‘‘कोवळ्या वयात अनाथपणाकडं सरकणारं एकटेपण खूप आलं होतं. मनाचा कोंडमारा व्हायचा. पुस्तकांचा आसरा घावला न् एकटेपण थोडं सुसह्य़ झालं खरं, पण पुस्तकं त्यांचं सांगतात, आपल्या मनातलं कोण ऐकणार? पण वाचनानंच ‘लिहिता येणं’ची जाणीव दिली आणि वाचनातून शिल्लक राहिलेलं अनाथपण लिहिण्यानं संपवलं.. मग लिहिणं हेच जगणं झालं. व्यवहारातलं अस्थैर्य आणि तत्त्वांचं टणकपण यांनी लिहिण्याला अनुभव पुरवले. माणूसपणाची चळवळ चालवणं अशी दिशा ठरली. माणसांनी निव्वळ माणूस व्हावं म्हणून ‘अक्षर मानव’ नावाची चळवळ सुरू केली. राजन खान हे नाव घेतलं. नैतिक समाज तयार व्हावा, यासाठी आपली मौखिक आणि कागदी बडबड उपयोगी पडावी, असं मला वाटतं.’’
वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षी मी लिहायला सुरुवात केली ते गद्य होतं. बरेच लिहिणारे त्यांच्या लिहित्या आयुष्याची सुरुवात कवितेनं करतात, माझी गद्यानं झाली. वयात येताना काही लिहिते जोडीदार मिळाले, ते सगळे कविता करणारे होते. ते आपापसात एकमेकांना कविता ऐकवायचे, खूश करायचे न् खूश व्हायचे. मी गद्य, त्यांच्यात एकटा पडायचो. माझ्या लंब्याचवडय़ा गोष्टी कोण ऐकणार? ‘माझ्या पैल्या कवितेचं नावय..’ असं म्हणून त्यांची मैफल सुरू व्हायची. ‘माझ्या पैल्या कथेचं नावय..’ असं म्हणायची मला सोय नसायची. अख्खी कथा होईपर्यंत थांबणार कोण? मग त्यांच्या बैठकीत टेकता यावं म्हणून आणि इसाळ म्हणून मीही स्वत:वरच्या बळजोरीनं कविता करू लागलो. कविता पाडण्याचा सपाटा. पण मी कविता ऐकवू लागलो की, जोडीदारांची नाकं वाकडी व्हायची. मला वाटायचं, या लोकांना आपल्या कवितेतलं काही कळत नाही. मग त्यांच्या इरेसरीला पडून मी निरनिराळ्या अंकांना कविता पाठवायचो. त्या छापून यायच्या. तेव्हा मोठय़ा तोऱ्यानं त्यांना त्या छापून आलेल्या कविता दाखवायचो अन् या संपादकांपेक्षा तुम्ही शहाणे आहात का, असं विचारायचो.

अशा शे-सव्वाशे कविता छापून आल्या. तेव्हा त्या फुकटच छापल्या जायच्या. मानधन नाही. पण एकदा धक्कादायक गोष्ट घडली. ‘अधिष्ठान’ नावाच्या दिवाळी अंकाकडून कवितेचं थेट पंचवीस रुपये मानधन आलं. त्यानंतर मी अंकांना कविता पाठवणं बंद केलं. आपण बेतीव, बनीव कविता करतो आहोत, आपली कविता काही खरी नाही, याची जाणीव होतीच, त्यामुळे मानधन घेण्याचा संकोच वाटला.
वाचक म्हणून लिहिण्याच्या सर्वच प्रकारांवर प्रेम आहे, पुढं संपादक म्हणून साहित्याचे सगळेच प्रकार छापले प्रेमानं, पण कविता, नाटक, बालवाङ्मय लिहिणं नेहमी अवघड वाटलं. लिहिण्याची भीती नाही वाटली, पण ते लिहिण्यासाठी मेंदूची जी रचना लागते, ती आपल्याकडं नाही याची जाणीव नेहमी राहिली. एका भरात नाटकंही लिहून पाहिली काही, पण एका ठिकाणी पु. ल. देशपांडे यांच्या नावाचा उत्कृष्ट नाटककार असा पुरस्कार मिळाला, तर तो घ्यायलाही गेलो नाही न् नाटकं लिहायची थांबवली.
