वाढलेली भूक कुणीतरी शमवणं गरजेचं होतं. त्याने सुंदर तळाशिलकरांचं केलेलं पहिलंवहिलं ‘चाकरमानी’ हे नाटक अस्सल वस्त्रगाळ मालवणी बाजाचं होतं.

दरम्यानच्या काळात ‘वस्त्रहरण’च्या दोनशे प्रयोगांनंतर रमेश पवार आजारी पडला. ‘वस्त्रहरण’ सोडताना मच्छिंद्र आत्मविश्वासानं म्हणाला होता, ‘‘वस्त्रहरण’ कधीतरी माझ्याकडे येतला.’ रमेश पवारनंतर योग्य असा तात्या सरपंच नरेंना मिळत नव्हता. शेवटी नाटक पाडून ठेवण्यापेक्षा ते ‘भद्रकाली प्रॉडक्शन’कडे द्यावं अशी नरेंची समजूत शिवाजी मंदिरचे त्यावेळचे सरचिटणीस अण्णा सावंत, ‘कलावैभव’चे मोहन तोंडवळकर आणि मी स्वत: घातली. नरेंनाही ते पटलं. लेखकाचं नुकसान होता कामा नये, या तत्त्वावर त्यांनी ‘वस्त्रहरण’ला प्रेमाचा निरोप दिला. नरे नेहमी म्हणायचे, ‘वस्त्रहरण’मुळे लालबागहून मी दादरला राहायला आलो.’
‘भद्रकाली प्रॉडक्शन’ची इतर मालवणी नाटकं सुरूअसताना मच्छिंद्र ‘वस्त्रहरण’ पुरवून पुरवून चालवत होता. तो म्हणायचा, ‘वस्त्रहरण’ ही माझी रिझव्‍‌र्ह बँक आहे.’ हजार प्रयोगांच्या आसपास नाटक आल्यावर मच्छिंद्र ‘वस्त्रहरण’ लंडनला नेण्याचं स्वप्न पाहू लागला. ‘आपली मालवणी भाषा शेक्सपिअरच्या गावात जावक्व्हयी..’ हे त्याचं स्वप्न. हजार प्रयोग होईपर्यंत मराठी रंगभूमीवरील अनेक दिग्गज नटांनी ‘वस्त्रहरण’ अनेक वेळा पाहिलं होतं.

त्यात डॉ. काशिनाथ घाणेकरांचा पहिला नंबर होता. शिवाजी नाटय़मंदिर आणि रवींद्र नाटय़मंदिरला जेव्हा जेव्हा ‘वस्त्रहरण’ असायचं, तेव्हा तेव्हा ते स्वत: तिकीट काढून त्याला बसायचे. मनसोक्त हसायचे. ‘वस्त्रहरण’मुळे मी त्यांचा जवळचा मित्र झालो होतो. मनात विचार आला- डॉ. घाणेकरांनी जर पाहुणा कलाकार म्हणून ‘वस्त्रहरणा’त भूमिका केली तर इतरही कलावंत होकार देतील. आणि तसंच झालं. मालवणी कलावंतांना लंडनला जाता यावं म्हणून डॉ. घाणेकर त्वरित ‘हो’ म्हणाले आणि घाणेकर ‘वस्त्रहरणा’त पाहुणे कलाकार म्हणून भूमिका करताहेत म्हटल्यावर मास्टर भगवानदादा (धृतराष्ट्र), नाना पाटेकर (भीम), अशोक सराफ (धर्म), बाळ धुरी (दुयरेधन), मास्टर सचिन (विदुर), विजू खोटे (शकु नीमामा), ज्येष्ठ नाटय़- समीक्षक कमलाकर नाडकर्णी (देव), विजय चव्हाण (द्रौपदीकाकू), स्वत: घाणेकर (दु:शासन) असा नटसंच तयार झाला. तो प्रयोग षण्मुखानंद नाटय़गृहात ठेवला होता. तिकीट खिडकीवर तोबा गर्दी झाली. प्रयोग काही तासांत ओव्हरपॅक झाला. त्या प्रयोगाला मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचं अधर्ंअधिक मंत्रिमंडळ दादांच्या धाकामुळे असेल- तिकीट काढून बसलं होतं. मंगेशकर घराणंही हजर होतं. विशेष नोंद घेण्यासारखी गोष्ट अशी की, आम्हा मालवणी कलावंतांना शुभाशीर्वाद देण्यासाठी लतादीदी भाषण करण्यास तयार झाल्या. त्यांच्या मिश्कील स्वभावानुसार त्या म्हणाल्या, ‘‘आमचे मालवणी कलावंत लंडनला ‘वस्त्रहरण’ करण्यास निघाले आहेत. परंतु लंडनला गेल्यावर त्यांच्यावर ‘वस्त्रहरण’ करण्याची वेळच येणार नाही. कारण तिथले लोक मुळातच तोकडे कपडे घालतात.’’ दीदींच्या या कॉमेंटमुळे हॉल हास्यसागरात बुडून गेला.