माझा जीव गोष्टी सांगण्यात रमला. पण गोष्टी सांगण्याची सरधोपट, पारंपरिक शैलीतली गद्य शैली मी अंगीकारली. कविता, नाटक या आकारात मला गोष्ट सांगता नाही आली कधीच. कथा, कादंबरी ही माझी गोष्ट सांगण्याची पसरट, पाल्हाळिक माध्यमं राहिली. मला वाटतं, तोंड आणि शब्द मिळालेत, तर जिवंत आहोत तोवर सारखं बडबड करत राहिलं पाहिजे. या बडबडीच्या इच्छेतूनच मी गोष्टी लिहू लागलो असेन.
**
माणूस हा व्यक्त होण्यासाठीच जन्मतो किंवा व्यक्त होण्यासाठीच जन्म वापरतो. मी लिहिण्यातून व्यक्त होत राहिलो. पण लेखक व्हायचंय असं ठरवून काही लिहिण्यात आलो नाही. अगदी लहानपणी, वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षी लिहायचा नाद लागला. त्या वयात लेखक होण्याची कारकीर्द करता येते असलं काही भान नव्हतं न् ज्ञानही नव्हतं. लिहिणं सापडलं ते वाचण्याच्या नादातून. आठव्या-नवव्या वर्षी वाचायचा नाद सुरू झाला. चुकून बाबुराव अर्नाळकरांची एक रहस्यकथा हातात आली न् करायला काहीच नसल्यानं ती वाचत राहिलो. कळलं काहीच नाही, पण मन रिझल्याची भावना सुरू झाली. मग पुस्तकं शोधू लागलो. पुस्तकं मिळेनाशी झाली की रस्त्यावर सापडणारे रद्दी कागदाचे तुकडे गोळा करून वाचू लागलो. घरात पुस्तकं विकत आणण्याचं वातावरण नव्हतं. मुळात आर्थिक आणि वडीलधाऱ्यांची मानसिक बदहाली! मग स्वस्तातली वाचनालयं पण आली आयुष्यात. बेछूट वाचत सुटलो, हाती लागेल ते, विषयांचं वावडं नाही. विषय महत्त्वाचा नाही, तर पुस्तक हातात असणं महत्त्वाचं.
आज जाणवतं, त्या कोवळ्या वयात जवळजवळ अनाथपणाकडं सरकणारं एकटेपण खूप आलं होतं. घरातले वडीलधारे आपापल्या चिंतांच्या व्यवधानात. दर वर्षी नवं गाव आयुष्यात, त्यामुळं शिणेच्या मैत्रीची सांधेजोड कुणाशीच नाही. मुलांमध्ये मी थोरला. वडील फिरस्तीवर, त्यामुळं आईचा घरातला साथीदार मी. मी नऊ वर्षांचा असल्यापासून वयात येईपर्यंतच्या काळात तिची तीन बाळंतपणं झाली. त्यात तिच्या देखरेखीखाली उरला संसार जमेल तसा सांभाळायचा. बाजारहाट, घरकामं करायची, बाळंतिणीची कामं करायची. घराची परिस्थिती बिकट. त्याच्या झळा लहानपणीच कळू लागल्या. त्यावर सतत मेंदूत प्रतिक्रिया उमटत राहायच्या. कुणाशी तरी व्यक्त व्हावं वाटायचं. आई होती, पण तिच्याशी किती व्यक्त होणार? बोलूनही उरायचंच. अनेक स्वप्नरंजनं असायची, बालपणाची अनेक अपेक्षितं असायची, ती पूर्ण व्हायची नाहीत. मनाचा कोंडमारा व्हायचा. एकटेपणा यायचा. त्याला पुस्तकांचा बरा आसरा घावला न् एकटेपण थोडं सुसह्य़ झालं. तरीही स्वत:ची अभिव्यक्ती अपुरीच