सिंगापूर एअरलाइन्सची तिकिटं आम्हाला मिळाली होती. डॉ. घाणेकर म्हणाले होते, ‘‘सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानात देखण्या हवाईसुंदऱ्या असतात आणि त्या हसत हसत रेड वाइन फुकट पाजतात.’’ आणि मच्छिंद्र म्हणाला होता, ‘‘सुटाबुटात इलास नाय तर हवाई सुंदऱ्या तुमका इमानात घेवच्या नाय.’’ त्यामुळे प्रत्येकाने उधार-उसनवारीवर जमेल तसे सूट शिवले होते. मधु मंगेश कर्णिक आमचे मार्गदर्शक म्हणून आमच्यासोबत आले होते. काही कलावंतांनी प्रथमच सूट घातल्यामुळे ते रोबोसारखे चालत होते. आम्ही विमानात स्टाईलमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश महिलावर्गाचा मात्र काळजाचा ठोका चुकला होता. त्यांना वाटलं, हे प्रवासी नसून अतिरेकीच असावेत. कारण आम्ही परिधान केलेले सूट आम्हाला ‘सूट’ होत नव्हते. पहाटे दोनचं विमान होतं. प्रत्येकजण रेड वाइनची वाट पाहत होता. आणि देखण्या हवाईसुंदऱ्यांचा ताफा पाहून रंगकर्मीवर्ग पिसाटला होता. काहीजणांनी सूचनेनुसार कमरेला पट्टे बांधले होते. पण ज्यांना पट्टा बांधायला जमत नव्हतं त्यांना स्वत: हवाईसुंदऱ्या आपल्या नाजूक हाताने पट्टा बांधण्यास मदत करत होत्या. हे जेव्हा आमच्या कलावंतांच्या लक्षात आलं तेव्हा हवाईसुंदऱ्यांची सुंदर नजर चुकवून कमरेचे पट्टे त्यांनी सोडून टाकले आणि त्यांच्या नाजूक हातांनी पुन्हा बांधून घेतले होते. मालवणी माणूस हवाई प्रवासातसुद्धा अभिनय करत होता. सुलोचना मोंडकरबाई (द्रौपदीकाकू) त्यांच्या शारीरिक क्षेत्रफळामुळे विमानातील खुर्चीत एकदम फिट्ट बसल्या होत्या. हवाईसुंदरी त्यांना जेव्हा कमरेला पट्टा बांधायला मदत करू का, असं विचारायला आली तेव्हा त्या हवाईसुंदरीला मोंडकरबाईंनी सुनावलं, ‘‘अगो, या खुर्चीत मी इतक्या गच्च बसल्याला आसय, की तुझा ईमान जरी उल्टापाल्टा झाला तरी मी बाय काय खुर्चीतून पडूचय नाय.’’ १४ ऑक्टोबर रोजी मोंडकरबाईंनी केलेल्या हास्यविनोदावर सातमजली हसत सातासमुद्रापलीकडे लंडनला आम्ही आमच्या मालवणी भाषेतलं नाटक घेऊन पोहोचलो होतो.