राहायची, अधांतरी. पुस्तकं त्यांचं सांगतात, पण आपल्या मनातलं कोण ऐकणार? मनात तर खूप साचतं, ते कुठं बडबडणार? वडील अधूनमधून गोष्टी लिहायचे, त्यांचं पाहून आणि वाचनानं ‘लिहिता येणं’ या कलेची अगदी प्राथमिक जाणीव दिली होती. त्यामुळे मनातल्या खऱ्या, काल्पनिक गोष्टी कागदावर बडबडू लागलो. वाचनातून शिल्लक राहिलेलं अनाथपण लिहिण्यानं संपवलं. कागद आणि शाई जोडीला आले न् मी करत असलेली बडबड मूकपणे सोसू लागले. मग लिहिणं हेच जगणं झालं. त्यात लेखक होण्याचा उद्देश कधीच नव्हता. आजही नाही.
**
राजन खान हे घेतलेलं नाव आहे. वाचनानं मेंदूचा दायरा वाढलाच होता, पण वयात येता येता समाजात वावरण्याचा न् समाज समजण्याचा परिसरही वाढत गेला. आपलं देशी महान वैशिष्टय़ म्हणजे विविध प्रकारच्या भेदांचा बुजबुजाट. सगळी माणूस जातच, पण तिच्यातल्या भेदांची यादी करावी तेवढी थोडी. पुन्हा भेद हिणकस असूनही प्रत्येकाला आपल्या भेदाचा दांडगा अभिमान. भेदाची मोठी शिकवण म्हणजे स्वत:भोवती श्रेष्ठत्वाची आरती ओवाळून घ्यायची न् दुसऱ्याचा द्वेष करायचा, दुसऱ्याला माणूसच न समजणं ही आपली विकृत आणि असहिष्णू परंपरा. ती आधी लोकांच्या, विविध समाजघटकांच्या घरांतून वावरताना लक्षात आली. मग वाचनातून ती जास्त कळू लागली. वयात येताना आणि नंतरच्या काळात विविध सामाजिक, सांस्कृतिक चळवळींशी संबंध येत गेला. वाडी, खंड, मौजा, तालुक्याचं गाव, नगर, महानगर असा प्रत्यक्ष वावर होत राहिला. अनेक जाती, धर्माच्या लोकांमध्ये वावर होत राहिला. नागर समाज, दलित, भटके-विमुक्त, आदिवासींमध्ये वावर होत राहिला. स्त्री-चळवळीशी संबंध आला. यातून भेदांचे अंत:स्तर आणि बाह्य़स्तर कळू लागले. वारकरी, महानुभाव, सुफी संप्रदायांचा संबंध आला. उत्सुकतेपोटी सर्वच धर्माचं साहित्य वाचलं. धर्माच्या लोकांच्या प्रत्यक्ष वर्तणुकी पाहत आलो. वैचारिक चळवळींचे अंतरंग आणि बाह्य़रंग कळू लागले न् लक्षात आलं, सगळेच भेद थोतांड आहेत, नुसतं माणूस म्हणून जगणं आवश्यक आहे. वाटलं, आपण समन्वयाचं काम करणं आवश्यक आहे. म्हणजे आधी आपण प्रत्यक्ष माणूस म्हणून जगणं, बडबडीची नैसर्गिक सुविधा उपलब्ध आहे, तर बडबड माणूस म्हणून करणं, लिहिण्याची बडबडही माणूसपणाची करणं आणि लोकांमध्ये उतरून माणूसपणाची चळवळ चालवणं अशी दिशा ठरली. देशातला सर्वात जहाल झगडा आणि विद्वेष हिंदू-मुसलमानांचा, तर त्यात समन्वयाचं काम अधिक करणं गरजेचं. त्याची सुरुवात स्वत:च्या नावापासून करायची, तर त्यासाठी राजन खान नाव घातलं. (मग भविष्यात या नावाबद्दल होणारे अनेक भेदभावही भोगले.)
१९८१मध्ये पहिल्यांदा नाव छापून आलं. श्रीधर अंभोरे चालवत असलेल्या ‘आदिम’ नावाच्या अंकात कविता छापून आली. तिच्याखाली हे नाव छापलं गेलं. तिथून ते एकमेव, अधिकृत आणि कायदेशीर नाव झालं. (नंतरच्या काळात पत्रकारिता, संपादन करताना अनेक टोपणनावं घेऊन बरंच काही लिहिलं.)
१९८१ मध्येच माणसांनी निव्वळ माणूस व्हावं म्हणून ‘अक्षर मानव’ नावाची चळवळ सुरू केली. जुन्नर तालुक्यातल्या ओतूर नावाच्या गावात तिची सुरुवात झाली. आता महाराष्ट्रभर आणि बाहेही तिचा पसारा आहे. देव, धर्म, जाती, लिंगभेद, भ्रष्टाचार नाकारणं हे तिचं काम आहे.
**
जगणं एकसाची आणि कोशबद्ध झालं नाही. उलटफेर आणि चढउतार खूप होत राहिले त्यात. त्यामुळं जगण्याच्या अनुभवांमध्ये आपोआप विविधता येत गेली. कोणत्याही चाकोरीत मळलो नाही. नित्यनैमित्तिक जगण्याचा अस्थैर्य आणि अनिश्चितता हा स्थायिभाव झाला. पण जगण्याची तत्त्वं आणि आदर्श ठरत गेले, त्यावर मात्र कायम ठाम राहिलो. स्थिर कृती एकच राहिली आयुष्यात, लिहिणं. व्यवहारातलं अस्थैर्य आणि तत्त्वांचं टणकपण यांनी लिहिण्याला अनुभव पुरवले.
शिकण्याचं अगदीच कोवळं वय होतं, तेव्हा पहिली कविता छापून आली. तिच्याखाली नाव छापून आलं. नाव छापून येण्याचा कोण आनंद! आपण कुणी तरी आहोत असं वाटे. हे आपण कुणी तरी आहोत असं दाखवण्याच्या जगातल्या कुठल्याही अपत्याच्या पहिल्या जागा असतात त्या वडील आणि आई. विशेषत: वडील (पुरुषप्रधान वातावरणात मानसशास्त्रीयदृष्टय़ा मुलांची वडिलांशीच स्पर्धा असते. काहीही केलं की, आपणही काही कमी नाही, हे पहिलं त्यांनाच दाखवावंसं वाटतं.) तर धावतच नाव छापून आलेला अंक घेऊन वडिलांकडं गेलो. ‘बघा बघा’ म्हणालो. तर नावावर क्षणक नजर टाकून त्यांनी अंक दूर फेकून दिला न् म्हणाले, ‘असले उद्योग करण्यापेक्षा काही तरी कमवायचं बघा.’ तो पहिलाच क्षण छापून आलेल्या नावाचा मोह संपण्याचा होता. तो मोह कधीच वाटला नाही पुढं. त्यांनी फेकलेला अंक उचलायलाही गेलो नाही. तो आईनं जपून ठेवला. वडिलांना नंतर कधीच काही लिहिलेलं दाखवायला गेलो नाही आणि आयुष्यात घडणारं काही स्वत:हून सांगायलाही गेलो नाही. तिथून वडिलांचा आर्थिक आधारही अव्हेरला. मग खरंच कमवायला निघालो. (पण म्हणून वडिलांचा द्वेष वाटला असं झालं नाही. उलट त्यांच्या आडव्या वागण्यानं आयुष्याचे आडवेतिडवे अनुभव घेण्याचं बळ दिलं. त्यांना पोराचं कौतुक वाटतं, हे भोवतीच्या इतर लोकांकडून कळत राहिलं. मी कवी कधीच झालो नाही, लिहिल्या कथा-कादंबऱ्या, पण वडील आयुष्यभर कविराज म्हणून हाकारत राहिले कौतुकानं.)