लंडनच्या प्रेक्षकांना मालवणी कळणार नाही म्हणून आम्ही मराठीतून ‘वस्त्रहरण’ करण्याचा निर्णय घेतला. पंधरा मिनिटं गेली तरी प्रेक्षकांतून हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. विनोदी नाटकाला जर प्रतिसाद मिळाला नाही तर रंगकर्मीची मोठी पंचाईत होते. आमच्या नटांची तीच हालत झाली. पंधराव्या मिनिटाला एक सद्गृहस्थ उठून उभे राहिले आणि मच्छिंद्र कांबळीला त्यांनी खडा सवाल केला, ‘‘अहो कांबळ्यांनो, तुमका आमी हयसर खेकां बोलवलव? आमका मालवणी भाषेतून ‘वस्त्रहरण’ ऐकुचा आसा.’’ सातासमुद्रापलीकडेही मराठी माणसाने आपल्या मायमातीचा सुगंध जपून ठेवला होता. हेच पडद्यामागचं मोठ नाटय़ आहे.

मच्छिंद्रची आणखी एक अचाट कल्पना होती. पाच हजारावा प्रयोग त्याला मुंबईतील शिवाजी पार्कच्या मैदानावर- तोदेखील पाहुणे कलाकार म्हणून महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या संचात करायचा होता. परंतु त्याने ४८०० प्रयोग झाल्यावर अचानक पृथ्वीतलावरूनच कायमची एक्झिट घेतली. नाटय़सृष्टीला प्रचंड धक्का बसला. ‘भद्रकाली प्रॉडक्शन’चं काय होणार, अशी चर्चा सुरू झाली. मच्छिंद्रच्या हयातीत त्याचा चिरंजीव प्रसाद कांबळी नाटय़गृहावर कधी चुकूनही फिरकायचा नाही. परंतु वडील गेल्यावर प्रसादने ‘भद्रकाली प्रॉडक्शन’ची पालखी स्वत:च्या खांद्यावर घेतली. मच्छिंद्रने स्वबळावर निर्माण केलेल्या मालवणी भाषेच्या सिंहासनाला त्याने सुवर्णाची झळाळी दिली. षण्मुखानंदमध्ये सेलिबेट्री संचात झालेल्या पाच हजाराव्या प्रयोगाची जाहिरात त्याने अशा तऱ्हेने केली की, के. आसिफ यांच्या ‘मुगल-ए-आझम’ या चित्रपटाच्या मुहूर्ताची आठवण व्हावी. आठवडाभर मुंबई शहरभर ‘वस्त्रहरण’मय वातावरण निर्माण केलं होतं. प्रसादने वडिलांचं खऱ्या अर्थाने स्मारक बांधलं होतं.

१९६२ मध्ये माझ्याकडून लिहिल्या गेलेल्या ‘आज काय नाटक होवचा नाय’ या एकांकिकेचं ‘वस्त्रहरण’ म्हणून नामांतर होतं काय, आणि आपटत-धोपटत गेली ५४ र्वष ‘वस्त्रहरण’ जनमानसात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करतं काय..? हा नाटय़सृष्टीत घडलेला एक चमत्कारच आहे. एक गोष्ट मात्र सूर्यप्रकाशाइतकी सत्य आहे, की पु. ल. देशपांडे जर आम्हाला भेटले नसते तर हा प्रवास होणे केवळ अशक्य होतं! ‘वस्त्रहरण’मुळेच मला अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे. मला मनापासून वाटतं, महाराष्ट्रातील तमाम बोलीभाषांतील नाटकं रंगमंचावर यायला हवीत. ‘वस्त्रहरण’सारखेच त्यांनी विक्रम करायला हवेत. कारण हृदयाची भाषा ही बोलीभाषा आहे. या बोलीभाषा पडद्यामागे लपलेल्या आहेत. त्यांना पडद्यापुढे आणणं ही काळाची गरज आहे.

– गंगाराम गवाणकर
suchita.gawankar@yahoo.com