मग जगण्यासाठी अनेक उपद्व्याप केले. शेती केली, थोडी मास्तरकी केली, मुंबईत जाऊन मजुरी केली, कारखान्यात कामगारकी केली, पत्रकारिता केली, संपादक झालो. वेडंवाकडं जगलो. झोपडपट्टीत राहिलो, चाळीत राहिलो न् बंगल्यातसुद्धा राहिलो. वडील आणि आई कुणाचं मिंधं व्हायचं नाही न् प्रामाणिक राहायचं या रेषेवर जगणारे होते. वेडय़ावाकडय़ा जगण्यात वारसा म्हणून मिळालेली ती सरळ रेष कधी सोडली नाही. आपण आणि आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांचं दोन वेळाचं पोट भरणं एवढय़ा माफक अपेक्षेचं जगत राहिलो. व्यवहारी गरजा आणि स्वप्नं साधी, छोटी राहिली. कायम आपकमाईचं खाल्लं, हरामाचं नाही. खरं जगायचं. खोटं नाही, असं ठरत गेलं न् तसंच जगत आलो. भव्य स्वप्न पाहिलं ते माणूसपणाच्या चळवळीचं. जगातला प्रत्येक माणूस भेदरहित झाला पाहिजे, असं ते स्वप्न.
**
कधी कधी शंका येते, आपण आजच्या मानवी काळाला विसंगत आहोत की काय? आजच्या वयात लक्षात येतं, माणसं नैतिक मूल्यांच्या बाबतीत दुहेरी जगतात. आत एक, बाहेर एक. वाचनात नैतिकतेच्या, आदर्शाच्या गोष्टी खूप आल्या. वाचलेलं खरं मानायची एक सवय आणि दुसरं म्हणजे घरच्या, बाहेरच्या काही माणसांचे झालेले काही चांगले संस्कार, यांनी माणसानं आतबाहेर एकच असावं, पारदर्शी जगावं असं काही शिकवलं. पण ही शिकवण भाबडी आणि काळाला विसंगत आहे असं भवताल पाहताना वाटतं. त्यानं चिडचिड होते न् ती चिडचिड लिहिण्यात येते.
दुसरी गोष्ट, आपल्या देशी वातावरणातल्या भेदांच्या बुजबुजाटाची. समोर माणसासारखा माणूस दिसत असूनही त्याला निव्वळ माणूस मानायची कुणाचीच तयारी नाही. त्याची ओळख आधी त्याच्या भेदांनीच होणार. साहित्यालासुद्धा या भेदांनी आपल्या पछाडीत घेतलेलं. तुमची अस्मिता काय न् तुमची भूमिका काय असं प्रत्येक लिहिणाऱ्याला विचारलं, तपासलं जातं. आपण म्हणालो, मला कसलीच अस्मिता नाही, तर आश्चर्यानं पाहिलं जातं. अस्मितेचा अर्थ म्हणजे भेदाचा प्रकार सांगणं. तीच तुमची लेखक असण्याची ओळख. पण मला कधीच लेखक व्हायचं नव्हतं न् आजही व्हायचं नाहीय. त्यामुळे कुठली भेदिक अस्मिताही मजकडं नाही. मला फक्त डोक्यात येणारं, चालणारं बडबडायचं होतं. कुणाशी तरी बोलावंसं वाटणं म्हणजे लिहिणं. मी फक्त माणूस म्हणून जगतो, तर तेच मला बोलावंसं वाटलं. आपण जे जगतो किंवा आपल्याला जे जगावंसं वाटतं, ते लिहिण्यात येतं. आपण जगण्यासाठी जी तत्त्व ठरवून घेतो किंवा संस्कारांतून उचलतो, तीच आपल्या जगण्याची भूमिका होऊन लिखाणात येते आणि तीच आपल्या लिहिण्याची अस्मिता होते. मला केवळ भेदरहित आणि नैतिक माणूस म्हणून जगायचं होतं, जगतही आलो, तर हीच माझ्या लिहिण्याची भूमिका आणि अस्मिता असणार.
देव, धर्म, जाती, पंथ, वर्ण, संप्रदाय, लिंगभेद, प्रदेशभेद मला झूट वाटत आले. त्यांनी जगभर घातलेला वैराचा, विद्वेषाचा धुमाकूळ नकोसा वाटत आला. हे काल्पनिक भेद आहेत, पण ते वास्तव असतात असं समजणारे लोक मनोरुग्ण असतात न् मृत्यूला घाबरणारे असतात. एक वेळ त्यांनी स्वत:पुरतं तसं समजायला हरकत नाही, पण ते या भेदांची हत्यारं करून एकमेकांवर तुटून पडतात किंवा दुसऱ्यांना आपल्यापेक्षा नीच समजतात, तर या गोष्टी मला किळसवाण्या वाटतात न् त्याविरुद्ध माझा झगडा सुरू होतो. हा झगडा मी माझ्या व्यक्तिगत पातळीवर, माझ्या लिहिण्यात, माझ्या भाषणांमध्ये, माझ्या ‘अक्षर मानव’च्या चळवळीत करत राहतो. पण हा भेदांशी चाललेला झगडा द्वेषाचा नाही, तर समजुतीचा आहे, जगातली सगळी माणसं आपलीच असल्यानं हा झगडा आपुलकीचा आहे आणि मला विश्वास आहे, आपण आपल्या बोलण्यातून, लिहिण्यातून निष्ठेनं चालवत राहिलो, तर पुढच्या कुठल्या तरी काळात माणसं निखळ माणूस आणि नैतिक माणूस म्हणून जगू लागतील. आपल्यामुळं भोवतीच्या कुणालाही कसलाही त्रास होणार नाही, एवढी दक्षता घेत राहणं म्हणजे मानवी नैतिकता, असं मला वाटतं. तसा नैतिक समाज तयार व्हावा, यासाठी आपली मौखिक आणि कागदी बडबड उपयोगी पडावी, असं मला वाटतं.
**
लेखक म्हणून ओळख मिळवायची असोशी नसल्यानं, साहित्याच्या पुस्तकी निकषांची पथ्यं पाळली नाहीत. मेंदूत येतं, ते, त्या त्या वेळच्या मेंदूच्या आकलनानुसार कच्चंपक्कं कसंही लिहिलं. मात्र प्रत्येक गोष्ट मनापासूनच लिहिली. आपण लिहीत असलेल्या गोष्टीचं श्रेय काय मिळेल याची पर्वा केली नाही. मराठी साहित्यसृष्टीतल्या जातीय, धार्मिक, पंथीय, वैचारिक, लैंगिक टोळीबाज भेदांमध्ये अडकलो नाही. मोकळा आणि एकटा राहिलो. आपल्याला साहित्य कळतं असा दावा कधी केला नाही. (साहित्याची अंतिम व्याख्या कुणालाच करता येत नाही. प्रत्येकाची आपापली एक व्याख्या असते, पण ती सार्वजनिक आणि सार्वकालिक कधीच नसते. ती सापेक्ष असते. त्यामुळं ‘आपल्याला साहित्य कळतं’ असं कुणी ठाम म्हणालं की त्याला मनातून हसत राहिलो.) संपादक राहिलो. संपादनातही कुणाचंही वाट्टेल ते छापत राहिलो. ‘काय म्हणायचंय ते वाचणाऱ्यांना कळेल ना’ एवढाच एक निकष इतरांच्या लिखाणाला लावला. बाकी लिहिणाऱ्याला जे म्हणायचंय ते म्हणू दिलं. त्यात संपादक म्हणून कसलेही भेद घेऊन आडवा उभा राहिलो नाही. संपादक म्हणून साहित्याचा अंतिम ‘व्याख्याता’ झालो नाही. वाचणारे आणि लिहिणारे यांच्यातला मध्यस्थ झालो. साहित्य चांगलं की वाईट हे काळ आणि अदृश्य चेहऱ्याचा समाज ठरवील असं म्हणत राहिलो.
हेच म्हणणं स्वत:च्याही लिहिण्याला लावलं. त्यामुळं कसल्याच ‘व्यक्तिगत’ टोळीबद्ध व्याख्येत न अडकता, पण माणूस चांगला माणूस झाला पाहिजे या कळवळ्याचं लिहीत राहिलो. आपल्याच धुनकीत बडबडायचं असल्याने आणि बडबडणं हे नैसर्गिकच मिळालं असल्याने मनमोकळं बडबडत राहिलो कागदावर. या बडबडीतून तात्त्विक मिळकत मिळवायची होती, त्यामुळं व्यावहारिक काही मिळकत मिळते की नाही, याच्या तृप्ती-अतृप्तीच्या लचांडात अडकलो नाही. तरीही माझी ही बडबड वाचणाऱ्या समाजानं त्याल जमेल तसा प्रतिसाद दिलाच. माझ्या लिहिण्याची कसलीही जाहिरात न होता, कसले समारंभ न होता आणि माझ्याकडून काही मिळवायचे प्रयत्न न होतासुद्धा वाचणाऱ्या समाजानं स्वत:हून बरंच काही पदरात टाकलं. महत्त्वाचं म्हणजे मी म्हणत असलेलं वाचलं. माझ्या भूमिकेलाही पाठिंबा दिला. माझ्या चळवळीत माणसं आली. अनेक अभिवाचनं, एकांकिका, नाटकं, चित्रपट झाले माझ्या लिहिण्यावर. अनेक पुरस्कार मिळाले. मला खूप महत्त्वाची वाटणारी गोष्ट म्हणजे, ज्याचं लिहिणं वाचत मी मोठा झालो, माझा पिंड ज्यांच्या लिहिण्यावर पोसला, अशा मराठीतल्या बहुतेक ज्येष्ठांनी मी लिहिण्यात आल्यावर स्वत:हून माझ्याशी संपर्क करून ‘आम्ही तुझं वाचत असतो, आवडतं’ हे कळवलं. लिहिण्याबाहेरच्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या अनेक दिग्गज मंडळींनीही माझ्या लिहिण्यावरचं प्रेम व्यक्त केलं. एका जाहीर कार्यक्रमात विजय तेंडुलकर आणि मी एकत्र होतो. माझ्या गैरसमजानुसार मी त्यांचा पहिला जाहीर उल्लेख ‘बाबा’ असा केला, तर ते त्यांच्या भाषणात माझ्या लिहिण्याचं कौतुक करत म्हणाले, ‘अरे, तू काय आम्हाला बाप म्हणतोस? तू आमच्या सगळ्यांचा बाप आहेस’. हा बापमाणसाकडून लेकराला मिळालेला सर्वोच्च पुरस्कार! लिहिण्यानं जन्म धन्य झाला.

premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
Ashwini Kalsekar On Not Having Kids
“तेव्हा सरोगसीची फॅशन नव्हती अन् पैसेही नव्हते…”, मूल नसण्याबाबत मराठमोळ्या अश्विनी काळसेकर यांचे वक्तव्य

 

– राजन खान
साहित्यिक , सामाजिक कार्यकर्ते
aksharmanav@yahoo.com

Story img Loader